aravalli mountain range destruction: राजस्थानमधील चुरू शहरात शनिवारी (३० मे) धुळीचे प्रचंड मोठे वादळ आले होते. धुळीच्या वादळाचे व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. राजस्थानमधील चुरू या शहरासह हनुमानगढ, श्री गंगानगर, बिकानेर, नागौर, दिडवाना-कुचामन, अलवर आणि सीकर या शहरांनाही धुळीच्या वादळाचा जोरदार तडाखा बसला. राजस्थानमध्ये दरवर्षी या कालावधीत धुळीचे लोट उठणे सामान्य मानले जाते. कारण मध्य पूर्व व थार वाळवंटातून धुळीसह मोठ्या प्रमाणात वारे वाहू लागतात. थार वाळवंटातील धूळ व गंगा – सिंधुंच्या मैदानात असलेली दाट लोकवस्ती यांच्यात अरवली पर्वतरांग एका भिंतीसारखी उभी आहे. जेव्हा हे धुळीचे वारे अरवली पर्वताला धडकतात, तेव्हा त्यांचा वेग मंदावतो आणि त्यांच्यासोबत आलेली वाळू तिथेच साचते. या पर्वतरांगेच्या पश्चिमेकडील उतारांवर अशा अनेक वाळूच्या टेकड्या पाहायला मिळतात. या टेकड्यांना ‘ऑब्स्टॅकल ड्युन्स’ म्हटले जाते. अरवली पर्वतरांग मैदानी भागात राहणाऱ्या लोकांचे धुळीपासून तसेच धुळीच्या वादळापासून रक्षण करते. परंतु, अरवली पर्वतरांगेतील टेकड्यांचा आणि तेथील नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे दिल्ली, पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश या राज्यांना कोणता धोका निर्माण झाला आहे? ते सविस्तर जाणून घेऊयात.

अरवली पर्वतरांग वाळवंटातून येणारी धूळ कशी रोखते?

चुरू शहरात आलेल्या धुळीच्या वादळाबाबत पर्यावरण संशोधक आणि ‘सेंटर फॉर इकॉलॉजी डेव्हलपमेंट अँड रिसर्च’चे अभ्यासक चेतन अग्रवाल यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला माहिती दिली. ते म्हणाले, “पश्चिमेकडून धुळीसह येणारे उष्ण वारे अरवली पर्वतरांगेच्या पश्चिमेकडील भागावर धडकतात. त्यामुळे अरवली पर्वतरांगेत असलेल्या अनेक टेकड्यांच्या पश्चिमेकडील उतारावर वाळूचे मोठे ढीग साचले आहेत. उतारावर वाळूच्या टेकड्या तयार झाल्या आहेत. त्या टेकड्यांना ‘ऑब्स्टॅकल ड्युन्स’ म्हणून ओळखले जाते. या टेकड्यांवर वाढणारी वनस्पती ही वाळवंटी प्रदेशात आढळणाऱ्या वनस्पतींसारखीच असते. जर तिथे मोठ्या प्रमाणात झाडे लावून कवच तयार करण्यात आले, तर धुळीच्या वादळामुळे उडणाऱ्या वाळूला अरवली पर्वतरांग ओलांडून पुढे येता येणार नाही. झाडांमुळे वाळू तसेच धुळीची हालचाल कमी होते. झाडे एखाद्या फिल्टरसारखी काम करतील. यावरून अरवली पर्वतरांग धूळ रोखण्यात किती महत्त्वाची भूमिका बजावते हे स्पष्टपणे दिसून येते.”

अरवली पर्वतरांगेचा सध्या ऱ्हास होत आहे. अरवली पर्वतरांगेवरील वनस्पतींचे प्रमाण घटले आहे. टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात खाणकाम होत आहे. त्यामुळे तिथे आधीपासून अस्तित्वात असलेले धूळ अडवणारे नैसर्गिक कवच धोक्यात आले आहे. हवामानशास्त्रज्ञांच्या मते, आता राजस्थानमध्ये येणारे धुळीचे वादळ तीव्र नसले तरीही तेथील धूळ वाऱ्यामार्फत उत्तरेकडील मैदानी भागांपर्यंत वाहून येत आहे.

दरवर्षी सर्वाधिक धुळीचे वादळ कोणत्या भागात?

उत्तर भारतात धुळीचे वादळ मुख्यत: थार वाळवंटामुळे निर्माण होते. मान्सून येण्यापूर्वी साधारणपणे एप्रिल ते जून दरम्यान धुळीचे वादळ तयार होतात. हे वादळ उत्तर भारतात सामान्य मानले जाते. अतिउष्ण तापमान आणि कोरडे हवामान यांमुळे धुळीचे वादळ निर्माण होते. नैऋत्य आणि पश्चिमेकडून वाहणारे वारे ही धूळ संपूर्ण भागात पसरवण्यास कारणीभूत ठरतात. भारतीय हवामान विभागाच्या ‘क्लायमेट हॅझार्ड्स अँड व्हल्नरेबिलिटी ॲटलास ऑफ इंडिया’ने वायव्य भारतात येणाऱ्या धुळीच्या वादळांचा अभ्यास केला आहे. हा अभ्यास १९८१ ते २०१० दरम्यान गोळा केलेल्या माहितीवर आधारीत आहे. अहवालानुसार, वायव्य भारतातील काही भागांमध्ये धुळीचे वादळ येण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्या भागांमध्ये दरवर्षी सरासरी ०.८९ ते १.५५ दिवस धुळीच्या वादळाची नोंद होते. (१.५५ दिवस म्हणजे ३० वर्षांत दरवर्षी १.५५ (साधारणपणे दीड दिवस) दिवस धुळीच्या वादळाची नोंद झाली.)

राजस्थानमधील धूळ उत्तर भारतातील मैदानी भागांत

धुळीच्या वादळाशी संबंधित दीर्घकालीन आकडेवारीवरून दिसून येते की, दिल्ली व दिल्लीच्या शेजारील जिल्हे हे वादळांच्या उच्च-जोखीम क्षेत्रात येतात. दिल्लीत दरवर्षी जून महिन्यात वादळांचे प्रमाण सर्वाधिक असते. जूनमध्ये दिल्लीत वादळाची वारंवारता २.५ दिवस (जून महिन्यातील ३० दिवसांपैकी २.५ दिवस वादळाची नोंद होते.) इतकी नोंदवली जाते. अरवली पर्वतरांगेचा दिवसेंदिवस ऱ्हास होत असल्याने यापुढे वादळांची तीव्रता आणखी वाढू शकते. “सध्या वाऱ्याचा वेग ताशी ३५ ते ४० किलोमीटर असल्यास राजस्थानमधील धूळ उत्तर भारतातील मैदानी भागांपर्यंत वाहून नेली जाते. हे यापूर्वी घडत नव्हते. जेव्हा राजस्थानमध्ये धुळीचे मोठे वादळ निर्माण होऊन ते दिल्लीच्या दिशेने पुढे सरकायचे तेव्हाच धुळीचे कण उत्तर भारतातील मैदानी भागांपर्यंत पोहोचत असत”, असे ‘स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रा. लि.’ चे हवामानशास्त्र आणि हवामान बदल विभागाचे उपाध्यक्ष महेश पालावत यांनी सांगितले.

अरवली पर्वतरांगेचा ऱ्हास होण्याची कारणे काय?

‘फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया’च्या २०१८ च्या अहवालानुसार, राजस्थानमधील अरवली पर्वतरांगेत असलेल्या १२८ अरवली टेकड्यांपैकी ३१ टेकड्या मानवी हस्तक्षेपामुळे नष्ट झाल्या आहेत. तसेच राजस्थानमधील नरेना, कालवाड, कोटपुतली, झालाना आणि सरिस्का येथील समुद्रसपाटीपासून २०० ते ६०० मीटर उंची असलेल्या टेकड्यांचेही नुकसान झाले आहे. पर्यावरण मंत्रालयाने गेल्या वर्षी आपल्या अरवली पुनरुज्जीवन आराखड्यात (restoration framework) या ऱ्हासामागची कारणे स्पष्ट केली होती. लाल सिलिका, ग्रॅनाइट आणि इतर दुय्यम खनिजांचे खाणकाम, जंगलतोड, शहरीकरण, बांधकाम, जमिनीच्या वापरात झालेला बदल, पशुपालनामुळे होणारा वनस्पतींचा ऱ्हास आणि अतिक्रमण यांमुळे अरवली पर्वतरांगेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

अरवली पर्वतरांग नष्ट होत असल्याने कोणते दुष्परिणाम?

‘वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ने २००९ मध्ये केलेल्या एका अभ्यासाचा संशोधक आणि अधिकाऱ्यांकडून आजही संदर्भ दिला जातो. या अभ्यासादरम्यान अरवली पर्वतरांगेतील १२ ‘गॅप्स’ (मोकळ्या जागा/खिंडी) शोधून काढण्यात आले होते. जंगलतोड झाल्याने अरवली पर्वतरांगेतील मोकळ्या जागा अधिक रुंदावल्या आहेत. अरवली पर्वतरांगेतील या मोकळ्या जागांमुळे दिल्ली, पंजाब आणि उत्तर प्रदेशसह आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये धूळ व वाळू वाऱ्यामार्फत वाहून आणली जाते. त्यामुळे दिल्लीच्या हवेची गुणवत्ता अधिकच खालावत आहे. तसेच त्याचा पावसावरही परिणाम होत आहे.

धुळीचे वारे सतत वाहत असल्यास जमिनीपर्यंत पोहोचणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या प्रमाणातही बदल होऊ शकतो. हवेत धूळ असल्यास जमिनीच्या तापमानावर परिणाम होतो. परिणामी, धूळ सूर्यप्रकाशाच्या विखुरण्यावर परिणाम करू शकते आणि तात्पुरत्या स्वरूपात तापमान कमी करू शकते. नासाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ हिरेन जेठवा यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सांगितले की, “उत्तर भारतावर होणारा अरवलीच्या ऱ्हासाचा आणि धूळ वाहून येण्याचा परिणाम समजून घेण्यासाठी, उत्तर भारतातील धुळीची वारंवारता आणि त्याच्या प्रमाणावर दीर्घकालीन संशोधन आणि विश्लेषणाची गरज आहे.”