American Journalist Abducted Baghdad : अमेरिकेतील प्रसिद्ध महिला पत्रकार शेली किटलसन यांचे इराकची राजधानी बगदाद येथून मंगळवारी (३१ मार्च) सिनेस्टाईल अपहरण करण्यात आले. भररस्त्यातच दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने इराकसह संपूर्ण अमेरिकेत एकच खळबळ उडवून दिली. अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यासाठी इराणच्या सुरक्षा यंत्रणांनी व्यापक मोहीम हाती घेतली. या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली असून त्याने गुन्ह्यात वापरलेले वाहनही जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेला संशयित हा इराणशी संबंधित असलेल्या हिजबुल्ला या सशस्त्र गटाचा सदस्य असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर कोण आहेत शेली किटलसन? त्यांचे इराणमधून अपहरण कसे झाले? बगदादमध्ये नेमके काय घडले? त्याविषयीचा हा आढावा…
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे वरिष्ठ अधिकारी डायलन जॉन्सन यांनी या घटनेवर भाष्य केले. बगदादमध्ये एका अमेरिकन पत्रकाराचे अपहरण झाल्याच्या वृत्ताची माहिती आम्हाला मिळाली असल्याचे त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद केले. मात्र, अधिकृत निवेदनात जॉन्सन यांनी शेली किटलसन यांच्या नावाचा थेट उल्लेख करणे टाळले आहे. इराकच्या सुरक्षा दलांनी बगदादमध्ये जागोजागी नाकाबंदी केली असून, किटलसन यांची सुटका करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
कोण आहेत शेली किटलसन?
शेली किटलसन या अमेरिकेतील एक अनुभवी आणि धाडसी स्वतंत्र पत्रकार आहेत. त्यांना प्रामुख्याने मध्य पूर्वेतील संघर्ष आणि युद्धाच्या बातम्यांचे वार्तांकन करण्यासाठी ओळखले जाते. त्यांच्या अपहरणामुळे आंतरराष्ट्रीय पत्रकारिता वर्तुळात चिंता व्यक्त केली जात आहे. किटलसन यांनी आपल्या पत्रकारितेच्या प्रवासाला अफगाणिस्तानमधून सुरुवात केली होती. त्यानंतर सीरिया आणि इराकच्या युद्धभूमीवरून त्यांनी प्रत्यक्ष परिस्थितीचे वृत्तांकन केले. स्वतंत्र पत्रकारिता करण्यापूर्वी किटलसन यांनी फॉरेन पॉलिसी, न्यू लाइन्स मॅगझीन, पोलिटिको, अल मजल्ला, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस, आरएआय रेडिओट्रे आणि एएनएसए, यांसारख्या वृत्तपत्रांमध्ये काम केले आहे. त्यांच्या उत्कृष्ट पत्रकारितेची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली गेली आहे. २०१७ मध्ये किटलसन यांना युद्धक्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय कामासाठी इटलीचा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘प्रेमियो कारावेला’ हा पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते, असे ‘इटालियन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल पॉलिटिकल स्टडीज’च्या अहवालात म्हटले आहे.
आणखी वाचा : भारतासाठी धोक्याची घंटा? करोनाचा नवा व्हेरिएंट किती घातक? आरोग्य तज्ज्ञांचा इशारा काय?
अमेरिकन पत्रकाराचे अपहरण कसे झाले?
पत्रकार शेली किटलसन यांच्या अपहरणाबाबतचे थरारक तपशील समोर आले आहे. मध्य बगदादमधील एका गजबजलेल्या रस्त्यावरून दिवसाढवळ्या त्यांचे अपहरण करण्यात आले. अपहरणकर्ते कारमधून आले होते आणि त्यांनी केस पकडून किटलसन यांना गाडीत खेचले आणि घटनास्थळावरून पळ काढला, अशी माहिती इराकच्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी द न्यूयॉर्क टाइम्सला दिली. प्रत्यक्षदर्शींनी या अपहरणाची माहिती दिल्यानंतर इराकच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी तातडीने अपहरणकर्त्यांचा कारचा पाठलाग सुरू केला. या सिनेस्टाईल पाठलागादरम्यान किटलसन यांना घेऊन जाणारी एक कार उलटली. मात्र, कारचा भीषण अपघात होऊनही अपहरणकर्त्यांनी तातडीने किटलसन यांना अपघातग्रस्त गाडीतून बाहेर काढले आणि दुसऱ्या कारमध्ये बसवून तिथून पळ काढला.

कथित व्हायरल व्हिडीओत नेमके काय?
असोसिएटेड प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, या अपहरणात दोन गाड्यांचा वापर करण्यात आला होता. त्यापैकी एक कार अपघातग्रस्त झाल्याने पोलिसांना जप्त करता आली. मात्र, दुसरी गाडी किटलसन यांना घेऊन दक्षिण बगदादच्या दिशेने फरार झाली. अल अरबिया या वृत्तवाहिनीने या कथित अपहरणाचा एक व्हिडीओ प्रसारित केला आहे, त्यामध्ये काही सशस्त्र व्यक्ती भररस्त्यात किटलसन यांची गाडी थांबवतात आणि त्यांना केस धरून आपल्या गाडीत बसवताना दिसत आहे. या व्हिडीओच्या सत्यतेची अधिकृत पुष्टी झालेली नसल्याचे वृत्तवाहिनीने स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर अमेरिकेत राहणाऱ्या किटलसन यांच्या आई शेली यांनी चिंता व्यक्त केली आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे किटलसन कुटुंबीयांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.
हेही वाचा : Inflation Alert : रुपया घसरला अन् तेलही महागलं; देशात महागाईचा प्रचंड भडका उडणार? अर्थतज्ज्ञांचा इशारा काय?
इराकच्या गृह मंत्रालयाने काय म्हटले?
इराकच्या गृह मंत्रालयाने अरबी भाषेतून प्रसिद्ध केलेल्या अधिकृत पत्रकात या घटनेचा थरार आणि सुरू असलेल्या कारवाईची माहिती दिली. पत्रकार शेली किटलसन यांच्या अपहरणाची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी अचूक गुप्तचर माहिती आणि सखोल क्षेत्रीय मोहिमेद्वारे अपहरणकर्त्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. यादरम्यान अपहरणकर्त्यांची एक कार उलटली, तरीही त्यांनी बंदुकीच्या जोरावर किटलसन यांना बाहेर काढले आणि दुसऱ्या वाहनातून ते फरार झाले. याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली असून सध्या त्याची चौकशी सुरू आहे. या गुन्हेगारी कृत्यात सामील असलेल्या आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, इराणशी संबंधित असलेल्या ‘कॅतब हिजबुल्ला’ या संघटनेच्या यादीत शेली किटलसन यांचे नाव होते. त्यांचे ‘अपहरण करणे किंवा ठार मारणे’ असा या संघटनेचा कट होता. जीवाला धोका असल्याची कल्पना असतानाही किटलसन यांनी बगदाद सोडले नाही आणि आपले रिपोर्टिंग सुरूच ठेवले होते. यादरम्यान हे अपहरण पश्चिम आशियातील सुरू असलेल्या युद्धाशी संबंधित आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
