जगातील चार प्राचीन संस्कृतींमधील दोन प्रमुख संस्कृती म्हणजेच भारत आणि इजिप्त. या दोन्ही देशांना हजारो वर्षांचा इतिहास आहे. इतकेच नाही तर या दोन्ही देशांमधील ऋणानुबंध स्थापन करणारे अनेक पुरावे उघडकीसही आले आहेत. पोलिश संशोधकांनी अलीकडेच प्राचीन इजिप्शियन पाळीव प्राण्यांच्या स्मशानभूमीत अनेक पुरावशेषांचा शोध घेतला. या स्मशानभूमीत असलेल्या प्राण्यांच्या अवशेषांचा कालखंड रोमनकालीन आहे. त्यामुळे या प्रदेशात तैनात असलेल्या रोमन सैन्यांच्या जीवनाविषयी समजण्यास मदत झाली आहे.

ही प्राचीन इजिप्शियन पाळीव प्राण्यांची स्मशानभूमी लाल समुद्रावरील बेरेनिके येथे आहे. या ठिकाणी झालेल्या उत्खननात केवळ पाळीव प्राण्यांचे अवशेषच नाहीत तर रोमन लष्करी अधिकाऱ्यांची पॅपिरसवरील पत्रे देखील उघडकीस आली आहेत. या पत्रांच्या माध्यमातून या प्रांतातील व्यापार आणि लष्करी संघटनेविषयी महत्त्वाचा तपशील समजण्यास मदत झाली आहे.

अधिक वाचा: विश्लेषण : इजिप्तमधील पिरॅमिड्सचा भारताशी काही संबंध आहे का?

रोमन- इजिप्शियन जीवनाची एक झलक

बेरेनिके हे एके काळी इजिप्तमधील भरभराटीला आलेले बंदर होते आणि हे बंदर विदेशी आयातीसाठी ओळखले जात होते. त्यामुळे या भागात भारत, आशिया, अरेबिया आणि पूर्व आफ्रिकेतील व्यापारी मालाचा सतत प्रवाह असे. कालांतराने हे बंदर रोमन साम्राज्यासाठी महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून विकसित झाले.

या बंदरावरून होणारा आंतरखंडीय व्यापार रोमन लष्करी अधिकारी आणि लेखकांनी लिहिलेल्या पत्रांमधून स्पष्ट होतो. एका पत्रात बेरेनिकेमधील विदेशी लक्झरी वस्तूंच्या किमतींची चौकशी करण्यात आली आहे आणि या वस्तूंसाठी उंटांवर प्रवास करणाऱ्या रोमन सैनिकांद्वारे पैसे पाठवल्याचा उल्लेख केला. तसेच या पत्रांमध्ये रोमन सैनिकांसाठी “वासराचे मांस आणि तंबूचे खांब” यांसारख्या जिन्नसांची मागणी देखील करण्यात आली आहे.

विदेशी पाळीव प्राणी आणि दफन पद्धती

या स्मशानामध्ये मांजरी, कुत्री, वासरे आणि विशेषत: माकडांसह २०० हून अधिक प्राण्यांचे सांगाड्यांचे अवशेष सापडले आहेत. या प्राण्यांना खास बनवलेल्या कबरींमध्ये दफन करण्यात आले होते, ही बाब त्या प्राण्यांविषयी वाटणाऱ्या उच्च सहानुभूतीची निदर्शक आहे.

मकाका माकडांचे थडगे विशेषआहेत, या थडग्यांमधील दोन प्रजाती मूळ भारतातील होत्या. त्या हिंद महासागर आणि लाल समुद्रातून आयात केल्या गेल्या, याचे स्पष्ट पुरावे सापडले. या माकडांना स्टेटस सिम्बॉल मानले जात होते आणि त्यांची मानवासारखी काळजी घेतली जात होती.

व्रोकला विद्यापीठातील प्रोफेसर मार्टा ओसिपिंस्का यांनी नमूद केले आहे की, इतर रोमन प्रांतांच्या तुलनेत बेरेनिके येथे माकडांची विपुलता अधिक दिसून येते. ही बाब त्यांचे महत्त्व विशद करते.

अधिक वाचा: प्राचीन इजिप्शियन लोकांनी मेंदूच्या कर्करोगावर शोधला होता उपचार; नवीन संशोधन नेमके काय सांगते?

मांजरी आणि कुत्र्यांच्या सोप्या दफनविधीच्या तुलनेत माकडांच्या थडग्यांमध्ये इंद्रधनुषी कवच ​​आणि खेळण्याच्या वस्तू पुरण्यात आल्या आहेत. काही माकडांना तर त्यांच्याच पाळीव प्राण्यांसह पुरण्यात आले होते.

एका थडग्यात मकाक मादी होती. तिच्या डोक्याजवळ हिंद महासागरातील मोठे शिंपले होते. तिचे शरीर झाकलेले होते तर तिच्या थडग्यात भारतीय ॲम्फोराचे तुकडे सापडले. दुसऱ्या एका मकाकच्या पायावर balsam resin लावण्यात आले होते. त्यावरून त्या माकडावर वैद्यकीय उपचार करण्यात आले होते हे सूचित होते.

निष्कर्ष

हा शोध रंजक आहे, त्यातून प्राचीन रोमन सैनिकांचे जीवन स्पष्ट होते. शिवाय भारतातून निर्यात होणाऱ्या प्राण्यांविषयीही समजण्यास मदत होते.