ब्रिटनच्या राजघराण्यातील सून केट मिडल्टन यांनी अलीकडेच लंडनमधील एका मद्यनिर्मिती केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी वाईन आणि बीअरची चव चाखण्यास नम्रपणे नकार दिला. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर मी मद्यपान जवळपास बंद केले आहे. आता मला याबाबत खूपच जागरूक राहावे लागत असल्याचे त्यांनी उपस्थितांना सांगितले. २०२४ मध्ये केट मिडल्टन यांना कर्करोगाचे निदान झाले होते. दोन वर्षांच्या उपचारादरम्यान त्यांनी या जीवघेण्या आजारावर मात केल्याचे सांगितले जाते. यादरम्यान केट यांनी केलेल्या विधानामुळे महिलांमधील कॅन्सरचा धोका आणि मद्यपान हा विषय पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. त्याविषयीचा हा आढावा…
मद्यपान शरीरासाठी कसे हानिकारक?
दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी काही महिला किंवा पुरुष रात्री मद्यपान करतात. त्याकडे तणाव कमी करण्याचे साधन म्हणूनही पाहिले जाते. मात्र, सातत्याने मद्यपान केल्यास कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. मद्यपान आणि विविध प्रकारच्या कर्करोगाचा थेटपणे संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्करोगाच्या धोक्याच्या दृष्टीने मद्यपानाचे कोणतेही प्रमाण सुरक्षित मानले जाऊ शकत नाही, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. त्याशिवाय संघटनेच्या संशोधन विभागाने अल्कोहोलचे अत्यंत घातक अशा ‘ग्रुप १ कार्सिनोजेन’ श्रेणीत वर्गीकरण केले गेले आहे. कर्करोगाचा धोका निर्माण करणाऱ्या पदार्थांची ही सर्वांत उच्च श्रेणी मानली जाते. त्यामध्ये मद्यपानाचा समावेश तंबाखू आणि अॅस्बेस्टॉससारख्या पदार्थांबरोबर करण्यात आला आहे, ज्यांचा कर्करोगाशी थेट आणि ठोस वैज्ञानिक संबंध असल्याचे सिद्ध झाले आहे.
मद्यपानामुळे कर्करोगाचा धोका कसा वाढतो?
तज्ज्ञांच्या मते, मद्यपानामुळे विविध प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. महिलांमध्ये विशेषतः स्तनांचा कर्करोग हा सर्वांत मोठा चिंतेचा विषय मानला जातो. कमी प्रमाणात मद्यपान केल्यानेही स्तनांच्या कर्करोग होऊ शकतो. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे मद्यपानामुळे शरीरातील इस्ट्रोजेन आणि इतर हार्मोन्सची पातळी वाढते. हे हार्मोन्स शरीरातील ट्यूमर किंवा कर्करोगाच्या गाठींच्या वाढीसाठी कारणीभूत ठरतात. त्याव्यतिरिक्त मद्यपानामुळे पचनसंस्था आणि चयापचय क्रियेशी संबंधित अनेक महत्त्वाच्या अवयवांच्या कर्करोगाचाही धोका वाढतो. त्यामध्ये तोंडाचा कर्करोग, घशाचा कर्करोग, यकृता कर्करोग आणि मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचा समावेश आहे.
आणखी वाचा : Cognitive Shuffling : मेंदूला शांत करून झोप आणणारे हे खास तंत्र तुम्हाला माहितीये का? संशोधन काय सांगते?
मद्यपानाचा पेशींवर कसा परिणाम होतो?
मद्यपानाचा शरीरावर होणारा परिणाम अनेक घटकांवर आधारित असतो. मद्यपानामुळे शरीरात ॲसिटाल्डीहाईड नावाचे अत्यंत विषारी रसायन तयार होते. हे रसायन शरीराची पेशी दुरुस्त करण्याची क्षमता नष्ट करते. त्याशिवाय मद्यपानामुळे शरीरात ‘फ्री रॅडिकल्स’ नावाचे घातक घटक तयार होतात, जे निरोगी उतींना कमकुवत करून, कर्करोगासारख्या गंभीर आजाराला निमंत्रण देऊ शकतात. शरीरातील दाह वाढून हानिकारक ‘फ्री रॅडिकल्स तयार होतात आणि शरीरातील ऊती इतर कॅन्सरकारक घटकांसाठी अधिक संवेदनशील बनतात. विशेषतः तोंड आणि घशामध्ये, मद्यपानामुळे सिगारेटच्या धुरातून येणारे घातक कॅन्सरकारक घटक अधिक सहजपणे शोषले जातात. जे लोक मद्यपानाबरोबर धूम्रपानही करतात, त्यांना तोंड आणि घशाच्या कर्करोगाचा धोका कित्येक पटींनी जास्त असतो. मद्यपान हे केवळ एक व्यसन नसून, ते शरीरातील पेशींना आतून पोखरण्याचे काम करते. कर्करोगाच्या पेशींना वाढण्यासाठी पोषक वातावरण तयार होणे हा मद्यपानाचा सर्वांत मोठा दुष्परिणाम असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी काय करावे?
मर्यादित मद्यपान हृदयासाठी फायदेशीर असू शकते, असे वर्षानुवर्षे सांगितले जात होते. मात्र, नवीन संशोधनाने हा दावा पूर्णपणे खोडून काढला आहे. मद्यपानामुळे हृदयाला होणाऱ्या थोड्याशा फायद्यापेक्षा त्यामुळे कर्करोगाचा धोका कितीतरी पटींनी जास्त असतो. त्यामुळेच आता अनेक देशांनी मद्याच्या जाहिरातींवर त्याबाबत नमूद करणे बंधनकारक केले आहे. कर्करोगाचा धोका पूर्णपणे टाळण्यासाठी मद्यपान न करणे हाच सुरक्षित पर्याय असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यांनी नियमित मद्यपान करणाऱ्या लोकांना काही महत्त्वाच्या बाबी सांगितल्या आहेत. दररोज मद्यपान न करता कधीतरी करावे, अतिमद्यपान करणे टाळावे, मद्यपान करताना त्यात कोणतेही शीतपेय मिसळू नये, मद्यपान करायचे असल्यास जास्त पाणी घ्यावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
हेही वाचा : Blackout Challenge : ‘ब्लॅकआउट चॅलेंज’ म्हणजे नेमके काय? त्यामुळे लहान मुलांना का गमवावा लागतोय जीव?
मद्यपानामुळे भारतात कर्करोगाचे किती रुग्ण?
वाढत्या मद्यपानाच्या सवयीमुळे भारतातील कर्करोग ग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे विविध आरोग्य अहवालांतून समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि ‘इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर’ यांच्या अंदाजानुसार, मद्यपानामुळे दरवर्षी भारतात ५०,००० ते ७०,००० लोकांना कर्करोग होत आहे. त्यामध्ये सुमारे ३०,००० हून अधिक रुग्णांना आपले प्राण गमावावे लागत आहे. मद्यपानामुळे होणाऱ्या कर्करोगाचे प्रमाण पुरुषांमध्ये सर्वाधिक आहे. कर्करोगाच्या एकूण रुग्णांपैकी सुमारे १० ते १५ टक्के पुरुषांचा मद्यपानाशी संबंध असतो. तंबाखू आणि मद्यपान या दोन्हीच्या एकत्रित सेवनामुळे तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे. मद्यामुळे अन्ननलिकेच्या पेशींचे नुकसान होऊन तिथे गाठी तयार होतात आणि मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचा धोका वाढतो, त्यामुळे तरुणांसह महिलांनी मद्यपानापासून दूर राहावे, असे आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केले आहे.
