How to Quit Alcohol and Smoking: व्यसनाधीनता फक्त मुलांपुरती मर्यादित राहिलेली नसून मुलीसुद्धा व्यसनांच्या आहारी जात असल्याचे विविध अहवाल सांगतात. आज देशातील लाखो तरुण-तरुणी मद्यपान, तसेच धूम्रपानाच्या विळख्यात अडकल्याचे दिसून येतात. या व्यसनापायी आजवर अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त झाल्याच्या कथा गावागावांत ऐकायला मिळतात. अनेकांच्या आयुष्यात एखाद्या व्यसनाची सुरुवात आनंदाच्या क्षणाने किंवा मनावरचा ताण हलका करण्याच्या बहाण्याने होते; पण ही सवय कधी एखाद्या जीवघेण्या आजारात बदलते हे त्या व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबाला समजतच नाही. यादरम्यान व्यसनाधीनता सोडायची झाल्यास मद्यपान सोडण्यापूर्वी धूम्रपान सोडावे की धूम्रपान सोडण्यापूर्वी मद्यपान, असा प्रश्न आजही अनेकांना पडतो. त्याविषयी तज्ज्ञ काय सांगतात? जाणून घेऊ…
मद्यपान की धूम्रपान, आधी काय सोडावे?
दारूचे व्यसन आधी सोडावे की धूम्रपान- याबाबतचा कोणताही वैश्विक नियम नसल्याचे दिल्लीतील शालिमार बाग येथील फोर्टिस रुग्णालयातील मूत्रपिंड विकाराचे तज्ज्ञ डॉ. भानू मिश्रा यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले. त्यांच्या मते, मद्यपान सोडण्यापूर्वी धूम्रपान सोडावे की धूम्रपान सोडण्यापूर्वी मद्यपान याचे एकच ठरावीक उत्तर सर्वांसाठी लागू होत नाही. हा निर्णय संबंधित व्यक्तीच्या व्यसनाचे स्वरूप आणि त्याच्या आरोग्य स्थितीवर अवलंबून आहे. व्यसनापासून मुक्त होण्याचा निर्णय प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळा असला तरी सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने धूम्रपान हे अधिक गंभीर आणि जीवघेणे व्यसन आहे. धूम्रपानामुळे फुप्फुसाचा कर्करोग, हृदयरोग, पक्षाघात (स्ट्रोक) तसेच इतर अनेक गंभीर आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. अगदी अधूनमधून केलेले धूम्रपानदेखील आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते. तंबाखूच्या सेवनाची ‘सुरक्षित मात्रा’ अशी कोणतीही संकल्पना नाही, असेही डॉ. मिश्रा यांनी नमूद केले.
व्यसनामुळे आरोग्यावर काय परिणाम होतात?
दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी काही महिला किंवा पुरुष रात्री मद्यपान करतात. त्याकडे तणाव कमी करण्याचे साधन म्हणूनही पाहिले जाते. मात्र, नियमित आणि दीर्घकाळ मद्यपान केल्यास त्याचे शरीराच्या प्रत्येक अवयवांवर नेमके काय परिणाम होतात याची कल्पना अनेकांना नसते. दारू ही शरीरासाठी एका संथ विषाप्रमाणे काम करते आणि त्यामुळे अनेक आजार उद्भवू शकतात, असा इशारा डॉ. मिश्रा यांनी दिला. त्यांच्या मते, अति प्रमाणात मद्यपान केल्यास यकृत (लिव्हर) आणि स्वादुपिंडाशी संबंधित आजार, उच्च रक्तदाब, हृदयविकार, विविध प्रकारचे कर्करोग, मानसिक आरोग्याच्या समस्या, तसेच अपघात आणि दुखापतींचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. दारू आणि कर्करोग यांच्यातील संबंधाबाबतही संशोधनातून महत्त्वाचे निष्कर्ष समोर येत आहेत. सध्याच्या संशोधनानुसार, कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी मद्यपानाचे कोणतेही प्रमाण पूर्णपणे सुरक्षित मानले जाऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
धूम्रपान आरोग्यासाठी सर्वाधिक घातक
नियमित धूम्रपान आणि मद्यपान करणाऱ्या व्यक्तींनी शक्य तितक्या लवकर या दोन्ही व्यसनांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करायला हवा. ही दोन्ही व्यसने एकत्र असल्यास त्यांचा शरीरावर परस्परपूरक परिणाम होतो. त्यामुळे तोंड, घसा व अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका केवळ एकाच व्यसनाच्या तुलनेत अनेक पटींनी वाढतो. काहींसाठी कदाचित धूम्रपान आणि मद्यपान एकाच वेळी सोडणे कठीण वाटू शकते; पण अशा परिस्थितीत सर्वसाधारणपणे आधी धूम्रपान सोडण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा आरोग्याच्या दृष्टीने मोठा फायदा होतो. धूम्रपान सोडल्याचे फायदे जवळपास तत्काळ दिसू लागतात. काही आठवड्यांतच शरीरातील रक्ताभिसरण आणि फुप्फुसांचे कार्य सुधारते. तसेच कालांतराने हृदयविकार, पक्षाघात आणि कर्करोगाचा धोका सातत्याने कमी होत जातो, असेही डॉ. मिश्रा यांनी सांगितले. मात्र, व्यसनमुक्तीसाठी एकच उपाय सर्वांवर लागू होत नाही, या मुद्द्यावरही त्यांनी प्रकाश टाकला.
व्यसनापासून दूर कसे जायला हवे?
धूम्रपान असो किंवा मद्यपान, कोणतेही व्यसन सोडणे हा सकारात्मक निर्णय आहे. मात्र, उपचाराची रणनीती प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार ठरवली पाहिजे. एखाद्या व्यक्तीची निकोटीन आणि मद्यावरील अवलंबित्वाची तीव्रता, रुग्णाची व्यसन सोडण्याची तयारी, मानसिक आरोग्य आणि इतर आजारांचा विचार करूनच आरोग्यतज्ज्ञ योग्य उपचाराची योजना आखतात. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेतल्यास दीर्घकाळ व्यसनमुक्त राहण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढते, असेही त्यांनी सांगितले. व्यसनाधीन व्यक्तीचे समुपदेशन, निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी, मद्यपान कमी करण्यासाठीची औषधे, तसेच वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध उपचारपद्धती यांचा अवलंब केल्यास व्यसनमुक्ती यशस्वी होण्याची आणि ती दीर्घकाळ टिकून राहण्याची शक्यता अधिक असते, असा निष्कर्षही डॉ. मिश्रा यांनी मांडला आहे.
दारू-सिगारेटमुळे दरवर्षी अनेकांचा मृत्यू
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, जगभरात दरवर्षी लाखो नागरिकांचा तंबाखू, विडी, सिगारेट आणि मद्यपानाशी संबंधित कारणांमुळे मृत्यू होतो. भारतातही विशेषतः तरुण वर्गामध्ये या व्यसनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. मद्यामुळे अन्ननलिकेच्या पेशींचे नुकसान होऊन तिथे गाठी तयार होतात आणि मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचा धोका वाढतो. तसेच तंबाखू, विडी आणि सिगारेटमुळे फुप्फुसांचा किंवा तोंडाचा कर्करोग होतो. त्यामुळे तरुणांसह महिलांनी या व्यसनांपासून दूर राहावे, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देतात. दारूचे सेवन बंद केल्याने केवळ यकृतालाच नव्हे, तर हृदयाच्या आरोग्यालाही मोठा फायदा होतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या आकडेवारीनुसार, भारतातील जवळपास प्रत्येकी चार प्रौढांपैकी एक व्यक्ती उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहे. हा आजार दीर्घकालीन गंभीर आरोग्य समस्यांचा धोका वाढवू शकतो. मद्यपान कमी करणे यासारखे जीवनशैलीतील छोटे बदलही हृदयविकाराचा धोका कमी करण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात.
दारू सोडल्यानंतर शरीरात काय बदल होतात?
दारू सोडल्यानंतर सर्वांत पहिला आणि ठळकपणे जाणवणारा फायदा म्हणजे झोपेची गुणवत्ता झपाट्याने सुधारते आणि वजनही नियंत्रणात येते. त्याचप्रमाणे रक्तदाब नियंत्रित होतो, यकृताचे कार्य सुधारते, पचनक्रिया चांगली होते आणि एकंदरीत शरीरात अधिक ऊर्जा निर्माण होते. अल्कोहोलमध्ये प्रति ग्रॅम सात कॅलरीज असतात. चरबीनंतर सर्वाधिक कॅलरीज देणारा हा घटक असून, त्यामध्ये आवश्यक पोषक तत्त्वांचा अभाव असतो. त्यामुळे दारूमधून शरीरात मोठ्या प्रमाणात ‘लपलेल्या’ कॅलरीज जातात. मद्यपान बंद केल्यास एकूण कॅलरीजचे सेवन कमी होते आणि हळूहळू वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. काही लोकांमध्ये दारू सोडल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रणात राहते, तसेच भूक अचानक वाढणे किंवा कमी होणे यांसारख्या समस्या कमी झाल्याचेही दिसून येते. तज्ज्ञांच्या मते, दारू सोडण्याचे आरोग्याला अनेक फायदे असले तरी वर्षानुवर्षे अति मद्यपान करणाऱ्यांनी अचानक दारू पिणे पूर्णपणे बंद करणे नेहमीच सुरक्षित नसते. दीर्घकाळ मोठ्या प्रमाणात मद्यपान करणाऱ्यांनी व्यसनापासून अचानक दूर जाण्याचा प्रयत्न केल्यास ‘अल्कोहोल विड्रॉवल सिंड्रोम’ उद्भवू शकतो. त्यामध्ये तीव्र चिंता वाटणे, हात-पाय थरथरणे, प्रचंड घाम येणे, उलट्या होणे व झोप न येणे अशी लक्षणे दिसतात. त्यामुळेच व्यसनापासून दूर जाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
