Amarnath Cave Shivling Melting: काश्मीर खोऱ्यातील पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या काळ्या सावलीनंतर,  चालू वर्षाची अमरनाथ यात्रा एका नव्या आशेने आणि विक्रमी गर्दीने सुरू झाली. ‘बम बम भोले’च्या जयघोषात अवघ्या चार दिवसांत ९३,००० हून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. पण, हा भरघोस उत्साहाचा ओघ सुरू असतानाच एक अत्यंत चिंताजनक आणि धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यात्रेला सुरुवात होऊन अवघे पाच दिवस उलटत नाहीत, तोच येथील पवित्र गुहेतील नैसर्गिक बर्फाचे शिवलिंग (बाबा बर्फानी) चक्क ९० टक्के वितळले आहे. ५७ दिवसांची यात्रा अजून बाकी असताना, अवघ्या पाच दिवसांत शिवलिंग अदृश्य होणे ही केवळ हवामानबदलाची धोक्याची घंटा आहे की मानवी हस्तक्षेपाचा परिणाम? 

एका आठवड्यात ९०% बर्फ गायब?

दरवर्षी हिवाळ्यातील बर्फवृष्टी आणि गुहेतील तापमानानुसार हे शिवलिंग नैसर्गिकरीत्या आकारास येते आणि उन्हाळ्यात हळूहळू वितळते. मात्र, यंदा भाविक आणि पत्रकारांनी सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. इंदूरहून आलेल्या एका भाविकाने सांगितले, “आम्ही चौथ्या दिवशी पोहोचलो; पण बाबांचे रूप खूपच लहान झाले होते. पूर्वी ४० ते ४५ दिवस दर्शन मिळायचे; पण आता ५ दिवसांतच शिवलिंग वितळले आहे.”

हा प्रकार पहिल्यांदाच घडत नाहीये. २०१८ (२९ दिवस), २०२० (३८ दिवस), २०२२ (२८ दिवस) आणि २०२४ मध्येही शिवलिंग अपेक्षेपेक्षा लवकर वितळले होते; पण २०२६ मधील ही बर्फ वितळण्याची गती आतापर्यंतची सर्वांत वेगवान गती मानली जात आहे.

हिमालयाची वाढती उष्णता:

शास्त्रज्ञांच्या मते, जगातील इतर पर्वतरांगांच्या तुलनेत हिमालयीन परिसर जास्त वेगाने तापत आहे. अमरनाथ गुहा समुद्रसपाटीपासून सुमारे ३,८८८ मीटर (१२,७५६ फूट) उंचीवर आहे. तिथे झालेली अल्प बर्फवृष्टी आणि उन्हाळ्यातील वाढते तापमान यांमुळे हिमनद्या (Glaciers) आक्रसत आहेत. गुहेतील हवेतील आर्द्रता आणि आजूबाजूचे तापमान थोडे जरी वाढले तरी त्याचा परिणाम थेट बर्फाच्या रचनेवर होतो. 

गर्दी आणि पायाभूत सुविधांचा ‘मायक्रोक्लायमेट’वर घाला?

गेल्या दोन दशकांत अमरनाथन यात्रेचे स्वरूप बदलले आहे आणि त्यामुळे केवळ निसर्गाला दोष देऊन चालणार नाही. हे बदल पुढीलप्रमाणे :

  • रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले आहे.
  • गुहेजवळ हेलिपॅड, तात्पुरती निवासस्थाने आणि लंगर (अन्नछत्रे) वाढली आहेत.
  • तिथे सौरऊर्जा आणि विजेचा वापर सुरू झाला आहे.
  • नुकतीच सरकारने एका रोप-वे प्रकल्पाला आणि बोगद्याला मंजुरी दिली आहे.

या सगळ्या आधुनिक सुविधांमुळे यात्रा अधिक सुरक्षित आणि सोपी झाली असली तरी या अति-संवेदनशील (Ecologically Fragile) भागात मानवी हस्तक्षेप प्रचंड प्रमाणात वाढला आहे.

तज्ज्ञांच्या मते, या गुहेजवळ हजारो माणसं नेहमीच वावरत असतात आणि त्यामुळे त्यांची शारीरिक उष्णता, जनरेटर्स व नव्याने बांधलेले ‘रेन शेल्टर’ यांमुळे गुहेचे ‘मायक्रोक्लायमेट’ बदलत आहे. परिणामत: गुहेच्या आतील उष्णतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने येथील बर्फ वेगाने वितळू लागले आहे. 

नियम आणि प्रशासकीय पेच:

सर्वोच्च न्यायालयाने अमरनाथ यात्रेसाठी दररोज दोन्ही मार्गांवरून (पहलगाम आणि बालटाल) प्रत्येकी १०,००० भाविकांची मर्यादा घालून दिली आहे. परंतु, जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिंह यांनी चिंता व्यक्त केली आहे की, हजारो भाविक कोणत्याही वैध नोंदणीशिवाय किंवा आरोग्य प्रमाणपत्राशिवाय यात्रेला येत आहेत. या अनधिकृत गर्दीमुळे केवळ सुरक्षेवरच नव्हे, तर तिथल्या निसर्गावरही प्रचंड ताण पडत आहे. पीडीपी नेत्या इल्तिजा मुफ्ती यांनीही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “निसर्गाचा बळी देऊन चालवलेला हा विकास आपल्याला कुठे नेणार” असा प्रश्न त्यांनी केला आहे. 

श्रद्धेसोबत निसर्गाचे संरक्षणही गरजेचे!

अमरनाथ यात्रा ही कोट्यवधी हिंदूंच्या आस्थेचा विषय आहे. दहशतवादाच्या सावलीतून बाहेर पडून विक्रमी संख्येने भाविक तिथे पोहोचणे ही आनंदाची बाब आहे. पण, जर आपण तिथल्या हिमालयाचे पर्यावरण वाचवू शकलो नाही, तर ज्या बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी लाखो लोक मैलोन् मैल चालत जातात, ते ‘बाबा बर्फानी’च भविष्यात पाहायला मिळणार नाहीत.

आता गरज आहे ती एका स्वतंत्र वैज्ञानिक समितीद्वारे या बर्फ वितळण्याचा अभ्यास करण्याची आणि ‘पर्यटन विकास’ व ‘पर्यावरण रक्षण’ यांमध्ये एक सुवर्णमध्य साधण्याची!