पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल व इराण यांच्यात युद्ध सुरू आहे. इराणच्या शाहेद ड्रोन्सच्या माऱ्याने अमेरिका त्रस्त झाली आहे. इराणच्या शाहेद ड्रोन्सचा सामना करण्यासाठी अमेरिकेने युक्रेनला मदत मागितल्याचे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते. फेब्रुवारी २०२२ पासून युक्रेन स्वत:च रशिया विरूद्ध युद्ध लढत आहे. जागतिक पातळीवर प्रभावशाली असलेली अमेरिका आता युक्रेनची मदत घेत असल्याचे समोर आले आहे. अमेरिकेने युक्रेनला रशियाविरूद्धच्या युद्धात आतापर्यंत ११५ अब्ज डॉलरची आर्थिक मदत केल्याचे जर्मन थिंक टँक किल इन्स्टिट्यूटच्या अहवालातून समोर आले. परंतु, या मदतीत ट्रम्प सत्तेत आल्यापासून घट झाली आहे.
युक्रेनकडून अमेरिकेच्या लष्करी तळांचे रक्षण?
जॉर्डनमध्ये अमेरिकेच्या लष्करी तळांचे रक्षण करण्यासाठी युक्रेनने ड्रोनला हाणून पाडणारे इंटरसेप्टर ड्रोन व ड्रोन तज्ज्ञांची एक टीम पाठवली आहे, असे झेलेन्स्की म्हणाले. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्या विधानांपासून फारकत घेतली आहे. युक्रेनची मदत घेतली नाही, असे ट्रम्प म्हणाले. नेमकं काय घडतंय? अमेरिका या युद्धात युक्रेनची मदत कशी घेत आहे? याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
शाहेद ड्रोन्सची अमेरिकेला धास्ती?
इराणकडून होत असलेल्या शाहेद ड्रोन्सच्या माऱ्याने अमेरिकेला युक्रेनची मदत गरजेची वाटत आहे. इराणने आखाती देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांना शाहेद ड्रोनने लक्ष्य केले. शाहेद-१३६ हे ड्रोन लष्करी तळावरून एकदा हवेत उडाले की ते थेट शत्रूच्या तळांवर जाऊन मोठा स्फोट घडवून आणतात. हे वन-वे ड्रोन आहेत. या ड्रोनच्या नोजमध्ये (पुढील टोकदार भागात) स्फोटके भरलेली असतात. एक शाहेद ड्रोन बनवण्यासाठी इराणला २० ते ३० हजार डॉलर इतका खर्च येतो. हे कमी उंचीवरून उडणारे घातक ड्रोन्स आहेत.
शाहेद ड्रोन्सने अमेरिकेचे मोठे आर्थिक नुकसान
इराणने शाहेद ड्रोनचा वापर करून सौदी अरेबिया, यूएई, कतार, कुवैत, बहरीन आणि इतर अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांवर हल्ले चढवले आहेत. शाहेद ड्रोनचा सामना करण्यासाठी अमेरिकेने पॅट्रिओट मिसाईलचा वापर केला. एक पॅट्रिओट मिसाईल बनवण्यासाठी अमेरिकेला ४ दशलक्ष म्हणजे ४० लाख डॉलर लागतात. त्यामुळे इराणचे ३० हजार डॉलरचे शाहेद विरूद्ध अमेरिकेचे ४० लाख डॉलरचे पॅट्रिओट मिसाईल असा सामना रंगला आहे. शाहेद ड्रोन्स अमेरिकेचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान करत आहेत. शाहेद ड्रोन विरोधात अमेरिका वापरत असलेल्या पॅट्रिओट मिसाईलचा अमेरिकेकडे तुटवडा असल्याचे वृत्त नुकतेच ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिले होते.

युद्ध काळातही इराण वेगाने शाहेद ड्रोनची निर्मिती करत असल्याचे समोर आले आहे. हजारो शाहेद ड्रोन्सचा साठा इराणकडे तयार आहे. २८ फेब्रुवारी पासून युद्ध सुरू झाल्यानंतर इराणने आतापर्यंत फक्त २ हजार शाहेद ड्रोन्स वापरले आहेत. त्यांच्याकडे पाच हजारांहून अधिक हे ड्रोन्स असल्याचे समोर आले आहे.
युक्रेनविरोधात रशियाकडून शाहेद ड्रोन्सचा वापर?
जगात नवीन तंत्रज्ञानाला रशिया लवकर स्वीकार करतो. शाहेद ड्रोन बनवण्याचे तंत्रज्ञान देखील रशियाने याआधीच समजून घेतले आहे. शाहेद ड्रोनमध्ये काही बदल करून रशियाने त्याला ‘गेरान’ ड्रोन असे नाव दिले. युक्रेनविरोधात युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाने गेरान ड्रोन्सने युक्रेनवर हल्ला चढवला होता. युक्रेन देखील अमेरिकेप्रमाणे गेरानच्या विरोधात पॅट्रिओट मिसाईल वापरत होता. परंतु, कालांतराने पॅट्रिओट मिसाईल हे गेरानचा सामना करू शकत नाहीत, हे युक्रेनला लक्षात आले. तसेच ते अमेरिकेकडून विकत घ्यावे लागत होते. त्याची किंमतदेखील युक्रेनला न परवडणारी होती.
युक्रेनसाठी गरज कशी ठरली अविष्काराची जननी?
गरज ही अविष्काराची जननी आहे असे म्हणतात. त्याप्रमाणे युक्रेनला रशियाच्या गेरान ड्रोनचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करणे अत्यावश्यक होते. युक्रेनने गेरान ड्रोन्सला हाणून पाडणारी काउंटर ड्रोन टेक्नॉलॉजी विकसित केली. गेरान ड्रोन हवेत उडताच त्याला ट्रॅक करणारी सिस्टिम विकसित केली. या सिस्टिमचा उपयोग करून युक्रेनने ट्रकवर मशिन गन लावल्या. या मशिन गनने रशियाचे गेरान ड्रोन हाणून पाडण्याचे काम सुरू केले. तसेच इलेक्ट्रॉनिक जॅमर देखील युक्रेनने विकसित केले होते.

अमेरिकेला युक्रेनकडून काय हवंय?
युक्रेनचे हेच ड्रोन विरोधी तंत्रज्ञान आता शाहेद ड्रोन्सचा सामना करण्यासाठी अमेरिकेला हवे आहे. अमेरिकेचे वर्षाला १ लाख ड्रोन बनवण्याची क्षमता आहे, तर युक्रेनने २०२५ मध्ये २० लाख ड्रोन बनवल्याची नोंद आहे. दरम्यान, अमेरिकेने आता शाहेद ड्रोनला आव्हान देणारे लुकास (LUCAS) हे ड्रोन विकसित केले आहे. एक लुकास ड्रोन बनविण्यासाठी अमेरिकेला ३५ हजार डॉलरचा खर्च आल्याचे सांगण्यात आले. रशिया इराणला युद्धात मदत करत असल्याचा संशय अमेरिकेला आहे. अमेरिकेच्या लष्करी तळांचे लोकेशन आणि गुप्त माहिती रशिया इराणला पोहोचवत आहे असा संशय अमेरिकेला आहे. ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला दिल्या मुलाखतीत म्हटले, रशिया “त्यांना कदाचित मदत करत असेल.” दरम्यान, रशिया विरूद्ध सुरू असलेले यु्द्ध थांबवण्यासाठी, शस्त्रसंधी करण्यासाठी आम्हाला मदत केली तर आम्ही पश्चिम आशियातील देशांना मदत करू असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
