-आसिफ बागवान
नोव्हेंबर २०१६मध्ये केंद्र सरकारने अचानक ५००, १ हजारच्या नोटांच्या निश्चलनीकरणाची घोषणा केल्यानंतर देशात डिजिटल पेमेंटचे वारे जोरात वाहू लागले. त्यानंतर चार वर्षांनी आलेल्या करोना साथीत रोकड व्यवहारांतून संसर्ग पसरण्याच्या भीतीने डिजिटल पेमेंटचा वापर कमालीचा वाढला आणि एक प्रकारे ती व्यवहारातील अपरिहार्यताही बनली. भारतीय जनता आणि अर्थव्यवस्था डिजिटल पेमेंटकडे अधिकाधिक सरकत असताना आता या व्यवस्थेतील कळीचा घटक असलेल्या ‘क्यूआर कोड’चा वापर आर्थिक फसवणुकीसाठी होऊ लागल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर ‘क्यूआर कोड’च्या फायदे आणि तोटे यांचा घेतलेला आढावा…

क्यूआर कोड म्हणजे काय?

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
High class houses out of MHADA lottery Thinking of stopping construction of expensive houses from now on
म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…

‘क्यूआर कोड’ हा डिजिटल डेटाचे सांकेतिक रूप असते. ‘क्यूआर कोड’ प्रचलित होण्यापूर्वी ‘बार कोड’ हा प्रकार पूर्णपणे रुळला होता. साठवलेली माहिती समोर आणण्यासाठी सांकेतिक रूपात एका अक्षावर प्रदर्शित करण्यात आलेल्या उभ्या जाड-बारीक रेषा म्हणजे बार कोड. तर एका चौरस आकारात दोन्ही अक्षांवर सांकेतिक रूपात प्रदर्शित करण्यात आलेल्या छोट्या काळ्या-पांढऱ्या टिंबांना किंवा चौकोनी ठिपक्यांना क्यू आर कोड म्हणतात. क्यूआर कोडचा वापर बहुतांश वेळा वेब लिंक साठवून ठेवण्यासाठी होतो. त्याशिवाय चित्रे किंवा मजकूर सांकेतिक रूपात साठवण्यासाठीही क्यूआर कोडचा वापर होतो.

‘क्यूआर कोड’ कसे काम करतो?

‘क्यूआर कोड’ कॅमेऱ्याद्वारे स्कॅन करून उघड करता येतो. जेव्हा तुम्ही तुमच्या मोबाइलच्या ॲपमधील कॅमेऱ्याने क्यूआर कोड स्कॅन करता तेव्हा कॅमेरा त्यातील सांकेतिक भाषा उलगडून समोर आणतो. त्याद्वारे तुमच्या समोर क्यूआरकोडमधील ‘यूआरएल’ अर्थात वेबलिंक उपलब्ध होते. या लिंकवर क्लिक करताच तुम्ही संबंधित वेबसाइटशी संलग्न होता. याच सूत्रानुसार वेगवेगळ्या कामांसाठी क्यूआर कोडचा वापर केला जातो. सध्या आपण डिजिटल पेमेंटसाठी क्यूआर कोड स्कॅन करतो तेव्हाही हीच प्रक्रिया होत असते. मात्र, आपण पेमेंट ॲपच्या माध्यमातून कोड स्कॅन करत असल्याने ही सर्व प्रक्रिया पडद्यामागे होत असते आणि आपल्यासमोर केवळ पेमेंटशी संबंधित माहिती प्रदर्शित होत असते. मात्र, याखेरीज हॉटेलचा मेनू, औषधाची माहिती, ईमेलची यादी, व्यक्तीची ओळख पडताळणी अशा विविध कारणांसाठी क्यूआर कोड उपयोगी पडतो.

क्यूआर कोडची रचना…

क्यूआर कोडच्या चौरसाची अंतर्गत रचना एखाद्या आलेख कागदासारखी असते. त्या चौरसात समान आकारात विभागलेले अनेक छोटे चौरस असतात. या प्रत्येक चौरसातील काळा ठिपका वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण असतो. सर्वसाधारणपणे छोट्यात छोट्या क्यूआर कोडमध्ये साधारण ४४१ छोटे चौरस असतात तर मोठ्या क्यूआर कोडमध्ये असणाऱ्या चौरसांची संख्या काही हजारांत असते. प्रत्येक क्यूआर कोडमध्ये डेटा, पोझिशन मार्कर, क्वाएट झोन आणि ऑप्शन लोगो अशा चार गाेष्टींचा अंतर्भाव असतो. यापैकी डेटा हा छोट्या चौरसांतील ठिपक्यांच्या सांकेतिक सरमिसळीत दडलेला असतो. कोडच्या कोपऱ्यांत असणारे मोठे चौरस पोझिशन मार्कर अर्थात त्याची सीमा दर्शवतात. मुख्य चौरसाच्या भोवती असलेली मोकळी जागा हीदेखील कोड कुठून सुरू होऊन कुठे संपतो, हे दर्शवतात. काही कोडमध्ये संबंधितांचे नाव वा कंपनीचे लाेगो दिसतात.

क्यूआर कोडचे फायदे

डिजिटल पेमेंट पद्धतीत क्यूआर कोड महत्त्वाची भूमिका बजावतात. याद्वारे एक वापरकर्ता दुसऱ्याची माहिती न पाहताही त्याच्या क्यूआरकोड द्वारे जोडला जाऊ शकतो. त्यामुळे डिजिटल पेमेंटसाठी हा एक चांगला पर्याय आहे. विशेषत: करोना काळात क्यूआर कोडद्वारे पेमेंट करण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढण्यामागचे प्रमुख कारण ही गोपनीयताही आहे.

मग यात धोका काय असतो?

क्यूआर कोड ही पद्धत माहिती गोपनीयपणे साठवण्यासाठी आणि ठरावीक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी एक चांगले माध्यम आहे. मात्र, सायबर भामटे या पद्धतीचा वापर आता आर्थिक फसवणुकीसाठीही करू लागल्याचे उघड झाले आहे. क्यूआर कोडमध्ये भलतीच लिंक साठवून ठेवून ती सुरू करण्यासाठी वापरकर्त्याला नकळत उद्युक्त केले जाते. अशा प्रकारच्या वेब यूआरएल तुम्हाला बनावट, फसवणूक करणाऱ्या वेबसाइटशी संलग्न करू शकतात. किंवा या कोडच्या माध्यमातून कोणत्याही वेबसाइटर नेऊन तुमची आर्थिक फसवणूक केली जाऊ शकते. अशा प्रकारच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांत उघड झाल्या आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मुलगी घरातील जुना सोफा ऑनलाइन विक्री करण्याच्या प्रयत्नात असताना पलिकडून संपर्क साधणाऱ्या भामट्याने तिला क्यूआर कोड पाठवून त्याद्वारे तिच्या खात्यातील ३४ हजार रुपये लाटल्याचे समोर आले आहे.

काय काळजी घ्याल?

क्यूआर कोड ही सोयीची पद्धत असली तरी, कोणताही कोड स्कॅन करताना त्याबाबत योग्य खातरजमा करून घ्या. खात्रीशीर यूआरएल नसल्यास त्यावर क्लीक करू नका. कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीला तुमच्या स्मार्टफोनमधून क्यूआर कोड स्कॅन करण्याची परवानगी देऊ नका. व्हॉट्सॲप किंवा ईमेलद्वारे अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या क्यूआर कोडचा वापर करू नका. क्यूआर कोड स्कॅन करण्यासाठी नेहमी विश्वासार्ह ॲपचाच वापर करा.