सध्या सुरू असलेल्या ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत व्हिडिओ असिस्टंट रेफरी (व्हीएआर) तंत्रज्ञान पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. ‘किमान हस्तक्षेप, जास्तीत जास्त फायदा’ या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या प्रणालीमुळे पंचांच्या निर्णयांमधील अचूकता वाढली असली, तरी त्याच वेळी खेळाचा वेग, उत्स्फूर्तता आणि प्रेक्षकांचा अनुभव यांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परिणामी, फुटबॉलमधील मानवी निर्णय आणि तांत्रिक अचूकता यांच्यातील संघर्ष अधिक ठळकपणे समोर आला आहे.
‘व्हीएआर’चा हेतू काय?
‘व्हीएआर’ ही प्रणाली मैदानावरील मुख्य पंचांना महत्त्वाच्या निर्णयांमध्ये मदत करण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. सामन्यात एखादा गोल, पेनल्टी, रेड कार्ड किंवा चुकीच्या खेळाडूला कार्ड दाखवले जाणे या चारच प्रसंगी पंचांकडून ‘स्पष्ट आणि उघड चूक’ झाल्याचे आढळल्यास ‘व्हीएआर’चा चमू व्हिडिओ रिप्ले तपासतो आणि आवश्यक असल्यास मुख्य पंचांना पुनरावलोकनाची सूचना करतो. या चमूत सगळे पंच किंवा रेफरीच असतात. पण ते स्टेडियममधील दालनात बसलेले असतात. त्यांची खातरजमा होत नाही तेव्हा तसे मैदानावरील रेफरीला मैदानाच्या बाजूला असलेल्या मॉनिटरवर रिप्ले पाहून अंतिम निर्णय घेण्याचा सल्ला देतात. ‘ऑफसाइड’सारख्या तथ्याधारित निर्णयांमध्ये मात्र ‘व्हीएआर’ थेट निष्कर्ष देऊ शकते.
‘व्हीएआर’ कसे काम करते?
प्रत्येक सामन्यात स्वतंत्र ‘व्हीएआर’ चमू अनेक कॅमेऱ्यांच्या साहाय्याने प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवतो. हा चमू मैदानावरील पंच, साहाय्यक पंच आणि चौथ्या पंचांशी सातत्याने संपर्कात असतो. व्यक्तिसापेक्ष निर्णयांमध्ये अंतिम अधिकार मैदानावरील मुख्य पंचाकडेच राहतो. ‘व्हीएआर’ प्रणाली केवळ साहाय्यकाची भूमिका बजावते. त्यामुळे अंतिम निर्णय हा मानवी विवेकबुद्धीवरच आधारित असतो. या विश्वचषकापूर्वी ‘व्हीएआर’ला गोल, पेनल्टी, रेड कार्ड आणि चुकीची ओळख या चारच प्रकारच्या घटनांमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार होता. यंदाच्या स्पर्धेत कॉर्नर किक आणि दुसरे पिवळे कार्ड अशा काही अतिरिक्त बाबींचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र, इतर नियमित निर्णयांमध्ये ‘व्हीएआर’ हस्तक्षेप करू शकत नाही.
निर्णयांमधील अचूकता वाढली का?
‘व्हीएआर’ प्रणालीतील सर्वांत महत्त्वाची संकल्पना म्हणजे ‘स्पष्ट आणि उघड चूक’. हा निकष जाणीवपूर्वक अत्यंत कठोर ठेवण्यात आला आहे. रिप्लेमधून पंचांचा निर्णय स्पष्टपणे चुकीचा असल्याचे सिद्ध झाल्यासच ‘व्हीएआर’ हस्तक्षेप करते. त्यामुळे प्रत्येक वादग्रस्त निर्णयाचा पुनर्विचार केला जात नाही. या तंत्रज्ञानामुळे फुटबॉलमधील निर्णयांची अचूकता निश्चितच वाढली आहे. गोल, ऑफसाइड, हँडबॉल आणि पेनल्टीसारख्या निर्णायक घटनांमध्ये होणाऱ्या गंभीर चुका मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. सामन्यांच्या निकालावर परिणाम करणाऱ्या चुकीच्या निर्णयांना आळा बसला असून पंचांवरील पक्षपातीपणाचे आरोपही काही प्रमाणात कमी झाले आहेत. खेळाडूंमध्ये शिस्त वाढण्यास आणि नियमांचे काटेकोर पालन होण्यासही ‘व्हीएआर’मुळे मदत झाली आहे.
अर्जेंटिना-इजिप्त सामन्यात वाद काय?
गोलपूर्वीच्या फाऊलच्या पुनरावलोकनासाठी कालमर्यादा निश्चित करणे आवश्यक झाले आहे. सध्या एखाद्या फाऊलनंतर अनेक पास झाल्यानंतर आणि दुसऱ्या टोकाला गोल झाल्यानंतरही ‘व्हीएआर’ मागील घटना तपासून गोल रद्द करू शकते. असा काहीसा प्रकार अर्जेंटिना आणि इजिप्त संघांतील विश्वचषक उपउपांत्यपूर्व सामन्यात घडला. त्यावेळी फाऊलनंतर १७ सेकंदांनी, एका टोकावरून दुसऱ्या टोकावर झालेल्या गोलनंतर पंचांनी ‘व्हीएआर’च्या आधारे इजिप्तचा गोल रद्द केला. त्यामुळे इजिप्तने पंचांवर पक्षपातीपणाचा आरोप केला.
तंत्रज्ञानावर टीका का?
या तंत्रज्ञानावर गंभीर टीकाही होत आहे. फुटबॉलमधील गोल झाल्यानंतरचा आनंद आणि जल्लोष आता अनेकदा काही मिनिटांसाठी थांबतो, कारण गोल ग्राह्य ठरणार की नाही याची प्रतीक्षा करावी लागते. यामुळे खेळाची नैसर्गिक लय खंडित होते. विशेषतः ऑफसाइडचे निर्णय अत्यंत सूक्ष्म फरकांवर घेतले जात असल्याने सामान्य प्रेक्षकांना ते समजणे कठीण जाते. परिणामी, तांत्रिक अचूकता वाढली असली, तरी खेळातील भावनिक थरार आणि उत्सफूर्तपणा कमी झाल्याची भावना अनेक चाहत्यांमध्ये आहे. फुटबॉल हा मुळात व्यक्तिसापेक्ष निर्णयांवर आधारित खेळ आहे. प्रत्येक फाऊल, शारीरिक संपर्क किंवा हँडबॉलचे स्वरूप वेगवेगळे असते. त्यामुळे कोणतेही तंत्रज्ञान अशा निर्णयांमध्ये शंभर टक्के अचूकता देऊ शकत नाही. म्हणूनच ‘व्हीएआर’ अस्तित्वात असूनही वाद कायम राहतात.
काय सुधारणा आवश्यक?
सध्याच्या विश्वचषकातील अनुभव पाहता, ‘फिफा’ने ‘व्हीएआर’ प्रणालीमध्ये काही महत्त्वाच्या सुधारणा करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम पंच आणि ‘व्हीएआर’ चमूमधील संवाद अधिक पारदर्शक करणे गरजेचे आहे. सध्या हा संवाद प्रेक्षकांना ऐकू येत नाही. त्यामुळे अनेकदा निर्णयांबाबत संशय निर्माण होतो. हा संवाद सार्वजनिक केल्यास पंचांनी कोणत्या कारणावरून गोल रद्द केला किंवा रेड कार्ड दिले, हे सर्वांना स्पष्ट होईल. दुसरी महत्त्वाची सुधारणा म्हणजे स्लो मोशनचा मर्यादित वापर. फाऊल किंवा शारीरिक संपर्कासारख्या घटनांचे मूल्यांकन करताना प्रत्यक्ष गतीतील फुटेज अधिक महत्त्वाचे मानले पाहिजे. स्लो मोशनमध्ये साधा संपर्कही अधिक गंभीर वाटू शकतो. त्यामुळे स्लो मोशनचा वापर केवळ चेंडू शरीराला कुठे लागला किंवा खेळाडू रेषेच्या आत होता की बाहेर, अशा घटनांपुरताच मर्यादित ठेवणे अधिक योग्य ठरेल.
अतिरेक टाळणे आवश्यक?
‘व्हीएआर’मुळे फुटबॉलमधील निर्णयांची गुणवत्ता आणि अचूकता निश्चितच वाढली आहे. मात्र, तंत्रज्ञानाचा अतिरेक झाल्यास खेळातील मानवी भावना, वेग आणि उत्स्फूर्तता यांना धक्का बसू शकतो. फुटबॉलची खरी ओळख त्याच्या अखंड प्रवाहात, क्षणाक्षणाला बदलणाऱ्या रोमांचात आणि मानवी निर्णयांमध्ये आहे. त्यामुळे तंत्रज्ञान हे पंचांची जागा घेण्यासाठी नव्हे, तर त्यांना आवश्यक तेवढीच मदत करण्यासाठी वापरले गेले पाहिजे. ‘फिफा’नेही ‘व्हीएआर’चा वापर खेळावर नियंत्रण ठेवणारे साधन म्हणून नव्हे, तर न्याय्य, पारदर्शक आणि विश्वासार्ह निर्णय प्रक्रियेला साहाय्य करणारी यंत्रणा म्हणून मर्यादित ठेवले, तर फुटबॉलचा वेगवान आणि रोमांचक आत्मा कायम राखणे शक्य होईल.
