पश्चिम आशियात अमेरिका-इस्रायल व इराण यांच्यात युद्ध सुरू आहे. होर्मुझ सामुद्रधुनीत इराणकडून जलसुरुंग म्हणजेच नेव्हल माइन्स (Navel Mines) लावले जात असल्याचे अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने म्हटले आहे. होर्मुझ सामुद्रधुनीत इराणी नौदलाच्या काही नौका व १६ जलसुरुंग उद्ध्वस्त केल्याचे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने सांगितले. होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकन लष्कराच्या कारवायांना आळा घालण्यासाठी इराणने नेव्हल माइन्स लावण्याचे काम सुरू केले आहे. नेव्हल माइन्स लावण्यासाठी इराणकडून लहान जहाज व बोटींचा वापर केला जात आहे, अशी माहिती ‘द न्यू यॉर्क टाइम्स’ने दिली. आखाती देशांमधून जगात पोहोचणाऱ्या २० टक्के तेलाची वाहतूक होर्मुझ सामुद्रधुनीतून केली जाते. याच मार्गात इराणने जहाजांवर हल्ले व नेव्हल माइन्स लावण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे तेल व गॅसच्या व्यापारात अडथळा निर्माण झाला आहे.
नेव्हल माइन्स म्हणजे काय ?
समुद्राखालील सबमरीन व पाण्यावरून जाणाऱ्या जहाजांना जलसुरुंग म्हणजेच नेव्हल माइन्स लावून उडवले जाते. शत्रूला प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी तसेच त्याला एका ठिकाणी अडकवून ठेवण्यासाठी नेव्हल माइन्सचा वापर केला जातो. अमेरिकन क्रांती (१७६५-८३) वेळी पहिल्यांदा अमेरिकेकडून नेव्हल माइन्सचा समुद्रात वापर करण्यात आला होता. येल विद्यापीठातील डेव्हिड ब्रश्नेल यांनी गनपावडरचा पाण्यात स्फोट होऊ शकतो, असा शोध लावला होता. अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या कार्यकाळात अमेरिकेकडून जलसुरूंग तयार करण्यात आले होते. डेलावेअर रिव्हर ऑफ फिलाडेल्फिया येथे उभ्या असलेल्या ब्रिटीश जहाजाला अमेरिकेने जलसुरुंगाचा वापर करून उडवले होते.
नेव्हल माइन्सचे प्रकार
नेव्हल माइन्सचे अनेक प्रकार आहेत. नेव्हल माइन्स पाण्यात कसे लावले जातात, तसेच त्यांची पाण्यातील स्थिती यांवरून नेव्हल माइन्सचे प्रकार ठरतात. छोट्या जहाजांमध्ये देखील नेव्हल माइन्स भरून ठेवले जातात. ते पाण्यावरच तरंगत असतात. जहाज त्यांच्या संपर्कात आले की मोठा स्फोट होतो. आकाशातून लढाऊ विमानांद्वारे पाण्याखाली नेव्हल माइन्स लावले जातात. पाण्याच्या आत लावलेल्या नेव्हल माइन्सने सबमरीनला लक्ष्य करता येते. नेव्हल माइन्सचे अनेक प्रकार अमेरिका तसेच इतर देशांनी विकसित केले आहेत. मुर्ड नेव्हल माइन्स हे समुद्राच्या तळाला साखळीने बांधलेले असतात जे पाण्याच्या ठराविक खोलीवर तरंगतात. तर बॉटम माइन्स हे समुद्राच्या अगदी तळाला बसवलेले सुरुंग असतात.
नेव्हल माइन्सला कसे उद्ध्वस्त केले जाते?
नेव्हल माइन्सला उदध्वस्त करण्यासाठी अॅक्टिव्ह व पॅसिव्ह पद्धतींचा वापर केला जाते. शत्रूला कसे प्रत्युत्तर द्यायचे आहे, यावरून नेव्हल माइन्स कसे उद्ध्वस्त करायचे ते ठरवले जाते. पॅसिव्ह पद्धतीत जहाजात लाकूड अथवा फायबर ग्लासचा वापर केला जातो. त्यामुळे जहाज नेव्हल माइन्सला धडकले तरी नेव्हल माइन्स अॅक्टिव्ह होत नाही. अॅक्टिव्ह पद्धतीत नेव्हल माइन्सला उद्ध्वस्त अथवा त्यांना टाळले जाते. मानवरहित ड्रोन अथवा व्हेइकल किंवा सोनार तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांना निष्क्रिय केले जाते. अमेरिकेच्या नौदलाकडून एव्हेंजर श्रेणीतील माइनस्विपरचा वापर केला जातो. या माइनस्विपर हे पाण्याखालील माइन्सचा शोध घेतात, तसेच त्यांना नष्ट करतात. नेव्हल माइन्स नष्ट करण्यासाठी मानवरहित ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाण केला जातो. याद्वारे जीवितहानी टाळली जाते.
इराणकडून नेव्हल माइन्सचा वापर
मार्च २०२६ मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालातून इराणकडे पाच ते सहा हजार नेव्हल माइन्स असल्याचे समोर आले. लिम्पेट माइन्स, मुर्ड माइन्स आणि बॉटम माइन्स अशा तीन प्रकारचे नेव्हल माइन्स इराणकडे आहेत. दरम्यान, युद्ध सुरू झाल्यापासून इराणने खूप कमी माइन्सचा वापर केला आहे. येत्या काळात इराण माइन्सचा अधिक वापर करू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. होर्मुझ सामुद्रधुनीत नेव्हल माइन्स लावण्यासाठी इराणकडून छोट्या व वेगाने धावणाऱ्या जहाजांचा वापर केला जात आहे. इराणकडून स्फोटकांनी भरलेल्या सुसाईड जहाज पूर्वी वापरल्या जायच्या. त्यांची जागा आता नेव्हल माइन्सने घेतली आहे.
१९८० मध्ये इराणने माइन्सचा वापर करून पर्शियन आखातात व्यावसायिक जहाजांना उडवले होते. त्यावेळी इराण-इराक यांच्यात युद्ध सुरू होते. इराणकडून मूर्ड माइन्स श्रेणीतील सादाफ-०२ या नेव्हल माइन्सचा त्यावेळी वापर करण्यात आला होता. त्यानंतर अमेरिका व इराण यांच्या नौदलात युद्ध पेटले होते. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी इराणला ठोस प्रत्युत्तर देण्याचे आदेश अमेरिकन सैन्याला दिले होते. त्यानंतर इराणच्या पायाभूत सुविधांना अमेरिकेकडून लक्ष्य करण्यात आले होते. इराणमध्ये अनेक ठिकाणी अमेरिकेने हल्ले केले होते. ‘ऑपरेशन प्रेयिंग मँटिस’ असे नाव त्या ऑपरेशनला अमेरिकेने दिले होते.
होर्मुझ सामुद्रधुनी
होर्मुझ सामुद्रधुनी हा एक महत्वाचा सागरी मार्ग आहे. जगात होणाऱ्या एकूण तेल व गॅस पुरवठ्यापैकी २० टक्के वाहतूक होर्मुझ सामुद्रधुनीतून केली जाते. होर्मुझ सामुद्रधुनीच्या उत्तरेला इराण व दक्षिणेला ओमान व संयुक्त अरब अमिराती हे देश आहेत. ही सामुद्रधुनी ५० किमी रूंद, तर अरबी समुद्र व गल्फच्या आखाताला जोडणाऱ्या भागात ३३ किमी रूंद आहे. ही सामुद्रधुनी अत्यंत खोल असल्याने मोठ्या जहाजांसाठी हा मार्ग महत्वाचा ठरतो. २०२५ मध्ये होर्मुझ सामुद्रधुनीतून दररोज तेलाचे २० दशलक्ष बॅरल जहाजांमार्फत वाहून नेण्यात आले. दरवर्षी या सामुद्रधुनीतून ६०० अब्ज डॉलरचा व्यापार होतो. या मार्गाने युरोप तसेच आशियातील भारत व चीन या महत्वाच्या देशांना तेल, गॅस पुरवठा केला जातो. होर्मुझ सामुद्रधुनीतून फक्त इराणमधील तेलाचीच वाहतूक होत नाही, तर इराक, कुवैत, कतार, सौदी अरेबिया व यूएई या देशांमधील तेल या मार्गाने जगभरात पोहोचवले जाते.
होर्मुझ सामुद्रधुनीच्या कोणत्या भागात नेव्हल माइन्स लावले जात आहेत?
अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणा सीआयएने २००९ मध्ये एक अहवाल जारी केला होता. त्यात होर्मुझ सामुद्रधुनीचा बऱ्यापैकी भाग हा ४५ मीटर खोल असल्याचे म्हटले होते. पर्शियन आखात हे १००० किमी लांब व ३३० किमी रूंद आहे. पण त्याची खोली १०० मीटर पेक्षा अधिक नाही. सौदी अरेबिया व कुवैतमधील बंदरांच्या जवळील भागात खोली २० मीटरपेक्षाही कमी आहे. त्यामुळे या भागात मुर्ड किंवा बॉटम माइन्सचा वापर केला जाऊ शकतो.
इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनीत माइन्स लावले जाण्याची शक्यता खूपच कमी असल्याचे सीआयएने त्या अहवालात म्हटले होते. इराणकडून होणारी तेलाची व गॅसची निर्यात या मार्गाने होते, तसेच याच मार्गातून इराणला माल पुरवला जातो. आंतरराष्ट्रीय पातळीवर होर्मुझ सामु्द्रधुनी व्यापारासाठी इतर देशांसाठीही महत्वाची आहे. त्यामुळे इराणने नेव्हल माइन्स लावल्यास आंतरराष्ट्रीय दबाव इराणला झेलावा लागू शकतो. इराणची तेल निर्यात ही खर्ग आयलंड येथून होते. त्यामुळे खर्ग आयलंडवर जर हल्ला झाला तर इराण होर्मुझ सामुद्रधुनीत नेव्हल माइन्स लावेल, किंवा होर्मुझ सामुद्रधुनी बंद करेल, अशी शक्यता सीआयएने व्यक्त केली होती. दरम्यान, इराणकडून इराणला खेटून असलेल्या भागातच नेव्हल माइन्स पेरले जाऊ शकतात. ओमानकडील भागात इराणला नेव्हल माइन्स पेरणे अशक्य मानले जाते.
