Animal Intelligence Veronica Cow: व्हेरोनिका ही १३ वर्षांची स्विस ब्राउन गाय काही दिवसांपूर्वी जगभर चर्चेत आली, ती पाठ खाजवण्यासाठी केलेल्या ब्रशच्या वापरामुळे. तिने आपल्या शरीरावरचा पाठीचा भाग खाजवण्यासाठी चक्क ब्रशचा वापर साधन (tool) म्हणून केला, हा अगदी सहज केलेला वापर होता. व्हेरोनिका ब्रश तोंडात धरते, शरीराच्या भागानुसार कधी ब्रशचा टोकाचा भाग तर कधी त्याची गुळगुळीत दांडी खाजवण्यासाठी वापरते. महत्त्वाचे म्हणजे खाजवताना ब्रशचा दाबही ती आवश्यकतेनुसार कमी- अधिक करते.
प्राण्यांची बुद्धिमत्ता
करंट बायोलॉजी (Current Biology) या प्रतिष्ठित वैज्ञानिक नियतकालिकात या संदर्भातील माहिती सविस्तर प्रसिद्ध झाली आणि अभ्यासकांचे लक्ष या विषयाकडे वळले. व्हिएन्ना येथील युनिव्हर्सिटी ऑफ वेटर्नरी मेडिसिनमधील संशोधक अॅलिस आउअर्सपर्ग आणि अँटोनियो ओसुनो-मास्कारो यांनी व्हेरोनिकेचे प्रत्यक्ष निरीक्षण करून हा अभ्यास केला. ओसुनो-मास्कारो यांनी या घटनेतून प्राण्यांच्या बुद्धिमत्तेबाबतचे काही महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केले.
व्हेरोनिका ही ‘गायींमधली आईन्स्टाईन’?
संशोधक या प्रश्नाचे उत्तर ठामपणे ‘नाही’ असेच देतात. व्हेरोनिका ही अपवादात्मक ‘अतिबुद्धिमान’ गाय नाही. ओसुनो-मास्कारो यांच्या मते, केवळ बौद्धिक क्षमता असणे पुरेसे नसते; तर ती क्षमता प्रत्यक्षात येण्यासाठी आजूबाजूला योग्य वातावरण असावे लागते. साधनांचा वापर (tool use) हा अचानक होत नाही किंवा केला जात नाही. तर त्यासाठी काही गोष्टी जुळून याव्या लागतात. उदाहरणार्थ-
- – योग्य वस्तू सतत उपलब्ध असणे,
- – त्या वापरण्याचा स्पष्ट फायदा असणे,
- – आणि सतत प्रयोग करून त्यातील अपयशांमधून शिकत (trial and error) राहण्यासाठी सुरक्षित परिस्थिती आजूबाजूला असावी लागते.

धोका कमी असतो, असे सुरक्षित वातावरण असावे लागते, तर प्राणी आपल्या बुद्धीमत्तेचा चांगला वापर करतात. उदाहरणार्थ- एखाद्या बेटांवरील परिसंस्था किंवा संरक्षित परिसर असलेल्या ठिकाणी प्राणी वस्तूंशी अधिक मोकळेपणाने खेळू शकतात, प्रयोग करू शकतात. त्यामुळे तिथे साधनांचा वापर अधिक दिसून येतो. म्हणजेच, बुद्धिमत्ता जन्मजात असली, तरी ती व्यक्त होण्यासाठी आजूबाजूला चांगले वातावरण असावे लागते.
काही प्राणीच साधने का वापरतात?
माकडे, कावळे, पोपट, ऑर्का (व्हेलचा प्रकार) या सर्व प्राण्यांमध्ये साधनांचा वापर आढळतो. मात्र त्या वापरामागची कारणे वेगवेगळी असतात.
- काही प्राणी अन्न मिळवण्यासाठी साधने वापरतात,
- काही स्वच्छतेसाठी किंवा शरीराची काळजी घेण्यासाठी,
- तर काही शिकारीसाठी.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ‘साधनांचा वापर’ ही एकसंध संकल्पना नाही. एका कावळ्याने काठी वापरून अळी काढणे आणि व्हेरोनिकाने ब्रश वापरून खाज भागवणे या दोन्ही गोष्टींमागील यांत्रिक गरजा, नियंत्रण आणि विचारपद्धती वेगवेगळी आहे, असे संशोधकांना वाटते.
साधनांचा वापर म्हणजे, प्राण्याने आपल्या शरीराच्या मर्यादा ओलांडून शरीर + एखादी वस्तू असा एकत्रित वापर करणे.
पाळीव प्राण्यांकडे दुर्लक्ष्य?
प्राण्यांशी संबंधित अभ्यासामध्ये पाळीव प्राण्यांकडे माणसाचे दुर्लक्ष्य झाले आहे का, याचे उत्तर ‘होय’ असे आहे. प्रायमेट्स (माकड वर्गातील प्राणी) आणि काही ‘प्रसिद्ध’ प्रजातींवर मोठ्या प्रमाणात संशोधन झाले आहे. पण पाळीव प्राणी आणि शेतीतील जनावरे हजारो वर्षे माणसासोबत राहिल्यानंतरही त्यांच्या बौद्धिक क्षमतांकडे फारसे लक्ष गेलेले नाही.
म्हणूनच, गायीमध्ये साधनांचा वापर दिसला की, तो अविश्वसनीय किंवा अचंबित करणारा वाटतो. प्रत्यक्षात, तो दुर्मीळ नसून आपण केलेल्या दुर्लक्ष्यामुळेच आपल्या नजरेत आजवर तो कधी आलेला नाही, असे संशोधकांना वाटते. एखादी वागणूक वारंवार दिसते म्हणून ती ‘विशेष उत्क्रांतीशील’ आहे असे गृहीत धरले जाते, पण कदाचित इतर प्राण्यांमध्ये ती असूनही आपल्या नजरेतच आलेली नाही, असेही असू शकते.
अति-मूल्यमापनाचा धोका…
- संशोधक याबाबत फार काळजी घेतात.
- – प्रथम संकल्पनांची अचूक व्याख्या केली जाते.
- – एखाद्या वस्तूचा साधा वापर आणि साधन (टूल) म्हणून केलेला वापर यात भेद केला जातो.
- – वर्तन लवचिक आहे का, परिस्थितीनुसार बदलते का, याकडे लक्ष दिले जाते.
तसेच, संशोधक नेहमीच सोप्या स्पष्टीकरणांचा विचार करतात. म्हणजे, एखादी कृती शिकलेल्या सवयीमुळे झाली की, प्रत्यक्ष विचारातून हे तपासले जाते.
व्हेरोनिकाच्या बाबतीत, तिचे वर्तन अत्यंत लवचिक, संवेदनशील आणि नाविन्यपूर्ण असल्याचे संशोधक स्पष्ट करतात.
पुढे काय होईल?
संशोधकांना वाटते आहे की, जनावरे केवळ निष्क्रिय नसतात. तर ती शोध घेणारी, शिकणारी आणि संवाद साधणारी आहेत हा दृष्टिकोनच यामुळे अधिक बळकट होईल. आणि तसे झाल्यास प्राण्यांना त्यांच्या बुद्धीमत्तेचा वापर करण्यास प्रृवृत्त करण्यासाठी त्यांना उत्तम वातावरण उपलब्ध करून देण्याच्या प्रमाणात वाढ होऊ शकते. आणि पुराव्याने किंवा वैज्ञानिक आधाराने हे स्पष्ट झाल्यास पाळीव प्राण्यांच्या संदर्भातील कायद्यांमध्ये भविष्यात बदलही होऊ शकतो. म्हणजे प्राण्यांसाठी चांगले वातावरण असावे, यासाठी कायदेशीर नियमावलीही येऊ शकते.
म्हणूनच व्हेरोनिका ही केवळ एक गाय नाही… तर ती आपल्याला म्हणजेच माणसाला विचार करायला भाग पाडणारी एक ‘हुशार प्राणी’ आहे, याबाबत मात्र संशोधकांचे एकमत झाले आहे!

