संरक्षण क्षेत्रामध्ये आत्मनिर्भरतेला भारत महत्त्व देत आहे. या आत्मनिर्भरतेमध्ये सर्वांत महत्त्वाचा उल्लेख करावा लागेल, तो क्षेपणास्त्रांचा. क्षेपणास्त्र तंत्रज्ञानामध्ये आपण आत्मनिर्भरता गाठलेली आहे. आपण क्षेपणास्त्रांची निर्मितीच नव्हे, तर निर्यातही करतो. भारताच्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचा घेतलेला हा आढावा…

क्षेपणास्त्र निर्मितीत आत्मनिर्भर

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता वाढत आहे. संरक्षण उत्पादनासाठी लागणाऱ्या साहित्यापैकी ६० टक्क्याहून अधिक भाग देशी बनावटीचा आहे. दहा ते पंधरा वर्षांपूर्वी परिस्थिती वेगळी होती. यामधील सर्वांत महत्त्वाचा वाटा हा क्षेपणास्त्रांचा. क्षेपणास्त्रांच्या बाबतीत ७५ ते ८० टक्क्यांहून अधिक भाग देशी बनावटीचा आहे. क्षेपणास्त्रप्रणालीतील आत्मनिर्भरतेमुळे भारताच्या एकूण संरक्षणसिद्धतेला कमालीचे बळ आले आहे. या क्षेपणास्त्र प्रणालीमध्ये अग्नी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रापासून, ब्राह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रे आणि इतर छोट्या क्षेपणास्त्रांचाही समावेश आहे.

डीआरडीओचे योगदान

क्षेपणास्त्रनिर्मितीमध्ये संरक्षण, संशोधन व विकास संस्थेचा (डीआरडीओ) वाटा सर्वाधिक आहे. १९८०च्या दशकात सुरू झालेल्या या निर्मितीची साक्षीदार ही संस्था आहे. आता खासगी क्षेत्र आणि इतर सरकारी कंपन्याही विविध प्रकल्पात सहभागी झाल्या आहेत. संभाव्य धोक्यांचा विचार करून भारतामध्ये क्षेपणास्त्रे तयार केली गेली आहेत. क्षेपणास्त्रांचे पल्ले हे धोके विचारात घेऊनच ठरवले जातात. क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून भारत अण्वस्त्रेही शत्रूदेशावर डागू शकतो.

अग्नी क्षेपणास्त्र

अग्नी क्षेपणास्त्रे जवळपास संपूर्ण देशी बनावटीची आहेत. भारताचे हे प्रमुख सामरिक अस्त्र आहे. अग्नी ५ क्षेपणास्त्र आंतरखंडीय असून, पाच हजार किलोमीटरपर्यंतचा मारा करू शकते. ही क्षेपणास्त्रे संरक्षण दलांच्या ताफ्यात दाखल झाली आहेत. अग्नी १ आणि अग्नी २ या क्षेपणास्त्रांचा पल्ला कमी आहे. अग्नी प्राइम क्षेपणास्त्रही संरक्षण दलांमध्ये दाखल होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे.

पृथ्वी क्षेपणास्त्र

भारताच्या भात्यातील आणखी एक महत्त्वाचे क्षेपणास्त्र. शत्रूवर अचूक हल्ल्यांसाठी ते वापरले जाते. त्यानुसार या क्षेपणास्त्रांचे पल्ले ठरविण्यात आले आहेत. पृथ्वी १ आणि पृथ्वी २ क्षेपणास्त्र १९९०च्या दशकापासून संरक्षण दलांच्या सेवेत आहेत. याच क्षेपणास्त्राची नौदलासाठीची आवृत्ती धनुष क्षेपणास्त्रही संरक्षण दलांमध्ये दाखल झाले आहे. अग्नी, पृथ्वी ही जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आहेत.

ब्राह्मोस क्षेपणास्त्र

रशियाच्या सहकार्याने ब्राह्मोस क्षेपणास्त्र विकसित केले आहे. ही क्रूझ क्षेपणास्त्रे सुखोई-३० एमकेआय विमानातून, जमीन आणि युद्धनौकेतूनही डागता येतात. ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या पुढील पिढीवर (ब्राह्मोस एनजी) डीआरडीओ काम करीत असून, ही क्षेपणास्त्रे वजनाने हलकी आणि लहान आहेत. हवाई संरक्षणाची ताकद त्यामुळे आणखी वाढणार आहे. हे क्षेपणास्त्रही ७० टक्क्यांपर्यंत देशी बनावटीचे आहे.

आकाश क्षेपणास्त्र आणि हवाई संरक्षण प्रणाली

हवाई संरक्षणामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावणारे आणि जमिनीवरून हवेत मारा करणारे आकाश क्षेपणास्त्र देशी बनावटीचे आहे. हवाई संरक्षणामध्ये हे क्षेपणास्त्र महत्त्वाची भूमिका बजावते. हवाई संरक्षणाच्या बाबतीत विचार केला, तर भारताने एकत्रित हवाई संरक्षण शस्त्र यंत्रणेची (आयएडीडब्लूएस) चाचणी घेतली आहे. त्यात देशी बनावटीच्या त्वरित प्रत्युत्तर देणाऱ्या जमिनीवरून हवेत हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा, लघु पल्ल्याच्या हवाई संरक्षण यंत्रणेचा, उच्च शक्तीची लेझर प्रणालीवर आधारित शस्त्रयंत्रणेचाही (डीईडब्ल्यू) समावेश आहे. लेझर प्रणालीवर आधारित दिशादर्शक ऊर्जा शस्त्रांचाही हवाई संरक्षणात समावेश आहे.

पिनाका प्रणाली

पिनाका रॉकेट लाँचर सिस्टीम देशी बनावटीची आहे. संरक्षण, संशोधन व विकास संघटनेच्या (डीआरडीओ) आर्मामेंट रीसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टाब्लिशमेंटने (एआरडीई) रॉकेट यंत्रणा तयार केली आहे. कारगिल युद्धात या यंत्रणेने अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावली होती. हलकी रॉकेट डागणारी यंत्रणा ३८ किलोमीटरपर्यंत मारा करू शकते. वेगवेगळ्या प्रकारचे दारुगोळे ही यंत्रणा शत्रूवर मारा करू शकते. एकाच वेळी बारा रॉकेट शत्रूच्या प्रदेशाला बेचिराख करू शकतात. पिनाका एमके-१ आणि पिनाका एमके-२ असे दोन प्रकार एआरडीईने विकसित केले आहेत.

प्रलय क्षेपणास्त्र

प्रलय क्षेपणास्त्रही देशी बनावटीचे असून, संरक्षण दलांमध्ये दाखल होण्यास सज्ज झाले आहे. ‘प्रलय’ हे ‘क्वासी बॅलिस्टिक’ क्षेपणास्त्र आहे. ‘क्वासी बॅलिस्टिक’ हा क्षेपणास्त्रांचा विशेष प्रकार असून, हे क्षेपणास्त्र डागल्यानंतर ते ‘बॅलिस्टिक’ क्षेपणास्त्राप्रमाणे वर्तुळाकार मार्गाने मार्गक्रमण करते. मात्र, मार्गक्रमण करीत असतानाच ते गरजेनुसार दिशा बदलून शत्रूला चकित करू शकते. तसेच, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रापेक्षा हे क्षेपणास्त्र कमी उंचीवरून मार्गक्रमण करते. या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांमुळे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असूनही ते छोट्या संघर्षांमध्ये डावपेचात्मक पातळीवर कमी अंतरावर मारा करण्यासाठी वापरता येते.

भारताचे रॉकेट फोर्स

भारताची सारी क्षेपणास्त्रे आणि हवाई संरक्षण प्रणालीसाठी हे दल स्थापण्याचे प्रस्तावित आहे. या दलामध्ये निर्भय, पिनाका यंत्रणा, ब्राह्मोस क्षेपणास्त्रे अशा इतर क्षेपणास्त्रांचाही समावेश असेल. पाकिस्तान आणि चीनचे एकत्रित आव्हान आणि सध्याच्या ‘नॉन कॉन्टॅक्ट वॉरफेअर’च्या काळात भविष्यातील युद्धांची मदार या दलावरच प्रामुख्याने असेल.

भारतातील संरक्षण उत्पादन

भारताचे संरक्षण उत्पादन गेल्या आर्थिक वर्षांत दीड लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. संरक्षण क्षेत्रातील निर्यात २३ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. आर्मेनिया हा भारताचा संरक्षण निर्यातीचा महत्त्वाचा ग्राहक देश आहे. क्रूझ क्षेपणास्त्रे आणि क्षेपणास्त्र प्रणालींचा वाटा निर्यातीमध्ये मोठा आहे. भारताला पाकिस्तान आणि चीनचे दुहेरी आव्हान पाहता संरक्षण साहित्याची निर्यात करावी का, असा प्रश्न सामरिक वर्तुळात उपस्थित केला जात आहे. प्रथम आपली गरज भागवून एखादे उत्पादन अधिक झाले, तरच त्याचा निर्यातीसाठी विचार व्हावा, असे मत मांडले जात आहे.

आव्हान मोठे

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे चाललेली वाटचाल महत्त्वाची आणि सकारात्मक असली, तरी त्यात सुधारणेसाठी मोठा वाव आहे. लढाऊ विमानांच्या इंजिनसह अनेक महत्त्वाची आयुधे भारतात तयार होत नाही. संरक्षणामध्ये आजही आपण मोठ्या प्रमाणावर आयात करतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.