Ancient Indian Medicine Sushruta Samhita Plastic Surgery History: प्राचीन भारतात प्लास्टिक सर्जरी होती, टेस्ट-ट्यूब बेबीज होते आणि कदाचित विमानेही होती. पिणाऱ्यांची तल्लफ वाढून चहाचे कप वाढत जावेत, तसे हे दावेही वाढत मोठे होत जातात. शेवटी असे चित्र उभं राहतं की आधुनिक विज्ञानातला जवळपास प्रत्येक शोध प्राचीन भारतात हजारो वर्षांपूर्वीच लागला होता. मुळात, पण, हे सर्व दावे पूर्णपणे खोटे की खरे आहेत, ही समस्याच नाहीये. खरी समस्या अशी आहे, की मोलाची अस्सल ऐतिहासिक कामगिरी आणि अतिशयोक्त दावे यांची सरमिसळ होऊन त्यात खरंखुरं योगदान दुर्लक्षिलं जातं आहे.
वैद्यक शास्त्राची कथा काय सांगते?
हे वास्तव कोणी नाकारू नये की, प्राचीन भारतानं वैद्यकशास्त्रात खरोखरच महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं. त्याची नोंद उपलब्ध ग्रंथांमध्येही करण्यात आलेली आहे. वैद्यकशास्त्राचे इतिहासकारही या योगदानाला महत्त्व देत आलेत. पण या इतिहासाची दुसरी बाजूही आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. ती म्हणजे, एखादी संस्कृती अकल्पनीय वैद्यकीय ज्ञान निर्माण करू शकते, तरीही कालांतराने ते ज्ञान निर्माण करणाऱ्या आणि जपणाऱ्या व्यक्तींचे सामाजिक स्थान कमकुवतही करू शकते.
सुश्रुतसंहितेचं मोल काय ?
सुश्रुतसंहिता हा प्राचीन भारतीय वैद्यकातला सर्वांत उल्लेखनीय ग्रंथांपैकी एक आहे. या ग्रंथात मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करणं, मूत्राशयातले खडे काढणं, जखमांमध्ये रुतलेले बाण काढणं अशा तंत्रांचा उल्लेख आढळतो. आजच्या दृष्टीनं ही तंत्रं साधी वाटू शकतात; पण आधुनिक भूलतंत्र आणि जंतुनाशक पद्धती उपलब्ध होण्यापूर्वी माणसावर शस्त्रक्रिया करणं अत्यंत धोकादायक होतं. अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी अफाट कौशल्य, निरीक्षणशक्ती आणि प्रत्यक्ष अनुभव आवश्यक होता. जे त्या काळातल्या शल्यचिकित्सकांनी साधलं होतं. म्हणूनच प्राचीन भारतीय शल्यचिकित्सकांना त्यांच्या काळातील अत्यंत नावीन्यपूर्ण वैद्यकीय विचारवंतांमध्ये स्थान दिलं जातं.
प्राचीन वैद्यकशास्त्राची मोठी कामगिरी कोणती?
सुश्रुतसंहितेत विशेषतः नाकाचा खराब झालेला किंवा कापलेला भाग पुन्हा तयार करण्याची पद्धत वर्णन केलेली आहे. या प्रक्रियेत रुग्णाच्या गालावरचा त्वचेचा एक तुकडा घेऊन नाकाची पुनर्रचना करण्याची पद्धत सांगितली आहे. या सूचनांमध्ये इतका सविस्तरपणे तपशील आलेला आहे की आधुनिक शल्यचिकित्सकही या पद्धतीला प्रत्यक्षात वापरण्याजोगी आणि प्रभावी तंत्र म्हणून ओळखतात. अर्थातच पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया (Reconstructive Surgery) ही प्राचीन भारतीय वैद्यकातील सर्वांत मोठ्या कामगिरींपैकी एक मानली गेली आहे.
पुणेकर कुंभाराने दाखवला शल्यचिकित्सकांना मार्ग
इ.स. १७९४ मध्ये ब्रिटिश ‘Gentleman’s Magazine’ मध्ये पुण्यात एका भारतीय कुंभाराने पारंपरिक पद्धतीनं यशस्वीपणे नाक पुनर्रचना केल्याचं वर्णन प्रसिद्ध झालं होतं. युरोपीय शल्यचिकित्सकांनी ही पद्धत बारकाईने अभ्यासली, तिच्यात सुधारणा केल्या आणि पुढे ती आधुनिक पुनर्रचनात्मक शस्त्रक्रियेच्या इतिहासाचा भाग झाली. ही जागतिक वैद्यकाला मिळालेली खरी भारतीय देणगी आहे. तिचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी कोणत्याही पुराणकथेची किंवा अतिशयोक्त दाव्यांची आवश्यकता नाही.
सुश्रुतांचा अधिक भर थिअरीपेक्षा प्रॅक्टिकलवर
मानवी शरीररचनेचा प्रत्यक्ष अभ्यास करण्यावर दिलेला भर हे सुश्रुतसंहितेचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. सुश्रुतांनी विद्यार्थ्यांना मानवी शरीराचा अभ्यास केवळ गुरूंनी सांगितलेल्या माहितीच्या आधारे न करता प्रत्यक्ष निरीक्षणातून करावा, असं सुचवलं होतं. यासाठी मृतदेह वाहत्या पाण्यात विशिष्ट काळ ठेवून त्याचं हळूहळू विघटन होऊ द्यावं, त्यानंतर मऊ झालेल्या ऊती सावधपणानं दूर करून आतल्या अवयवांचं निरीक्षण करावं, अशी पद्धत सांगितली आहे. प्रत्यक्ष निरीक्षण आणि अनुभव यावर दिलेला हा भर आधुनिक वैज्ञानिक वैद्यकाच्या मूलभूत तत्त्वांपैकी एकाशी जवळीक दर्शवणारा आहे.
पित्याचं ‘बीज’ आणि मातेचं ‘क्षेत्र’
सुश्रुतसंहितेबरोबरच ‘चरकसंहिता’ हा प्राचीन भारतीय वैद्यकातला आणखी एक महत्त्वाचा ग्रंथ गणला जातो . या ग्रंथात आनुवंशिकतेसंदर्भात काही प्रारंभीचे विचार आढळतात. त्यात मूल हे पित्याचं ‘बीज’ आणि मातेचं ‘क्षेत्र’ यांच्या संयोगातून तयार होते, अशी कल्पना मांडली आहे. तसंच शरीरातील मऊ ऊतींचा उगम मुख्यतः मातेकडून, तर हाडे आणि दातांसारखे कठीण भाग पित्याकडून येतात, अशी धारणा व्यक्त करण्यात आली. ग्रेगर मेंडेलच्या वारसाविषयक सिद्धांतांशी किंवा आधुनिक आण्विक जीवशास्त्राशी याची तुलना करता येण्यासारखी नाही. मात्र या मांडणीचे महत्त्व असं की, वारशाचा प्रश्न केवळ दैवी किंवा अलौकिक शक्तींशी जोडण्याऐवजी नैसर्गिक कारणांमधून समजावून घेण्याचा हा प्रयत्न होता.
वैद्यकीय परंपरा का टिकली नाही?
या प्रश्नाचं उत्तर काहीसं अस्वस्थ करणारं आहे. इथे, समस्या बुद्धिमत्तेची किंवा सर्जनशीलतेची कमतरता ही नव्हतीच. उलट, त्याचा संबंध समाजात वैद्य आणि शल्यचिकित्सकांकडे कसं पाहिलं जात होतं याच्याशी होता. धर्मशास्त्रीय परंपरेचा अभ्यास करणारे विद्वान पॅट्रिक ऑलिव्हेल (Patrick Olivelle) यांनी आपल्या संशोधनातून दाखवून दिलं आहे की ब्राह्मण्यवादी सामाजिक व्यवस्थेत वैद्यांना अनेकदा कमी प्रतिष्ठेचं किंवा कलंकित स्थान दिलं जात असे. मनुस्मृतीत द्विज ब्राह्मणाने वैद्याच्या हातचं अन्न स्वीकारू नये किंवा महत्त्वाच्या धार्मिक भोजनासाठी त्याला आमंत्रित करू नये, अशा प्रकारच्या सूचना असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं आहे.
वैद्यांना ‘अशुद्ध’ का मानलं गेलं?
या दृष्टिकोनामागे अनेक कारणं होती. वैद्यांचा आजारी, रक्तस्त्राव होणाऱ्या आणि मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्या माणसांशी सतत संपर्क येत असे. त्यामुळे काही धार्मिक कल्पनांनुसार त्यांना विधिजन्य अशुद्धतेशी (Ritual Impurity) जोडलं गेलं. या शिवाय वैद्य मंडळी आजारांवर उपचार करून झाल्यावर धन घेत असत. काही धार्मिक ग्रंथांमध्ये धन कमावणाऱ्या वैद्यांचा उल्लेख कसाई किंवा संशयाने पाहिल्या जाणाऱ्या सावकारी व्यवसायांच्या जोडीने केला गेला. सोबतच अथर्ववेदात रोगनिवारणाच्या पद्धतींचा समावेश तर आहे; पण त्याचबरोबर जादू, मंत्र आणि विधी यांच्याशी संबंधित अनेक संकल्पनाही आढळतात. त्यामुळेही काही सामाजिक गटांच्या नजरेत वैद्यकाचे स्थान कमी प्रतिष्ठेचं असावं, असा हा विषय आहे.
गरज सरो, वैद्य मरो ?
वैद्यक आणि शल्यचिकित्सक महत्त्वाचं काम करत असूनही परंपरेच्या रेट्यामुळे एक विचित्र विरोधाभास निर्माण झाला. ज्या संस्कृतीने सुश्रुत आणि चरक यांसारखे वैद्य निर्माण केले, त्याच संस्कृतीत वैद्यांकडे सामाजिकदृष्ट्या कनिष्ठ नजरेनं पाहिलं गेलं. वैद्यकीय ज्ञानाला महत्त्व होतं; पण ते प्रत्यक्ष वापरणाऱ्या व्यक्तींविषयी संशय किंवा तुच्छताही असू शकत होती. समाजाला वैद्याची गरज होती, पण त्याचवेळी त्यांना अशुद्धही मानलं जात होतं.
पिछेहाटीचं कारण काय ?
या सामाजिक दृष्टिकोनाचे कालांतरानं गंभीर परिणाम झाले. शस्त्रक्रियेचं ज्ञान हे प्रतिष्ठित विद्वत व्यवसायाचा भाग राहण्याऐवजी हळूहळू काही निम्न सामाजिक स्तरातील नाभिक किंवा पारंपरिक शल्यकार समुदायांकडे गेलं. सुश्रुतांनी ज्या प्रत्यक्ष निरीक्षणाला प्रोत्साहन दिलं होतं, ती वृत्तीही कालांतरानं कमी होत गेली. या पिछेहाटीचा परिणाम असा झाला, प्राचीन भारतीय वैद्यकानं मेंदूचं कार्य, हृदयाची नेमकी भूमिका किंवा रक्ताभिसरण यांची आधुनिक अर्थानं सविस्तर समज विकसित केली नाही.
संस्थात्मक आधाराचा अभाव
एका टप्प्यानंतर प्राचीन वैद्यक शास्त्राचा विकास खुंटला हे खरं. पण तसं घडण्यामध्ये भारतीय समाजात बौद्धिक क्षमता नव्हती, असं म्हणणं चुकीचं ठरेल. उलट, वैद्य आणि शल्यचिकित्सकांचं सामाजिक स्थान कमी होत गेल्यामुळे घडलं असं की, वैद्यकीय प्रगतीसाठी आवश्यक असलेला प्रत्यक्ष शरीरअभ्यास, शवविच्छेदन आणि प्रयोगशीलतेला पुरेसा संस्थात्मक आधार मिळाला नाही. ज्यामुळे पुढची वाट अवघड बनली.
प्रेरणादायी आणि शोकात्मही
म्हणूनच प्राचीन भारतीय वैद्यकाचा इतिहास एकाच वेळी प्रेरणादायी आणि शोकात्म आहे. एका बाजूला या परंपरेने उल्लेखनीय शस्त्रक्रिया तंत्रं विकसित केली, प्रत्यक्ष निरीक्षणाला महत्त्व दिलं आणि जागतिक वैद्यकाच्या इतिहासात खरंखुरं आणि दीर्घकालीन योगदान दिलं. दुसऱ्या बाजूला समाजातील धार्मिक शुद्धता-अशुद्धतेच्या कल्पना, जातिव्यवस्था आणि व्यवसायांच्या प्रतिष्ठेतील उतरंडीमुळे वैद्य आणि शल्यचिकित्सकांचं सामाजिक स्थान हळूहळू कमकुवत झालं. त्यामुळे वैद्यकीय ज्ञानाची परंपरा अस्तित्वात असूनही तिचा पुढील संस्थात्मक आणि प्रयोगशील विकास मंदावत गेला.
अतिरंजित दाव्यांची गरज काय?
सुश्रुतांचं खरं महत्त्व समजून घेण्यासाठी म्हणूनच अतिरंजित दाव्यांची गरज नाही. नाकाची पुनर्रचना, शस्त्रक्रियाविषयक तपशील, प्रत्यक्ष शरीरनिरीक्षण आणि अनुभवाधिष्ठित वैद्यकीय प्रशिक्षण यांमध्ये त्यांनी दिलेलं योगदान प्रचंड मोलाचं आहे. हे मोल विसरून भलतेसलते दावे करण्यात काय हशील?(देवदत्त हे कला, संस्कृती आणि वारसा या विषयांवर लेखन करणारे प्रसिद्ध पुराणकथांचे अभ्यासक आहेत.)
स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी विषयाशी संबंधित प्रश्नः
१. प्राचीन भारतीय वैद्यकानं शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय ज्ञानाच्या विकासात दिलेल्या प्रमुख योगदानांची चर्चा करा.
२. सुश्रुतसंहितेतील कामगिरीवरून प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरा केवळ तात्त्विक चिंतनावर आधारित नव्हती, तर प्रत्यक्ष निरीक्षण आणि प्रयोगशीलतेलाही महत्त्व देत होती. याचे परीक्षण करा.
३. विविध व्यवसायांबद्दल समाजात असलेल्या दृष्टिकोनाचा ज्ञाननिर्मिती आणि ज्ञानाच्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे होणाऱ्या संक्रमणावर कसा परिणाम होऊ शकतो? प्राचीन भारतीय समाजातील वैद्यांच्या स्थानाच्या संदर्भात चर्चा करा.
४. जातिव्यवस्था, विधिजन्य शुद्धता-अशुद्धतेच्या संकल्पना आणि व्यवसायाचा सामाजिक दर्जा यांनी प्राचीन भारतातील वैद्यकशास्त्राच्या संस्थात्मक विकासावर कसा प्रभाव टाकला? चर्चा करा.
