Historical Legacy Of Ancient India Iran Persian Empire Influence: भारतीय उपखंडाच्या राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणीत केवळ स्थानिक राजघराण्यांचाच नव्हे, तर प्राचीन इराणमधील अकेमेनिड (Achaemenid) साम्राज्याचाही अत्यंत महत्त्वाचे योगदान आहे. भारतीय इतिहासाचा विचार करताना बहुतांश वेळेस चर्चा मौर्य, गुप्त किंवा मुघल साम्राज्यांभोवती फिरताना दिसते. मात्र भारतीय उपखंडाच्या राजकीय आणि सांस्कृतिक घडणीत काही परकीय साम्राज्यांचा अप्रत्यक्ष आणि तरीही खोलवर परिणाम झाला आहे, या वास्तवाकडे नेहमीच दुर्लक्ष्य होते. त्यातील सर्वात महत्त्वाचे उदाहरण म्हणजे प्राचीन इराणमधील अकेमेनिड साम्राज्य (Achaemenid Empire). सिंधू प्रदेशावर त्यांच्या राज्याचा प्रभाव आणि त्यानंतर उभ्या राहिलेल्या मौर्य साम्राज्याच्या (Mauryan Empire) प्रशासकीय आणि स्थापत्य परंपरेतील साम्य यामुळे भारत-इराण संबंधांचा एक वेगळाच इतिहास समोर येतो.

प्रशासकीय संकल्पना आणि स्थापत्यशैली

सध्या इतिहास संशोधनात असा मुद्दा प्रामुख्याने मांडला जात आहे की, भारतीय राजकारणातील काही महत्त्वाच्या प्रशासकीय संकल्पना आणि स्थापत्यशैली या पर्शियन प्रशासनाच्या प्रभावातून विकसित झाल्या असाव्यात.

पर्शियन साम्राज्याची सिंधूपर्यंतची वाटचाल

इसवी सनपूर्व सहाव्या शतकात पर्शियाचा राजा दरायस पहिला Darius I याने आपले साम्राज्य मध्य आशिया, पश्चिम आशिया आणि सिंधू नदीच्या प्रदेशापर्यंत विस्तारले. ग्रीक इतिहासकार हेरोडोटसच्या उल्लेखानुसार सिंधू प्रदेश हा पर्शियन साम्राज्याचा एक महत्त्वाचा करदायी प्रदेश (satrapy- सॅट्रपी याचेच नंतर रुपांतर क्षत्रप या शब्दात झाले) होता.

Asokan Pillar Vaishali
अशोकस्तंभ, वैशाली (Photo- Wikipedia)

नोंदवही व्यवस्थापन आणि शिलालेख

आजच्या पाकिस्तानातील गांधार आणि सिंधू परिसरातील प्रदेश पर्शियन प्रशासनाखाली आले. त्यामुळे पर्शियन अधिकाऱ्यांची प्रशासकीय पद्धती, कर प्रणाली, नोंदवही व्यवस्थापन आणि शिलालेख परंपरा या गोष्टी भारतीय उपखंडात प्रथमच परिचित झाल्या, असे संशोधकांना वाटते. भारतीय पुरातत्त्वीय संशोधनात असे लक्षात आले आहे की, या काळात व्यापारीमार्ग, नाणी आणि प्रशासकीय विभागणी यामध्ये मोठे बदल घडून आले. या प्रक्रियेमुळे पुढील काही शतकांत भारतीय राज्यव्यवस्थेच्या विकासाला एक वेगळा आकार प्राप्त झाला.

चंद्रगुप्त मौर्य आणि पर्शियन प्रशासन

इसवी सनपूर्व चौथ्या शतकात चंद्रगुप्त मौर्य (Chandragupta Maurya) याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली. त्याची राज्यव्यवस्था सर्वदूर पसरलेली आणि राज्याची बांधणी अत्यंत प्रगत आणि केंद्रीभूत स्वरूपाची होती. इतिहासकारांच्या मते ही प्रशासकीय रचना काही प्रमाणात पर्शियन प्रणालीशी साधर्म्य दर्शवते. पर्शियन साम्राज्यातील सॅट्रपी प्रणाली (क्षत्रप) म्हणजे मोठ्या प्रांतांचे प्रशासकीय विभाग. प्रत्येक प्रांतवार राज्यपाल (satrap अर्थात क्षत्रप) नेमला जात असे. मौर्य साम्राज्यातही प्रांत, जिल्हे आणि स्थानिक प्रशासनाची सुघटित रचना दिसून येते.

मोठ्या साम्राज्याचे व्यवस्थापन

अनेक संशोधकांचे असे मत आहे की, सिंधू प्रदेशात पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या पर्शियन प्रशासनामुळे भारतीय शासकांना मोठ्या साम्राज्याचे व्यवस्थापन कसे करावे याचे जणू काही प्रशिक्षणच मिळाले. याशिवाय कर प्रणाली, रस्ते व्यवस्था आणि गुप्तचर जाळे या बाबतीतही मौर्य प्रशासन पर्शियन परंपरेशी काही प्रमाणात मिळतेजुळते आहे. यामुळे प्राचीन काळात भारत आणि इराण यांच्यातील राजनैतिक देवाणघेवाणीचे महत्त्व अधोरेखित होते.

अशोकाच्या शिलालेखांमधील ‘लिपी’चे नाते

मौर्य सम्राट अशोकाच्या राज्यकाळात भारतीय इतिहासात प्रथमच मोठ्या प्रमाणावर शिलालेखांची परंपरा सुरू झालेली दिसते. भारतभर विखुरलेले अशोकस्तंभ आणि शिलालेख हे केवळ धार्मिक संदेश नसून एक प्रगत प्रशासकीय संवाद प्रणाली होती.

Kharoshti Inscription
खरोष्टीमधील शिलालेख (Photo- Wikipedia)

अशोकाच्या शिलालेखात खरोष्टी

इतिहासकारांना असे वाटते की, अशोकाच्या शिलालेखांमध्ये वापरलेल्या काही लिपींचे पर्शियन परंपरेशी असलेले नाते महत्त्वाचे आहे. वायव्य भारतातील अशोकाच्या काही शिलालेखांमध्ये खरोष्टी लिपीचा वापर झाला आहे. ही लिपी अरामाइक (Aramaic) लिपीपासून विकसित झाल्याचे मानले जाते, जी पर्शियन साम्राज्यात प्रशासकीय भाषेसाठी वापरली जात असे. यामुळे असे लक्षात येते की, पर्शियन प्रशासनाची लिपी परंपरा सिंधू प्रदेशात टिकून राहिली आणि पुढे मौर्य काळात तिचा वापर करण्यात आला असावा.

अशोकस्तंभ आणि पर्शियन प्रभाव

अशोकस्तंभांचे स्थापत्य हे भारतीय कला इतिहासातील एक अद्वितीय उदाहरण मानले जाते. पॉलिश केलेल्या दगडाचे उंच स्तंभ, त्यावरील प्राण्यांची शिल्पं आणि घंटाकृती आधार (bell-shaped capital) हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. संशोधकांच्या मते या स्तंभांच्या रचनेत पर्शियन साम्राज्यातील पर्सेपोलिस येथील स्तंभांशी साम्य दिसून येते. घंटाकृती आधार, प्राण्यांच्या शिल्पांची शैली आणि स्तंभांची प्रमाणबद्ध रचना यामध्ये आश्चर्यकारक साम्य आढळते. याचा अर्थ असा नव्हे की, भारतीय स्थापत्य पूर्णपणे पर्शियन होते. उलट, भारतीय कारागिरांनी परकीय स्थापत्य कल्पना आत्मसात करून त्याला स्थानिक कलात्मक परंपरेशी जोडले. परिणामी एक नवी आणि स्वतंत्र भारतीय स्थापत्यशैली उदयास आली.

ऐतिहासिक नाते

भारत आणि इराण यांच्यातील संबंधांचा इतिहास हजारो वर्षे जुना आहे. पर्शियन साम्राज्याचे सिंधू प्रदेशाशी असलेले तत्कालीन नाते हे केवळ राजकीय नव्हते; तर ते सांस्कृतिक, प्रशासकीय आणि स्थापत्य क्षेत्रांमध्येही दिसून येते. मौर्य साम्राज्याच्या प्रबळ प्रशासनात, अशोकाच्या शिलालेख परंपरेत आणि स्थापत्यकलेत दिसणारे हे सूक्ष्म धागे भारत-इराण संबंधांच्या प्राचीन इतिहासाचे महत्त्वपूर्ण पुरावे आहेत.

पुनर्मूल्यांकन आवश्यक

आज जागतिक इतिहासाचा अभ्यास अधिक व्यापक पद्धतीने सुरू असताना, या परस्परसंवादांचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक ठरते. कारण प्राचीन साम्राज्ये केवळ युद्ध आणि विस्तार यांच्या माध्यमातूनच नव्हे, तर विचार, तंत्रज्ञान आणि प्रशासनाच्या देवाणघेवाणीतूनही एकमेकांवर प्रभाव टाकत होती.

संदर्भ-

  • Archaeological Survey of India – Excavation and epigraphic reports.
  • Michael Axworthy, Empire of the Mind: A History of Iran.
  • Romila Thapar – Aśoka and the Decline of the Mauryas.
  • Upinder Singh – A History of Ancient and Early Medieval India.
  • H. G. Rawlinson – Intercourse Between India and the Western World.
  • Numismatic and epigraphic studies on Indo-Iranian cultural exchange.