‘बुद्धिमत्ता शक्ती देते. या शक्तीवर नियंत्रण मिळवणे कठीणच. असंख्य माणसांपेक्षाही अधिक ‘अतिप्रगत’ असलेली ही यंत्रणा चुकीच्या हातांमध्ये धोकादायक ठरेल आणि ती जागतिक अस्थिरतेत भर पाडू शकते’…. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संभाव्य धोक्याविषयीचे हे विधान याच ‘एआय’ तंत्रज्ञानाचे प्रणेते समजले जाणारे योशुआ बेन्जियो यांचे. आर्टिफिशियल इंटिलिजन्स आणि डीप लर्निंगचा प्रभाव वाढू लागल्यापासून त्याच्या संभाव्य धोक्याचा इशारा बेन्जियो यांच्यासारख्या अनेक तज्ज्ञांनी दिला. पण त्या धोक्याची चुणूक गेल्या आठवड्यात अँथ्रोपिक कंपनीने दाखवली.

या कंपनीने बनवलेल्या ‘मायथोस’ ने जगभरातील सायबर सुरक्षा व्यवस्थेत दहशत निर्माण केली आहे. कोणत्याही अतिप्रगत यंत्रणेत शिरकाव करून त्यातील दुबळेपणा हेरण्याची क्षमता असलेल्या ‘मायथोस’ची भीती इतकी की खुद्द ‘अँथ्रोपिक’नेच हे मॉडेल सार्वजनिक करण्याचे टाळले. तेव्हापासून ‘मायथोस’च्या फायद्या-तोट्यांबरोबरच ‘एआय’च्या विध्वंसक क्षमतेची चर्चा अधिक गांभिर्याने होऊ लागली आहे.

क्लॉडच्या भीतीनंतर मायथोसची दहशत?

यावर्षाच्या सुरुवातीलाच अँथ्रोपिक कंपनीने ‘क्लॉड’ हे एआय मॉडेल जाहीर केले. चॅटजीपीटी, जेमिनाय किंवा सध्याच्या प्रचलित कोणत्याही ‘एआय’ मॉडेलपेक्षा प्रभावीपणे काम करणाऱ्या ‘क्लॉड’चे जगभर कोडकौतुक झाले. संगणकीय प्राेग्राम तयार करण्याची, त्यात सुधारणा करण्याची जी कामे करण्यासाठी शेकडोने संगणक अभियंते नेमावे लागतात, ती कामे ‘क्लॉड’ काही मिनिटांत करू शकतो. त्यामुळे क्लॉडची घोषणा होताच आयटी कंपन्यांच्या समभागांची गाळण उडाली. अशातच आता क्लॉडची पुढची आवृत्ती असलेल्या मायथोसने आणखी खळबळ उडवून दिली आहे.

मायथोस नेमके काय करते?

मायथोस हे चॅटजीपीटी, जेमिनाय, क्लॉड यासारखे एआय मॉडेल आहे. क्लाॅडप्रमाणे या मॉडेलमध्ये क्लिष्ट प्रोग्रॅमिंग करण्याची तसेच कितीही प्रदीर्घ कोडिंग करण्याची क्षमता आहे. मात्र, मायथोसचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, ते स्वयंचलित पद्धतीने कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये शिरून त्यातील त्रुटी किंवा उणिवा शोधून काढू शकते. त्यासाठी मानवी आज्ञेचीही ते वाट पहात नाही. मायथोसच्या या क्षमतेबद्दल अँथ्रोपिकही अनभिज्ञ होते. मात्र, या एआय मॉडेलने त्यावर देखरेख ठेवणाऱ्या अभियंत्याच्या नकळत संगणकीय ऑपरेटिंग सिस्टीम आणि वेब ब्राऊजरमधील हजारो कच्चे दुवे शोधून काढले. गेल्या अनेक वर्षांपासून वापरात असलेल्या या ऑपरेटिंग सिस्टीम आणि वेब ब्राऊजरमधील या उणिवा आजवर कोणत्याही सिक्युरिटी सॉफ्टवेअरना शोधता आलेल्या नाहीत. त्या मायथोसने शोधून दाखवल्या.

आतापर्यंतच्या एआय मॉडेलपेक्षा भिन्न कसे?

सध्या वापरात असलेले एआय मॉडेल कितीही अद्ययावत झाले तरी, मानवी आज्ञापालनाखेरीज ते काम करत नाहीत. मायथोस या सगळ्यांपेक्षा भिन्न आहे. कोणत्याही संगणकीय प्रणालीमध्ये आज्ञेविना शिरून त्यातील कमतरता झटक्यात शोधून काढण्याची क्षमता मायथोसमध्ये आहे. इतकेच नव्हे तर, कोणत्याही सूचनेविना हे मॉडेल ही त्रुटी दूर करू शकते. ही क्षमताच या मॉडेलला धोकादायक ठरवते. स्वयंचलितपणे कोणत्याही सिस्टीममध्ये शिरण्याची हातोटी मायथोसकडे आहे. मायथोसच्या मदतीने जगभरात सध्या कार्यरत असलेल्या सगळ्या सॉफ्टवेअरमध्ये शिरकाव करून त्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो. यासाठी संगणकीय ज्ञान असण्याचीही गरज नाही. हा धोका लक्षात घेऊनच अँथ्रोपिकने ‘क्लॉड मायथोस’ सार्वजनिक वापरासाठी न आणण्याचा निर्णय जाहीर केला.

प्राेजेक्ट ग्लासविंग काय आहे?

मायथोस सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले नसले तरी, अँथ्रोपिकने या मॉडेलला केंद्रस्थानी ठेवून ‘प्राेजेक्ट ग्लासविंग’ नावाने नवीन मोहीम सुरू केली आहे. कठीणतम सुरक्षाप्रणाली भेदून संगणकीय व्यवस्थेत शिरकाव करण्याच्या मायथोसच्या क्षमतेचा वापर संगणकीय सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी ‘प्राेजेक्ट ग्लासविंग’ काम करणार आहे. यासाठी अँथ्रोपिकने ॲपल, ॲमेझॉन, गुगल, मायक्राेसॉफ्ट, एन्विडिया, जेपी मॉर्गन चेस यांसारख्या प्रमुख अमेरिकी सॉफ्टवेअर आणि संगणकीय सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना मायथोसची सेवा देऊ केली आहे. या कंपन्यांनी आपल्या संगणकीय व्यवस्थेत मायथोसचा वापर करून सुरक्षेच्या दृष्टीने कच्चे दुवे शोधून काढावेत आणि त्यावर उपाय शोधून आपली संगणकीय सुरक्षा अभेद्य करण्यासाठी प्रयत्न करावेत, हा यामागचा हेतू आहे. याखेरीज ब्रिटन आणि अमेरिकेतील बँका आपल्या संगणकीय व्यवस्थेतील कच्चे दुवे शोधण्यासाठी मायथोसची मदत घेऊ पाहात आहेत.

तरीही भीती कायम?

‘प्रोजेक्ट ग्लासविंग’अंतर्गत निवडक कंपन्यांना मायथोस हाताळणीचे अधिकार देण्यात आले असले तरी, हे एआय मॉडेल अन्य कंपन्यांच्या हाती पडू शकते किंवा त्याची हुबेहुब नक्कल केली जाऊ शकते, अशी भीतीही व्यक्त होत आहे. ‘मायथोस’चा वापर सायबर गुन्हेगार कोणतीही संगणकीय सुरक्षा भेदण्यासाठी करू शकतील. नेमकी हीच बाब गेल्या आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) बैठकीत उपस्थित करण्यात आली. कॅनडा आणि ब्रिटनच्या अर्थमंत्र्यांनी मायथोसबाबत आक्षेप मांडताना एकूणच एआयच्या विध्वंसक क्षमतेबद्दल गांभिर्याने चर्चा करण्याची गरज व्यक्त केली.

‘एआय’ विध्वंसक ठरेल?

योशुआ बेन्जियो यांनी अलिकडेच एका परिषदेत बोलताना एआयपासून मानवजातीला संभावणाऱ्या धोक्याची कल्पना दिली. ज्या पद्धतीने सध्या एआय मॉडेलना प्रशिक्षित केले जात आहे, ते पाहता एखाद्या दिवशी हे ‘एआय’ मानवावर वर्चस्व गाजवेल, असे बेन्जियो म्हणाले होते. मायथोस हे त्याचेच ताजे उदाहरण. एआयच्या नियंत्रित वापराची मागणी जगभरात सातत्याने होत आहे. त्याचवेळी या तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करण्याचा आग्रहही धरला जात आहे. तसे न झाल्यास हे तंत्रज्ञान मोजक्या हातांतले शस्त्र ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.