All Eyes on Rafah‘ अर्थात ‘रफावर सर्वांच्या नजरा…’ अशा मथळ्यासह एक छायाचित्र खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसते आहे. एव्हाना इन्स्टाग्रामवरील स्टोरीवर अनेकांनी ते शेअर केल्याचेही तुम्ही पाहिले असेल. भारतासहित जगभरातील अनेक सेलीब्रिटींनी हे छायाचित्र शेअर केले आहे. या छायाचित्रामध्ये एका वाळवंटी भागात खूप मोठ्या प्रमाणावर तंबू दिसतात. त्यातील काही तंबूंची विशिष्ट प्रकारे मांडणी करून ‘All Eyes on Rafah’ हे वाक्य साकारण्यात आल्याचे या छायाचित्रामध्ये दिसत आहे. अनेक जण #AllEyesOnRafah हा हॅशटॅगही वापरताना दिसत आहेत. मात्र, ही मोहीम नक्की काय आहे, हे अनेकांना माहीत नाही.

कशासंदर्भात आहे छायाचित्र?

हे छायाचित्र इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये सुरू असलेल्या संघर्षाशी निगडित आहे. या दोन देशांमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच चिघळत चालला आहे. गाझाच्या दक्षिण भागात वसलेल्या रफा शहरामध्ये इस्रायलने हल्ला केल्यानंतर जगभरात निषेधाचे सूर उमटताना दिसत आहेत. कारण- पॅलेस्टिनी विस्थापितांनी उभ्या केलेल्या शरणार्थी छावणीवर हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये मोठ्या संख्येने निष्पाप लोक मारले गेले आहेत. त्यामध्ये लहान मुले आणि वयोवृद्धांचा समावेश असून, अनेक लोक जखमीही झाले आहेत.

इस्रायलने केलेल्या या हल्ल्यामध्ये कमीत कमी ४५ पॅलिस्टिनी लोक मारले गेल्याची माहिती मिळाली आहे. इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष सुरू झाल्यापासून आपला बचाव करण्यासाठी अनेक पॅलेस्टिनी लोक रफामध्ये एके ठिकाणी विस्थापित झाले आहेत. या विस्थापितांच्या तंबूंवर हा हल्ला झाला आहे. निष्पाप लोकांना लक्ष्य करण्यात आल्यामुळे जगभरात मानवी हक्कांची चाड असलेल्या लोकांकडून इस्रायलच्या या कृत्याचा निषेध केला जात आहे. ‘अल जझिरा’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रफा शहराच्या वायव्येकडील ताल अस-सुलतान हा भाग ‘सुरक्षित क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आला होता. त्यामुळे अनेक पॅलेस्टिनी नागरिकांनी तेथे आपला तळ निर्माण केला होता. मात्र, या ठिकाणी आठ इस्रायली क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यामुळे हाहाकार उडाल्याचे चित्र आहे. गाझा पट्टीत सुरू असलेल्या या हल्ल्यांमुळे काही दिवसांपासून निष्पाप पॅलेस्टिनी लोक जीवाच्या भीतीने अरुंद अशा निर्वासित छावण्यांमध्ये कोणत्याही मदतीशिवाय राहत आहेत. इथे अंदाजे १.५ दशलक्ष लोकांनी आश्रय घेतला असल्याची माहिती आहे.

गाझा पट्टीतील हजारो पॅलेस्टिनींसाठी रफामधील हाच तळ सुरक्षित ठरत होता. मात्र, त्यावरही हल्ला केला गेल्याने निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. यावरून जगभरात निषेधाचा सूर उमटत आहे आणि काळजीही व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यामुळे रफामधील छावणीतील अनेक तंबूंना आग लागली; तर काही तंबू तत्काळ भस्मसात झाले. ही आग पसरत गेल्याने अनेक लोक मृत्युमुखी गेले आहेत. इस्रायली हवाई हल्ल्यामुळे एका इंधनाच्या टाकीचा स्फोट झाल्यामुळे ही आग अधिक पसरली, अशी माहिती NBC ने आपल्या बातमीमध्ये दिली आहे.

हेही वाचा : बॉम्बच्या अफवेनंतर विमानातील प्रवाशांच्या सुटकेसाठी ‘इव्हॅक्युएशन स्लाईड्स’चा वापर कशाप्रकारे करण्यात येतो?

‘All Eyes On Rafah’ मोहिमेला जगभरातून पाठिंबा

या हल्ल्यामुळे जळून भस्मसात झालेल्या मृतदेहांचे अवशेष, तसेच जखमी लोकांची छायाचित्रे गतीने समाजमाध्यमांवर प्रसारित होऊ लागली. ‘All Eyes on Rafah’ अर्थात ‘रफावर सर्वांच्या नजरा…’ अशा मथळ्यासह लोक आपल्या भावना व्यक्त करू लागले. बघता बघता हा मथळा ट्रेंड होऊ लागला. मानवी हक्क कार्यकर्ते, तसेच संवेदनशील लोकांकडून या हल्ल्याच्या विरोधात आवाज उठविण्यात येऊ लागला. गाझा पट्टीमध्ये सुरू असलेल्या हाहाकाराकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधणे आणि हा नरसंहार तातडीने बंद व्हावा, यासाठीची संवेदनशीलता वाढविणे हा या मोहिमेचा हेतू आहे. या मोहिमेमध्ये ‘All Eyes on Rafah’ असे लिहिलेले एक छायाचित्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे विशिष्ट प्रकारे तंबूंची मांडणी करून हे वाक्य साकारण्यात आल्याचे या छायाचित्रामध्ये दिसत आहे. आतापर्यंत ३४ दशलक्षांहून अधिक लोकांनी इन्स्टाग्रामवर हे छायाचित्र शेअर केले आहे.

हे छायाचित्र खरे आहे का?

हे छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साधनांचा (AI-generated) वापर करून तयार करण्यात आले असण्याची शक्यता अधिक आहे. फेक न्यूजबाबत अभ्यास करणारे मार्क ओवेन जोन्स याबाबत म्हणाले की, प्रथमदर्शनी हे छायाचित्र AI द्वारे तयार करण्यात आल्यासारखे भासते. कारण- हे खरे वाटत नाही. या छायाचित्रातील सावलीची रचनाही नैसर्गिक वाटत नाही आणि त्यातील तंबूही वास्तवदर्शी वाटत नाहीत. त्यामुळे या लक्षणांवरून तरी हे छायाचित्र AI चा वापर करून तयार केलेले वाटते.

‘All Eyes on Rafah’ ही घोषणा कुठून प्रचलित झाली?

इस्रायलव्याप्त पॅलेस्टिनी प्रदेशातील जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यालयाचे संचालक रिक पीपरकॉर्न यांच्या विधानांमधून ही घोषणा प्रचलित झाली आहे. रफा हा परिसर हमास संघटनेचा शेवटचा बालेकिल्ला असून, तोदेखील निकामी करण्याचा आदेश इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दिला होता. त्या आदेशानंतर WHO चे संचालक रिक पीपरकॉर्न यांनी फेब्रुवारीमध्ये हे वक्तव्य केले होते. त्यातूनच ‘All Eyes on Rafah’ हा वाक्यांश प्रचलित झाला आहे.

हेही वाचा : राम रहीम हत्याप्रकरणात निर्दोष, तरीही तुरुंगात; कारण काय? त्याच्याविरोधात कोणकोणते गुन्हे? जाणून घ्या…

हे छायाचित्र व्हायरल कसे झाले?

सेव्ह द चिल्ड्रन, ऑक्सफाम, अमेरिकन्स फॉर जस्टीस इन पॅलेस्टाईन अॅक्शन, ज्युईश व्हॉइस फॉर पीस आणि पॅलेस्टाईन सॉलिडॅरिटी कॅम्पेन यांसारख्या काही संस्था आणि संघटनांनी हा वाक्यांश उचलून धरत, या हल्ल्याच्या भीषणतेकडे लक्ष वेधून घेतले. समाजमाध्यमांवर #AllEyesOnRafah हा हॅशटॅगही ट्रेंड होऊ लागला. आतापर्यंत हा हॅशटॅग वापरून १,९५,००० पोस्ट्स करण्यात आल्या आहेत आणि लाखो लोकांनी त्या पाहिल्या आहेत. इन्स्टाग्रामवरही काल मंगळवारी (२८ मे) हा हॅशटॅग आणि ते छायाचित्र खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. तिथे २४ तासांच्या आत तब्बल ३४ दशलक्ष लोकांनी हे छायाचित्र प्रसारित करून या हल्ल्याचा निषेध केला आहे.

या मोहिमेमध्ये जागतिक पातळीवरील अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींनी सहभाग नोंदविला आहे. त्यामध्ये भारतीय सेलीब्रिटींचा समावेश आहे. वरुण धवन, माधुरी दीक्षित, समंथा रुथ प्रभू, तृप्ती दिमरी अशा अनेक भारतीय सेलीब्रिटींनी ‘All Eyes on Rafah’चे छायाचित्र शेअर केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ट्रॅव्हिस हेड, ब्रिटिश गायिका ले-ॲनी पिनॉक, मॉडेल बेला हदीद आणि अभिनेत्री सॉइर्स-मोनिका जॅक्सन व सुसान सरंडन यांसारख्या सेलीब्रिटींनी रफाबाबत आपली सहानुभूती व्यक्त केली आहे. एकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष गाझामधील घडामोडींकडे लागलेले असताना दुसरीकडे, ‘All Eyes on Rafah’ची मोहीम वेग पकडत आहे. पॅलेस्टिनी नागरिकांना शांतता आणि न्याय मिळावा यासाठी या मोहिमेद्वारे आवाज उठविला जात आहे.