scorecardresearch

विश्लेषण : अनिल देशमुख अखेर तुरुंगाबाहेर, १०० कोटींचे आरोप आणि तुरुंगात रवानगी कशी झाली?

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आज १३ महिन्यांनी तुरुंगाबाहेर आले आहेत

विश्लेषण : अनिल देशमुख अखेर तुरुंगाबाहेर, १०० कोटींचे आरोप आणि तुरुंगात रवानगी कशी झाली?
Anil Deshmukh get out of jail Now but How did he become accused of 100 crores and sent to jail?

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे १ वर्ष १ महिन्याने तुरुंगातून बाहेर आले आहेत. १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट सचिन वाझेला दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. मुंबई पोलीस आयुक्तपदावर असताना परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकून हा आरोप केला होता. त्यानंतर हे प्रकरण हायकोर्टात गेलं तेव्हा त्यांना गृहमंत्रीपद सोडावं लागलं. तसंच २०२१ च्या नोव्हेंबर महिन्यात त्यांना अटक करण्यात आली. १ वर्ष १ महिन्याने त्यांची सुटका झाली आहे. आपण जाणून घेणार आहोत या सगळ्यात अनिल देशमुख अडकत कसे गेले

मुकेश अंबानींच्या घराबाहेर आढळली स्फोटकांनी भरलेली कार

२५ फेब्रुवारी २०२१ ला प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतल्या अँटेलिया या निवासस्थानकाबाहेर एक संशयित कार सापडली होती. ज्यामध्ये काही स्फोटकं आढळून आली. या घटनेची चर्चा देशभरात झाली. त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार सत्तेत होतं. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ही गाडी सापडल्याने या प्रकरणाची चर्चा झालीच. मात्र खरा पेच तेव्हा निर्माण झाला जेव्हा यात सचिन वाझेचं नाव आलं.

४ मार्च २०२१ ला अँटेलिया प्रकरणात सचिन वाझेचं नाव
४ मार्च २०२१ ला अँटेलिया प्रकरणात सचिन वाझेबाबत शंका उपस्थित केली ती त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी. तसंच मनसुख हिरेन नावाच्या माणसाची कारच अंबानी यांच्या घरासमोर ठेवण्यात आली होती आणि सचिन वाझे- मनसुख हिरेन यांची मैत्री कशी होती या गोष्टीही समोर आल्या. यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच ५ मार्च २०२१ ला मनसुख हिरेनचा मृतदेह कळवा येथील खाडीत आढळून आला. ज्यानंतर हे सगळं प्रकरण राजकीय अँगलकडे वळलं.

सचिन वाझेचं निलंबन करून त्याला अटक करावी अशी मागणी त्यावेळी विरोधकांकडून झाली. राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंनी मात्र सचिन वाझे हा काही ओसामा बिन लादेन नाही असं म्हणत १० मार्च २०२१ ला त्यावेळी गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांनी सचिन वाझेची बदली करण्याचा निर्णय घेतला. या सगळ्या प्रकरणाचा तपास NIA कडे सोपवण्यात आला होता. एनआयएने १३ मार्च २०२१ ला सचिन वाझेला अँटेलिया प्रकरणात अटक करण्यात आली. त्यावेळीच भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदावरून हटवलं पाहिजे अशी मागणी केली होती.

ठाकरे सरकारवर या प्रकरणावरून आरोप होऊ लागले. ज्यानंतर त्यावेळी मुंबई पोलीस आयुक्तपदी असलेले परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अनिल परब यांनी ट्विट करून मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांना हटवत असल्याचं स्पष्ट केलं.

परमबीर सिंग यांचा लेटरबॉम्ब
परमबीर सिंग यांना पदावरून हटवण्यात आल्यानंतर पुढच्या तीन दिवसात म्हणजेच २० मार्च २०२१ ला त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं. या पत्रात अनिल देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये ढवळाढवळ करतात आणि त्यांनी सचिन वाझेला मुंबईतल्या बार आणि रेस्तराँच्या मालकांकडून दर महिन्याला १०० कोटी रूपये वसूल करायचे असं टार्गेट दिलं होतं. या दोन बाबी यात नमूद होत्या. परमबीर सिंग यांच्या या लेटरबॉम्बने राज्याच्या राजकारणात मोठा धुरळा उडाला. माझ्यावरचे आरोप खोटे आहेत असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.

परमबीर सिंग कोर्टात गेले आणि…
परमबीर सिंग या प्रकरणी कोर्टात धाव घेतली. अनिल देशमुख यांची चौकशी व्हावी अशी मागणी करत आधी सुप्रीम कोर्टात आणि त्यानंतर मग हायकोर्टात याचिका दाखल केली. हायकोर्टाने ५ एप्रिल २०२१ ला या प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश दिले आणि त्यावेळी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारत अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशीसोबत ईडीकडूनही चौकशी
अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी १०० कोटींच्या वसुली प्रकरणात होत होतीच. शिवाय ईडीने बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी अनिल देशमुख यांच्या घरांवर आणि कार्यलयांवर छापे मारले होते. एप्रिलमध्ये राजीनामा दिल्यानंतर सुरूवातीच्या काही तारखांना अनिल देशमुख चौकशीसाठी गेले. मात्र त्यानंतर ऑगस्ट २०२१ ते ३० ऑक्टोबर २०२१ या कालावधीत ते फारसे समोर आले नाहीत.

१०० कोटी वसुलीप्रकरणी आरोप असलेले अनिल देशमुख अनेक दिवस समोर आलेले नव्हते. अनिल देशमुख यांना ५ वेळा समन्स बजावल्यानंतरही ईडीसमोर हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांना त्यांच्या नावानं लुक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. तसंच देशमुख यांचा शोध घेण्यासाठी ईडीकडून सीबीआयकडे मदत मागण्यात आली होती. अखेर १ नोव्हेबर रोजी अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले. सकाळी ११ वाजेच्या सुमारास अनिल देशमुख ईडी कार्यालयात पोहोचले होते. त्यानंतर जवळपास १२ तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीने अटक करण्यात आली.

अनिल देशमुख कुठे आहेत? अशी विचारणा होत असतानाच…
अनिल देशमुख कुठे आहेत अशी विचारणा होत असतानाच अनिल देशमुख हे १ नोव्हेंबरला ईडी कार्यालयासमोर हजर झाले. ईडीने त्यांच्याविरोधात मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात सहा हजार पानी आरोपपत्र दाखल केलं होतं.

………..अशी झाली अटक
अनिल देशमुख चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात गेल्यानंतर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. तसंच चौकशीच्या अंती रात्री उशिरा १ वाजण्याच्या सुमारास अनिल देशमुख यांना अटक करण्यात आलं. अनिल देशमुख २ नोव्हेंबर ते २८ डिसेंबर या कालावधीत तुरुंगात होते. या सगळ्या कालावधीत त्यांनी जामीन मिळवण्यासाठी अनेकदा त्यांना अपिल केलं. मात्र ते फेटाळलं गेलं. अखेर आज अनिल देशमुख तुरुंगाबाहेर आले आहेत. २७ डिसेंबरला त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-12-2022 at 18:20 IST

संबंधित बातम्या