Amitabh Bachchan shares video of 1892 Hindu Vishnu temple: इराण- इस्रायल- अमेरिका युद्धभूमीच्या पार्श्वभूमीवर भारत आणि इराणचा सांस्कृतिक बंध दर्शवणार्या अनेक गोष्टी चर्चेत आल्या आहेत. इतिहास, खाद्यसंस्कृती, व्यापार, धार्मिक समजुती अशा सर्वच पार्श्वभूमीवर हा ऋणांनुबंध दृष्टीपथास पडतो. असाच एक घट्ट संबंध दर्शवणारा व्हिडिओ आणि फोटो बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बिग बींनी बंदर अब्बास येथील १३४ वर्ष जुन्या मंदिराचे व्हिडिओ आणि फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. त्यामुळे जगासाठी अनभिज्ञ असलेल्या या सांस्कृतिक वारशाची चर्चा चांगलीच रंगली आहे. त्याच पार्श्वभूमीवर या मंदिराचा आणि बंदर अब्बासचा हिंदू व्यापार्यांशी असलेल्या संबंधांच्या प्राचीन इतिहासाचा घेतलेला हा आढावा.
अमिताभ बच्चन यांच्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं आहे?
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओला कॅप्शन देत अमिताभ बच्चन यांनी लिहिले आहे की, “इराणच्या बंदर अब्बास येथील प्राचीन हिंदू विष्णू मंदिर कजार (Qajar) राजवटीच्या कालखंडात १८९२ साली या शहरात काम करणाऱ्या भारतातील हिंदू व्यापाऱ्यांसाठी बांधण्यात आले होते आणि व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंडला (पार्श्वभूमीवर) ऐकू येणारे पर्शियन संगीत आहे.” त्यांच्या या पोस्टवर काही मिनिटांतच हजारो नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. इराणमध्येही एक हिंदू मंदिर अस्तित्वात आहे, याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. तर काहींनी या दोन महान संस्कृतींमधील सलोख्याचे आणि चिरंतन संबंधांचे तोंडभरून कौतुक केले आहे.
सामुद्रधुनी सामारिकदृष्ट्या महत्त्वाची
इराणच्या किनार्यावरील होर्मुझची सामुद्रधुनी ही सामरिकदृष्ट्या महत्त्वाची आहे. ही सामुद्रधुनी पर्शियन आणि ओमानचे आखात (पर्यायाने अरबी समुद्र) यांना जोडणारा महत्त्वाच्या मार्ग आहे. प्राचीन काळी मेसोपोटेमिया (इराक), पर्शिया (इराण) आणि सिंधू संस्कृती (भारत) यांच्यातील सागरी व्यापाराचा हा मुख्य दुवा होता. म्हणूनच प्राचीन कालखंडापासून या सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न अनेक व्यापारी शक्तींनी केला.
मध्ययुगीन काळात भारत आणि आग्नेय आशियातून येणारे मसाल्याचे पदार्थ आणि चीनमधून येणारे रेशीम हे याच मार्गाने युरोप आणि आफ्रिकेकडे जात असे.
पर्शिया, भारत आणि अरब यांच्यातील दुवा
होर्मुझच्या किनार्यावरील बंदर अब्बास या शहराचा व्यापारी इतिहास पर्शिया, भारत आणि अरब यांच्याशी दुवा साधणारा आहे. पोर्तुगीजांनी १५ व्या शतकात होर्मुझवर आक्रमण करून बंदर अब्बास या शहरावरही नियंत्रण मिळवले होते. १६२२ साली तत्कालीन सफाविद घराण्याचे सम्राट शाह अब्बास यांनी इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीच्या नौदलाच्या साहाय्याने होर्मुजवरील पोर्तुगीज सत्ता संपुष्टात आणली. पोर्तुगीजांना हुसकावून लावल्यानंतर शाह अब्बास यांनी या शहराला ‘बंदर-ए अब्बास’ (म्हणजेच ‘अब्बासचे बंदर’) असे आपले नाव दिले.
भारतीय व्यापाऱ्यांची ये-जा
शाह अब्बास यांना पोर्तुगीजांविरोधातील लढाईत भारतीय व्यापार्यांचीही साथ लाभली होती असे ऐतिहासिक संदर्भ सापडतात. त्या काळातील पर्शियन आखातातून होणार्या व्यापारामध्ये भारतीय, विशेषतः गुजराती व्यापाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. मध्ययुगीन कालखंडपासून २० व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत भारतीय व्यापार्यांची या बंदरावर सततची ये-जा होती.
कजार (Qajar) राजवटीचा इतिहास
इराणच्या बंदर अब्बास येथील प्राचीन विष्णू मंदिर कजार (Qajar) राजवटीच्या कालखंडात बांधले गेले. कजार हे मूळचे एका तुर्कमेनी टोळीचे (Oghuz Turks) लोक होते. सफावी राजवटीच्या काळापासूनच ते इराणच्या राजकारणात सक्रिय होते. १७८९ साली आगा मोहम्मद खान कजार (Agha Mohammad Khan) याने विरोधकांचा पराभव करून कजार राजवटीचा पाया घातला. तो एक अत्यंत क्रूर पण कुशल योद्धा होता. १७९६ साली त्याने स्वतःला इराणचा अधिकृत ‘शाह’ (राजा) घोषित केले. आगा मोहम्मद खाननेच तेहरान या शहराची नवे राजधानीचे शहर म्हणून निवड केली. पहिल्या महायुद्धानंतर (१९१४-१९१८) इराणची आर्थिक आणि राजकीय स्थिती पूर्णपणे कोलमडली. ही परिस्थिती हाताळण्यास कजार घराण्याचा शेवटचा राजा अहमद शाह असमर्थ ठरला. त्यातूनच १९२५ साली या राजवटीचा अंत झाला.
बंदर अब्बास येथील प्राचीन विष्णू मंदिर कोणी बांधले?
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतातून (विशेषतः गुजरात, कच्छ आणि सिंध प्रांतातून) अनेक व्यापारी व्यावसायिक कामासाठी बंदर अब्बास येथे स्थायिक झाले होते. त्यातील बरेच व्यापारी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीशीही संबंधित होते. या भारतीय व्यापारी आणि हिंदू समुदायाने स्वतः निधी (देणग्या) गोळा करून १८९२ (इसवी सन १३१० हिजरी) मध्ये या मंदिराची स्थापना केली. हे मंदिर जेव्हा बांधले गेले, तेव्हा इराणमध्ये कजार राजवट होती. बंदर अब्बासचे तत्कालीन स्थानिक इराणी शासक मोहम्मद हसन खान साद-ओल-मालेक (Mohammad Hassan Khan Sa’d-ol-Malek) यांच्या कार्यकाळात आणि त्यांच्या परवानगीने या मंदिराचे बांधकाम करण्यात आले होते.
वास्तुशास्त्रावर भारतीय संस्कृतीचा प्रभाव
इराणच्या बंदर अब्बास येथील प्राचीन हिंदू विष्णू मंदिराची रचना भारतीय आणि पर्शियन वास्तुकलेचा एक अप्रतिम संगम आहे. या मंदिराचा पांढराशुभ्र घुमट, त्यावरील प्रतीकात्मक नक्षीकाम आणि मुख्य गर्भगृह पश्चिम भारतातील पारंपरिक मंदिरांची आठवण करून देतात. स्थानिक इराणी सौंदर्यशास्त्राचा आदर राखून आणि येथील भौगोलिक परिस्थितीचा विचार करून हे मंदिर अत्यंत कल्पकतेने साकारण्यात आले आहे. विष्णूचे हे मंदिर, एकेकाळी या भागात व्यापाराच्या निमित्ताने स्थायिक झालेल्या भारतीय समुदायासाठी एक प्रमुख आध्यात्मिक आणि सामाजिक केंद्र होते. आजच्या काळात मंदिरात पूर्वीसारखी नियमित पूजाअर्चा होत नसली, तरी भारत आणि इराणमधील शतकानुशतके जुन्या सांस्कृतिक संबंधांची साक्ष देणारे एक ऐतिहासिक स्मारक आणि प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून हे ठिकाण जतन करण्यात आले आहे.
भारत-इराणमधील दृढ सांस्कृतिक संबंध
बंदर अब्बास येथील या विष्णू मंदिराच्या निमित्ताने, आधुनिक भूराजकारणाच्या पलीकडे असलेले भारत आणि इराणमधील शतकानुशतके जुने संबंध पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत. ऐतिहासिक काळापासून, विशेषतः मुघल साम्राज्यादरम्यान, पर्शियन संस्कृतीचा भारतीय कला, भाषा, वास्तुकला आणि प्रशासनावर मोठा प्रभाव राहिला आहे. त्याच वेळी, भारतीय व्यापाऱ्यांनी आणि त्यांच्या समुदायांनी पर्शियन आखातातील बंदरे, पूर्व आफ्रिका आणि मध्य आशियामध्ये आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. तज्ज्ञांच्या मते, या दोन्ही प्रदेशांमधील सांस्कृतिक देवाणघेवाण केवळ साम्राज्ये आणि मुत्सद्देगिरीपुरती मर्यादित नव्हती, तर व्यापारी, कवी, प्रवासी आणि आध्यात्मिक परंपरांच्या माध्यमातून ती थेट जनमानसात रुजली होती. बंदर अब्बास येथील हे विष्णू मंदिर म्हणजे दोन्ही संस्कृतींच्या याच सामायिक आणि अजरामर वारशाचा एक जिवंत पुरावा आहे.
सोशल मीडियावरील प्रतिक्रिया
अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर युजर्सनी कमेंट सेक्शनमध्ये आश्चर्य आणि कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी या मंदिराचे वर्णन एक ‘लपलेला ठेवा’ (hidden gem) असे केले आहे, तर काहींच्या मते ही वास्तू म्हणजे आजच्या आधुनिक सीमा आणि राजकीय भिंती अस्तित्वात येण्यापूर्वीच विविध संस्कृती एकमेकांशी किती खोलवर जोडलेल्या होत्या याचे एक उत्तम उदाहरण आहे. या निमित्ताने निर्माण झालेल्या उत्सुकतेमुळे भारतीय प्रवासी आणि इतिहासप्रेमींमध्ये परदेशात पसरलेल्या भारताबाहेरच्या भारतीयांशी (प्रवासी भारतीय समुदाय) संबंधित अशा अल्पपरिचित ऐतिहासिक वारसा स्थळांबद्दल अधिक जाणून घेण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली आहे.
