Ankle Sprain Treatment and balance recovery solutions in Marathi: घोटा मुरगळणे (Ankle Sprain) ही क्रीडापटूंपासून ते अगदी धावपळीच्या आयुष्यात चालणाऱ्या सर्वसामान्य लोकांपर्यंत उद्भवणारी मुख्य समस्या आहे. एकदा पाय मुरगळल्यानंतर अनेकांचा सांधा वारंवार निखळतो किंवा तोल जातो, यामागील शास्त्रीय कारणे आणि फिजिओथेरेपी उपाय सविस्तर जाणून घेऊया. “डॉक्टर, माझा घोटा एकदा मुरगळला होता. आता तर अगदी छोट्या खड्ड्यात पाय गेला किंवा जिना उतरताना थोडा तोल गेला तरी पुन्हा पुन्हा मुरगळतो. असं का होतं?” घोटा मुरगळणं (अँकल स्प्रेन) ही अत्यंत सामान्य दुखापत आहे. खेळताना, धावताना, जिना उतरताना किंवा अगदी चालताना पाय वळू शकतो. बहुतेक लोक काही दिवस विश्रांती घेतात, वेदना कमी झाल्या की पुन्हा पूर्वीसारखं चालायला लागतात. पण काही व्यक्तींमध्ये समस्या इथेच संपत नाही. एकदा मुरगळलेला घोटा पुन्हा पुन्हा मुरगळू लागतो….
वारंवार अशा घटना घडल्या की, अनेकांना वाटतं की लिगामेंट अजूनही पूर्णपणे बरी झालेली नाही. पण प्रत्येक वेळी कारण फक्त लिगामेंटच असतं असं नाही. अनेकदा त्यामागे शरीराचं संतुलन, स्नायूंचा समन्वय आणि मज्जासंस्थेची प्रतिक्रिया यामध्ये झालेला बदलही कारणीभूत असू शकतो.
घोटा मुरगळतो म्हणजे नेमकं काय होतं?
बहुतेक वेळा पाय आतल्या बाजूला वळतो (इन्व्हर्शन इंजुरी) आणि घोट्याच्या बाहेरील लिगामेंटवर अचानक ताण येतो. त्यामुळे त्या लिगामेंटमध्ये सूक्ष्म किंवा मोठी इजा होऊ शकते. सुरुवातीला वेदना, सूज आणि चालताना त्रास होणं ही लक्षणं दिसतात. योग्य उपचारांमुळे लिगामेंटला झालेली इजा हळूहळू भरून निघते. मात्र, लिगामेंट बरी झाली म्हणजे घोटा पूर्णपणे पूर्वीसारखा झाला, असं नेहमीच होत नाही.

लिगामेंट फक्त सांधा धरून ठेवत नाही…
आपण लिगामेंटचं काम फक्त दोन हाडांना जोडून ठेवणं एवढंच समजतो. पण त्याच्यामध्ये असंख्य सूक्ष्म संवेदनाक्षम पेशी असतात. या पेशी सतत मेंदूला माहिती पाठवत असतात…
- घोटा कोणत्या दिशेला आहे?
- पायावर किती वजन आहे?
- शरीराचा तोल बिघडतो आहे का?
या माहितीच्या आधारावर मेंदू लगेच स्नायूंना योग्य सूचना देतो आणि आपण पडण्यापासून वाचतो.
मग समस्या कुठे निर्माण होते?
घोटा मुरगळल्यानंतर फक्त लिगामेंटच दुखावत नाही; त्यामधील या संवेदनाक्षम पेशींनाही इजा होऊ शकते. परिणामी मेंदूपर्यंत अचूक माहिती जात नाही. मग घोटा किंचित वळला तरी स्नायूंना योग्य वेळी प्रतिक्रिया देता येत नाही आणि पुन्हा घोटा मुरगळण्याची शक्यता वाढते. यालाच प्रोप्रियोसेप्शन म्हणजे शरीराच्या स्थितीची जाणीव कमी होणं असं म्हणतात.
संतुलनाचा घोट्याशी काय संबंध?
समजा तुम्ही डोळे बंद करून एका पायावर उभे राहण्याचा प्रयत्न केला. तर हे शक्य होण्यासाठी फक्त ताकद पुरेशी नसते. मेंदूला सतत माहिती मिळणं आणि स्नायूंनी योग्य वेळी प्रतिक्रिया देणंही तितकंच आवश्यक असतं. घोट्याला दुखापत झाल्यानंतर ही संपूर्ण प्रणाली काही काळ विस्कळीत होऊ शकते. म्हणूनच अनेक रुग्ण म्हणतात, “घोटा दुखत नाही, पण तो स्थिर वाटत नाही.” ही भावना अनेकदा संतुलन आणि प्रोप्रियोसेप्शन कमी झाल्याचं लक्षण असू शकते.
वारंवार मुरगळण्याचं दुष्टचक्र…
- एकदा घोटा मुरगळला
- त्यामुळे संतुलन कमी झालं
- पुन्हा घोटा मुरगळला…
- आणखी आत्मविश्वास कमी झाला
- व्यक्ती चालणं, धावणं किंवा खेळणं टाळू लागते.
- स्नायूंची कार्यक्षमता कमी होते.
- परिणामी पुन्हा दुखापतीचा धोका वाढतो
- यालाच क्रोनिक अँकल इन्स्टेबिलिटी म्हणतात
ही केवळ लिगामेंटची समस्या नसून संपूर्ण हालचाल प्रणालीची समस्या असू शकते.
फक्त वेदना कमी झाल्या म्हणजे उपचार पूर्ण झाले का?
अनेक लोक वेदना कमी झाल्या की, उपचार थांबवतात. पण वेदना कमी होणं आणि शरीर पुन्हा पूर्ण क्षमतेने काम करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. घोट्याची ताकद, संतुलन, प्रतिक्रिया देण्याचा वेग आणि चालण्याची पद्धत पूर्ववत झाली आहे का, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असतं. याच कारणामुळे काही खेळाडूंना वेदना नसतानाही पुन्हा दुखापत होते.
फिजिओथेरेपिस्टचं मूल्यमापन
आधुनिक फिजिओथेरेपीमध्ये केवळ सूज कमी करणं किंवा वेदना कमी करणं हेच उद्दिष्ट नसतं.
फिजिओथेरेपिस्ट खालील गोष्टींचं मूल्यमापन करतो:
- घोट्याची हालचाल
- स्नायूंची ताकद
- संतुलन
- एका पायावर उभं राहण्याची क्षमता
- चालण्याची आणि धावण्याची पद्धत
- शरीराचा समन्वय
या तपासणीच्या आधारे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा पुनर्वसन कार्यक्रम तयार केला जातो.
संतुलनाचा सराव का महत्त्वाचा?
घोट्याच्या दुखापतीनंतर संतुलनाचे व्यायाम हा पुनर्वसनाचा महत्त्वाचा भाग असतो. कारण शरीराला पुन्हा योग्य वेळी प्रतिक्रिया देण्याचा सराव करावा लागतो. यामुळे मेंदू आणि स्नायू यांच्यातील संवाद पुन्हा सुधारण्यास मदत होते. सध्या अनेक संशोधनांमध्ये असं दिसून आलं आहे की, योग्य बॅलन्स ट्रेनिंगमुळे पुन्हा घोटा मुरगळण्याचा धोका कमी होऊ शकतो.
फक्त अँकल बेल्ट पुरेसा असतो का?
काही लोक कायमस्वरूपी अँकल बेल्ट किंवा अँकल सपोर्ट वापरतात. विशिष्ट परिस्थितीत त्याचा उपयोग होऊ शकतो, पण केवळ बेल्ट वापरल्याने संतुलन, ताकद आणि प्रोप्रियोसेप्शन सुधारत नाही. मूळ कारण स्नायूंची प्रतिक्रिया किंवा संतुलनातील कमतरता असेल, तर फक्त बाह्य आधार पुरेसा ठरत नाही.
कोणत्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी?
- वारंवार घोटा मुरगळणारे
- खेळाडू
- ट्रेकिंग करणारे
- उंच टाचांच्या चपला वापरणाऱ्या महिला
- मधुमेहामुळे पायातील संवेदना कमी झालेल्या व्यक्ती
- ज्येष्ठ नागरिक
या गटांमध्ये संतुलनाचं मूल्यमापन विशेष महत्त्वाचं ठरतं.
दुखापतीचं दुष्टचक्र तोडता येऊ शकतं…
घोटा वारंवार मुरगळणं म्हणजे प्रत्येक वेळी लिगामेंट पूर्णपणे बरी झालेली नाही असं नसतं. अनेक वेळा त्या दुखापतीनंतर संतुलन, प्रोप्रियोसेप्शन आणि स्नायूंच्या समन्वयामध्ये झालेला बदल ही त्यामागची खरी कारणं असू शकतात. म्हणूनच घोटा मुरगळल्यानंतर केवळ वेदना कमी होणं हे उपचाराचं अंतिम उद्दिष्ट नसावं. शरीर पुन्हा आत्मविश्वासाने चालू शकतं का, धावू शकतं का, तोल सावरू शकतं का आणि अचानक पाय वळल्यास योग्य वेळी स्वतःला सावरू शकतं का, हे तितकंच महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, घोटा मजबूत असणं म्हणजे फक्त लिगामेंट मजबूत असणं नव्हे; तर मेंदू, मज्जासंस्था, स्नायू आणि संतुलन यांच्यातील समन्वय सक्षम असणं होय. योग्य फिजिओथेरपीमुळे हा समन्वय पुन्हा विकसित होऊ शकतो आणि वारंवार होणाऱ्या दुखापतीचं दुष्टचक्र तोडता येऊ शकतं.
