US Iran Naval Blockade: अमेरिकेने इराणच्या बंदरांवरून ये-जा करणाऱ्या जहाजांची नाकेबंदी सुरू केली आहे. अमेरिकेच्या प्रमाण वेळेनुसार सोमवारी सकाळी १० वाजता नाकेबंदीला सुरूवात झाली आहे. इराणच्या व्यापाराला तडा देण्यासाठी अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे. अमेरिका व इराण यांच्यात इस्लामाबादमध्ये झालेली चर्चा अपयशी ठरली. त्यानंतर अमेरिकेने इराणच्या आर्थिक नाड्या आवळायला सुरूवात केली आहे. अमेरिकेने नाकेबंदी करणार असल्याची घोषणा केल्यानंतर इराणने अमेरिकेला ठोस प्रत्युत्तर दिले आहे. अमेरिकेने जर इराणच्या बंदरांवर आणि किनारपट्टीवर नाकेबंदी केली तर पर्शियन आखात आणि ओमानच्या आखातातील कोणतेही बंदर सुरक्षित राहणार नाही, असा इशारा इराणने दिला आहे. दरम्यान, अमेरिका इराणच्या सगळ्या बंदरांची कशाप्रकारे नाकेबंदी करणार आहे? याबाबत जाणून घेऊयात.

अमेरिकेच्या लष्कराच्या सेंट्रल कमांडने काय म्हटले?

अमेरिकेच्या लष्कराच्या यूएस सेंट्रल कंमांड (CENTCOM) ने याबाबत माहिती दिली आहे. इराणच्या बंदरांवर व किनारपट्टीवर जाणाऱ्या सर्वच जहाजांना अडवले जाईल. अरब आखात व ओमान आखाताकडे जाणाऱ्या किंवा तिथून येणाऱ्या जहाजांना देखील रोखले जाईल. होर्मुझ सामुद्रधुनीतून इराण सोडून इतर देशांच्या बंदरांवर जाणाऱ्या जहाजांना ये-जा करण्याची मुभा दिली जाईल. त्यांच्या नौकानयन स्वातंत्र्यावर गदा आणली जाणार नाही, असे अमेरिकन लष्कराच्या सेंट्रल कमांडने स्पष्ट केले आहे.

एखाद्या देशाची नाकेबंदी म्हणजे नेमकं काय ?

एखाद्या देशाची नाकेबंदी करणे म्हणजे नेमकं काय? हे भारतीय नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उलगडून सांगितले आहे. नाकेबंदी (ब्लोकेड) म्हणजे एकप्रकारे ॲक्ट ऑफ वॉर किंवा आंतरराष्ट्रीय सशस्त्र संघर्षाचे प्रतिक आहे. युद्धात सहभागी असलेला एक देश विशिष्ट किनारपट्टींवर, बंदरांवर, विमानतळांवर जाण्यापासून सर्व देशांना किंवा शत्रू देशांना रोखतो, त्यावेळी त्याला नाकेबंदी (ब्लोकेड) असे म्हणतात. ज्या भागाची नाकेबंदी केली जाते, तो भाग संबंधित देशाच्या नियंत्रणात असतो. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष केनेडी यांच्या प्रशासनाने देखील १९६२ मध्ये क्यूबन मिसाईल संकट ओढवल्यानंतर नाकेबंदी केली होती. परंतु, त्यांनी त्याला नाकेबंदी न म्हणता विशिष्ट भाग विलगीकरणात ठेवत असल्याचे म्हटले होते.

‘क्लोज ब्लोकेड’ म्हणजे काय?

भारतीय नौदलाचे व्हाइस ॲडमिरल प्रदिप चौहान (निवृत्त) यांनी नाकेबंदीबाबत माहिती दिली. नाकेबंदी दरम्यान युद्धनौका तैनात केल्या जातात. इतर देशांच्या जहाजांना रोखणे, त्यांची तपासणी करणे ही कामे नाकेबंदी दरम्यान नौदलाकडून केली जातात. नाकेबंदीचे जहाजाने उल्लंघन केले असेल तर संबंधित जहाजाला जप्त किंवा ताब्यात घेतले जाते, असे चौहान म्हणाले. “नाकेबंदी ‘क्लोज ब्लोकेड’ असू शकते. ‘क्लोज ब्लोकेड’मध्ये बंदर व किनारपट्टीच्या अतिशय जवळ नौदलाला नाकेबंदीसाठी तैनात केले जाते. दरम्यान, ज्या देशाची नाकेबंदी करण्यात आली आहे, त्या देशाकडून नौदलावर हल्ला होण्याची शक्यता अधिक असते. संबंधित देशाकडे किती लांबपर्यंत मारा करणारे ड्रोन्स किंवा क्षेपणास्त्र आहेत याचा विचार करून ‘क्लोज नाकेबंदी’ करण्याबाबत निर्णय घेतला जातो”, असे चौहान म्हणाले.

‘डिस्टंट ब्लोकेड’ म्हणजे काय?

“अनेकदा ‘डिस्टंट ब्लोकेड’चा वापर केला जातो. यात किनारपट्टी किंवा बंदरापासून दूरवर नौदल नाकेबंदी करण्यासाठी तैनात केले जाते. नाकेबंदीसाठी तैनात असलेल्या नौदलातील नौकांमधील अंतर अधिक असते. त्यामुळे ही नाकेबंदी चुकवणे जहाजांसाठी सहज शक्य होते. त्यामुळे नाकेबंदी पूर्ण ताकदीने लागू करणे आवश्यक असते”, असे व्हाइस अॅडमिरल चौहान म्हणाले.

नाकेबंदीसाठी आवश्यक असलेले निकष कोणते?

नाकेबंदी (Blockade) कायदेशीररीत्या वैध ठरण्यासाठी काही विशिष्ट निकषांची पूर्तता करणे आवश्यक असते, असे व्हाइस अ‍ॅडमिरल चौहान यांनी सांगितले. ते निकष खालील प्रमाणे –

१) नाकेबंदी लागू करण्याबाबत युद्धात सहभागी आणि इतर तटस्थ देशांना नाकेबंदीची माहिती अधिसूचनेद्वारे देणे आवश्यक असते. नाकेबंदीची तारीख कळवणे आवश्यक असते. नाकेबंदी संपण्याची तारीख सांगणे नाकेबंदी करणाऱ्या देशाला बंधनकारक नसते, परंतु, नाकेबंदी संपल्यानंतर त्याबाबत पुन्हा अधिसूचनेद्वारे माहिती देणे आवश्यक असते.

२) नाकेबंदी सातत्याने राखली गेली पाहिजे आणि सर्व जहाजांना समान न्याय लावून निपक्षपातीपणे तिची अंमलबजावणी होण आवश्यक असते.

३) नाकेबंदीचा उद्देश हा लष्करी असायला हवा. इतर देशातील सामान्य नागरिकांना नाकेबंदीने नुकसान होता कामा नये. लोकांना जीवनावश्यक वस्तू नाकारणे हा नाकेबंदीचा उद्देश असेल तर ती नाकेबंदी बेकायदेशीर ठरते. लोकांना अन्नपाण्याचा पुरवठा व्यवस्थित सुरू राहणे आवश्यक असते.

४) नाकेबंदी ‘प्रभावी’ असणे आवश्यक आहे. शत्रूच्या किनारपट्टीवर प्रवेश खरोखर रोखण्यासाठी पुरेशा लष्करी दलाद्वारे ती कार्यान्वित ठेवली पाहिजे. केवळ कागदोपत्री नाकेबंदी लादणे बेकायदेशीर आहे.

भारताचे माजी राष्ट्रीय सागरी सुरक्षा समन्वयक काय म्हणाले?

अमेरिकेने इराणची नाकेबंदी केल्यास पुन्हा एकदा जागतिक स्तरावर इंधन टंचाई निर्माण होईल, असे भारताचे माजी राष्ट्रीय सागरी सुरक्षा समन्वयक व्हाइस अॅडमिरल जी. अशोक कुमार यांनी दिली. “इराण हा किनारपट्टी लाभलेला देश आहे. किनारपट्टीचा इराणला पर्शियन आखातात धोरणात्मक फायदा होतो. त्या भागात जर दुसऱ्या देशाचे नौदल नाकांबदी करणार असेल तर त्याला इराणी ड्रोन्स किंवा क्षेपणास्त्रांचा सामना करावा लागू शकतो. नाकेबंदी दरम्यान इतर देशांच्या जहाजांना जप्त किंवा रोखले जाते”, असे जी. अशोक कुमार म्हणाले.

तेल व नैसर्गिक वायू पुरवठ्यावर परिणाम नाही?

अमेरिकेच्या नाकेबंदीचा भारतावरही परिणाम होईल. भारतातून इराणला होणाऱ्या निर्यातीवर तसेच इराणमधून भारतात होणाऱ्या आयातीवर परिणाम होईल. कच्चे तेल व नैसर्गिक वायूवर फार परिणाम होणार नाही. एप्रिल ते डिसेंबर २०२५ दरम्यान भारताचा इराणबरोबर असलेला व्यापार १.१ ते १.२ अब्ज डॉलर असा साधारण राहिला. भारतातून अन्नधान्य आणि औषधे मोठ्या प्रमाणात निर्यात केली जातात. त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी नाकेबंदी उठणे आवश्यक आहे. भारत इराणमधून कच्चे तेल, पेट्रोलियम प्रोडक्ट्स, बिटूमिन, मिथेनॉल, जिप्सम आयात करतो”, असे जी. अशोक कुमार म्हणाले. दरम्यान, इराणची नाकेबंदी कशी करणार याबाबत अमेरिकन नौदलाची कार्यपद्धती अद्याप समोर आलेली नाही.