एका बाजूला वाढता राजकीय संघर्ष, बेंबीच्या देठापासून आपल्या हक्कासाठी लढणारे भारताचे युवक, मागण्यांचे फलक आणि ‘नीट’ पेपरफुटीच्या ताणात मृत्युमुखी पावलेल्या विद्यार्थ्यांची यादी; तर दुसऱ्या बाजूला शेकडो किलोमीटर दूर बसलेल्या एका सामान्य नागरिकाची आंदोलकांप्रती संवेदनशीलता!
दिल्लीतील ऐतिहासिक जंतरमंतर मैदानावर परीक्षांमधील गैरप्रकारांविरोधात पेटलेल्या आंदोलनादरम्यान एक अशी घटना घडली आहे, ज्याने सोशल मीडिया युझर्सच्य्या डोळ्यात पाणी आणले!
मुंबईत राहणाऱ्या अनुज रावत नावाच्या एका तरुणाने दिल्लीत उपोषणाला व निदर्शनांना बसलेल्या अनोळखी लोकांसाठी मुंबईतून ‘झोमॅटो’ ॲपद्वारे जेवण ऑर्डर केलं. ही केवळ एक साधी फूड ऑर्डर नसून, ती आजच्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीद्वारे अंतर ओलांडून व्यक्त केलेल्या माणुसकीचं आणि आत्मीयतेचं एक जिवंत उदाहरण आहे.
“जो भुकेला असेल त्याला हे जेवण द्या!”; ती खास ‘नोट’
अनुज रावत यांनी झोमॅटोवरून ऑर्डर बुक करताना डिलिव्हरी नोटमध्ये एक मनाला भिडणारा संदेश लिहिला होता- “कृपया हे जेवण जंतरमंतरवर जो कोणी भुकेला दिसेल त्याला द्या.”
सोमवारी दुपारी दिल्लीत कोसळणाऱ्या मुसळधार पावसात झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय फूड पार्सल घेऊन जंतरमंतरवर पोहोचला. तो ते पार्सल घेऊन आंदोलकांच्या गर्दीत गेला आणि तिथल्या स्वयंसेवकांना ही नोट वाचून दाखवली.
डिलिव्हरी बॉयने तिथल्या उपस्थित लोकांना सांगितले की,
“मुंबई, महाराष्ट्र येथून अनुज रावत नावाचे एक दादा आहेत, त्यांनी हे जेवण ऑनलाइन ऑर्डर करून त्याचे पैसे भरले आहेत. त्यांनी मला स्पष्ट सांगितले आहे की जंतरमंतरवर जी व्यक्ती भुकेली दिसेल त्याला तुम्ही हे जेवण द्या.”
हे ऐकताच तिथे उपस्थित असलेल्या सर्व स्वयंसेवकांच्या आणि आंदोलकांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे आणि कृतज्ञतेचे भाव उमटले.
जेवण तर अनुजने पाठवलं, मग डिलिव्हरी बॉयचं कौतुक कशाला?
दिल्लीतील अत्यंत प्रतिकूल हवामानात आणि मुसळधार पावसातही त्या डिलिव्हरी बॉयने ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी घेतलेले कष्ट कौतुकास्पद ठरले. पार्सल स्वीकारताना एका महिला स्वयंसेवकाने भावूक होऊन “थँक्यू भैया” असे उद्गार काढले आणि आपली कृतज्ञता व्यक्त केली.
त्या क्षणी जंतरमंतरवर जमलेल्या सर्व आंदोलकांनी आणि स्वयंसेवकांनी जोरदार टाळ्या वाजवून त्या डिलिव्हरी बॉयचे आणि शेकडो किलोमीटर दूर मुंबईत बसून ही मदत पाठवणाऱ्या अनुज रावत यांचे आभार मानले. हा सर्व प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
यावर नेटकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आल्या?
हा व्हिडीओ इंटरनेटवर येताच अवघ्या काही तासांत तो प्रचंड व्हायरल झाला. लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून हजारो लोकांनी त्यावर आपल्या संवेदनशील प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. तीव्र राजकीय संघर्षाच्या आणि वादाच्या वातावरणात ही घटना मानवतेचं एक सुंदर प्रतीक ठरलं आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया :
“अनुज रावत, जर तुम्ही ही पोस्ट पाहत असाल तर तुम्हाला आमचा मनापासून कडक सलाम.”
“आज आपल्या देशाला अशाच संवेदनशील आणि मोठ्या मनाच्या माणसांची सर्वात जास्त गरज आहे.”
“मानवतेची सर्वांत सुंदर खूण हीच आहे की, स्वतःचा विचार करण्यापूर्वी दुसऱ्या भुकेल्या माणसाच्या पोटाचा विचार करणे.”
ट्विटरवर एकाने व्यक्त केले की,
“हा व्हिडीओ पाहताना आणि ती नोट ऐकताना माझ्या अंगावर काटा आला. यामध्ये मला प्रेम, काळजी आणि माणुसकीचं खरं दर्शन घडलं, हे अत्यंत प्रभावी आहे.”
जंतरमंतरची सद्यस्थिती काय?
सोमवारी जंतरमंतरवर ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) या चळवळीखाली भव्य निदर्शने आयोजित करण्यात आली होती. हे आंदोलन मुख्यत्वे NEET-UG २०२६ च्या पपेरफुटीच्या गैरप्रकाराविरोधात आणि शिक्षण क्षेत्रातील व्यापक सुधारणांसाठी सुरू आहे. आंदोलकांच्या मुख्य तीन मागण्या आहेत:
- शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा.
- नीट पेपरफुटीसारख्या परीक्षांमधील अनियमिततेसाठी जबाबदारी निश्चित करणे.
- नीट पेपरफुटीच्या तणावामुळे मृत्युमुखी पावलेल्या मुलांच्या कुटुंबाला १ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देणे.
सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण आणि वाढता असंतोष:
या आंदोलनाला अधिक तीव्र रूप मिळाले ते प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक सोनम वांगचुक यांच्या सहभागामुळे. सोनम वांगचुक यांनी २८ जून २०२६ पासून शिक्षण शॆत्रातील गैरप्रकार आणि परीक्षांमधील गोंधळाविरोधात अनिश्चितकालीन आमरण उपोषण सुरू केलं आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांनी उपोषणाचा मार्ग निवडला आहे; त्यामुळे देशभरातील विद्यार्थी, तरुण पिढी आणि नागरिक या मुद्द्यावर आक्रमक झाले असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी जंतरमंतरवर सातत्याने लोक जमा होत आहेत.
डिजिटल युगात मदतीचा नवा मार्ग:
मुंबईच्या अनुज रावत यांची ही घटना काही एकमेव नव्हती. सोमवारच्या या आंदोलनादरम्यान असे अनेक व्हिडीओ समोर आले, ज्यामध्ये स्थानिक स्वयंसेवक आणि सामान्य नागरिक आंदोलकांना चहा, नाश्ता आणि जेवण वाटताना दिसले.
अनेक लोकांनी प्रत्यक्ष दिल्लीत उपस्थित राहू न शकल्यामुळे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाइन पद्धतीने जेवणाचे पैसे भरून दूरवरून मदत पाठवण्याचा मार्ग निवडला. या घटनेने सिद्ध केले आहे की, तंत्रज्ञानाचा वापर केवळ संवाद साधण्यासाठीच नाही, तर दूरवर बसूनही कोणाची तरी भूक भागवण्यासाठी आणि माणुसकी जपण्यासाठी केला जाऊ शकतो.
धर्माच्या भिंती गळून पडल्या: भुकेला धर्म नसतो!
या संपूर्ण आंदोलनादरम्यान आणि मदतीचा हा ओघ पाहत असताना एक सर्वांत भावूक करणारी गोष्ट समोर आली, ती म्हणजे इथे धर्माच्या आणि जातीच्या सर्व भिंती गळून पडल्या आहेत. मुंबईतून अन्न पाठवणाऱ्या अनुज रावत यांनी जेवण मागवताना कोणाचा धर्म विचारला नाही आणि दिल्लीत जंतरमंतरवर ते जेवण स्वीकारणाऱ्या स्वयंसेवकांनी किंवा आंदोलकांनीही मदत करणाऱ्याची जात-पात पाहिली नाही. असे अनेक व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल झाले, जिथे विविध धर्मांचे लोक आंदोलकांना एकत्र येऊन जेवण वाढत होते, मोफत जेवण उपलब्ध करून देत होते.
देशात अनेकदा जातीय किंवा धार्मिक मुद्द्यांवरून वाद आणि तणाव निर्माण केला जात असताना, जंतरमंतरवरील या प्रसंगाने ‘भुकेला आणि माणुसकीला कोणताही धर्म नसतो’ हाच शाश्वत संदेश दिला. कोणताही भेदभाव मनात न ठेवता, केवळ एका भुकेल्या पोटाचा विचार करून जोडले गेलेले हे हात आजच्या काळात खऱ्याखुऱ्या एकतेचं आणि बंधुभावाचं प्रतीक ठरलं आहे.
