Ali Khamenei death news and legacy of Iran’s supreme leader: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या वृत्तामध्ये तथ्य असल्याचे इराणी माध्यमांनी म्हटले आहे. यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल-अमेरिका संयुक्त कारवाईत खामेनी ठार झाल्याचा दावा केला होता. खामेनी यांच्या ‘शहादती’च्या स्मरणार्थ इराणने ४० दिवसांचा सार्वजनिक शोक आणि सात दिवसांच्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर गेल्या साडेतीन दशकांपासून इराणचे नेतृत्व करणाऱ्या या नेत्याच्या राजकीय प्रवासाबद्दल आणि त्यांनी घडवलेल्या इराणविषयी जाणून घेणे महत्त्वाचे ठरावे.

इराणमध्ये सर्वोच्च नेत्याकडे नेमकी किती सत्ता असते?

इराणच्या धर्माधिष्ठित (थिओक्रॅटिक) व्यवस्थेत सर्वोच्च नेता हे देशातील सर्वात प्रभावशाली पद आहे. राष्ट्रपती, संसद आणि न्यायपालिका यांच्याही वर त्याचे स्थान असते. खामेनी यांच्याकडे सशस्त्र दलांचे सर्वोच्च नियंत्रण होते. न्यायव्यवस्थेचे प्रमुख, राज्य नियंत्रित माध्यमांचे प्रमुख तसेच महत्त्वाच्या सुरक्षा संस्थांचे प्रमुख नेमण्याचा अधिकार त्यांच्याकडे होता. निवडून आलेल्या अधिकाऱ्यांना पदच्युत करणे, संसदेकडून मंजूर केलेले कायदे रोखणे किंवा बदलणे, तसेच युद्ध किंवा शांततेची घोषणा करणे यांसारखे निर्णायक अधिकार त्यांच्या हातात होते. त्यांचे नियंत्रण परराष्ट्र आणि लष्करी धोरणांपर्यंत विस्तारलेले होते. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कोअर (IRGC) आणि त्याची परदेशी कारवाया पाहणारी कुद्स फोर्स यांच्या माध्यमातून इराणच्या प्रादेशिक धोरणांवर त्यांचा प्रभाव राहिला.

विलायत-ए-फकीह सिद्धांत

इराणमध्ये सर्वोच्च नेत्याचे पद ‘विलायत-ए-फकीह’ या सिद्धांतावर आधारित आहे. विलायत-ए-फकीह म्हणजे ‘धर्मतज्ज्ञाचे पालकत्व’. या तत्त्वानुसार एका धर्मगुरुला इस्लामी राज्यावर सर्वोच्च सार्वभौम सत्ता दिली जाते. हा सिद्धांत अयातुल्ला अली खामेनी यांचे पूर्वसूरी अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांनी मांडला आणि १९७९ च्या राज्यघटनेत त्याचा समावेश करण्यात आला.

अयातुल्ला अली खामेनी कोण होते?

अयातुल्ला अली खामेनी यांचा जन्म १९३९ साली इराणच्या उत्तरेकडील मशहद शहरात झाला. ते आठ भावंडांपैकी दुसरे होते. त्यांचे वडील एक धर्मगुरू होते आणि त्यांची कौटुंबिक परिस्थिती सर्वसामान्य होती. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत खामेनी यांनी धर्मशास्त्राचे शिक्षण घेतले. १९५८ ते १९६४ दरम्यान त्यांनी कोम येथे धार्मिक अध्ययन केले आणि १९६२ साली अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांच्या शाहविरोधी चळवळीत ते सहभागी झाले.

शाहच्या राजवटीदरम्यान त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला. १९७९ च्या इस्लामी क्रांतीनंतर ते प्रमुख नेत्यांपैकी एक म्हणून उदयास आले. १९८१ ते १९८९ या काळात त्यांनी इराणचे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले आणि इराण-इराक युद्धाच्या काळात देशाचे नेतृत्व केले. १९८९ साली अयातुल्ला खोमेनी यांच्या निधनानंतर खामेनी यांनी सर्वोच्च नेतेपद स्वीकारले.

वैचारिक विविधतेचा प्रभाव

खामेनी यांच्या सुरुवातीच्या आयुष्यावर वैचारिक विविधतेचा प्रभाव दिसून येतो. त्यांनी इराणी बुद्धिजीवींशी संवाद साधला आणि धर्मनिरपेक्ष तसेच इस्लामी विचारांचा अभ्यास केला. साहित्याची त्यांना विशेष आवड होती. फ्रेंच लेखक व्हिक्टर ह्यूगो यांच्या ले मिजेराब्ल्स या कादंबरीचे त्यांनी विशेष कौतुक केले होते. २००४ साली राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी या कादंबरीला ‘इतिहासातील सर्वोत्तम कादंबरी’ असे संबोधले आणि “ले मिजेराब्ल्स एकदा वाचा.. ही कादंबरी लेखनाच्या जगातील चमत्कार आहे,” असे ते म्हटले होते.

खामेनी काय मानत होते?

अयातुल्ला अली खामेनी यांची विचारसरणी इस्लामी तत्त्वांवर आधारित होती आणि त्यांनी पाश्चिमात्य उदारमतवाद व भांडवलशाहीवर तीव्र टीका केली. त्यांच्या मते, पश्चिमेकडील व्यवस्था भौतिकतावादी आणि इस्लामविरोधी प्रवृत्तीची आहे. तरीही ते पूर्णपणे पाश्चिमात्यविरोधी नव्हते. १९९९ साली तरुण इराणी नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी म्हटले होते की, “पाश्चिमात्य संस्कृती ही चांगल्या आणि वाईट गोष्टींचा संगम आहे. शहाणी राष्ट्रे चांगल्या गोष्टी स्वीकारतात आणि त्या आपल्या संस्कृतीत मिसळतात, तर वाईट गोष्टी नाकारतात.”

नैतिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या प्रगत इराण घडवणे हा उद्देश

त्यांच्या मते, पाश्चिमात्य देश फक्त पैसा-संपत्ती आणि भौतिक प्रगतीकडे लक्ष देतात. एका बैठकीत त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, “पश्चिम फक्त भौतिक बाजूकडे पाहते.” खामेनी यांना वाटत होते की, इस्लामी संस्कृती केवळ विकास किंवा संपत्तीपुरती मर्यादित नाही. त्यात न्याय, प्रार्थना, स्वातंत्र्य आणि परमेश्वराशी नाते जोडणे यांसारखी मूल्येही महत्त्वाची आहेत. त्यामुळे त्यांचा उद्देश फक्त मजबूत आणि शक्तिशाली इराण उभा करणे नव्हता, तर नैतिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या उंचावलेला इराण घडवणे हा होता.

सैय्यद कुत्ब यांचा प्रभाव

खामेनी यांच्यावर इजिप्तचे इस्लामी विचारवंत सैय्यद कुत्ब यांचा प्रभाव होता. कुत्ब यांनी “इस्लामशिवाय मुस्लिम राष्ट्र आणि शासनाशिवाय इस्लाम निरर्थक आहे” असे मत मांडले होते. तसेच इस्लामी क्रांतीचे प्रणेते अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी हे त्यांचे प्रमुख वैचारिक मार्गदर्शक होते.

खोमेनींप्रमाणेच अयातुल्ला अली खामेनी हे अमेरिकेविषयी आणि इस्रायलबाबत कठोर भूमिकेसाठी ओळखले जात. खोमेनी यांनी अमेरिकेला ‘ग्रेट सॅटन’ आणि इस्रायलला ‘लिटल सॅटन’ असे संबोधले होते. २०१० साली फ्लोरिडातील एका पाद्रीने कुराण जाळण्याची धमकी दिल्यानंतर खामेनी यांनी या घटनेमागे व्यापक कट असल्याचा सूचक आरोप केला होता. त्यांनी त्या वेळी म्हटले होते की, “या कृत्यांचे संचालन वर्चस्ववादी शक्तींच्या आणि झायनिस्ट नियोजन केंद्रांच्या हातात आहे.”

खामेनी यांनी काय केलं?

इराणी विश्लेषक मोहसेन मिलानी यांनी ‘फॉरेन अफेयर्स’मध्ये लिहिले होते की, “खामेनी यांनी इस्लामी क्रांतीची ओळख जपणे हे आपले ध्येय मानले. त्यात इस्लामी तत्त्वांशी निष्ठा आणि पश्चिमेविरोधी भूमिका कायम ठेवणे यांचा समावेश होता.” त्यांच्या नेतृत्वाखाली इराणने थेट युद्ध टाळले आणि स्वतःला प्रादेशिक शक्ती म्हणून उभे केले. लेबनॉनपासून येमेनपर्यंत विविध प्रॉक्सी गटांना निधी, प्रशिक्षण आणि शस्त्रसामग्री पुरवून इराणने इस्रायल, सौदी अरेबिया आणि अमेरिकेसारख्या प्रतिस्पर्ध्यांना अप्रत्यक्षपणे आव्हान दिले. हिझबुल्लाह, हमास, हौथी तसेच इराक आणि सीरियातील मिलिशिया गटांना इराणकडून पाठबळ मिळाले.

प्रतिरोध अर्थव्यवस्था

आर्थिक क्षेत्रात खामेनी यांनी प्रतिरोध अर्थव्यवस्था ही संकल्पना मांडली. आंतरराष्ट्रीय निर्बंधांचा परिणाम कमी करण्यासाठी तेलावरील अवलंबित्व घटवणे, चीन व रशियाबरोबर व्यापार वाढवणे आणि सरकारी अनुदानात कपात करणे अशा उपाययोजना राबवण्यात आल्या. मात्र या धोरणाची परिणामकारकता वादग्रस्त राहिली. इराणची अर्थव्यवस्था अद्याप तेलावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे आणि अनुदान कपातीमुळे देशभरात आंदोलने उसळली.

अणु विज्ञानाला राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक मानले

अणुकार्यक्रमाच्या बाबतीत खामेनी यांनी अणु विज्ञानाला राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक मानले. त्यांच्या दृष्टीने युरेनियम संवर्धनाचा अधिकार हा केवळ ऊर्जा निर्मितीचा मुद्दा नव्हता, तर देशाच्या सार्वभौमत्वाशी निगडित होता. त्यांनी इराण अण्वस्त्रे विकसित करत नसल्याचा दावा केला आणि २०१५ च्या अणुकरारासाठी वाटाघाटींना परवानगी दिली; मात्र अमेरिकेने करारातून माघार घेतल्यानंतर त्यांनी त्यावर कठोर टीका केली.

खामेनी यांनी विरोध कसा दडपला?

देशांतर्गत राजकारणात अयातुल्ला अली खामेनी यांनी अशी व्यवस्था उभी केली की, त्यांची सत्ता मजबूत आणि कायम राहील. सरकारमधील बहुतेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी आपल्या विश्वासातील लोकांची नेमणूक केली. त्यामुळे मध्यममार्गी किंवा सुधारणा सुचवणाऱ्या नेत्यांना पुढे येणे कठीण झाले. सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची भूमिकाही त्यांनी घेतली.

गश्त-ए-इर्शाद

अलीकडच्या काळात इराणमध्ये दोन मोठी आंदोलने झाली. २०२२ साली महसा अमिनी या २२ वर्षीय तरुणीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला आणि देशभर संतापाची लाट उसळली. इस्लामी पोशाख नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून नैतिकता पोलिसांनी (गश्त-ए-इर्शाद: Guidance Patrol) त्या तरुणीला ताब्यात घेतले होते. तिच्या मृत्यूनंतर सुरू झालेले आंदोलन १९७९ नंतरचे सर्वात मोठे राजकीय संकट मानले गेले. हे आंदोलन कठोरपणे दडपण्यात आले आणि ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. “वुमन, लाइफ, फ्रीडम” या घोषणा देशभर घुमू लागल्या. परंतु, त्यानंतर काही काळ रस्त्यांवर दिसेनाशी झालेली नैतिकता पोलिस यंत्रणा नंतर पुन्हा सक्रिय झाली.

यापूर्वी २८ डिसेंबरला सुरू झालेल्या आणखी एका आंदोलनानेही देश हादरला होता. तेहरानच्या ग्रँड बाजारमधील व्यापाऱ्यांच्या निदर्शनांपासून त्याची सुरुवात झाली आणि त्यामागे आर्थिक अडचणी मोठ्या प्रमाणात कारणीभूत होत्या. हे आंदोलन लवकरच इराणभर पसरले. त्या वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आंदोलकांना समर्थन देण्यासाठी अमेरिका पूर्ण तयारीत असल्याचे म्हटले होते. मात्र हे आंदोलनही शेवटी कठोर कारवाईतून दडपण्यात आले.