scorecardresearch

विश्लेषण : सातत्याने तापमानवाढ का होते आहे?

हिंदी महासागर क्षेत्रातील समुद्रातील उष्णतेच्या लाटांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे अलीकडेच पुण्यातील हवामान शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखालील एका अभ्यासात स्पष्ट करण्यात आले आहे.

राखी चव्हाण

हिंदी महासागर क्षेत्रातील समुद्रातील उष्णतेच्या लाटांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे अलीकडेच पुण्यातील हवामान शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखालील एका अभ्यासात स्पष्ट करण्यात आले आहे. भविष्यातील मोसमी पाऊस आणि चक्रीवादळासह सागरी जीवनावर त्याचा वाईट परिणाम होणार असल्याचा इशारा या अभ्यासात देण्यात आला आहे. एकीकडे ‘आयपीसीसी’च्या (‘इंटर गव्हर्नमेंट पॅनेल ऑन क्लायमेट चेंज’ ही संयुक्त राष्ट्रांनी १९८८ साली स्थापन केलेली संस्था) अहवालात वातावरण बदलामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांचा इशारा तर दुसरीकडे पुण्यातील हवामान शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखालील हा नवीन अभ्यास. या पार्श्वभूमीवर तापमानवाढीचे संकट भारतावरच नाही तर जगभरावर कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

भारतातील तापमानात इतका फरक कशामुळे? 

भारतातील वातावरण सातत्याने बदलत आहे, कारण अरबी समुद्र आणि हिंदी महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान वाढत आहे. वातावरणात आद्र्रता वाढत असल्यामुळे पावसाचे ढग जास्त वेळ आद्र्रता रोखू शकत नाही आणि कमी वेळात पाऊस होतो. याचा परिणाम म्हणजे दुष्काळ पडत असून उष्णतेच्या लाटांमध्ये वाढ होत आहे. हिवाळय़ातदेखील पश्चिमेकडून येणारी हवा अरबी समुद्रावरून जात उष्ण होत असल्याने उन्हाळय़ासोबतच हिवाळय़ातही दिवसाचे तापमान वाढत आहे. मात्र त्याच वेळी रात्रीचे तापमान कमी होत आहे.

शहरांमधील तापमानवाढीची कारणे कोणती? 

भारतातल्या शहरांमध्ये विविध बांधकामांमुळे गेल्या काही दशकांमध्ये मोठे बदल झाले आहेत. शहरांभोवतीची आणि शहरांमधली मोठी झाडे या बांधकामांमुळे नष्ट झाली आहेत. त्याच वेळी डांबरी, सिमेंटचे रस्ते आणि काँक्रीटच्या इमारती, असे शहरांचे नवे रूप तयार झाले. उन्हाळय़ात वातानुकूलन यंत्रांचा वापर सुरू झाल्यामुळे पुन्हा इमारतीतील क्लोरोफ्लूरोकार्बनयुक्त उष्ण हवा आधीच तापलेल्या बाहेरच्या हवेत सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली. जागोजागी वेगवेगळे उद्योग उभारले जात आहेत. त्याद्वारे निघणाऱ्या कार्बन डायऑक्साइडमुळे तापमानात वाढ होत आहे. तसेच ओझोन थराला पडलेली छिद्रे २०३० पर्यंत तरी भरून येणार नसल्यामुळे त्यातून येणाऱ्या अतिनील किरणांनीही तापमानात वाढ होत आहे.

तापमानवाढीचे परिणाम कोणते?

तापमानवाढीचा परिणाम मोसमी पावसावरदेखील होत आहे. २००२ पर्यंत मोसमी पाऊस कमी होत गेला. २००२ नंतर पावसाच्या प्रमाणात घट झाली नसली तरीही पावसाचे दिवस कमी होत आहेत. जमीन आणि शेतीसाठी सात सेंटिमीटरपेक्षा कमी पावसाचे दिवस फायदेशीर असतात. आता सात सेंटिमीटरपेक्षा जास्त पावसाच्या दिवसांत वाढ होत आहे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होत आहे. शेती करणे कठीण होणार असून पाण्याच्या दुर्भिक्षामुळे लोकांचे स्थलांतर वाढेल आणि पूर, वादळामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढेल.

तापमानवाढ कशी रोखता येईल?

वातावरणातील कार्बन डायऑक्साइड वायू कमी करण्यासाठी उपाय करावे लागतील. यातील एक उपाय म्हणजे युद्धपातळीवर वृक्षारोपण. सध्याचे कार्बन डायऑक्साइडचे वातावरणातील प्रमाण थोपवून, परतवून लावायचे तर त्याची निर्मिती कमी करणे आवश्यक आहे. जंगलाखालील भूमी सध्याच्या तीन ते पाचपट वाढवायला हवी. त्यासाठी झाडांची संख्या वाढवणे गरजेचे असून मोठय़ा प्रमाणात वृक्षारोपण करून वृक्षतोडीला आळा घालावा लागेल. याशिवाय खासगी वाहनांचा वापर कमी करावा लागेल. सौर ऊर्जेवर अधिकाधिक जोर द्यावा लागेल, तसेच वाढते सिमेंटीकरण कमी करून त्यावर पर्याय शोधावा लागेल. हरितगृह वायूंच्या (ग्रीनहाऊस गॅसेस) जादा उत्सर्जनावर कर लावणे हादेखील उपाय आहे.

तापमान कमी करण्यासाठीच्या लक्ष्यप्राप्तीत अपयशच?

उद्योगांतून निघणारे हरितगृह वायू कमी करण्यासाठी १९९७ साली अनेक देश एकत्र आले व त्यांनी ‘क्योटो प्रोटोकॉल’ स्वीकारण्याचे ठरवले. मात्र तो अस्तित्वात येण्यास २००५ साल उजाडले. २०२० पर्यंत कार्बनसहित इतर हरित वायू उत्सर्जनावर नियंत्रण आणण्याचे ठरवले, पण भारतासह अनेक देश त्यात अपयशी ठरले आहेत. त्याची सुधारित आवृत्ती असलेला ‘पॅरिस करार’ २०१५ साली १९७ देशांनी मान्य केला. या शतकात सरासरी तापमानवाढ दोन अंश सेल्सिअसच्या आत ठेवण्याचा निर्धार पॅरिस करार व्यक्त करतो. शक्यतो तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअसपर्यंतच मर्यादित ठेवण्याचेही या करारात नमूद आहे. मात्र त्यातही भारतासह इतर अनेक देशांना यश येत नसल्यामुळे तापमान कमी होण्याऐवजी वाढतच आहे.

वीजनिर्मिती, सिमेंट यांचा काय संबंध?

भारतातील ५७ टक्के ऊर्जा कोळशापासून तयार होते. चीन, अमेरिका, भारत आणि रशिया जगातील सर्वाधिक कर्ब वायू उत्सर्जन करणारे देश आहेत. त्यांचे उत्सर्जन अनुक्रमे ९०४०.७४, ४९९४.५०, २००६.०१, १४६८.९९ दशलक्ष मेट्रिक टन इतके जास्त आहे. सिमेंट उद्योगसुद्धा कर्ब वायू उत्सर्जन करत आहेत. यातील जड वायूचे एक आवरण आपल्या परिसरात तसेच पृथ्वीभोवती होते. त्यात सूर्याची उष्णता अडकते आणि तापमानवाढ होते.

पण हे आत्ताच होते आहे का?

नासा आणि भारतीय हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार १९८६ नंतर पृथ्वीवरील तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली, तर २००१ पासून अत्याधिक तापमानवाढ सुरू झाली. २०१० पासून तापमानवाढीचे नवनवे विक्रम तयार होऊ लागले. तेव्हापासून आजतागायत तापमानवाढीची ही घोडदौड अव्याहतपणे सुरू आहे. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, २०१९ मध्ये भारतामधील तापमानही सरासरीपेक्षा जास्त होते. भारतात २०१९ मध्ये तापमान जागतिक सरासरीच्या ०.३६ अंश सेल्सिअस अधिक होते. सन २०१९च्या उन्हाळय़ात (मार्च ते जून)  ईशान्य आणि मध्य भारतात उष्णतेची लाट होती. यामध्ये सुमारे ३५० जणांचा मृत्यू झाला होता.rakhi.chavhan@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Analysis constant rise temperature increase incidence ocean heat waves meteorologists ysh 95 print exp 0322

ताज्या बातम्या