Egypt Tamil Brahmi Sankrit Prakrit Inscriptions: इजिप्तमधील Valley of the Kings अर्थात फॅरो राजांच्या दफनभूमीचा तो गूढ, अंधुक आणि इतिहासाच्या प्रतिध्वनींनी भारलेला परिसर. इसवी सन पूर्व १६व्या शतकातील ती थडगंवजा समाध्यारोमन काळात पर्यटकांचे आकर्षण होत्या. भिंतींवर कोरलेली हजारो ग्रीक नावे त्याचे पुरावे देतात. १९२६ साली फ्रेंच विद्वान Jules Baillet यांनी अशा २,००० हून अधिक ग्रीक नावांच्या नोंदी केल्या. त्या ग्रीक नावांच्या गर्दीत, एक आवाज मात्र शतकभराहून अधिक काळ दुर्लक्षितच राहिला तो होता भारतीयांचा आणि त्यांच्या भाषा आणि लिपींचा. त्यावर अलीकडेच एक मोठा संशोधनाचा प्रकाशझोत पडला आणि जगही अचंबित झाले. भारतीय तर इसवी सनपूर्व १६ व्या शतकातही खऱ्या अर्थाने जागतिक आणि कॉस्मोपॉलिटन होते, याचा साक्षात्कारच जगाला झाला!

२ हजार वर्षांपूर्वीचे भारतीय ‘टुरिस्ट’?

२०२४–२५ मध्ये École Française d’Extrême-Orient येथील प्राध्यापक शार्लोट श्मिड आणि University of Lausanne येथील प्रा. इन्गो स्ट्राउच यांनी सहा समाधी स्थळांमध्ये मिळून एकूण ३० भारतीय शिलालेखांची नोंद केली. त्यांच्या “From the Valley of the Kings to India” या शोधप्रबंधानुसार हे शिलालेख इ.स. पहिल्या ते तिसऱ्या शतकादरम्यानचे आहेत.

तमिळ-ब्राह्मी (तमिळी), संस्कृत, प्राकृत आणि गांधारी-खरोष्टी

यातील सुमारे २० लेख तमिळ-ब्राह्मी (तमिळी) लिपीत, तर उर्वरित संस्कृत, प्राकृत आणि गांधारी-खरोष्टीत आहेत. म्हणजेच केवळ दक्षिण भारतच नव्हे, तर पश्चिम व वायव्य भारतातील व्यापारीही त्या काळात इजिप्तपर्यंत पोहोचले होते, असे या संशोधनातून लक्षात येते. महत्त्वाचे म्हणजे ही केवळ व्यापाराची कथा नाही. हे व्यापारी केवळ लाल समुद्रकिनारी असलेल्या बंदरात उतरून परतले नाहीत; तर त्यांनी नाईलच्या खोऱ्यातील थेब्सपर्यंत अगदी आतपर्यंत प्रवास केला आणि फॅरोच्या समाधीस्थळाच्या भिंतींवर स्वतःची नावे कोरली.

Egypt-inscriptions-indian-langauges-Tamil-Brahmi-Sankrit-Prakrit
इजिप्तमधील प्राचीन थडग्यांवर सापडले भारतीय शिलालेख One of the inscriptions cited in the research. (Special arrangement)

‘सिकै कोर्रन’ एक नाव, आठ वेळा

या शिलालेखांमधील सर्वात ठळक नाव आहे ते म्हणजे सिकै कोर्रन (Cikai Koṟṟaṉ). हे नाव पाच वेगवेगळ्या समाधी स्थळांवरमध्ये आठ वेळा कोरलेले आढळते. काही नोंदी प्रवेशद्वाराजवळ, तर एक तर सुमारे चार मीटर उंचीवर आहे. याचाच अर्थ त्यांनी लिहिलेले कुणाही माणसाच्या सहज नजरेस पडावे, असाच त्यामागचा स्पष्ट हेतू होता.

प्राचीन कॉस्मोपॉलिटन भारतीय

या नावात भाषक संगमही पाहायला मिळतो. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सिकै’ हा शब्द संस्कृत ‘शिखा’शी संबंधित असू शकतो, त्याचा अर्थ केसांचा तुरा किंवा मुकुट असा होतो. तर ‘कोर्रन’ हा स्पष्टपणे तमिळ मूळ असलेला शब्द आहे. विजय, संहार किंवा राजेपद दर्शवणारा असा त्याचा अर्थ आहे. संगम साहित्यातील चेरा राजे, ‘कोर्रवै’ ही योद्धा देवी आणि ‘कोर्रवन’ (राजा) या शब्दांशी त्याचे नाते दिसते.
म्हणजेच एका नावात संस्कृत आणि तमिळ अशा दोन सांस्कृतिक प्रवाहांचा संगम दिसतो. प्राचीन भारतातील व्यापारी समाज हा केवळ बहुभाषक नव्हता तर तो बहुसांस्कृतिक अर्थात कॉस्मोपॉलिटनही होता, याचाच हा धडधडीत पुरावा आहे, असे संशोधकांना वाटते.

कोर्रन

हेच ‘कोर्रन’ नाव इजिप्तमधील बेरेनिके या लाल समुद्रकिनारी असलेल्या प्रसिद्ध प्राचीन बंदरात सापडलेल्या मातीच्या भांड्यावरही आढळते. संगम साहित्यातील ‘पिट्टांगोर्रन’ या चेरा राजालाही ‘कोर्रन’ अशी संबोधने आहेत. यातून इजिप्तमधील शिलालेख आणि तमिळ साहित्यातील उल्लेख यांच्यातील धागेदोरे स्पष्ट होतात.

Egypt-Inscriptions-Tamil-Brahmi-Sanskrit-Prakrit
इजिप्तमधील प्राचीन थडग्यांवर सापडले भारतीय शिलालेख One of the inscriptions cited in the research. (Special arrangement)

“कोपान आला आणि पाहिले”

आणखी एका महत्त्वाच्या शिलालेखात उल्लेख आहे, “कोपान वरत कंतन” म्हणजेच “कोपान आला आणि पाहिले.” हा वाक्प्रचार त्या काळातील ग्रीक शिलालेखांमध्ये असणाऱ्या वाक्यरचनेच्या शैलीशी साधर्म्य दर्शवतो. याचाच अर्थ भारतीय प्रवाशांना तेथील स्थानिक भाषाशैलीची उत्तम जाण होती आणि त्याच शैलीचा वापर त्यांनी तेथील शिलाखंडांवर भारतीय लिपीत आपली नावे कोरताना केला. याचाच अर्थ ते अतिशय स्मार्टही होते, असे संशोधकांचे मत आहे. ‘सातन’ आणि ‘किरन’ यांसारखी इतर तमिळ नावेही या छोटेखानी शिलालेखांमध्ये सापडली आहेत. क्षिण भारतातील प्रारंभिक तमिळ-ब्राह्मी शिलालेखांमध्येही ही नावे अशीच सापडतात.

संस्कृत व प्राकृतचा ठसा

सुमारे दहा शिलालेखांमधील छोटेखानी नोंदी या संस्कृत आणि प्राकृतमध्ये आहेत. एका संस्कृत शिलालेखात ‘क्षहरात’ (Kshaharata) राजघराण्याच्या दूताचा उल्लेख आहे. “तो येथे आला.” असा हा उल्लेख आहे. क्षहरात वंशाने इ.स. पहिल्या शतकात पश्चिम भारतातील काही भागांवर राज्य केले, याचे पुरावे आपल्याला इतिहासात सापडतात. याचाच दुसरा अर्थ असा की, व्यापारीच नव्हे तर राजघराण्यांशी संबंधित प्रतिनिधीही या सागरी नेटवर्कमध्ये सहभागी होते. भारत-रोमन व्यापार केवळ मलबार किनाऱ्यापुरता मर्यादित नव्हता; तर गुजरात, महाराष्ट्र, वायव्य भारत या सर्वच भागांमध्ये तो सुदूर पोहोचलेला होता.

केवळ व्यापार नव्हे, तर सांस्कृतिक प्रवास

रोमन लेखक प्लिनी आणि टोलोमी यांनी भारत-रोमन व्यापाराचा उल्लेख त्यांच्या लिखाणात केला आहे. काळीमिरी, हस्तिदंत, रत्ने, वस्त्रप्रावरणे पश्चिमेकडे जात होती, असा उल्लेख त्यात सापडतो. पण हे व्यवहार वा व्यापर केवळ एकतर्फीच होता का? असा प्रश्न आजवर संशोधकांना पडला होता. मात्र या नव्याने सापडलेल्या शिलालेखांमुळे कदाचित इतिहास बदलेल, अशी एक शक्यता सध्या दिसते आहे.

पश्चिम भारतातील क्षहराताचा दूर इजिप्तमध्ये

आजवर आपल्याला भारत- इजिप्त- रोम व्यापाराचे पुरावे सापडले होते पण आता त्याही पलीकडे थेट व्यक्तींची- व्यापाऱ्यांची नावेच सापडली आहेत. सिकै कोर्रनचा त्यात समावेश होता. कोपानही तिथे आला होता आणि एवढेच नव्हे तर पश्चिम भारतावर राज्य करणाऱ्या तत्कालीन क्षहरातचा दूतही तिथे इजिप्तमध्ये येऊन गेला होता. या साऱ्या नोंदी भारतीयांचा त्यावेळच्या जागतिक व्यापारावर असलेला ठसा पुरेसा स्पष्ट करतात.

तमिळ ब्राह्मी ताडपत्रावरच सर्वाधिक होती का?

तमिळ-ब्राह्मी शिलालेख भारतात आजवर केळ शंभराच्या आसपासच सापडले आहेत. आता त्यात इजिप्तमध्ये सापडलेल्या या नवीन २० नवीन छोटेखानी शिलालेखांची भर पडली आहे. त्यामुळे संशोधकांना असाही एक प्रश्न पडला आहे की, मग भारतात तमिळ- ब्राह्मी शिलालेख एवढ्या कमी संख्येने का सापडतात? बहुसंख्य लेखन हे त्यावेळेस लेखन ताडपत्रावर कऱण्यात आले आणि म्हणून ते नष्ट झाले आणि म्हणूनच आज ते सापडत नाही, असे आहे का? की दगडावर कोरण्याची पद्धत काही समाजघटकांपुरतीच  मर्यादित होती?

इजिप्तच्या कोरड्या हवामानाने जपला भारतीय इतिहास

इजिप्तच्या कोरड्या हवामानामुळे आणि त्यातही छोटेखानी शिलालेख खडकावरच कोरल्याने शिल्लक राहिले आणि जपले गेले. एक- दोन शतके नव्हे तर थेट दोन हजार वर्षे टिकून राहिले. कदाचित म्हणूनच तर जेम्स फर्ग्युसनने म्हटले असावे की, दगडातील स्थापत्य किंवा शैलगृहे ही जगातील सर्वोत्तम वास्तूकला ठरते कारण ती प्रदीर्घ काळ टिकून राहाते.

प्राचीन जगावर भारतीय ठसा

Valley of the Kings मधील हे तमिळ, संस्कृत आणि प्राकृत शिलालेख असे सांगण्याचा प्रयत्न करतात की, तत्कालीन भारतीयांचा प्रवास हा काही केवळ व्यापारापुरता मर्यादित नव्हता तर हा माणसांबरोबरच, त्यांच्या भाषा आणि सांस्कृतिक परिचयाचाही हा प्रवास होता. फॅरोच्या समाधी स्थळाच्या सावलीत, तमिळ देवी कोर्रवैचेही नाव तिथे वाचायला मिळते. संस्कृतमधील ‘शिखा’ शब्द इजिप्तच्या भिंतीवर झळकतो. प्राकृतमधील साधे वाटावे असे वाक्य “आला आणि पाहिले” हे सारे संदर्भ प्राचीन जगाच्या नकाशावर भारताचे अस्तित्व अगदी ठळक होते, हेच सिद्ध करणारे आहेत!