अमेरिकेतून भारतात होणारी कृषी मालाची निर्यात वाढली आहे. भारत व अमेरिकेत व्यापार करार अस्तित्वात नसतानादेखील अमेरिकेतून मोठ्या प्रमाणात कृषी माल भारतीय बाजारपेठेत पाठवण्यात आला आहे. अमेरिकेच्या कृषी मंत्री ब्रुक रोलिन्स यांनी भारत व अमेरिकेत सोमवारी झालेल्या व्यापार करारावर प्रतिक्रिया दिली. भारत व अमेरिकेत झालेल्या व्यापार कराराने अमेरिकेतून भारताच्या विशाल बाजारपेठेत होणारी कृषी मालाची निर्यात वाढणार आहे, असे ब्रुक रोलिन्स म्हणाल्या. अमेरिकेची भारताबरोबर झालेली कृषी क्षेत्रातील वित्तीय तुट भरून काढली जाईल, असा विश्वास रोलिन्स यांनी व्यक्त केला. २०२४ मध्ये १.३ अब्ज डॉलरची वित्तीय तुट झाल्याचे रोलिन्स म्हणाल्या. भारत व अमेरिकेतील व्यापार कराराबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी माहिती दिली. अमेरिकेवर लादलेले आयातशुल्क भारत शुन्यापर्यंत कमी करणार असल्याचे ट्रम्प म्हणाले. तसेच भारताने अमेरिकेकडून ५०० अब्ज डॉलरची ऊर्जा, तंत्रज्ञान, कृषी माल, कोळसा व इतर काही उत्पादने खरेदी करण्याची हमी दिली आहे, असे ट्रम्प म्हणाले.

अमेरिकेची निर्यात कशी वाढली ?

भारत व अमेरिकेत कृषी व्यापारात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. व्यापार करार नसताना देखील अमेरिकेतून भारतीय बाजारपेठेत कृषी माल मोठ्या प्रमाणात निर्यात झाल्याचे समोर आले आहे. तसेच अमेरिकेची भारताबरोबर झालेली कृषी निगडीत वित्तीय तुट देखील भरून निघत आहे.

जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या ११ महिन्यांच्या कालावधीत अमेरिकेतून भारतात २.८५ अब्ज डॉलर कृषी मालाची निर्यात झाली आहे. त्याआधी २०२४ मधील याच कालावधीत ही निर्यात २.१३ अब्ज डॉलर इतकी होती. यात आता तब्बल ३४.१ टक्क्याने वाढ झाली आहे. २०२५ या वर्षात ही निर्यात ३.१ अब्ज डॉलर असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून ती आतापर्यंतची सर्वोच्च कृषी निर्यात असेल.

अमेरिकेतून भारतात होणाऱ्या निर्यातीत वाढ झाली असली तरी अमेरिकेत मात्र भारतीय कृषी मालाच्या आयातीचे प्रमाण घटले आहे. भारतीय कृषी मालाच्या अमेरिकेत होणाऱ्या आयातीत ५.१ टक्क्यांची वाढ झाली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ५.६२ अब्ज डॉलरची आयात अमेरिकेने केली होती. ती वाढून जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या वर्षी ५.९१ अब्ज डॉलर इतकी झाली आहे. दरम्यान, अमेरिकेची भारताबरोबर असलेली वित्तीय तुट देखील भरून निघत आहे. ती ३.५ अब्ज डॉलरहून कमी होऊन ३.१ अब्ज डॉलर इतकी कमी झाली आहे.

सुका मेवा (ड्राय फ्रुट्स)

अमेरिकेतून भारतीय बाजारपेठेत सुका मेवा, बदाम व पिस्ता मोठ्या प्रमाणात पाठवला जातो. जानेवारी ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत १.१ अब्ज डॉलरची सुका मेवा (ड्राय फ्रुट्स) निर्यात अमेरिकेने केली होती. त्यात मागील वर्षी ३२.२ टक्क्यांची वाढ झाली आहे. ही निर्यात जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत १.३ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

अमेरिकेतील कापूस भारतीय बाजारपेठेत ?

१८ ऑगस्ट ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत भारताने अमेरिकेतून आयात होणाऱ्या कापसावर आयातशुल्क माफ केले होते. याचा अमेरिकेला मोठा फायदा झाला. त्यानंतर १ जानेवारी २०२६ पासून भारताने कापसावर ११ टक्के आयातशुल्क लावले. तसेच भारतात अमेरिकेतून कच्च्या सोयाबीन तेलाची देखील निर्यात झाली. भारताने त्यावरील आयातशुल्क ३१ मे २०२५ रोजी २७.५ टक्क्यांवरून कमी करून १६.५ टक्के केले.

इथेनॉलसाठी अमेरिकेकडून आग्रह

अमेरिकेत मक्यापासून मोठ्या प्रमाणात इथेनॉलची निर्मिती केली जाते. अमेरिका हा इथेनॉलचे उत्पादन व निर्यात करणारा जगातील सर्वात मोठा देश आहे. भारताने पेट्रोल व डिझेलमध्ये इथेनॉल मिसळावे, असा आग्रह अमेरिकेने धरला आहे. परंतु, भारताने सध्या फक्त उत्पादन करणाऱ्या कारखान्यांनाच इथेनॉल आयात करण्याची परवानगी दिली आहे. अल्कोहोल मिश्रीत केमिकल्स, बेव्हरेजेस, औषधे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांना इथेनॉल आयात करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अमेरिकेकडून इथेनॉल घेण्यास भारताने विरोध दर्शवला आहे. तसे केल्यास भारतीय ऊस, मका व भात उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होईल, असे भारताचे म्हणणे आहे.

भारताच्या कृषी निर्यातीत घट

जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत भारताच्या अमेरिकेला होणाऱ्या कृषी निर्यातीत फक्त ५.१ टक्क्यांची वाढ झाली आहे. यापैकी बरीच निर्यात ही अमेरिकेने भारतावर ५० टक्के आयातशुल्क लादण्याच्या आधीच झाली होती. ५० टक्के आयातशुल्क लादल्यानंतर जुलै ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत मागील वर्षाच्या तुलनेत १३.६ टक्क्यांची घसरण भारतीय निर्यातीत झाली आहे.

जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत अमेरिकेत होणाऱ्या सागरी पदार्थांच्या निर्यातीत ३२.५ टक्के वाढ नोंदवण्यात आली. जुलै ते नोव्हेंबर २०२४ मध्ये ११८३.४ दशलक्ष डॉलरची निर्यात अमेरिकन बाजारपेठेत झाली होती. त्यात घसरण होऊन जुलै ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत फक्त ९८४.५ दशलक्ष डॉलर सागरी पदार्थांची निर्यात अमेरिकेत झाली आहे.

अमेरिकेतून भारतीय बाजारपेठेत सुका मेवा (Dry Fruits), कापूस, सोयाबीन तेलाची निर्यात केली जात आहे. त्यातून अमेरिकेला फायदा होत आहे. दरम्यान, अमेरिकेने आग्रह धरलेल्या मका, डाळ, इथेनॉल व दुग्धजन्य पदार्थांबाबत भारत काय निर्णय घेतो, ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

वाणिज्य मंत्री पीयूष गोयल काय म्हणाले?

भारत व अमेरिकेत झालेल्या व्यापार कराराबाबत स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही. भारताने अमेरिकेच्या मका, इथेनॉल, सोयाबीन व दुग्धजन्य उत्पादनांना भारताची बाजारपेठ खुली करून दिली आहे का ? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी भारत व अमेरिका व्यापार कराराबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. ते म्हणाले, “अमेरिकेबरोबर झालेल्या व्यापार करारात भारताने संवेदनशील कृषी क्षेत्र व दुग्धजन्य उत्पादन क्षेत्राच्या हिताचे रक्षण केले आहे.” अशी ग्वाही गोयल यांनी दिली. दरम्यान, मागील वर्षी अमेरिकेतून भारतीय बाजारपेठेत होणाऱ्या कृषी मालाच्या निर्यातीत वाढ झाल्याचे समोर आले आहे.