भारतात सध्या सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. दिवाळीही अगदी तोंडावर आली आहे. त्यामुळे नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीकडून भेटवस्तू किंवा बोनस मिळण्याची शक्यता असते. दिवाळीच्या काळात अनेक कर्मचाऱ्यांना विविध प्रकारे आर्थिक लाभ होतो. मात्र, कंपनीकडून अशा प्रकारे पैशांच्या स्वरुपात दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू किंवा बोनस भारताच्या प्राप्तिकर कायद्यानुसार करपात्र आहेत. इतर महागड्या वस्तुंच्या रुपात देण्यात येणाऱ्या भेटवस्तूही कराच्या अधीन आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राप्तिकर विभागाच्या नियमांनुसार, कोणत्याही पावतीशिवाय मिळालेली रक्कम ‘आर्थिक भेट’ म्हणून संबोधली जाते. तर कोणत्याही पावतीशिवाय मिळणाऱ्या महागड्या भेटवस्तूला (जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊ जाता येते) ‘जंगम मालमत्तेची भेट’ असं म्हटलं जातं. रोख रक्कम, चेक किंवा ड्राफ्टचा आर्थिक भेटवस्तूमध्ये समावेश होतो. एका वर्षात ५० हजार रुपयांपेक्षा अधिकची रक्कम भेट म्हणून मिळाली असेल तर त्यावर प्राप्तिकर लागू होतो.

भेटवस्तूंवर कधी कर आकारला जात नाही?
एखादी व्यक्ती किंवा ‘एचयूएफ’कडून मिळालेली आर्थिक भेट करपात्र नसते. अशा भेटवस्तूंमध्ये नातेवाईकांकडून मिळालेल्या पैशांचा समावेश होतो. उदा. जोडीदार, भाऊ किंवा बहिणीकडून मिळालेली रक्कम. याशिवाय, लग्नसमारंभात मिळालेल्या भेटवस्तूंवर कर आकारला जात नाही. लग्नाव्यतिरिक्त, इतर सर्व कार्यक्रम किंवा समारंभात एखाद्या व्यक्तीला मिळणाऱ्या आर्थिक भेटवस्तूवर कर आकारला जातो.

हेही वाचा- विश्लेषण : सोशल मीडिया एन्फ्लुअन्सर्ससाठी केंद्र सरकारचे कठोर नियम; ५० लाखांपर्यंत दंडाची तरतूद, जाणून घ्या नेमकं प्रकरण

भेटवस्तूंवर कधी कर आकारला जातो?
प्राप्तिकर विभागाच्या नियमांनुसार, वाढदिवस किंवा वर्धापनदिन यांसारख्या कार्यक्रमात पैशांच्या स्वरुपात मिळालेली भेटवस्तू कराच्या अधीन असते. असं असलं तरी संबंधित भेटवस्तूंवर कर लावायचा की नाही, हे वर्षभरात मिळालेल्या भेटवस्तूच्या एकूण मूल्याच्या आधारावर निश्चित केलं जातं, वैयक्तिक भेटवस्तूच्या आधारावर नाही. वर्षभरात मिळालेल्या भेटवस्तूंचे एकूण मूल्य ५० हजाराहून अधिक असल्यास अशा भेटवस्तूंवर कर आकारला जातो.

कंपनीकडून मिळालेला दिवाळी बोनस आणि भेटवस्तूंबाबत काय नियम आहेत?
पाच हजार रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे गिफ्ट व्हाउचर तुमच्या पगाराचा भाग मानला जातो. त्यामुळे प्राप्तिकर विभागाच्या नियमांनुसार, अशा गिफ्ट व्हाउचर्सवर कर स्लॅबनुसार कर आकारला जातो. त्याचबरोबर कंपनीने भेटवस्तू म्हणून तुमच्या खात्यात कोणत्याही प्रकारे रक्कम जमा केली तर ती पगाराचा भाग मानली जाते. त्यावर कर आकारला जातो. याचाच अर्थ कंपनीकडून तुम्हाला दिवाळी बोनस मिळणार असेल तर तोही करपात्र असेल.

हेही वाचा- विश्लेषण : ‘आता खरेदी करा, नंतर पैसे द्या’ ही सेवा नेमकी काय आहे? याचा तुम्हाला फायदा होतो की तोटा?

कंपनीकडून रोख रकमेच्या स्वरुपात मिळणारी कोणतीही भेट कराच्या अधीन असते. मग ही रक्कम पाच हजार रुपयांपेक्षा कमी असली तरीही त्यावर कर भरावा लागतो. असं असलं तरी व्हाउचर किंवा कूपनच्या स्वरूपात चार हजार ९९९ रुपयांची भेटवस्तू आयटी नियमांनुसार कराच्या अधीन नसते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Are diwali bonuses and monetary gifts taxable know income tax rules rmm
First published on: 04-10-2022 at 16:48 IST