पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कानपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं. गेली दोन वर्षे या मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू होतं. उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मेट्रोतून फेरफटका मारला. यावेळी त्यांच्यासोबत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी हेदेखील उपस्थित होते. आयआयटी मेट्रो स्टेशन ते गीता नगर असं अंतर त्यांनी मेट्रोने प्रवास करत पार केलं. जानेवारी २०२२ मध्ये या मेट्रोचा पुढचा टप्पा खुला होणार असल्याची माहिती मिळत आहे.
हा प्रकल्प देशासाठी का महत्त्वाचा मानला जातो? या प्रकल्पाची वैशिष्ट्ये काय आहेत?
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कानपूर मेट्रो प्रकल्पाच्या ज्या टप्प्याचं उद्घाटन केलं तो टप्पा एकूण ९ किलोमीटरचा आहे. आयआयटी कानपूर ते मोती झील परिसर हा तो टप्पा आहे. पंतप्रधान मोदींनी आज या परिसरातल्या कामाची पाहणी केली, तसंच मेट्रोतून गीतानगरपर्यंत प्रवासही केला.
- कानपूरमधल्या या संपूर्ण प्रकल्पाची लांबी ३२ किलोमीटर आहे. तर हा प्रकल्प उभारण्यासाठी ११ हजार कोटीहून अधिक खर्च करण्यात आला आहे.
- या मेट्रो प्रकल्पाचा दुसरा टप्पा मोती झील ते ट्रान्सपोर्ट नगर परिसर हा असेल.
हेही वाचा – देशातल्या सर्वात वेगवान मेट्रोतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली सफर; पाहा व्हिडीओ
- कानपूर मेट्रोचं काम १५ नोव्हेंबर २०१९ रोजी सुरू झालं होतं.
- पहिल्या टप्प्यातल्या मेट्रोमार्गाची चाचणी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते यावर्षी १० नोव्हेंबरला करण्यात आली होती.
- ३१ डिसेंबरपासून हा पहिला टप्प्यातला मेट्रोमार्ग व्यावसायिक सेवेसाठी खुला करण्यात येईल.
- युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक (EIB) ने कानपूर मेट्रोमध्ये ६५० दशलक्ष युरो गुंतवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. युरोपिय संघाबाहेरचा हा या बँकेचा दुसरा मोठा प्रकल्प आहे.
- EIB ही युरोपिय संघाची अधिकृत बँक आणि जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय सार्वजनिक बँक आहे. EIB ने यापूर्वी लखनौ मेट्रोच्या विकासासाठी ४५० दशलक्ष युरोचे कर्ज मंजूर केले होते.