US B-2 Bomber Plane Goes Missing : गेल्या महिन्यात इराण व इस्रायल या दोन देशांत युद्ध पेटलेलं असताना अमेरिकेनं त्यात उडी घेऊन तेहरानवर हवाई हल्ले केले होते. या हल्ल्यात इराणमधील तीन आण्विक तळ नष्ट केल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. त्यानंतर ट्रम्प यांनी २४ जून रोजी इराण आणि इस्रायलमध्ये शस्त्रविरामाची घोषणा केली. ‘ऑपरेशन मिडनाईट हॅमर’अंतर्गत इराणवर केलेल्या हवाई हल्ल्याबाबतच्या अनेक गोष्टी अमेरिकेनं अजूनही गुप्त ठेवलेल्या आहेत. त्यादरम्यान, इराणवर हल्ला करण्यासाठी गेलेलं अमेरिकेचं लढाऊ विमान बेपत्ता झाल्याची आवई उठली आहे. त्याचाच घेतलेला हा आढावा…
इराणवरील हवाई हल्ल्यानंतर अमेरिकेनं जाहीर केलं की ‘ऑपरेशन मिडनाईट हॅमर’ हे पूर्णपणे यशस्वी ठरलं. तेहरानमधील फोर्डो, इस्फहान व नतान्झ हे आण्विक तळ अमेरिकन लष्करानं उद्ध्वस्त केले. मात्र, अमेरिकेच्या या दाव्यांचं इराणनं खंडन केलं आणि तिन्ही आण्विक तळ सुरक्षित असल्याचं सांगितलं. दरम्यान, इराणवर केलेल्या हवाई हल्ल्याबाबतच्या अनेक गोष्टी अमेरिकेनं अजूनही गुप्त ठेवलेल्या आहेत, ज्यामुळे त्यांच्या या मोहिमेवरच प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे. काही अहवालांनुसार, अमेरिकेनं या मोहिमेसाठी पाठविण्यात आलेल्या बी-२ स्टेल्थ या लढाऊ विमानांपैकी एक विमान अद्यापही देशात परतलेलं नाही. त्यामुळे हे विमान नेमकं कुठे गेलं, असा प्रश्न अमेरिकन नागरिक उपस्थित करीत आहेत.
अमेरिकेनं इराणवर कसा केला हल्ला?
- २१ जून रोजी अमेरिकेनं इराणच्या आण्विक तळावर हल्ला करण्याची मोहीम आखली.
- त्यासाठी अमेरिकेनं आपल्या लष्करी ताफ्यातील बी-२ स्टेल्थ श्रेणीतील दोन लढाऊ विमानं निवडली.
- या दोन्ही विमानांनी मिसुरी राज्यातील व्हाइटमॅन एअर फोर्स बेसहून उड्डाण केलं.
- त्यापैकी एक विमान इराणचं लक्ष विचलित करण्यासाठी पॅसिफिक महासागराच्या दिशेनं पाठवण्यात आलं.
- दुसरं विमान हे सात बॉम्बर्ससह पूर्वेकडे असलेल्या इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ला करण्यासाठी निघालं.
- या विमानांबरोबर इंधन भरणाऱ्या टँकर विमानांचा आणि इतर लढाऊ विमानांचा ताफा पाठविण्यात आला होता.
- अमेरिकेच्या काही लढाऊ विमानांनी इराणमधील फोर्डो आणि नतान्झ येथील अणुऊर्जेच्या केंद्रांवर हल्ले केले.
- त्यानंतर सर्व विमानं ३७ तासांच्या परतीच्या प्रवासानंतर व्हाइटमॅन बेसवर सुरक्षितपणे परतली.
- मात्र, अमेरिकेनं पश्चिमेकडे पाठविलेलं बी-२ स्टेल्थ हे विमान बेपत्ता झाल्याचा दावा केला जात आहे.
- विशेष बाब म्हणजे हे विमान नेमकं कुठे गेलं याबाबत कोणतीही माहिती नसल्याचं सांगितलं जात आहे.
आणखी वाचा : अमेरिकेचा भारतावर कुरघोडीचा प्रयत्न; कोट्यवधी शेतकरी सापडणार संकटात?
बेपत्ता झालेलं विमान नेमकं कुठे गेलं?
इराणला चकवण्यासाठी अमेरिकेनं पॅसिफिक महासागराच्या दिशेनं पाठविलेल्या ‘डिकॉय टीम’मधील बी-२ टेल्थ या विमानात अचानक बिघाड झाला होता आणि त्यामुळे या विमानानं तातडीनं आपत्कालीन लँडिग केल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेचं लढाऊ विमान हे हवाईमधील डॅनियल के. इनोय इंटरनॅशनल एअरपोर्टवर उतरलं असल्याचं सांगितलं जात आहे. या विमानतळाची धावपट्टी हवाईच्या हिकम एअर फोर्स बेससोबत शेअर करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे या विमानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अमेरिकन वायुदलातील माजी वैमानिक डेव्हिड मार्टिन यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. दुसरीकडे अमेरिकेच्या वायुदलानं या घटनेविषयीची कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. विमानाची दुरुस्ती व त्यासाठी लागणारा वेळ याविषयीही कुठलाही तपशील देण्यात आलेला नाही.

बी-२ स्टेल्थ विमानांमध्ये यापूर्वीही झाला होता बिघाड
दरम्यान, अमेरिकेच्या अत्याधुनिक लढाऊ विमानांमध्ये बिघाड होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही बी-२ श्रेणीतील स्टेल्थ विमानाला तांत्रिक अडचणींमुळे अनेकदा आपत्कालीन लँडिंग करावं लागलं होतं. एप्रिल २०२३ मध्ये असाच एक प्रसंग घडला होता, जेव्हा एक बी-२ स्टेल्थ विमान हवाईमध्ये वळवावं लागलं होतं. त्यावेळी या विमानाचा तिथे दोन आठवडे मुक्काम होता. २०२२ मध्ये तर आणखी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. मिसुरीत बी-२ विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं अमेरिकेनं सर्व विमानांचा ताफाच खाली उतरवला होता, ज्यामुळे अमेरिकन वायुदलाच्या स्टेल्थ ऑपरेशन्सवर ताण आला होता. ५ फेब्रुवारी २००८ मध्ये गुआमच्या अँडरसन वायुदलाच्या हवाई धावपट्टीवरून उड्डाण करताना B-2 ‘Spirit of Kansas’ हे विमान काही क्षणांतच कोसळलं होतं. या दुर्घटनेतून विमानातील दोन्ही पायलट सुखरूप वाचले. अपघाताची ही घटना बी-२ लढाऊ विमानाच्या इतिहासातील सर्वांत गंभीर मानली जाते.
हेही वाचा : अमेरिका भारतावर आकारणार तब्बल ५०० टक्के आयातशुल्क? डोनाल्ड ट्रम्प यांची रणनीती काय?
B-2 स्टेल्थ बॉम्बरविषयीची सविस्तर माहिती
बी-२ स्टेल्थ बॉम्बर हे एक अत्याधुनिक स्टेल्थ लढाऊ विमान अमेरिकेच्या लष्करी शक्तिशाली विमानांपैकी एक मानलं जातं. जगातील सर्वांत महागडं युद्धविमान मानल्या जाणाऱ्या या विमानाची किंमत सुमारे दोन अब्ज डॉलर्स इतकी आहे. सध्या अमेरिकेकडे या श्रेणीतील फक्त १९ लढाऊ विमानं आहेत. ‘ऑपरेशन मिडनाईट हॅमर’अंतर्गत राबविल्या गेलेल्या मोहिमेमध्ये या विमानांनी अचूकतेनं मारा करीत इराणच्या अणुऊर्जेच्या कार्यक्रमांना प्रचंड प्रचंड हानी पोहोचवली, असं अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. मात्र, याबाबतचा अधिकृत अहवाल अद्याप तयार होत असल्याचीही त्यांनी नोंद घेतली आहे. दुसरीकडे इराणनं कोणतीही मोठी हानी झाली नसल्याचा दावा केला आहे आणि या हल्ल्याचे अमेरिकेला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही दिला आहे.