America Iran Israel War Impact on India : अमेरिका व इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे ८६ वर्षीय सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा रविवारी (१ मार्च) मृत्यू झाला. त्यांच्याबरोबर इराणच्या संरक्षण दलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनाही आपले प्राण गमावावे लागल्याची माहिती इराणच्या सरकारी दूरचित्रवाहिन्यांनी दिली. खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणनेही आखाती देशांतील अमेरिकेच्या लष्करी ठिकाणांवर प्रतिहल्ले करण्यास सुरुवात केली आहे. या वाढत्या संघर्षाचे सावट आता भारतीय अर्थव्यवस्थेवरही गडद होताना दिसत आहे. यापार्श्वभूमीवर पश्चिम आशियातील या युद्धजन्य परिस्थितीचा भारतावर नेमका कसा परिणाम होत आहे. त्याविषयीचा हा आढावा…
युद्धाचा शेअर बाजाराला मोठा फटका
इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचा मोठा फटका भारतीय शेअर बाजाराला बसला. सोमवारी बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. व्यवहाराच्या सुरुवातीच्या तासांमध्ये सेन्सेक्स २,७४३ अंकांनी कोसळून ८,५४३.७३ वर आला; तर निफ्टी ५० मध्ये ५१९ अंकांची घसरण होऊन तो २४,६५९.२५ वर पोहोचला. दिवसाच्या उत्तरार्धात सेन्सेक्सने काही प्रमाणात सावरण्याचा प्रयत्न केला असला तरीही बाजार १,०४८ अंकांच्या (१.२९%) घसरणीसह बंद झाला. सोमवारी दुपारी ३:५० च्या सुमारास निफ्टी १.२४ टक्क्यांच्या घसरणीसह २४,८६५ वर व्यवहार करत होता. शेअर बाजारातील भीषण घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एकाच दिवसात ७.५ लाख कोटी रुपयांची घट झाली.
कोणकोणत्या कंपन्यांचे शेअर्स घसरले?
रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अँड टुब्रो, आयसीआयसीआय बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांसारख्या मोठ्या कंपन्यांच्या समभागांमध्ये सोमवारी मोठी पडझड झाली. मुंबई शेअर बाजाराचे एकूण बाजार भांडवल ४६३.५० लाख कोटी रुपयांवरून घसरून ४५५.७० लाख कोटी रुपयांवर आले आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, ६५० हून अधिक कंपन्यांच्या शेअर्सनी सोमवारी ५२ आठवड्यांतील नीचांकी पातळी गाठली होती. यात प्रामुख्याने एसीसी, ॲबॉट इंडिया आणि आलोक इंडस्ट्रीज यांसारख्या कंपन्यांचा समावेश होता. एकूण ३,७६५ सक्रियपणे व्यवहार झालेल्या शेअर्सपैकी तब्बल ३,०१४ शेअर्स घसरणीत होते; तर केवळ ५९६ शेअर्स वाढीत होते. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ७,५३६.३६ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. मात्र, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सुमारे १२,२९२.८१ कोटी रुपयांची खरेदी करून बाजार सावरण्याचा प्रयत्न केला.
आणखी वाचा : पाकिस्तानने त्यांच्याच देशातील लोकांना ठार का मारले? खामेनी यांच्या हत्येनंतर कराचीत काय घडले?
कच्च्या तेलाच्या किमतीत भरमसाठ वाढ
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतींनी उच्चांक गाठला. या युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून त्याचा मोठा फटका भारतासारख्या तेल आयातदार देशाला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अल जझीराच्या वृत्तानुसार, सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडच्या किमतीत नऊ टक्क्यांची वाढ होऊन ते ७९.४१ डॉलर्स (सुमारे ७,२६६ रुपये) प्रति बॅरलवर पोहोचले होते. त्याआधी शुक्रवारी ही किंमत ७२.८७ डॉलर्स होती. जगातील एकूण सागरी तेल व्यापारापैकी २० टक्के व्यापार होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होतो. सध्या हा मार्ग अधिकृतपणे बंद करण्यात आला नसला तरीही संभाव्य हल्ल्याच्या भीतीने तेलवाहू जहाजांची वाहतूक ठप्प झाली आहे. राईस्टॅड एनर्जीचे तज्ज्ञ जॉर्ज लिओन यांच्या मते, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून दररोज १५ दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाचा पुरवठा थांबला आहे. जर तणाव लवकर निवळला नाही, तर तेलाच्या किमतीत आणखी मोठी वाढ होऊ शकते.
भारताच्या अडचणीत कशी झाली वाढ?
भारत दररोज ५.५ दशलक्ष बॅरल तेलाचा वापर करतो आणि आपली ८० टक्के गरज आयातीद्वारे पूर्ण करतो. भारताची एकूण कच्च्या तेलाची निम्मी आयात आणि जवळपास सर्व एलपीजी खरेदी होर्मुझच्या सामुद्रधुनीतूनच होते. गेल्या दोन महिन्यांत भारताने रशियन तेलावरील अवलंबित्व कमी करून पश्चिम आशियातील देशांकडून (इराक, सौदी अरेबिया, युएई आणि कुवेत) होणारी आयात ५० टक्क्यांपर्यंत वाढवली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, भारत रशियन तेल खरेदी थांबवणार आहे. त्यामुळे भारताचे आखाती देशांवरील अवलंबित्व अधिक वाढले असून बाजारपेठेतील अनिश्चिततेचा फटका भारताला बसू शकतो. तज्ज्ञांच्या मते, मध्यपूर्वेतील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी अस्थिरता निर्माण होईल. यादरम्यान ओपेक देशांनी एप्रिलमध्ये दररोज २,०६,००० बॅरल अतिरिक्त उत्पादन करण्याचे आश्वासन दिले आहे. जर आखाती देशांतून होणारा पुरवठा दीर्घकाळ विस्कळीत राहिला आणि सौदी-ओपेक देशांनी उत्पादन वाढवले नाही, तर भारत पुन्हा एकदा वेगाने रशियन कच्च्या तेलाकडे वळू शकतो.
हेही वाचा : इराणकडे कोणकोणती क्षेपणास्त्रे? सैन्य किती शक्तिशाली? अमेरिका-इस्रायलसमोरील आव्हाने कोणती?
बासमती तांदळाची निर्यात थांबली
पश्चिम आशियातील युद्धामुळे भारताच्या कृषी निर्यातीसमोरही मोठे संकट उभे राहिले आहे. इराण आणि इराक यांसारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये होणारी बासमती तांदळाची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली असून रुपयाचे मूल्यही कमालीचे घटले आहे. ऑल इंडिया राईस एक्सपोर्टर्स असोसिएशनचे सरचिटणीस व फॉर्च्युन राईस लिमिटेडचे संचालक अजय भालोटिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराण हा भारतीय बासमती तांदळाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी इराणकडून मोठ्या प्रमाणावर आयातीची ऑर्डर मिळाल्याने देशांतर्गत बाजारात बासमती तांदळाचे भाव प्रति किलो १० रुपयांनी वाढले होते. सध्या भारताकडून इराणला मोठ्या प्रमाणात तांदूळ पाठवण्यात आला आहे. मात्र, बदललेल्या परिस्थितीमुळे इराणमधील आयातदार हा माल स्वीकारू शकतील का, याबाबत मोठी शंका निर्माण झाली आहे. भारताच्या एकूण बासमती निर्यातीपैकी इराणचा २५ टक्के वाटा, तर इराकचा २० टक्के वाटा आहे. या दोन देशांना होणारी निर्यात वर्षाला २ अब्ज डॉलर्स (सुमारे १८३ अब्ज रुपये) पेक्षा जास्त आहे. केवळ तांदूळच नव्हे, तर भारतीय चहाच्या निर्यातीलाही युद्धाचा फटका बसण्याची शक्यता आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारताने इराणला सुमारे सात अब्ज रुपयांचा चहा निर्यात केला होता, ज्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यापार्श्वभूमीवर मध्यपूर्वेतील हे युद्ध किती काळ चालणार आणि त्याचा भारताला किती मोठा फटका बसणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
