Archaeologists uncover 2,000-year-old Buddhist site in Kashmir: फ्रान्समध्ये सापडलेल्या बारामुल्ला येथील तीन बौद्ध स्तूपांचे एक जुने व धूसर छायाचित्र फ्रान्समध्ये सापडले आणि त्यामुळेच काश्मीरचा सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा गौरवशाली इतिहास उजेडात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले. ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये मानवनिर्मित भव्य संरचनांचे अवशेष सापडणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब असून त्यातून राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे दर्शन घडते.

ड्रोनच्या सहाय्याने हवाई छायाचित्रे घेण्यात आली

बारामुल्लातील झेहनपोरा परिसरात अनेक वर्षांपासून काही उंचवटे किंवा टेकड्या दिसत होत्या. मात्र त्या केवळ मातीचे ढिगारे असल्याचे मानले जात होते आणि त्यांच्या वास्तविक स्वरूपाबाबत कोणालाही माहिती नव्हती, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. एका पुरातत्त्वज्ञाचे मात्र या टेकड्यांकडे लक्ष गेले. त्यांनी त्या परिसराचे सखोल निरीक्षण सुरू केले असता, या टेकड्या सामान्य नसून काहीशा वेगळ्या आणि संशयास्पद असल्याचे लक्षात आले. त्यानंतर या ठिकाणी वैज्ञानिक पद्धतीने संशोधन सुरू करण्यात आले. ड्रोनच्या सहाय्याने हवाई छायाचित्रे घेण्यात आली आणि संपूर्ण भूभागाचे मॅपिंग करण्यात आले. या अभ्यासातून धक्कादायक निष्कर्ष समोर आले. “या टेकड्या नैसर्गिक नसून, त्याखाली एका मोठ्या मानवनिर्मित संरचनेचे अवशेष असल्याचे स्पष्ट झाले,” असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

छायाचित्रामुळे इतिहासाला नवे वळण

दरम्यान, या शोधाला आंतरराष्ट्रीय संदर्भही लाभला आहे. काश्मीरपासून हजारो किलोमीटर दूर, फ्रान्समधील एका संग्रहालयाच्या संग्रहात एक जुने व धूसर छायाचित्र होते. त्या छायाचित्रात बारामुल्लातील तीन बौद्ध स्तूप स्पष्टपणे दिसत होते, असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले. “या छायाचित्रामुळे इतिहासाला नवे वळण मिळाले आणि काश्मीरचा गौरवशाली भूतकाळ आपल्या समोर उलगडला. हा इतिहास सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा आहे,” झेहनपोरा येथील बौद्ध संकुल काश्मीरच्या प्राचीन परिचयाचे आणि त्याच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाचे सजीव प्रतीक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

काश्मीरच्या प्राचीन इतिहासातील महत्त्वाचा दुवा

झेहनपोरा या बौद्ध स्थळाच्या उत्खननाचा प्रकल्प जम्मू-काश्मीर सरकारच्या पुराभिलेख, पुरातत्त्व आणि संग्रहालय विभाग (DAAM) आणि काश्मीर विद्यापीठाचा मध्य आशियाई अध्ययन विभाग (CCAS) यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जात आहे. उत्खनन तसेच नोंदींचे शास्त्रशुद्ध दस्तऐवजीकरण करण्यासाठी दोन्ही संस्थांमध्ये सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. या संशोधनातून झेहनपोरा केवळ एक गाव न राहता, काश्मीरच्या प्राचीन इतिहासातील एक महत्त्वाचा दुवा म्हणून पुढे येईल, अशी आशा पुरातत्त्वज्ञ व्यक्त करत आहेत.

झेहनपोरा

झेहनपोरा हे ठिकाण झेलम नदीच्या उजव्या काठावर, बारामुल्लापासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. या क्षेत्राभोवती इतिहास, दंतकथा आणि सांस्कृतिक स्मृतींच्या अनेक थरांचे वलय आहे. शतकानुशतके या स्थळाची ओळख बदलत गेली. कधीकाळी वैदिक वस्ती, नंतर एक महत्त्वाचे बौद्ध केंद्र आणि कालांतराने स्थानिक लोककथांमध्ये गूढतेने वेढलेले स्थळ, असा त्याचा प्रवास घडला. झेहनपोऱ्याचे खरे महत्त्व समजून घ्यायचे झाल्यास, केवळ पुरातत्त्वीय पुरावेच नव्हे तर त्याच्या नावाची ऐतिहासिक व्युत्पत्ती आणि या मातीच्या ढिगाऱ्यांभोवती गुंफल्या गेलेल्या लोककथांचाही मागोवा घेणे आवश्यक ठरते.

भौगोलिकदृष्ट्याही अत्यंत मोलाचे

या स्थळाचे महत्त्व केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिकच नाही, तर भौगोलिकदृष्ट्याही अत्यंत मोलाचे आहे. झेहनपोरा हे वायव्य सीमाप्रांत (गंधार) ते काश्मीरच्या अंतर्भागात जाणाऱ्या प्राचीन व्यापार आणि तीर्थयात्रा मार्गावर वसलेले आहे. त्यामुळेच प्राचीन काळात हे ठिकाण सांस्कृतिक आणि धार्मिक केंद्र म्हणून विकसित झाले असावे, असे अभ्यासक मानतात. झेहनपोरा हे स्थळ सध्या सुरू असलेल्या उत्खनांनामुळे काश्मीरमधील सर्वात मोठे बौद्ध स्थळ म्हणून समोर येत आहे. येथे उघडकीस आलेले पुरातत्त्वीय पुरावे प्राचीन हुविष्कपुराकडे बोट दाखवत आहेत. कुषाण सम्राट हुविष्क याच्या काळात बौद्ध संस्कृतीचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला होता.

हरवलेल्या जगाचा शोध

झेहनपोऱ्यातील स्थानिकांना या मातीच्या उंचवट्यांमध्ये काहीतरी वेगळे असल्याची जाणीव होती. ड्रोनद्वारे केलेल्या हवाई सर्वेक्षणामुळे हे मानवनिर्मित असल्याचे सिद्ध झाले. नंतर शिस्तबद्ध भूस्तरीय तपासणी सुरू झाली. त्यात काही विटांचे पायाभूत अवशेष उघडकीस आले. हे अवशेष स्तूपाच्या पायाचा भाग होते हे सिद्ध झाले. त्याच्या आसपास विहारसदृश रचना आढळल्या. त्यात भिक्षूंसाठीचे कक्ष, चौथरे आणि मार्ग यांचा समावेश होता. त्यांची रचना गांधार प्रदेशातील बौद्ध मठांशी जुळणारी होती. म्हणजेच कुषाणकालीन होती. या शोधाने १८६९ साली ब्रिटिश काळातील संशोधकांनी केलेल्या निरीक्षणांनाही दुजोरा दिला आहे. त्या काळातील संशोधनामध्ये या परिसरात गांधार शैलीसारख्या रचनांचे उल्लेख होते. मात्र आधुनिक साधनांच्या अभावामुळे ते केवळ तर्कापर्यंतच मर्यादित राहिले. मात्र आज तेच निरीक्षण खरे ठरले आहे. झेहनपोराचा हा शोध केवळ नव्याने लागलेला नाही, तर शतकाहून अधिक काळ दुर्लक्षित राहिलेल्या वारशाची ही पुनर्ओळख आहे.

काश्मीरवरील कुषाणकालीन ठसा

या शोधाचे महत्त्व समजून घ्यायचे असल्यास कुषाण साम्राज्याच्या व्यापक ऐतिहासिक पार्श्वभूमीकडे पाहावे लागते. इ.स. पहिल्या ते तिसऱ्या शतकादरम्यान कुषाणांनी मध्य आशियापासून उत्तर भारतापर्यंत विशाल भूभागावर राज्य केले. बौद्ध धर्माचे ते आश्रयदाते होते. रेशीम मार्गावरून बौद्ध धर्माचा प्रसार करण्यात त्यांची मोलाची भूमिका होती. सम्राट हुविष्क हे कुषाण शासकांपैकी एक प्रभावी नाव मानले जाते. त्याने आपली काही प्रशासकीय आणि धार्मिक केंद्रे काश्मीरमध्ये हलविल्याचे उल्लेख प्राचीन नाणी, शिलालेख आणि ऐतिहासिक ग्रंथांत आढळतात. ‘हुविष्कपुरा’ नावाच्या राजकीय केंद्राचा उल्लेख वारंवार येतो, मात्र त्याचे नेमके स्थान आजवर अज्ञातच होते. झेहनपोरा हा त्या राजधानीच्या परिसराचा भाग असू शकतो का, असा प्रश्न आता संशोधकांना पडला आहे.

इतिहासात इंडो-ग्रीक राजा Menanderचा बौद्ध धर्माकडे कल असल्याचा उल्लेख आहे. नागसेन यांच्याशी झालेल्या धार्मिक चर्चेत पराभूत झाल्यानंतर मेनांडरने बौद्ध धर्म स्वीकारल्याचे सांगितले जाते. ही चर्चा काश्मीरजवळील एका ठिकाणी झाली होती. ‘मिलिंदपन्हो’ हा ग्रंथ काश्मीरमधील प्रारंभीच्या बौद्ध इतिहासाचा महत्त्वाचा स्रोत मानला जातो. त्यानुसार मेनांडरने ‘मिलिंद विहार’ उभारला, संघात प्रवेश केला आणि अखेरीस अर्हतपद प्राप्त केले. स्वात, तक्षशिला आणि काश्मीरच्या लोळाब भागात सापडलेले खरोष्ठी लिपीतील शिलालेख इ.स.पू. तिसऱ्या शतकात येथे बौद्ध धर्म अस्तित्वात असल्याचे सिद्ध करतात.

काश्मीर आणि गांधारचा संबंध

त्या काळात बौद्ध भिक्षू अफगाणिस्तानातील बामियान आणि पुढे मध्य आशियाकडे जाण्यासाठी हा मार्ग वापरत असत. झेहनपोरा हे बौद्ध विद्वानांचे, चिंतनाचे आणि सांस्कृतिक समृद्धीचे केंद्र होते. प्रवासात थकलेल्या भिक्षूंना इथे आश्रय आणि विश्रांती मिळत असे. आजच्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात पसरलेला गांधार प्रदेश बौद्ध शिक्षण, शिल्पकला आणि स्थापत्यकलेचा महत्त्वाचा केंद्रबिंदू होता. गांधारमधील ग्रीको-बौद्ध कला संपूर्ण आशियावर प्रभाव टाकणारी ठरली. काश्मीरचा गांधारशी असलेला ऐतिहासिक संबंध ग्रंथांमध्ये वारंवार नमूद केला जातो. ‘नीलमत पुराण’ या प्राचीन संस्कृत ग्रंथात काश्मीरची उत्पत्ती, तीर्थस्थळे, विधी आणि धार्मिक परंपरांचे सविस्तर वर्णन आढळते. या ग्रंथामुळे काश्मीरचा सामाजिक आणि धार्मिक इतिहास उलगडतो, मात्र प्रत्यक्ष पुरातत्त्वीय पुरावे आतापर्यंत मर्यादित होते. झेहनपोरा ही उणीव भरून काढत आहे.

शतकानुशतकांच्या मौनाचा पुनर्शोध

काश्मीरची ओळख ही विविध संस्कृतींच्या धाग्यांनी विणलेली आहे. हिंदू, बौद्ध, इस्लामी, पर्शियन, मध्य आशियाई आणि स्थानिक हिमालयीन परंपरांचा हा समृद्ध संगम आहे. दीर्घकाळ काश्मीरच्या इतिहासातील प्रारंभीचा बौद्ध कालखंड झाकोळला गेला होता. झेहनपोऱ्यातील हा शोध त्या विस्मृतीत गेलेल्या अध्यायाला नव्याने, ठोस पुराव्यांसह आणि जाणिवेसह उलगडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.