What Does America’s Brahman Cattle Have to Do With India? अमेरिकेत ब्राह्मण नावाचा एक प्रसिद्ध गोवंश आहे. इथे लक्षात घेण्याचा मुद्दा असा की, या वंशाचा भारतीय जातीव्यवस्थेशी कुठलाही संबंध नाही. परंतु, अमेरिकन असलेल्या या गोवंशाच्या माध्यमातून भारतीय गोवंशाने जगाला दिलेल्या पशूधनाची माहिती समजण्यास मदत होते, त्यामुळे या विषयाची माहिती घेणं महत्त्वाचं ठरतं. म्हणूनच या वारशाची देवाणघेवाण समजून घेण्यासाठी इतिहासात डोकावून पाहावे लागतं.

अमेरिकेन ब्राह्मण गायीच्या जैविक इतिहासाकडे वळण्यापूर्वी तिचे अमेरिकेतील महत्त्व समजून घेणे गरजेचं आहे. या ब्राह्मण गोवंशाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या गायी उष्ण हवामानाशी जुळवून घेतात. टॉरीन गुरांच्या तुलनेत हा वंश दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि अमेरिकेच्या उष्ण हवामानात सैल त्वचा, घर्मग्रंथींचे कार्य, त्वचेची रचना, केसांची वैशिष्ट्ये आणि शरीरातील उष्णता नियंत्रित करणाऱ्या जैविक यंत्रणांमुळे अधिक तग धरू शकतो. शिवाय त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे त्यांना गोचीड आणि बाह्यपरजीवींचा त्रास कमी प्रमाणात होतो. तरीही वेळच्यावेळी लसीकरण, कृमिनाशन, पशुवैद्यकीय तपासणी आणि जैवसुरक्षा आवश्यकच आहेत. या वंशातील माद्या दीर्घकाळ प्रजननक्षम असतात. क्रॉसब्रिडिंग प्रजननासाठी हा गोवंश उत्तम मानला जातो.

ब्राह्मण गोवंशाच्या संकरातून विकसित झालेल्या प्रजाती

  • ब्रँगस- ब्राह्मण × अँगस
  • ब्रॅफोर्ड- ब्राह्मण × हेरफोर्ड
  • बीफमास्टर- ब्राह्मण, हेरफोर्ड आणि शॉर्टहॉर्न यांचा सहभाग
  • सांता गर्ट्रुडिस- ब्राह्मण आणि शॉर्टहॉर्न आधारित
  • सिमब्राह- ब्राह्मण × सिमेंटल
  • चारब्रे- ब्राह्मण × शारोले

या गौ जातींमुळे अमेरिकेतील उष्णकटिबंधीय भागांत गोमांस उद्योगाला स्थिरता मिळण्यास मदत झाली. कमी मृत्यूदर, उत्तम प्रजनन क्षमता, गोचिड नियंत्रणावरील कमी खर्च आणि प्रतिकूल हवामानातही टिकून राहण्याची क्षमता, या सर्व गुणांमुळे त्यांना आर्थिक मूल्य प्राप्त झाले आहे. असे असले तरी काही आव्हानांनाही सामोरे जावे लागते आहे. या जनावरांमध्ये लैंगिक परिपक्वता येण्यास होणारा उशीर, विशिष्ट बाजारांच्या गरजेनुसार मांसाच्या मऊपणात (tenderness) फरक पडणे, अशा गोष्टी आढळतात. म्हणूनच, स्थानिक हवामान, बाजाराची मागणी आणि पैदासीचे उद्दिष्ट लक्षात घेऊन ‘ब्राह्मण’ जनुकांचे योग्य प्रमाण (टक्केवारी) राखणे व त्यांचा योग्य समतोल साधणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

भारताशी संबंध

या गोवंशाच्या पुढे अमेरिका हे नाव लागत असले तरी या गायीची आनुवंशिक मुळे भारतीय उपखंडात आहेत. गिर, कांकरेज, ओंगोल किंवा नेल्लोर आणि कृष्णा व्हॅली अशा भारतीय झेबू प्रजातींचे अमेरिकेत नियोजित संकरण व निवड करून ही जात विकसित करण्यात आली. ही भारतीय झेबूच्या आधारे अमेरिकेत घडवलेली नवीन संमिश्र जात आहे.

America’s Brahman Cattle

झेबू म्हणजे नक्की कोण?

झेबू म्हणजे खांद्यावर स्पष्ट वशिंड असलेला उष्णकटिबंधीय गोवंश होय. त्याचे वैज्ञानिक वर्गीकरण अनेकदा बॉस इंडिकस (Bos indicus) किंवा Bos taurus indicus असे केले जाते. युरोपीय व समशीतोष्ण प्रदेशातील वशिंड नसलेल्या गुरांना सामान्यतः Bos taurus किंवा taurine cattle म्हणतात.

झेबूची मुख्य दृश्य वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:

  • खांद्यावरील वशिंड
  • मोठी गलकंबळ किंवा लोंबती मानकातडी
  • तुलनेने सैल त्वचा
  • लांब कान
  • उष्णता सहन करण्याची क्षमता
  • कीटक, गोचिड आणि काही रोगांविरुद्ध तुलनेने अधिक तग धरण्याची प्रवृत्ती
  • पाणी व चारा कमी उपलब्ध असतानाही जगण्याची क्षमता

प्रत्येक भारतीय गोवंश जातीमध्ये ही सर्व वैशिष्ट्ये एकाच प्रमाणात दिसून येत नाहीत. गिर, कांकरेज, ओंगोल, साहिवाल, थारपारकर आणि कृष्णा व्हॅली यांसारख्या प्रजातींचे दूध उत्पादन, नांगर ओढणे, शरीररचना, रंग आणि स्थानिक वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता यांत लक्षणीय भिन्नता आढळते.

आनुवंशिक आणि पुरातत्त्वीय संशोधनानुसार, ‘टॉरिन’ (Taurine) आणि ‘इंडिसिन’ (Indicine) म्हणजेच झेबू गोवंशाचे माणसाळवणे दोन स्वतंत्र व वेगळ्या प्रक्रियांद्वारे झाले. टॉरिन गोवंशाचा उगम पश्चिम आशियातील जंगली ‘ऑरॉक्स’ (Aurochs) प्राण्यापासून झाला, तर झेबू (वशिंड असलेला गोवंश) गोवंशाचे माणसाळवणे प्रामुख्याने दक्षिण आशियात, विशेषतः सिंधू खोरे आणि लगतच्या प्रदेशात झाले. झेबूच्या कालावधीबाबत आणि मूळ स्थानाबद्दल मतभेद असले तरी पुरातत्त्वीय संशोधनात सापडलेली हाडांची रचना, प्राचीन शिल्पे व नाण्यांवरील प्रतिमा आणि आधुनिक डीएनए अभ्यास वशिंड असलेला हा गोवंश काही हजार वर्षांपूर्वी भारतीय उपखंडात स्वतंत्रपणे विकसित झाला.

प्राचीन शेतकऱ्यांसाठी झेबू हा फक्त दूध किंवा मांसाचा स्रोत नव्हता. तर त्याचा उपयोग नांगरणी, गाड्या ओढण्यासाठी, धान्याची मळणी करणे, शेणखत व इंधनासाठी, संपत्ती आणि सामाजिक प्रतिष्ठेचे प्रतीक म्हणून धार्मिक व सांस्कृतिक व्यवहारांत केला जात असे. दक्षिण आशियाई कृषिसंस्कृतीचा विस्तार आणि झेबूचा प्रसार हे परस्परांशी संबंधित होते.

हडप्पा-मोहेंजोदडोच्या शिक्क्यांवरील बैल झेबूच आहे का?

भारतीय झेबूचा (Bos indicus) इतिहास सिंधू संस्कृतीशी संबंधित आहे. इ.स.पूर्व ६००० च्या सुमारास सिंधू खोऱ्यात या गोवंशाचे माणसाळवणे झाले. याचे प्राथमिक पुरावे आजच्या पाकिस्तानातील मेहरगढसारख्या नवपाषाणकालीन स्थळांवर आढळतात. आनुवंशिक संशोधनातूनही हे स्पष्ट होते की, झेबू हा दक्षिण आशियातील प्राचीन पशुपालन संस्कृतीचा आणि पाळीवकरण प्रक्रियेचा एक स्वतंत्र व अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा आहे.

दक्षिण आशियाई कृषिसंस्कृतीचा विस्तार आणि झेबूचा प्रसार हे परस्परांशी संबंधित होते. सिंधू किंवा हडप्पा संस्कृतीच्या अनेक मुद्रांवर वशिंड असलेले बलदंड बैल दिसतात. उंच खांदा, मोठे वशिंड, लोंबती गलकंबळ आणि लांब शिंगे यांमुळे अनेक पुरातत्त्वज्ञ या प्रतिमांना झेबू किंवा indicine cattle चे चित्रण मानतात. हे दृश्य पुरावे महत्त्वाचे आहेत. यामुळे सिंधू संस्कृतीतील वशिंड असलेल्या गोवंशाचे आर्थिक आणि प्रतीकात्मक स्थान समजण्यास मदत होते.

मात्र येथे तीन गोष्टी वेगळ्या ठेवणे आवश्यक आहे. पहिली, मुद्रांवर वशिंड असलेला बैल दिसतो, म्हणून तो आधुनिक गिर, कांकरेज किंवा ओंगोल यांपैकी अमुकच जात होती, असे ठामपणे सांगता येत नाही. आजच्या नोंदणीकृत प्रजाती दीर्घकालीन स्थानिक निवड आणि तुलनेने अलीकडील औपचारिक वर्गीकरणातून आकाराला आल्या आहेत. दुसरी, मुद्रांवरील प्राणी धार्मिक देवता, राजकीय सत्ता, व्यापारी खूण, कुळचिन्ह की प्रत्यक्ष पशुधन नोंद होती, याचा निश्चित अर्थ अद्याप समजलेला नाही. तिसरी, मुद्रा हा दृश्य पुरावा आहे; परंतु, संपूर्ण इतिहास सिद्ध करण्यासाठी हाडांचे कालमापन, प्राणिशास्त्रीय मोजमाप आणि DNA पुरावेही आवश्यक असतात. म्हणून हडप्पा मुद्रांवरील बैलाचा झेबूशी संबंध मजबूत आणि शास्त्रीयदृष्ट्या मान्यताप्राप्त आहे; परंतु त्या प्रतिमेवरून आजच्या विशिष्ट भारतीय जातीची थेट ओळख पटवणे योग्य नाही.

भारतीय झेबू अमेरिकेत कसा पोहोचला?

१९ व्या शतकात अमेरिकेत युरोपीय वंशाच्या (‘टॉरिन’) गुरांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. परंतु, अमेरिकेच्या दक्षिण भागातील तीव्र उष्णता, दमट हवामान, गोचीड आणि विविध परजीवींचा प्रादुर्भाव यांमुळे या टॉरिन जातींच्या उत्पादन क्षमतेवर मर्यादा येत होत्या. याच काळात भारतातून थेट किंवा भारताद्वारे आधी ब्रिटन, ब्राझील व इतर देशांत गेलेल्या झेबू (वशिंड असलेल्या) पशूंचे अमेरिकेत आगमन सुरू झाले. ऐतिहासिक नोंदींनुसार १८४० च्या दशकापासून वेगवेगळ्या काळात ही जनावरे अमेरिकेत पोहोचल्याचे आढळते. पुढे, १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीला या झेबू गोवंशाच्या आधारे ‘अमेरिकन ब्राह्मण’ (American Brahman) या अत्यंत कणखर जातीची निर्णायक निर्मिती झाली.

  • गीर किंवा Gyr: गुजरातमधील गीर जात उष्णता सहनशीलता, मातृत्व, दूधक्षमता, वैशिष्ट्यपूर्ण कपाळ आणि लांब कानांसाठी ओळखली जाते.
  • कांकरेज किंवा Guzerat: Guzerat हे अमेरिकन व जुन्या पाश्चात्त्य नोंदींतील नाव आहे. ते गुजरात-कांकरेज समूहाशी संबंधित आहे. मोठा शरीरबांधा, शक्ती, लांब शिंगे आणि तग धरण्याची क्षमता यांमुळे तिचा उपयोग करण्यात आला.
  • ओंगोल किंवा Nellore: आंध्र प्रदेशातील ओंगोल जातीला आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेकदा Nellore किंवा Nelore म्हणतात. मोठा देह, उष्णता सहनशीलता आणि मांसोत्पादनासाठी उपयुक्त वाढ ही तिची वैशिष्ट्ये आहेत. ब्राझीलमध्ये Nelore ही अत्यंत प्रभावशाली जात ठरली.
  • कृष्णा व्हॅली: महाराष्ट्र-कर्नाटक सीमेच्या कृष्णा नदीखोऱ्यातील ही मोठ्या बांध्याची प्रसिद्ध प्रजात होती. अमेरिकन ब्राह्मणच्या ऐतिहासिक निर्मितीत तिचा वाटा तुलनेने कमी असला, तरी वंशपरंपरेत तिचा उल्लेख केला जातो.

आधुनिक जिनोमिक संशोधनात अमेरिकन ब्राह्मणमध्ये indicine ancestry प्रबळ असल्याचे दिसते. त्यात गीर, कांकरेज किंवा Guzerat, Nellore आणि कृष्णा व्हॅलीसारख्या भारतीय स्त्रोतांचा सहभाग आढळतो. काही प्रमाणात taurine मिश्रणही आढळू शकते. त्यामुळे अमेरिकन ब्राह्मण गाईला शुद्धपणे एका भारतीय प्रजातीची परदेशी आवृत्ती समजता येत नाही.

अमेरिकन ब्राह्मण ही प्रजाती अधिकृतपणे कधी घडली?

विविध झेबू आयाती आणि संकरणांनंतर अमेरिकन प्रजनकांनी विशिष्ट प्रकारची निवड सुरू केली. १९२४ साली American Brahman Breeders Association स्थापन करण्यात आली आणि अमेरिकन ब्राह्मण या प्रजातीला संघटित नोंदणी, वंशावळ आणि प्रजनन निकष मिळाले. यामुळे १९२४ हे अमेरिकन ब्राह्मण गाईच्या संस्थात्मक जन्माचे महत्त्वाचे वर्ष मानले जाते. परंतु तिची जैविक निर्मिती त्याआधी अनेक दशकांपासून चालू होती. ही नैसर्गिकरीत्या भारतातून जशीच्या तशी आलेली जात नाही. अमेरिकन हवामान, गोमांस बाजार, शरीरवाढ, प्रजननक्षमता आणि इतर स्थानिक उद्दिष्टांनुसार निवड करून तिला स्वतंत्र अमेरिकन जात म्हणून घडवण्यात आले.

ब्राह्मण हे नाव का दिले गेले?

या जातीच्या सुरुवातीच्या काळात ‘Brahma’ (ब्रह्मा), ‘Brahmin’ (ब्राह्मिन) आणि ‘Brahman’ (ब्राह्मण) असे विविध शब्द वापरले जात होते. पुढे १९२४ साली अधिकृत संघटना (American Brahman Breeders Association) स्थापन झाल्यानंतर ‘Brahman’ या एकाच नावावर शिक्कामोर्तब झाले आणि हेच नाव सर्वत्र प्रस्थापित झाले. हे नाव भारतीय संस्कृतीशी संबंधित असले तरी या पशुजातीचा भारतातील ‘ब्राह्मण’ या सामाजिक किंवा जाती-समुदायाशी कोणताही जैविक (biological) किंवा प्रजननशास्त्रीय (breeding) संबंध नाही. ‘Brahman’ हा येथे केवळ एका अमेरिकन पशूप्रजातीला दिलेला ऐतिहासिक व व्यावसायिक नामप्रयोग आहे. लोकप्रिय लेखनात किंवा अनधिकृत इतिहासात भारतातील पवित्र गायींमुळेच हे नाव दिले गेले असे सर्रास म्हटले जाते. हा संदर्भ काही अंशी तत्कालीन ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी स्पष्ट करतो; परंतु हेच नाव नक्की का आणि कोणत्या निर्णायक चर्चेतून निश्चित केले गेले, याची कोणतीही ठोस प्राथमिक नोंद (primary record) उपलब्ध नाही. म्हणूनच, या पशुजातीचे नाव (Brahman) आणि भारतातील सामाजिक ‘ब्राह्मण’ ही संकल्पना एकच मानणे ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे ठरेल.

भारतासाठी धडा

जगाने भारतीय गोवंशातील उपयुक्त गुण ओळखून त्यांचे वैज्ञानिक निवड, वंशनोंदणी, उत्पादनमापन आणि व्यावसायिक संकरात रूपांतर केले. भारतात मात्र अनेक देशी जातींची संख्या घटणे, अनियोजित संकर, शुद्ध वंशाची अस्पष्ट नोंद, कमी उत्पादनमापन आणि प्रजननक्षम नरांची कमतरता ही आव्हाने आहेत. देशी गोवंश संवर्धन म्हणजे प्रत्येक जनावराबद्दल भावनिक गौरव करणे एवढेच नाही, हे इथे लक्षात घेणे गरजेचे आहे.

संदर्भ/Refrence

  • American Brahman Breeders Association (ABBA)-Breed History
  • Chen, S. et al. (2010), “Zebu Cattle Are an Exclusive Legacy of the South Asia Neolithic,” Molecular Biology and Evolution, 27(1), 1–6.