India’s Most Wanted Terrorists Killed in Pakistan : दहशतवादाला खतपाणी घालणारा पाकिस्तान सध्या त्याच दहशतवादाच्या छायेत सापडला आहे. आधीच बलुचिस्तानमधील बंडखोरांनी पाकिस्तान सरकारला जेरीस आणले आहे. त्यातच देशात शरणार्थी असलेल्या दहशतवाद्यांचा नायनाट करण्याचा कुणीतरी सपाटाच लावला आहे. भारतातील मोस्ट वॉन्टेट यादीत आघाडीवर असलेल्या दहशतवाद्यांवर पाकिस्तानात हल्ल्यांची मालिका सुरू झाली आहे. लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अमीर हमजा याच्यावर पाकिस्तानातील लाहोरमध्ये गुरुवारी अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. गेल्या वर्षभरात हमजावर झालेला हा दुसरा मोठा हल्ला असून, या घटनेत तो गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचे समजते. त्याविषयीचा हा आढावा…

कोण आहे अमीर हमजा?

अज्ञात हल्लेखोरांच्या गोळीबारात गंभीर जखमी झालेला अमीर हमजा हा भारतविरोधी कारवाया करणाऱ्या ‘लष्कर-ए-तैयबा’ या संघटनेचा कणा मानला जातो. हाफिज सईदचा अत्यंत विश्वासू सहकारी असलेल्या हमजाचा दहशतीचा प्रवास अनेक दशकांचा आहे. हमजा मूळ पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गुजरानवाला येथील रहिवासी आहे. त्याने हाफिज सईदच्या सोबतीने लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेची स्थापना केली होती. तो अफगाण मुजाहिद्दीनचा जुना सैनिक असून, लष्करचा मुख्य विचारवंत म्हणून ओळखला जातो. आपल्या प्रक्षोभक भाषणांनी आणि लिखाणाने त्याने अनेक तरुणांना दहशतवादाकडे वळवले आहे.

बेंगळुरूतील हल्ल्याचा सूत्रधार

भारतातील अत्यंत प्रतिष्ठित संस्था असलेल्या बेंगळुरूच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’वर २००५ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे अमीर हमजाचा हात असल्याचे सांगितले जाते. या हल्ल्यात एका प्राध्यापकाचा मृत्यू आणि चार जण गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्याचा दुसरा सूत्रधार अबू सैफुल्ला हा गेल्या वर्षी पाकिस्तानात अज्ञात हल्लेखोरांकडून मारला गेला. हमजाच्या वाढत्या कारवाया लक्षात घेता ऑगस्ट २०१२ मध्ये अमेरिकेने त्याला ‘जागतिक दहशतवादी’ घोषित केले. तो लष्करच्या केंद्रीय सल्लागार समितीचा सदस्य होता आणि हाफिज सईदच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या विविध ट्रस्ट आणि धर्मादाय संस्थांचे काम पाहत असे.

आणखी वाचा : आठवीच्या विद्यार्थ्याने कसा घडवून आणला भीषण नरसंहार? १४ वर्षांच्या मुलाकडे ५ शस्त्रे आली कुठून?

भारतविरोधी कारवाईचे षडयंत्र

दहशतवाद्यांच्या सुटकेसाठी वाटाघाटी करणे आणि ‘विशेष मोहिमा’ राबवणे, अशी कामे हमजा करीत होता. २०१८ मध्ये जेव्हा पाकिस्तानने जमात-उद-दावा या संघटनेवर बंदी घातली, तेव्हा हमजाने ‘जयेश-ए-मनकाफा’ नावाची नवीन संघटना स्थापन केली. ही संघटना प्रामुख्याने काश्मीरवर लक्ष केंद्रित करून निधी गोळा करणे आणि भारतविरोधी प्रचार करण्याचे काम करते. हमजा आणि हाफिज सईद यांच्यात वाद असल्याच्या चर्चा मध्यंतरी रंगल्या होत्या, मात्र त्या केवळ अफवा असल्याचे नंतर स्पष्ट झाले.

amir-hamza-laskhar-e-taiba-attack-lahore-pakistan-unknown-gunmen
लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक सदस्य आणि भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अमीर हमजा.

अमीर हमजावर हल्ला नेमका कसा झाला?

अमीर हमजा याच्यावर गुरुवारी (१६ एप्रिल) लाहोरमधील पिंडी स्टॉपजवळ दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. एका स्थानिक टीव्ही चॅनलला मुलाखत देऊन कारने घरी परतत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. यावेळी हमजाबरोबर कारमध्ये पाकिस्तानचे न्यायाधीश नझीर अहमद गाझी हेदेखील होते. या हल्ल्यात त्यांनाही दुखापत झाल्याचे वृत्त आहे. हमजावर झालेला हा वर्षभरातील दुसरा हल्ला आहे. यापूर्वी मे २०२५ मध्ये त्याच्या लाहोरमधील राहत्या घरी घुसून अज्ञात व्यक्तींनी त्याच्या कंबरेवर गोळ्या झाडल्या होत्या. त्या हल्ल्यानंतर त्याला पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या कडक सुरक्षेत लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अमीर हमजाचा खेळ खल्लास?

ताज्या हल्ल्यात अमीर हमजा गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती सध्या अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. लष्कर-ए-तैयबाच्या अंतर्गत गटांमधील वादामुळे त्याच्यावर हा हल्ला झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. लाहोर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. अमीर हमजाचा खेळ खल्लास झाल्याची कुजबूज पाकिस्तानमधील अनेक शहरांमध्ये सुरू झाली आहे. मात्र, पाकिस्तानकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

हेही वाचा : ४९ लाखांची तिकीटे काढूनही विमानात प्रवेश नाकारला; पेरूला निघालेल्या भारतीय कुटुंबासोबत काय घडले?

भारताच्या कट्टर शत्रूंना कोण संपवतंय?

गेल्या चार वर्षांत अनोळखी व्यक्तींनी केलेल्या हल्ल्यांत पाकिस्तानात आश्रयास असलेले अनेक दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे भारताच्या शत्रूंना पाकिस्तानातून यमसदनी कोण पाठवतंय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. हमजावरील हल्ला हा याच साखळीतील एक भाग असल्याचे मानले जात आहे. मार्च २०२२ मध्ये कंधार विमान विमान हायजॅक प्रकरणातील आरोपी झहूर मिस्त्री याची कराचीत अज्ञात हल्लेखोरांनी अत्यंत निर्घृणपणे हत्या केली होती. त्यानंतर मे २०२३ मध्ये खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंग पंजवड याचा लाहोरमध्ये अज्ञातांनी खात्मा केला. पुढच्याच वर्षी युनायटेड जिहाद कौन्सिल या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या शेख जमील-उर-रहमान अ‍ॅबोटाबाद शहरात मृतावस्थेत आढळून आला.

दहशतवाद्यांमध्ये भीतीचे वातावरण

मार्च २०२५ मध्ये दहशतवादी हाफिज सईदचा पुतण्या व लष्कर कमांडर अबू कतल याची झेलममध्ये हत्या झाली. मार्च २०२६ मध्ये जैश-ए-मोहम्मद प्रमुख मसूद अझहरचा भाऊ मोहम्मद ताहीर अन्वर याची अज्ञात व्यक्तींनी हत्या केल्याचे समोर आले होते. याशिवाय दहशतवादी विचारसरणीचा प्रसार करणारा झियाउर रहमान, राजौरी हल्ल्याचा सूत्रधार अबू कासिम काश्मिरी आणि हिजबुल मुजाहिद्दीनचा बशीर अहमद पीर यांचाही अज्ञात हल्लेखोरांनी खात्मा केला. पाकिस्तानात एकापाठोपाठ एक दहशतवाद्यांना लक्ष्य केले जात असल्याने तेथील जिहादी संघटनांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषतः भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेले अनेक म्होरके आता पाकिस्तानातही सुरक्षित राहिलेले नाहीत, हे या घटनांवरून स्पष्ट होत आहे.