Aloka Peace Dog: तो कुणाचाही पाळीव कुत्रा नव्हता, ना त्याच्याकडे हक्काचे घर होते, ना त्याला नाव होते. भारतात रस्त्यांवर हजारोंच्या संख्येने फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांपैकीच तो एक होता… पण एका दिवशी मात्र त्याने एक वेगळाच रस्ता निवडला… शांततेचा, संयमाचा आणि माणुसकीचा! आज तोच भटका कुत्रा ‘आलोका – द पीस डॉग’ म्हणून ओळखला जातो. अमेरिकेत बौद्ध भिक्खूंबरोबर सुरू असलेली त्याची तब्बल २,३०० मैलांची पदयात्रा सध्या जगभर चर्चेत आहे, त्याचे व्हिडिओजही व्हायरल झाले आहेत.

‘तो’ त्यांच्यासोबत चालत राहिला!

आलोकाची कथा सुरू झाली ती भारतातच, ११२ दिवसांच्या शांती पदयात्रेदरम्यान. देशभर फिरत, गावोगाव शांततेचा संदेश देणाऱ्या बौद्ध भिक्खूंना एका टप्प्यावर एक भटका कुत्रा त्यांच्या मागे चालत येताना दिसला. हा कुत्रा इतर कुत्र्यांप्रमाणेच थोड्या वेळाने निघून जाईल, असे भिक्खूंना वाटले. पण तसे झाले नाही, तो त्यांच्याचसोबत थांबला, चालत राहिला आणि दिवसागणिक तो त्यांच्या पदयात्रेचा भाग होत गेला.

आलोका म्हणजे प्रकाश!

हा कुत्रा भारतीय परिआ (Indian Pariah) जातीचा असून त्याला आता ‘आलोका’ असे नाव देण्यात आले. पाली भाषेतील ‘आलोका’ या शब्दाचा अर्थ प्रकाश किंवा स्पष्टता. नंतर घडत गेलेल्या घटनांनी आलोकाचे नाव सार्थ ठरवले. ही पदयात्रा सोपी नव्हती. रणरणते ऊन असो अथवा जोरदार पाऊस आलोका सर्व भिक्खूंप्रमाणेच सारे काही झेलत पुढे चालत होता. मधेच एका कार खाली त्याचा अपघात झाला, त्यात तो गंभीर जखमीही झाला. त्याला विश्रांती मिळावी म्हणून भिक्खूंनी त्याला एका ट्रकमध्ये बसवले. पण आलोकाने मात्रा पदयात्रा सोडण्यास नकार दिला आणि ट्रकमधून उडी मारत तो पुन्हा चालू लागला… भिक्खूंच्या मागे, त्यांच्या पावलांवर पावलं टाकत!

Aloka-Peace-Dog-Buddhism
बौद्ध भिक्खूंसोबत पदयात्रा करणारा कुत्रा- आलोका

आलोकाचे प्रेरणादायी चालणे

“त्याने संपूर्ण प्रवास आमच्यासोबत चालून पूर्ण केला आणि अजुनही तो चालतोच आहे. तोच खरा नायक आहे,” असं एका भिक्खूंनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. “त्याला चालायचे होते. तेच आम्हाला प्रेरणा देणारे आहे.”

अमेरिकेत शांततेसाठी २३०० किमी.ची पदयात्रा

आलोकाची कथा भारताबाहेरही पोहोचली. बौद्ध भिक्खू आता अमेरिकेत पोहोचले असून सध्या त्यांचा मुक्काम टेक्सासमधील फोर्ट वर्थ येथील Huong Dao Vipassana Bhavana मध्ये आहे. इथेच आणखी एका अभूतपूर्व संकल्पनेचा जन्म झाला ती म्हणजे शांतता आणि करुणेच्या प्रसारासाठी अमेरिकेत पदयात्रा. ऑक्टोबर महिन्यात १९ बौद्ध भिक्खूंसोबतआलोकाने फोर्ट वर्थ ते वॉशिंग्टन डीसी असा तब्बल २,३०० मैलांचा प्रवास सुरू केला. उद्देश एकच करुणा, शांतता आणि ऐक्याचा संदेश देणे.

आलोकाच्या चिकाटीची साक्ष

हा प्रवास सुमारे ११० दिवसांचा असून १० राज्यांतून जाणार आहे. फेब्रुवारीत वॉशिंग्टन डीसी येथे तो संपणार आहे. डिसेंबरअखेरीस हा समूह अटलांटा शहरापर्यंत पोहोचला होता… नेमकी हीच बाब बौद्ध भिक्खूंच्या आणि आलोकाच्याही चिकाटीची साक्ष देणारी आहे. टेक्सासमधील पत्रकार निकोल कॉलियर यांनी या यात्रेबाबत म्हटले, “आजचा काळ हा आवाज आणि कोलाहलाचा आहे आणि लोकांना एकूणच जाणही कमीच आहे. मतभेद अधिक मोठे वाटतात, भासमान होतात आणि एकतेचा आवाज मात्र अतिशय क्षीण आहे. अशा वेळी ही पदयात्रा लोकांच्या मनाला स्पर्श करते आणि त्यातून आंतरधर्मीय ऐक्याचे दर्शन घडते.”

आलोकाचे इंस्टाग्राम

या प्रवासादरम्यान अनोळखी लोक भिक्खूंना अन्नदान देतात, वैद्यकीय मदत करतात, काही मैल त्यांच्यासोबत मौन धारण करून चालतात. आलोक हा या पदयात्रेतील सर्वात मोठे आकर्षण ठरला आहे. लहान मुलं तर त्याला भेटण्यासाठी आवर्जून येतात. सोशल मीडियावर ही यात्रा थेट पाहता येते. फेसबुकवर लाईव्ह ट्रॅकिंग आहे, तर इंस्टाग्रामवर रोजचे अपडेट्स. आलोकासाठीही एक इंस्टाग्राम अकाऊंट सुरू करण्यात आले आहे- ‘Peace Dog Aloka’. तो आता केवळ एक कुत्रा राहिलेला नाही, तर तो स्वतःच शांततेचा चालता-बोलता संदेश झाला आहे.

व्हाइट हाऊसच्या दिशेने!

“ही यात्रा अपेक्षित आणि अनपेक्षित आव्हानांनी भरलेली आहे,” असे ‘Walk for Peace’ या अधिकृत पेजवर नमूद करण्यात आले आहे. “पण शांत मन, ठाम ध्येय आणि प्रत्येक पावलात शांती घेऊन आम्ही पुढे जात आहोत… व्हाइट हाऊसच्या दिशेने….आणि सोबत आहे आलोका अर्थात प्रकाश!”