– संजय जाधव

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी ‘विकासाचा हिंदू दर’ हा शब्द वापरल्याने गदारोळ सुरू झाला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेतील घसरण चिंताजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सातत्याने सुरू असलेल्या घसरणीमुळे आगामी काळात विकास दर हा ‘हिंदू विकास दरा’जवळ पोहोचल्याचे ते म्हणाले. मात्र त्यांचे मुद्दे स्टेट बँकेच्या अहवालात खोडून काढण्यात आले आहेत. त्यामुळे राजन यांचे विधान आणि त्याचा प्रतिवाद याचे विश्लेषण महत्त्वाचे आहे.

raghuram rajan on narendra modi
“चिप उत्पादकांना अनुदान देण्यापेक्षा…”, रघुराम राजन यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “इथे रोजगार मोठं आव्हान असताना…”
narendra modi on loksabha election 2024
Video: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं निवडणुकीबाबत विधान चर्चेत; म्हणाले, “मी आयुष्यात कधी निवडणूक लढवण्याचा विचारच केला नव्हता, अचानक…!”
prashant kishor on bjp in loksabha election 2024
Video: २०२४च्या निवडणुकीत भाजपाचं काय होणार? प्रशांत किशोर यांनी मांडलं गणित; म्हणाले, “यावेळी पहिल्यांदाच…”
Raghuram Rajan on PM narendra modi
‘मोदींचे २०४७ च्या विकसित भारताचे ध्येय मूर्खपणाचे’, रघुराम राजन यांची टीका

रघुराम राजन नेमके काय म्हणाले?

खासगी क्षेत्रात घटलेली गुंतवणूक, वाढीव व्याजदर आणि जागतिक पातळीवरील घसरण या तीन घटकांचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा प्रतिकूल परिणाम राजन यांनी मांडला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने गेल्या महिन्यात चालू आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीतील विकास दराची आकडेवारी जाहीर केली. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत विकास दर ४.४ टक्क्यांवर आला आहे. त्याआधीच्या जुलै ते सप्टेंबर तिमाहीत विकास दर ६.३ टक्के होता. त्यामुळे आपला विकासदर धोकादायकरीत्या ‘हिंदू विकास दरा’च्या समीप गेला असल्याचे राजन म्हणाले.

‘हिंदू विकास दर’ संकल्पनेचा उगम कसा झाला?

हिंदू विकास दर ही संकल्पना सर्वप्रथम अर्थतज्ज्ञ राज कृष्णा यांनी १९७८मध्ये मांडली. देशाचा विकास दर १९५० ते १९८० या कालखंडात ४ टक्क्यांच्या आसपास होता. त्याला उद्देशून त्यांनी हा शब्दप्रयोग केला होता. कृष्णा हे ‘दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये अध्यापन करीत असतानाच त्यांनी ही संकल्पना मांडली. देशात सरकारे बदलली तरी त्या कालखंडात विकास दर स्थिर राहिला होता. त्यात वाढ होत नव्हती. युद्ध आणि इतर संकटे येऊनही विकास दरावर कोणताही परिणाम होत नव्हता. हे एक सांस्कृतिक वैशिष्ट्य असल्यामुळे त्याचे ‘हिंदू विकास दर’ असे नामकरण कृष्णा यांनी केले. भारताचा विकास दर दीर्घकाळ एकाच टप्प्यावर राहिल्याने ही संकल्पना प्रचलित झाली. मात्र भारत पूर्ण क्षमतेने आर्थिक विकास साधू शकत नसल्याचे त्यातून ध्वनित होत असल्यामुळे ती अवमानकारक मानली गेली. असे असले तरी टीका करण्याचा अथवा ‘हिंदू’ शब्दाबद्दल चुकीचा अर्थ काढण्याचा कृष्णा यांचा हेतू नव्हता.

संकल्पनेमागील नेमकी भूमिका काय?

सरकारी नियंत्रणाची समाजवादी धोरणे आणि आयात निर्बंध यामुळे विकास दर कमी आहे. अर्थव्यवस्थेला काहीही झाले तरी विकास दर ३.५ टक्क्यांच्या पुढे जाणे शक्य नाही, असे निरीक्षण कृष्णा यांनी त्या वेळी मांडले होते. पुढे पी. व्ही. नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले. आर्थिक उदारीकरण, खासगीकरण आणि जागितकीकरणाचे वारे वाहू लागले. त्यानंतर भारताच्या विकास दरात वाढ सुरू झाली. त्या वेळी भारताने प्रथमच कमी विकास दराची चौकट मोडून जास्त दर नोंदवला.

‘हिंदू’ शब्दाचा वापर का करण्यात आला?

हिंदू धर्मातील कर्म आणि भाग्य या गोष्टींचा विचार यात करण्यात आला आहे. कर्म आणि भाग्यावर विश्वास ठेवल्याने विकास दर कमी राहिला, अशी मांडणी त्या वेळच्या अर्थतज्ज्ञांनी केली होती. नंतरच्या काळात अनेक जणांनी याला विरोध दर्शवला. अर्थतज्ज्ञ व इतिहासकार पॉल बॅरोच यांनी ही मांडणी नाकारली. कमी विकास दराला त्या वेळच्या सरकारची संरक्षणवादी आणि हस्तक्षेप करणारी धोरणे कारणीभूत असल्याचे मत त्यांनी मांडले.

हिंदू शब्दाला आक्षेप का आहे?

कमी विकासदरासाठी ‘हिंदू दर’ ही संकल्पना प्रचलित झाल्यामुळे ती वादग्रस्त ठरली. ही संकल्पना अयोग्य असल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केले. देशात १९९० नंतर आर्थिक विकासाचे वारे आले. त्या वेळी विकास दरानेही झेप घेतली. त्यानंतर ही संकल्पना मागे पडली. नंतर तिचा वापर दिवसेंदिवस कमी होत गेला. राजन यांनी आता पुन्हा एकदा ही संकल्पना बोलून दाखवताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. राजन यांचा यामागील हेतू अर्थव्यवस्थेला असलेल्या धोक्याची जाणीव करून देण्याचा होता. असे असले तरी अनेकांनी हिंदू शब्दाच्या वापराला आक्षेप घेतला. करोना विषाणूला जसे आपण चीनचा विषाणू म्हणत नाही, त्याप्रमाणे कमी विकास दराला हिंदू विकास दर म्हणू नये, अशी भूमिकाही घेण्यात आली.

हेही वाचा : “आपल्या देशाला Hindu Rate Of Growth चा धोका” रघुराम राजन यांचा इशारा

स्टेट बँकेच्या अहवालामध्ये काय म्हटले आहे?

भारतीय स्टेट बँकेने जारी केलेल्या अहवालात राजन यांचे मुद्दे खोडून काढण्यात आले आहेत. हे मुद्दे पक्षपाती, चुकीचे आणि अपरिपक्व असल्याचे अहवालात म्हटले आहे. ‘त्रैमासिक विकासदराची आकडेवारी ही काहीशी गोंधळात टाकणारी असून एखादे गंभीर विश्लेषण करताना ती गृहीत धरली जाऊ नये,’ असे या अहवालात म्हटले आहे. या विधानाला बळकटी देण्यासाठी बरीच सकारात्मक आकडेवारीही सादर करण्यात आली आहे. एकूणच राजन यांना दुहेरी विरोध सहन करावा लागत आहे. एकतर कमी विकास दराला ‘हिंदू’ म्हणण्यास काही जणांचा आक्षेप आहे, त्याच वेळी त्यांनी केलेले आर्थिक भाकीतही चुकीचे असल्याचा दावा करण्यात आला आहे.

sanjay.jadhav@expressindia.com