Humanoid robots Chinese government विविध क्षेत्रांमध्ये दैनंदिन कामे अचूक व स्वायत्तपणे करणाऱ्या यंत्रमानव तंत्रज्ञानाचा (रोबोटिक्स) वेगाने विकसित होत आहे. आज रोबोट तंत्रज्ञान माणसांप्रमाणे चालू, बोलू, विचार करू शकत आहे. चीन या क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे, मात्र चीनचा वेगाने वाढणारा ह्युमनॉइड रोबोटिक्स उद्योग आता सरकारसाठीच चिंतेचे कारण ठरत असल्याचे दिसून येत आहे. चीन कम्युनिस्ट पार्टीने अलीकडेच या क्षेत्राला स्पेशल इंजिनचा दर्जा दिल्याने, त्याच्या गुंतवणुकीत अचानक वाढ झाली आहे. चीनमधील मानवी रोबोटिक्स क्षेत्राचा झालेला विकास इतका वेगाने वाढत आहे की, एकूणच चीनसाठी ही धोक्याची चिन्हे आहेत. काय आहे त्यामागील नेमके कारण? रोबोट्समुळे का वाढली सरकारची चिंता? त्याविषयी जाणून घेऊयात…
चीनने पहिल्यांदाच व्यक्त केली चिंता
बीजिंगच्या राष्ट्रीय विकास आणि सुधारणा आयोगाने (एनडीआरसी) मानवी रोबोटिक्स उद्योगाच्या स्थितीबद्दल सावधानतेचा इशारा दिला आहे. एनडीआरसी चीनच्या आर्थिक नियोजनाची देखरेख करणारी संस्था आहे. या इशाऱ्यामुळे सरकारची अस्वस्थता वाढली. ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, एनडीआरसीने सुमारे १५० हून अधिक चिनी कंपन्यांनी उत्पादित केलेल्या मानवी रोबोट्सच्या वेगाने वाढत असलेल्या यादीकडे लक्ष वेधले. यापैकी अनेक कंपन्या समान मॉडेल्स बाजारात आणत आहेत. त्यांच्या उत्पादनाचा वेग व्यावहारिक मागणीपेक्षा खूप जास्त आहे. एका ब्रीफिंगमध्ये, एनडीआरसीच्या प्रवक्त्या ली चाओ म्हणाल्या, “सीमावर्ती उद्योगांच्या विकासात वेळेत समतोल साधण्याची गरज आहे.”
त्या म्हणाल्या, “मानवी रोबोट उद्योगासाठीही तेच लागू होते.” चीनमध्ये यापूर्वी सायकल-शेअरिंग आणि सेमीकंडक्टर उद्योगांमध्ये अशा गुंतवणुकीत वाढ झाली आहे, जिथे जास्त गुंतवणुकीमुळे बाजारपेठेत मोठी घसरण झाली. आता, ह्युमनॉइड रोबोटिक्स उद्योगातही अशीच परिस्थिती पुन्हा निर्माण होण्याची भीती आहे. या वर्षी स्प्रिंग फेस्टिव्हल गालामध्ये युनिट्री रोबोटिक्सच्या ह्युमनॉइड रोबोट्सनी नृत्य सादरीकरण केले आणि देशभरात याची चर्चा झाली. अगदी तेव्हापासूनच या क्षेत्राची लोकप्रियता वाढली.
काही महिन्यांपूर्वी देशात नाचणाऱ्या, धावणाऱ्या आणि खेळ खेळणाऱ्या रोबोट्सच्या व्हायरल फुटेजमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. ली म्हणाल्या, “रोबोट्सची पूर्णपणे नक्कल केल्याने धोका निर्माण होऊ शकतो आणि अशा समानतेमुळे संशोधन आणि विकासाची जागा कमी होण्याची शक्यता असते, तसेच लोकांवरही याचा परिणाम होऊ शकतो.”
चीनमधील रोबोटिक्स क्षेत्रातील वाढ
२०२५ च्या स्प्रिंग फेस्टिवल गालादरम्यान युनिट्री रोबोट्सने केलेल्या एकत्रित परफॉर्मन्सने अनेक प्रेक्षकांना मोहित केले. या शोदरम्यान, त्यांची नृत्यकला आणि मंचावरील उपस्थिती यामुळे मानवी रोबोटिक्स एका रात्रीत घरोघरी चर्चेचा विषय ठरले. चिनी आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये याला ‘टर्निंग पॉईंट’ म्हटले गेले. त्यानंतर विविध कामे करणाऱ्या रोबोट्सचे व्हिडीओ म्हणजे नृत्य करणे, अडथळ्यांच्या शर्यतीतून जाणे, धावणे, बॉक्सिंग करणे, अगदी कॉफी तयार करणाऱ्या रोबोट्सचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. २०२५ च्या मध्यापासून, अगीबॉट, गॅलबॉट आणि युनिट्रीसारख्या कंपन्यांचे रोबोट्स वेगाने व्हायरल होत होते.
एका अगीबॉट मानवी रोबोटने सलग तीन दिवस, १०० किलोमीटर चालून दाखवले आणि सर्वाधिक अंतराचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला. चीनने ऑगस्टमध्ये जगातील पहिली मानवी रोबोट गेम्स स्पर्धा आयोजित केली होती, ज्यात बास्केटबॉल, रेसिंग आणि साफसफाईच्या स्पर्धांसह ५०० हून अधिक रोबोट्सनी भाग घेतला होता. या कार्यक्रमाने देशांतर्गत माध्यमांचे लक्ष वेधले आणि चीन हा ग्राहक-केंद्रित मानवी रोबोटिक्समध्ये जगाचे नेतृत्व करत आहे, ही धारणा अधिक मजबूत केली.
चिनी कम्युनिस्ट पक्षाने मानवी रोबोटिक्सला २०३० पर्यंत आर्थिक विकासाला मार्गदर्शन करणाऱ्या सहा धोरणात्मक उद्योगांपैकी एक म्हणून घोषित केले. या क्षेत्राला आणखी प्रतिष्ठा मिळाली. युनिट्रीचे संस्थापक वांग शिंगशिंग यांना या वर्षाच्या फेब्रुवारीमध्ये चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या महत्त्वाच्या बैठकीत आमंत्रित करण्यात आले होते. गुंतवणूकदारांनाही मानवी रोबोट्स चीनच्या औद्योगिक ऑटोमेशनमध्ये मध्यवर्ती ठरतील अशी अपेक्षा असल्याने, रोबोटिक्स कंपन्यांनी सट्टा भांडवल आकर्षित करण्यास सुरुवात केली.
चीनमधील रोबोटिक्सचा विकास किती महत्त्वाचा?
मानवी रोबोट्स व्हायरल झाले असले तरी चीनचा खरा जागतिक फायदा त्याच्या औद्योगिक रोबोट्समध्ये आहे, जे उत्पादन कंपन्या आणि लॉजिस्टिक्स हबमध्ये वापरले जातात. २०२३ मध्ये चीनने २,९०,००० हून अधिक औद्योगिक रोबोट्स स्थापित केले, जी संख्या जगाच्या बाकीच्या भागाच्या एकत्रित संख्येपेक्षा जास्त आहे. त्याने जपान आणि जर्मनीसारख्या औद्योगिक महासत्तांना पहिल्यांदाच मागे टाकले आहे. मात्र, आता मानवी रोबोट्सची मागणी वाढत असल्याने कंपन्यांचे लक्ष विचलित होण्याची भीती आहे. चीन जागतिक स्तरावर ज्या क्षेत्रात आघाडीवर आहे, त्यावरच सरकारला लक्ष केंद्रित करायचे आहे.
रोबोट्सची चाचणी करण्यासाठी, एआय मॉडेलना प्रशिक्षण देण्यासाठी आणि कार्यक्षमतेचे मूल्यांकन प्रमाणित करण्यासाठी केंद्रीयकृत प्लॅटफॉर्म विकसित करण्याची योजना आखत आहे. एनडीआरसीने संकेत दिले आहेत की, ते रोबोटिक्स क्षेत्रात कोणत्या कंपन्यांना प्रवेश करण्याची परवानगी असेल आणि त्यांनी कोणत्या परिस्थितीत मागे हटले पाहिजे किंवा क्षेत्र सोडले पाहिजे, यासाठी मानके लागू करतील.
