– राखी चव्हाण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ एप्रिलला व्याघ्रगणनेचा अहवाल जाहीर केला, मात्र गणनेचा हा पेटारा त्यावेळी पूर्णपणे उघडण्यात आला नाही. त्यामुळे केवळ देशाची आकडेवारीच मिळू शकली. आता हळूहळू लँडस्केपनुसार वाघांच्या संख्येचा पेटारा उघडण्यात येत आहे. त्यानुसार विदर्भाच्या लँडस्केपमध्ये वाघांची संख्या २३ टक्क्यांनी वाढली आहे. मात्र, या वाढलेल्या वाघांना सांभाळण्याची क्षमता विदर्भात आहे का, हाही प्रश्नच आहे.

There is a possibility of a code of conduct for the upcoming Lok Sabha elections
पिंपरी: आचारसंहितेच्या शक्यतेने राजकारण्यांप्रमाणेच प्रशासकांचीही धावपळ; तब्बल ‘इतक्या’ कोटींच्या कामांना मंजुरी
knight frank wealth report 2024
अग्रलेख : अधिक की व्यापक?
mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला
Trigrahi Yog
३० वर्षांनी ‘त्रिग्रही योग’ बनल्याने होळी २०२४ च्या आधी शनिदेव ‘या’ राशींना करणार श्रीमंत? लक्ष्मी कृपेने प्रचंड पैसा मिळण्याची शक्यता

वाघांचा संचार बदलतो आहे का?

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील गाभा (कोअर) आणि बफर क्षेत्राच्या वाघांच्या वापरामध्ये बदल होत आहे. मुख्य क्षेत्राच्या तुलनेत अधिकाधिक वाघ बफर क्षेत्राचा वापर करू लागले आहेत. २०१४-२०२२ या कालावधीत केवळ गाभा क्षेत्राचा वापर करणाऱ्या वाघांची संख्या ५१ वरून ११ वर आली आहे. तर गाभा आणि बफर असे दोन्ही क्षेत्र वापरणाऱ्या वाघांची संख्या चारवरून ३८ झाली आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पातदेखील १२ वाघांपैकी १० वाघ गाभा क्षेत्राचा वापर करत आहेत. बफर क्षेत्रातील दोन वाघ अधूनमधून गाभा क्षेत्राचाही वापर करतात. पेंच व्याघ्रप्रकल्पातील २९ वाघ गाभा क्षेत्राचा वापर करत असून ११ वाघ राखीव क्षेत्रातील बफर आणि गाभा क्षेत्र वापरतात.

वाघ-माणूस संघर्ष थांबवण्यासाठी उपाययोजना काय ?

राज्यात सर्वाधिक वाघ-माणूस संघर्ष ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात आहे आणि वाघांच्या वाढत्या संख्येमुळे तो अधिक तीव्र होत आहे. त्यामुळे या व्याघ्रप्रकल्पाचे गाभा क्षेत्र ६२५.८२ चौरस किलोमीटरवरून एक हजार किलोमीटर केले, तर कदाचित ही समस्या थोड्याफार प्रमाणात कमी होऊ शकते, असे विदर्भ लँडस्केपच्या अहवालात म्हटले आहे. कारण गाभा क्षेत्रातील वाघांनी त्यांचा मोर्चा बफर क्षेत्राकडे वळवला आहे. दीर्घकालीन व्याघ्रसंवर्धनसाठी मेळघाटसह पेंच व बोर व्याघ्रप्रकल्पादरम्यानचा कॉरिडॉर सुरक्षित करण्याची गरज आहे. पेंच-नवेगाव-नागझिरा व कान्हा व्याघ्रप्रकल्पाशी जोडणारे कॉरिडॉर मानवी अधिवास आणि जमिनीचा बदलत्या वापरापासून सुरक्षित करणे आवश्यक आहे. टिपेश्वर अभयारण्य आणि पांढरकवडा वनविभाग हे वाघांची प्रजननक्षमता असलेले छोटे संरक्षित क्षेत्र आहे. वाघांच्या व्यवस्थापनासाठी टिपेश्वरला लागलेले काही मोठे वनक्षेत्र चांगल्या पद्धतीने व्यवस्थापित करण्याची गरज आहे.

वाघांचे स्थलांतरण हा उपाय आहे का?

चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या वाढली म्हणून येथील काही वाघ इतरत्र स्थलांतरित करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेण्यात आला. त्या दृष्टीने तयारीदेखील सुरू झाली आहे. मात्र, एका वनक्षेत्रातून दुसऱ्या वनक्षेत्रात वाघ स्थिरावतील का, याबाबत शंका आहे. कारण महाराष्ट्रात यापूर्वीही वाघांच्या स्थलांतरणाचे प्रयत्न झाले होते. योग्य नियोजनाअभावी हे प्रयत्न फसले. तुलनेने मध्य प्रदेशात मात्र योग्य नियोजनामुळे स्थलांतरणाचा प्रत्येक प्रयोग यशस्वी ठरला आहे. त्यामुळे हे स्थलांतरण यशस्वी करायचे असेल तर मध्य प्रदेशची पद्धती महाराष्ट्राला अवलंबावी लागेल. अन्यथा मानव-वाघ संघर्षाच्या नव्या पर्वाला सुरुवात होईल.

वाघांची संख्या कुठे, किती आणि कशी वाढली?

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात वाघांची संख्यावाढ नाही. मात्र, लगतच्या प्रदेशातील वाघांची संख्या प्रचंड वाढली आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पातील वाघांची संख्या ८ वरून १२ इतकी झाली असली तरीही हे सर्वच वाघ राखीव क्षेत्राच्या मुख्य भागात आहेत. या व्याघ्रप्रकल्पात प्रभावी अधिवास व्यवस्थापन असूनही वाघांच्या संख्येत अपेक्षेप्रमाणे वाढ झालेली नाही. या व्याघ्रप्रकल्पात वाघांच्या मृत्यूचे प्रमाणदेखील वाढले आहे. उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात तीन प्रजननक्षम वाघिणींसह ११ वाघ आहेत. टिपेश्वर अभयारण्यात वाघांची संख्या वाढली, पण आता वाघांसाठी क्षेत्र कमी पडत आहे. कधी काळी गडचिरोली जिल्ह्यातून वाघ नाहीसे झाले होते, पण तेथेही सुमारे २७ वाघांची नोंद आहे.

हेही वाचा : भारतातील व्याघ्रगणनेचा अहवाल जाहीर, देशात ३,१६७ वाघ

ब्रह्मपुरीतील संघर्ष वाढणार की कमी होणार?

चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक मानव-वाघ संघर्ष ब्रह्मपुरी वनक्षेत्रात आहे आणि आता याच वनक्षेत्रात वाघांची संख्या आणखी वाढली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पानंतर सर्वाधिक वाघ या वनक्षेत्रात आहे. हा संघर्ष कमी करण्यासाठीच येथून नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पात वाघ सोडण्याची योजना तयार करण्यात आली आहे. मात्र, ज्या गतीने ब्रह्मपुरीतील वाघांची संख्या वाढली आहे, तो पाहता १०-१५ वाघ स्थलांतरित करून हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनेवर विचार करावा लागणार आहे.

rakhi.chavhan@expressindia.com