Anthropic AI tool Impact on IT Stocks : भारतीय शेअर बाजारात बुधवारी (४ फेब्रुवारी) सकाळी मोठी पडझड पाहायला मिळाली. बाजार उघडताच माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये अचानक घसरण झाली. इन्फोसिससह टेक महिंद्रा व टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) यांसारख्या कंपन्यांचे शेअर्स कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. केवळ भारतातच नव्हे, तर अमेरिकेतील ‘वॉल स्ट्रीट’ मार्केटवरही मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले. तज्ज्ञांनी या स्थितीला ‘SaaSpocalypse’ (सॉफ्टवेअर सर्व्हिस क्षेत्रातील प्रलय), असे संबोधले आहे. या अचानक आलेल्या प्रलयामागे ‘अँथ्रॉपिक’ या कंपनीने लाँच केलेले नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) टूल कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. त्याविषयीचा हा आढावा…

अँथ्रॉपिकचे नवीन AI टूल काय आहे?

‘क्लाउड’ चॅटबॉट विकसित करणारी अमेरिकन कंपनी अँथ्रॉपिकने ३० जानेवारी रोजी आपल्या ‘क्लाउड कोवर्क’ एआय एजंटसाठी ११ ओपन-सोर्स प्लग-इन्स लाँच केले. मार्केटिंगसह विक्री, तसेच डेटा विश्लेषण यांसारख्या क्षेत्रांतील कामे स्वयंचलित करणे हा त्यामागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. या प्लग-इन्समुळे पारंपरिक सॉफ्टवेअर सेवा कंपन्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याच कारणामुळे जागतिक बाजारात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

नवीन AI टूल कोणकोणती कामे करणार?

  • अँथ्रॉपिकने सादर केलेले प्लग-इन विविध व्यावसायिक क्षेत्रांतील कामे स्वयंचलित करण्यास सक्षम आहे.
  • कंपनीची उत्पादकता वाढविण्यासाठी टास्क मॅनेजमेंट, कॅलेंडर, दैनंदिन व वैयक्तिक कामकाजाचे नियोजन करणे.
  • एंटरप्राइज सर्चद्वारे कंपनीची विविध टूल्स आणि कागदपत्रांमधून महत्त्वाची माहिती शोधून काढणे.
  • प्लग-इन निर्मिती/कस्टमायजेशन : अगदी शून्यापासून नवीन प्लग-इन्स तयार करणे किंवा ते गरजेनुसार बदलणे.
  • उत्पादनांच्या विक्रीसाठी संभाव्य ग्राहकांचा शोध घेणे, करारांची तयारी करणे आणि विक्री प्रक्रियेवर लक्ष ठेवणे.
  • कंपनीच्या अर्थ विभागातील आर्थिक आकडेवारीचे विश्लेषण करणे, मॉडेल्स तयार करणे आणि महत्त्वाच्या आर्थिक निर्देशकांचा मागोवा घेणे.
  • डेटासेटमधील माहिती शोधून, ती आलेखांच्या स्वरूपात तयार करणे आणि त्याचा अर्थ लावणे.
  • मार्केटिंगसाठी मजकूर तयार करणे, मोहिमा आखणे आणि उत्पादनांच्या अनावरणाचे व्यवस्थापन करणे.
  • ग्राहकांच्या समस्यांचे वर्गीकरण आणि त्यांच्या उत्तरांचे मसुदे तयार करणे, तसेच त्यावर उपाय शोधून काढणे.
  • प्रॉडक्ट मॅनेजमेंटसाठी उत्पादनाचे तपशील लिहिणे, त्याचा रोडमॅप ठरवून प्रगतीवर विशेष लक्ष ठेवणे.
  • संशोधन साहित्याचा शोध घेऊन, त्याच्या निष्कर्षांचे विश्लेषण आणि प्रयोगांचे नियोजन करणे.
  • या अत्याधुनिक सुविधांमुळे अनेक क्षेत्रांतील मानवी हस्तक्षेप कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
  • त्यामुळेच अँथ्रॉपिकच्या नवीन एआय टूलमुळे जागतिक आयटी बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

आणखी वाचा : लिबियावर ४२ वर्षे राज्य करणाऱ्या हुकूमशहाच्या मुलाची हत्या; कोण होते सैफ अल-इस्लाम गद्दाफी?

टूल लाँच होताच नेमके काय घडले?

अँथ्रॉपिकचे नवीन एआय टूल लाँच होताच ३ फेब्रुवारी रोजी वॉल स्ट्रीटवर शेअर्सची मोठी पडझड झाली. गोल्डमॅन सॅक्सच्या अमेरिकन सॉफ्टवेअर कंपन्यांच्या समभागामध्ये तब्बल सहा टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये लागू करण्यात आलेल्या टॅरिफनंतरची ही एका दिवसातील सर्वांत मोठी घसरण आहे. दुसरीकडे- वित्तीय सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांचा निर्देशांक तब्बल सात टक्क्यांनी कोसळला. ‘नॅसडॅक १००’ इंडेक्सही २.४ टक्क्यांनी घसरला होता, जो नंतर सावरत १.६ टक्क्यांवर स्थिरावला. नवीन एआय टूलचा फटका केवळ अमेरिका व भारतातील आयटी कंपन्यांना नव्हे, तर युरोपमधील सॉफ्टवेअर कंपन्यांनाही बसला. ब्रिटनमधील ‘पियरसन’ या प्रकाशन समूहाचे शेअर्स तब्बल आठ टक्क्यांनी घसरले; तर ‘रिलॅक्स’ या माहिती आणि विश्लेषण कंपनीच्या शेअर्समध्ये १४ टक्क्यांची घसरण झाली. लंडनमध्ये ‘सेज’ या सॉफ्टवेअर कंपनीने समभाग १० टक्क्यांनी कोसळले.

भारतीय आयटी कंपन्यांनाही मोठा फटका

४ फेब्रुवारी रोजी शेअर्स बाजार उघडताच भारतीय आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी पडझड झाली. मंगळवारच्या सत्रातील लक्षणीय तेजीनंतर सेन्सेक्स ७८.५६ अंशांनी वधारून ८३,८१७.६९ पातळीवर बंद झाला. सत्रादरम्यान त्याने ८३,९४७.५३ अंशांची उच्चांकी आणि ८३,११९.९५ अंशांची नीचांकी पातळी गाठली. निफ्टी ४८.४५ अंशांनी वाढून २५,७७६ पातळीवर स्थिरावला. मार्च २०२० नंतरची ही या निर्देशांकातील एका दिवसातील सर्वांत मोठी घसरण ठरली. त्यामुळे इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचसीएल टेक व टेक महिंद्र यांसारख्या आयटी कंपन्यांच्या समभागांमध्ये सात टक्क्यांपर्यंत घसरण झाली. या तीव्र विक्रीमुळे आघाडीच्या आयटी कंपन्यांना एकूण बाजार भांडवलातून सुमारे दोन लाख कोटींचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते.

एआयमुळे आयटी क्षेत्राला किती धोका?

अँथ्रॉपिकने नवीन एआय-आधारित ऑटोमेशन सादर केल्यामुळे आयटी क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वयंचलित कामे करणाऱ्या या नवीन टूल्समुळे डेटा आणि प्रोफेशनल सर्व्हिसेस उद्योगात मोठी उलथापालथ होऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. एआयमुळे सॉफ्टवेअर आणि आयटी सेवा कंपन्यांच्या कार्यपद्धतीत मूलभूत बदल होतील. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होऊन, बाजारातील स्थान धोक्यात येऊ शकते. जर एआयने सर्व कामे स्वत: करण्यास सुरुवात केली, तर त्याच सेवा देणाऱ्या आयटी कंपन्यांसमोर अस्तित्वाचे संकट उभे राहू शकते, असे सिस्टिमॅटिक्स ग्रुपचे विश्लेषक अंबरीश शाह यांनी ‘मनीकंट्रोल’ला सांगितले. शेअर्स बाजारातील अस्थिरता काही काळ कायम राहणार आहे. जागतिक स्तरावरून लाँच होणारे प्रत्येक एआय टूल गुंतवणूकदारांच्या संयमाची परीक्षा पाहणार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

हेही वाचा : व्हेनेझुएलाकडून तेल खरेदीमुळे भारताला फायदा की तोटा? काय सांगते आकडेवारी?

‘एआय’च्या लाटेमुळे नोकऱ्या जाणार?

एआयमुळे अनेक क्षेत्रांत झपाट्याने बदल होत आहेत. त्याचा वापर वाढल्याने आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे. या पार्श्वभूमीवर पर्सिस्टंट सिस्टीम्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद देशपांडे यांनी जगातील एआयची लाट आणि त्यामुळे होणारा परिणाम यावर भाष्य केले आहे. भारतामध्ये माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम प्रगती होत आहे. सध्या दिसून येत असलेली एआयची लाट दीर्घकाळ कायम राहणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करण्याच्या अनेक नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. उद्योगांना या तंत्राचा चांगला फायदा होणार असल्याने आपण या नव्या संधीचा फायदा घेतला पाहिजे. माहिती-तंत्रज्ञानामध्ये आलेली पहिली लाट ही कनेक्टिव्हिटीची, दुसरी लाट मंच आणि विविध प्रणाली यांची होती. सध्या आलेली लाट ही कृत्रिम प्रज्ञेची असल्याचे सांगताना कृत्रिम प्रज्ञेचा मंच मोठे असून, त्यामध्ये काम करण्यासाठी नव्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत आणि कामाची कोणतीही कमतरता नाही, असे देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे.