तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या अ‍ॅपल कंपनीची स्थापना कॅलिफोर्नियातील एका गॅरेजमध्ये झाली होती. मार्केटिंग क्षेत्रातील तज्ज्ञ, कोणतेही उत्पादन विकण्याची क्षमता असणारे स्टीव्ह जॉब्स आणि तंत्रज्ञानात तज्ज्ञ असलेले स्टीव्ह वोझ्नियाक या दोघांनी मिळून अ‍ॅपल कंपनीची स्थापना केली होती. अ‍ॅपल कंपनीला काल १ एप्रिल रोजी ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. दरम्यान, १ एप्रिल १९७६ रोजी अ‍ॅपल कंपनीची स्थापना झाली तेव्हा आणखी एका व्यक्तीने अ‍ॅपलच्या स्थापनेशी संबंधित कागदपत्रांवर सही केली होती. त्या व्यक्तीचे नाव होते रोनाल्ड वेन. रोनाल्ड वेन यांना तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यवसायाचा अनुभव होता. तसेच ते सिलिकॉन व्हॅलीतील उद्योजक होते. स्टीव्ह जॉब्स, स्टीव्ह वोझ्नियाक यांच्यासह अ‍ॅपलची स्थापना करणारे रोनाल्ड वेन यांचा आज विसर का पडला आहे? त्यांचे नाव कुठेच का नसते? जाणून घेऊयात.

रोनाल्ड वेन कोण आहेत?

रोनाल्ड वेन यांचा जन्म अमेरिकेतील ओहिओ राज्यातील क्लिव्हलँड येथे १९३४ साली झाला.रोनाल्ड वेन हे लहानाचे मोठे न्यूयॉर्क शहरात झाले. त्यांनी टेक्निकल ड्राफ्टिंगचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी न्यूयॉर्क स्कूल ऑफ इंडस्ट्रीयल आर्टमध्ये नोकरी केली. १९५० साली रोनाल्ड वेन कॅलिफोर्नियात गेले.

रोनाल्ड वेन यांनी कॅलिफोर्नियात स्लॉट मशिन विकायला सुरूवात केली. पण त्या व्यवसायाची वाढ होण्यासारखी परिस्थिती नव्हती. “मी सुरू केलेल्या व्यवसायात मला काम करण्यासारखे काहीच नव्हते, हे मला खूप लवकर लक्षात आले, मी इंजिनियरिंगमध्ये चांगले काम करत होतो”, असे वेन यांनी एका मुलाखतीत म्हटले होते. अ‍ॅपल कंपनीची स्थापना करण्याआधी रोनाल्ड वेन यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक ठिकाणी नोकरी केली होती. गेमिंग कंपनी अटारी व लॉरेन्स लिव्हरमोर नॅशनल लॅबोरेटरी येथे वेन यांनी काम केले होते.

स्टीव्ह जॉब्सबरोबर पहिली भेट

अटारी कंपनीत रोनाल्ड वेन प्रोडक्ट डेव्हलपमेंट इंजिनियर आणि मुख्य ड्राफ्ट्समन म्हणून काम करत होते. अटारीत काम करत असताना १९७० मध्ये वेन यांची स्टीव्ह जॉब्स व स्टीव्ह वोझ्नियाक यांच्याशी पहिली भेट झाली. त्यावेळी वेन ४१ वर्षांचे होते.

रोनाल्ड वेन सांगतात, स्टीव्ह जॉब्सला माझ्या ज्ञानाचा फायदा करून घ्यायचा होता. त्यांना माहिती नसलेल्या गोष्टी माझ्याकडून जाणून घ्यायच्या होत्या. माझ्याकडे व्यवसायाचा २० वर्षांचा अनुभव होता. तसेच मला सगळे खाचखळगे माहिती होते. त्यांचा मार्गदर्शक बनण्यासाठी मी अ‍ॅपल मध्ये जॉइन झालो.

एक दिवस स्टीव्ह जॉब्स रोनाल्ड वेन यांच्या भेटीला आले. त्यावेळी वोझ्नियाकबरोबर मिळून एक पर्सनल कम्प्युटरचे उत्पादन करणारी कंपनी स्थापन करत असल्याचे स्टीव्ह जॉब्स यांनी रोनाल्ड वेन यांना सांगितले. “मला त्यांची कल्पना आवडली. योग्य वेळी योग्य वस्तूचे उत्पादन करण्याचे त्यांनी ठरवले होते. त्यामुळे ते यशस्वी होणार की नाही, हा प्रश्नच नव्हता.” , असे वेन म्हणाले.

वोझ्नियाकला अ‍ॅपलच्या स्थापनेसाठी राजी केले, कशी काढली समजूत?

स्टीव्ह वोझ्नियाकने एक सर्किट बोर्ड तयार केला होता. तो बोर्ड अ‍ॅपलचे पहिले प्रोडक्ट असलेल्या कम्प्युटरमध्ये वापरला जाणार होता. पण, स्टीव्ह वोझ्नियाक हे कंपनी स्थापन करून उत्पादन करण्याचे धाडस करण्यासाठी तयार नव्हते. त्यामुळे स्टीव्ह जॉब्स यांनी रोनाल्ड वेन यांना स्टीव्ह वोझ्नियाकला व्यावसायिकता काय असते, ते समजावून सांगण्यास सांगितले. रोनाल्ड वेन यांनी स्टीव्ह जॉब्सला स्टीव्ह वोझ्नियाकला घरी घेऊन येण्यास सांगितले होते.

जॉब्स, वोझ्नियाक व वेन यांची वेन यांच्या निवासस्थानी चर्चा झाली. वेन यांनी समजावून सांगितल्यानंतर वोझ्नियाक कंपनी स्थापन करण्यासाठी तयार झाले. त्यावेळी जॉब्स म्हणाले, “वा, आता आपण कंपनी स्थापन करत आहोत. वोझकडे (वोझ्नियाक) ४५ टक्के, माझ्याकडे ४५ टक्के आणि टायब्रेकर म्हणून तुमच्याकडे (वेन) १० टक्के हिस्सा असेल.”

जॉब्स व वोझ्नियाक यांच्यात वाद झाल्यास तो मिटवण्याचे काम माझे होते, कारण मी त्यांच्यात मोठा होतो, असे वेन गंमतीत सांगतात. दरम्यान, त्या दोघांना माझ्याकडे असलेले कौशल्य हवे होते, जे त्यांच्याकडे नव्हते, असे रोनाल्ड वेन यांनी सांगितले. त्यानंतर रोनाल्ड वेन यांनी लगेच टाइपरायटरवर अ‍ॅपल कंपनी स्थापनेचा करारनामा टाइप केला.

दोन आठवड्यांतच अ‍ॅपलमधून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला?

स्टीव्ह जॉब्स, स्टीव्ह वोझ्नियाक व रोनाल्ड वेन यांनी अ‍ॅपल कंपनीची स्थापना केली. त्यानंतर दोन आठवड्यांतच रोनाल्ड वेन यांनी कंपनीतून बाहेर पडण्याची तयारी केली होती.

स्टीव्ह जॉब्स यांनी अ‍ॅपल कंपनीची स्थापना झाल्यानंतर लगेचच ५० कम्प्युटर पुरवण्याचा करार बाइट शॉप या कंपनीबरोबर केला होता. हा करार पूर्ण करण्यासाठी १५ हजार डॉलर उधार घेतले जाणार होते. २०१६ मध्ये बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत वेन यांनी याबाबत माहिती दिली. बाइट शॉप कंपनीचे पैसे देण्याच्या बाबतीत नाव खराब होते, असे वेन म्हणाले. तसेच वेन यांना व्यवसायात एकदा दिवाळखोरीचा सामना करावा लागला होता. ती भीती त्यांना या करारावेळी सतावत होती.

अ‍ॅपलचे सह-संस्थापक रोनाल्ड वेन

“जॉब्स व वोझ्नियाककडे दोन निकेल्सही (अमेरिकी चलन) नव्हते. माझ्याकडे घर, बँक खाते आणि एक कार होती. काही झाले असते तर मलाच पकडण्यात आले असते”, असे वेन यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. तुम्हाला दोघांना मदत करण्याची इच्छा आहे, पण मला कंपनीचा भाग बनायचे नाही, असे रोनाल्ड वेन यांनी जॉब्स व वोझ्नियाक यांना सांगितले. रोनाल्ड वेन यांनी अ‍ॅपल कंपनीतून ‘एक्झिट’ घेण्याचे हे मुख्य कारण होते. तसेच वेन यांनी दुसरे एक कारण सांगितले. ते म्हणाले, मी दोन जायंट्सच्या (जॉब्स व वोझ्नियाक) छत्राखाली वाढणार होतो. त्यामुळे मी माझे स्वत:चे प्रोडक्ट कधीच बनवू शकलो नसतो. मला ते बनवायचे होते, असे वेन म्हणाले.

रोनाल्ड वेन यांनी तयार केला अ‍ॅपल कंपनीचा पहिला लोगो

अ‍ॅपल कंपनीचा पहिला लोगो बनवण्याचे श्रेय रोनाल्ड वेन यांना जाते. न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली वाचत बसले आहेत, आणि वरून एक सफरचंद त्यांच्यावर पडण्याची वाट पाहतेय, असा लोगो रोनाल्ड वेन यांनी तयार केला होता. दरम्यान, रोनाल्ड वेन यांना त्यांच्या अ‍ॅपल कंपनीत असलेल्या १० टक्के भागांच्या बदल्यात दोन टप्प्यात एकूण २३०० डॉलर स्टीव्ह जॉब्स यांनी दिले. ते १० टक्के भाग वेन यांनी आजपर्यंत स्वत: जवळ ठेवले असते तर त्याची आजची किंमत ३५० ते ४०० अब्ज डॉलर इतकी असती.

रोनाल्ड वेन यांनी तयार केलेला अ‍ॅपलचा पहिला लोगो

अ‍ॅपल कंपनीचा बोलबाला जगात आजही कायम आहे. येत्या काळात कंपनी आणखी प्रगत तंत्रज्ञान आणण्याची तयारी करत आहे. परंतु, एकेकाळी कंपनीचे सह-संस्थापक असलेले रोनाल्ड वेन मात्र कंपनीपासून दूर आहेत. बीबीसीच्या मुलाखतीत वेन यांनी एक आठवण सांगितली. काही वर्षांपूर्वी कोणीतरी त्यांना अ‍ॅपलचा आयपॅड भेट दिला होता. तो त्यांनी कोणाला तरी देऊन टाकला, असे वेन म्हणाले होते. रोनाल्ड वेन आज ९१ वर्षांचे आहेत.