Antarcticas Red Waterfall mystery पृथ्वीवर अशा अनेक जागा आहेत, ज्या अद्भुत रहस्यांनी भरलेल्या आहेत. अंटार्टिकामधील ब्लड वॉटरफॉलदेखील अशाच रहस्यांपैकी एक आहे. अंटार्क्टिकातील लख्ख पांढऱ्याशुभ्र बर्फात एका हिमनदीतून लाल रंगाचा धबधबा वाहत आहे. ही दृश्ये आश्चर्यकारक आणि अस्वस्थ करणारी आहेत. या धबधब्याकडे पाहिले की जणू वरून रक्ताचे पाट वाहत आहेत असेच वाटेल, त्यामुळेच या ‘ब्लड फॉल्स’ने दशकांपासून लोकांचे लक्ष वेधले आहे. पण, या जागेचे रहस्य काही वेगळे आहे. हे रहस्य प्रत्यक्षात रसायनशास्त्राशी संबंधित आहे. ‘ब्लड फॉल्स’च्या याच रहस्याविषयी जाणून घेऊयात…

‘ब्लड फॉल्स’चे रहस्य

‘ब्लड फॉल्स’ पूर्व अंटार्क्टिकातील ‘टेलर ग्लेशियर’मधून वाहतो. हा असा प्रदेश आहे जिथे वर्षातील बराच काळ तापमान गोठणबिंदूच्या खूप खाली असते. अशा ठिकाणी पाण्याचे प्रवाही असणे अशक्य असते. त्यात या गडद लाल रंगामुळे हे दृश्य अधिकच गोंधळात टाकणारे आहे. १९०० च्या सुरुवातीला संशोधकांनी पहिल्यांदा या धबधब्याची नोंद केली. त्यावेळी वैज्ञानिकांना वाटले की या रंगाला शेवाळ कारणीभूत असावे, कारण इतर ठिकाणी सूक्ष्मजीवच पाण्याला असा रंग देतात. वैज्ञानिकांचा तो एक तार्किक अंदाज होता. जोवर आधुनिक संशोधन उपकरणांचा वापर केला गेला नाही, तोवर हा धबधबा आणि याचा रंग एक रहस्यच होते.

बर्फाखाली दडलेले लोहयुक्त पाणी

२००९ मध्ये वैज्ञानिकांच्या हाती मोठी गोष्ट लागली. ‘सायन्स’ नावाच्या मासिकात प्रकाशित झालेल्या एका अभ्यासातून असे समोर आले की, ब्लड फॉल्सचा उगम टेलर ग्लेशियरखाली दबलेल्या एका तलावातून होतो. हा तलाव नवा नाही. हा तलाव जवळपास २० लाख वर्षांपासून सूर्यप्रकाश आणि वातावरणापासून पूर्णपणे तुटलेला आहे. या पाण्यात विरघळलेल्या लोहाचे (आयर्न ) प्रमाण प्रचंड आहे. जोपर्यंत हे पाणी जमिनीखाली असते, तोपर्यंत हे लोह दिसत नाही, पण जेव्हा हे पाणी पृष्ठभागावर येते आणि ऑक्सिजनच्या संपर्कात येते, तेव्हा प्रक्रिया होऊन त्याचे ऑक्सिडेशन होते. या रासायनिक अभिक्रियेमुळे पाणी गडद गंजलेल्या रंगाचे किंवा लाल होते, त्यामुळे हा धबधबा असा दिसतो.

या पाण्याचे रुपांतर बर्फात का होत नाही?

इतक्या कडाक्याच्या थंडीत हे पाणी द्रव अवस्थेत कसे राहते हा मोठा प्रश्न आहे. ‘प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस’मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, हे जमिनीखालील पाणी अत्यंत खारे आहे. यातील खारटपणा समुद्राच्या पाण्यापेक्षाही कितीतरी पटीने जास्त आहे. क्षारांच्या या उच्च प्रमाणामुळे पाण्याचा गोठणबिंदू खाली जातो आणि त्यामुळे उणे तापमानातही हे पाणी द्रव राहू शकते.

सूक्ष्मजीवांचे अस्तित्व

‘नेचर कम्युनिकेशन्स’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे आढळले की, काही सूक्ष्मजीवांनी सूर्यप्रकाशाऐवजी रासायनिक अभिक्रियांवर अवलंबून राहून या हिमनदीखाली स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवले आहे. ऑक्सिजन नसूनही हे जीव ऊर्जा निर्माण करण्यासाठी पाण्यातील लोह आणि सल्फेटचा वापर करतात, त्याला ‘केमोसिंथेसिस’ म्हणतात. याचा अर्थ असा की, जीवनासाठी नेहमीच उष्णता, प्रकाश किंवा ताज्या हवेची गरज असतेच असे नाही. कधीकधी फक्त योग्य रसायनशास्त्र पुरेसे असते.

ब्लड फॉल्सचे महत्त्व काय?

ब्लड फॉल्स हा केवळ कुतूहलाचा विषय राहिलेला नाही. अतिविषम वातावरणातील जीवनाबद्दल वैज्ञानिकांच्या विचार करण्याच्या पद्धतीत याने बदल घडवून आणला आहे. ‘नेचर जिओसायन्स’मधील अभ्यासात असे नमूद करण्यात आले आहे की, युरोपा आणि एन्सेलाडससारख्या चंद्रांच्या बर्फाळ पृष्ठभागाखाली अशाच प्रकारची खारी आणि लोहयुक्त पाणी संस्था असू शकतात. जर सूक्ष्मजीव अंटार्क्टिकाच्या बर्फाखाली लाखो वर्षे जगू शकतात, तर सूर्यमालेत इतरत्रही जीवन असण्याची शक्यता असू शकते.

अंटार्क्टिकातील लाल धबधबा भीतीदायक वाटत असला तरी ही प्रत्यक्षात काळाने घडवलेली एक संथ आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे. तिथे रक्त नाही किंवा कोणतेही रहस्यमय द्रव्य नाही. तिथे केवळ प्राचीन पाणी, हवेची लोहाशी होणारी अभिक्रिया आणि प्रतिकूल परिस्थितीतही तग धरून राहिलेले सूक्ष्मजीव आहेत. ब्लड फॉल्स आपल्याला आठवण करून देतो की निसर्गात अशा अनेक अविश्वसनीय गोष्टी आहेत, त्यामागचे विज्ञान खऱ्या अर्थाने थक्क करणारे आहे. पृथ्वीवरील सर्वात कठोर वातावरणातही तेथील पाणी वाहतेय, रसायने कार्य करत आहेत आणि जीवन स्वतःला जुळवून घेत आहे.