– गौरव मुठे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑनलाइन शिकवणीतील नवतंत्रज्ञानाधारित कंपनी आणि देशातील सर्वाधिक मूल्यांकन मिळविणारा नवउद्यमी उपक्रम असलेल्या बायजूला सध्या मोठ्या आर्थिक पेचाला सामोरे जावे लागले आहे. बायजूच्या महसुलातील घसरण, वाढता कर्जभार आणि आक्रमक विस्तार योजनांमुळे तिच्या अडचणींमध्ये वाढ सुरू आहे. शिवाय बऱ्याच काळानंतर कंपनीने जाहीर केलेल्या वित्तीय कामगिरीतही गफलती आढळून आल्या. सध्या नव्याने निर्माण झालेले कर्जसंकट आणि त्यासंदर्भात बायजूने नेमके काय म्हटले आहे ते जाणून घेऊया.

कर्जफेडीदसंदर्भात बायजूची अमेरिकी कर्जदात्याविरुद्धच न्यायालयात धाव का?

शिक्षण क्षेत्रात कार्यरत तंत्रज्ञानाधारित कंपनी बायजूने, तिच्यावरील १२० कोटी अमेरिकी डॉलरच्या कर्जभाराचा, मुदतीनुसार सरलेल्या सोमवारी देय असताना ४ कोटी डॉलरचा व्याजाचा हप्ता भरणे टाळले. इतकेच नाही तर तिने कर्जदात्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत त्यांना न्यायालयात खेचले. बायजूने गुंतवणूक व्यवस्थापन कंपनी रेडवूड विरुद्ध दावा दाखल केला आहे. तिच्याकडून आपली कंपनी गिळंकृत करण्याचे कुटील डावपेच सुरू असल्याचा तिचा आरोप आहे. प्रामुख्याने परतफेडीचा पेच निर्माण झाला आहे अशी संकटग्रस्त कर्ज खाती विकत घेणाऱ्या रेडवूडने बायजूच्या कर्जाचा एक महत्त्वपूर्ण भाग खरेदी केला आहे आणि ही बाब मुदत कर्ज सुविधेच्या अटी-शर्तींच्या विरुद्ध जाणारी आहे, असा बायजूचा दावा आहे.

बायजूने कर्ज हप्ता भरणे का टाळले?

जगभरात १५ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांना सेवा पुरवणाऱ्या बायजूने १२० कोटी अमेरिकी डॉलरच्या कर्जावर सोमवारी देय असलेला ४ कोटी डॉलरचा व्याजाचा हप्ता भरलेला नाही. वाटाघाटी आणि विविध कर्जदारांशी नव्याने करारमदार करीत कर्जाच्या पुनर्गठनासाठी प्रयत्न करणाऱ्या बायजूने स्पष्ट केले की, जोपर्यंत वादाचे सर्व पैलू निकाली निघत नाहीत तोपर्यंत व्याजासह पुढील हप्ते न भरण्याचा तिने निर्णय घेतला आहे. १२० कोटी अमेरिकी डॉलरच्या कथित मुदत कर्जावरील (टीएलबी) पुढील हप्ते न भरण्याचा पर्याय कंपनीने निवडला आहे आणि न्यूयॉर्क सर्वोच्च न्यायालयात कर्जदात्याविरुद्ध दावाही दाखल केला आहे.

बायजूचा न्यायालयीन दाव्यातील युक्तिवाद काय?

मार्चमध्ये कर्जदात्यांकडून गैरलागू कारणे आणि कथित तांत्रिक त्रुटींचा बहाणा करीत बायजूने घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीच्या वेळापत्रकाला बेकायदेशीरपणे गती दिली गेली. शिवाय बायजू अल्फा या अमेरिकेतील तिच्या उपकंपनीचे नियंत्रण ताब्यात घेणे आणि तिच्या व्यवस्थापनाची नियुक्ती करणे यासारख्या अनाठायी हस्तक्षेपाच्या कारवायाही कर्जदात्यांनी सुरू केल्याचे बायजूचे म्हणणे आहे. करोनाकाळातील ऑनलाइन शिकवणीला उतरती कळा लागल्याचा बायजूच्या आर्थिक स्थितीवर स्पष्ट परिणाम दिसून आला आहे. तिने जवळपास दोन वर्षांपर्यंत आर्थिक ताळेबंद जाहीर करणेही टाळले. याच काळात मग तिच्या कर्जदात्यांनी दीर्घकाळ चाललेल्या वाटाघाटी रद्द केल्या आणि कर्जाची परतफेड त्वरित केली जाण्याची मागणी केली. प्रसंगी न्यायालयामार्फत त्यांनी वसुलीसाठी तगादाही लावला. मात्र परतफेडीच्या या घाईला नियमबाह्य ठरवत बायजूने या प्रकाराला न्यायालयात आव्हान दिले आहे.

बायजूचा महसूल वाढीबाबत दावे आणि गफलती काय?

आर्थिक वर्ष २०२१ मध्ये कंपनीच्या महसुलात अनपेक्षित घट झाली. कारण भारतातील सर्व तंत्रज्ञानाधारित शिक्षण कंपन्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. लिडो लर्निंगसारख्या कंपनीला टाळेही लागले. मात्र वर्षभरात महसुलात पुन्हा झपाट्याने वाढ नोंदवली. कारण करोना काळात ऑनलाइन शैक्षणिक सेवांच्या मागणीत अभूतपूर्व वाढ झाली. बायजूनेदेखील आर्थिक वर्ष २०२२ मध्ये सुमारे दहा हजार कोटी रुपयांच्या कमाईचा दावा केला. आधीच्या वर्षाच्या तुलनेत जवळपास चार पटीने वाढीची ही कामगिरी होती. मात्र, विधिवत लेखापरीक्षणातून या दाव्याला पाठबळ दिले गेले नाही. बायजूने सरलेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत ४,३५० कोटी रुपयांची कमाई केल्याचा दावा केला होता. मात्र उपलब्ध माहितीनुसार, बायजूने २०२०-२१ आर्थिक वर्षात ४,५८८ कोटी रुपयांचा तोटा नोंदवला आहे, जो २०१९-२० मधील २३१.६९ कोटी रुपयांच्या एकत्रित तोट्याच्या तुलनेत जवळपास २० पट अधिक आहे.

आक्रमक विस्तार धडाका नडला?

बायजूने २०१५ पासून इतर कंपन्यांच्या अधिग्रहणाचा धडाका लावला आहे. यामुळे कंपनीला काही प्रमाणात रोखीची कमतरता निर्माण झाली. २०१५ पासून बायजूने १९ कंपन्यांचे अधिग्रहण केले आहे. त्यामध्ये २०२१ मध्ये सर्वाधिक नऊ कंपन्यांचे अधिग्रहण करण्यात आले. तर चालू कॅलेंडर वर्षात अधिग्रहण प्रक्रिया धीमी केल्याने केवळ एकाच कंपनीचे अधिग्रहण तिने केले. बायजूने अधिग्रहित केलेल्या आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेसच्या भागभांडवली हिस्सेदारांची देणी चुकती करण्यास दोन महिन्यांनी विलंब झाला आहे, ज्यात खासगी इक्विटी कंपनी ब्लॅकस्टोनचा समावेश आहे. आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेसमध्ये ब्लॅकस्टोनची ३८ टक्के हिस्सेदारी आहे.

बायजूच्या महसूल घसरणीची कारणे काय?

बायजूकडे वर्षभरापेक्षा अधिक कालावधीपासून पूर्णवेळ मुख्य वित्तीय अधिकाऱ्याची (सीएफओ) जागा रिकामी होती. याआधी पीव्ही राव हे सीएफओ म्हणून कार्यरत होते. मात्र त्यांनी २०२१ मध्ये राजीनामा दिला. त्यांनतर एप्रिल २०२३ मध्ये अजय गोयल यांची मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. याचबरोबर करोना काळात बहुतांश वापरकर्त्यांना बायजूची सेवा-साधने मिळण्यास विलंब झाल्याने त्याचा परिणाम महसुलावर देखील झाला. बायजूच्या सेवा साधनांमध्ये टॅबलेट आणि एसडी कार्डचा देखील समावेश आहे. दुसरे म्हणजे क्रेडिट आधारित विक्री, ईएमआय (समसमान मासिक हप्ते) वगैरेच्या माध्यमातून विक्रीच्या कारणास्तव, उपभोगाच्या कालावधीत महसूल गृहित धरणे जाणे आवश्यक होते. मात्र प्रत्यक्षात तसे होऊ शकले नाही.

हेही वाचा : अग्रलेख : ‘बैजु’ बावरे!

बायजूची निधी उभारणीबाबत नवीन योजना काय?

लक्षणीय रोख राखीव गंगाजळीसह, आर्थिक स्थिती मजबूत असल्याचा बायजूने मंगळवारी दिलेल्या निवेदनात पुनरुच्चार केला आहे. गेल्या महिन्यात बायजूने अमेरिकेतील गुंतवणूकदार डेव्हिडसन केम्पनर कॅपिटल मॅनेजमेंटकडून २५ कोटी डॉलरचा निधी कर्जरूपाने उभारला आणि इतर काही गुंतवणूकदारांकडून आणखी ७० कोटी डॉलरचा निधी उभारण्यासाठी तिची चर्चा सुरू आहे.

gaurav.muthe@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Analysis of online education coaching company byju loan case reasons behind it print exp pbs
First published on: 09-06-2023 at 12:05 IST