महाराष्ट्रात येवला येथे एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने आपल्या कांद्याच्या उभ्या शेतात मेंढ्या सोडून दिल्या; तर नाशिकच्या एका शेतकऱ्याने होळीच्या निमित्ताने आपल्या कांद्याच्या उभ्या पिकाची होळी पेटवली. या आणि अशा स्वरूपाच्या अनेक बातम्या सध्या चर्चेत आहेत. कांद्याच्या विक्रमी उत्पादनामुळे बाजारपेठेत तो कवडीमोल ठरला आहे. गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा शेतकऱ्यालाही सद्ध्या रडवतो आहे. यामुळेच दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्र सरकारविरोधात मोर्चा काढला होता. परिणामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कवडीमोल ठरलेला कांदा राज्य सरकार उत्पादक शेतकऱ्यांकडून ३०० रुपये क्विंटल या भावाने खरेदी करेल, अशी घोषणा अलीकडेच केली. कांदा उत्पादक देशांच्या यादीत भारत हा अग्रेसर आहे. महाराष्ट्र हे सर्वाधिक कांदा उत्पादन करणारे राज्य आहे. असे असताना त्याच कांद्याला एपीएमसीसारख्या बाजारपेठेत किलोला एक रुपया दर मिळाला आणि कांद्याच्या अर्थकारण कोलमडले. याच पार्श्वभूमीवर कांद्याच्या आजवरचा रंजक इतिहास जाणून घेण्याचा हा प्रयत्न.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कांद्याचे मूळ कुठचे आहे?
कांदा मूलतः समशीतोष्ण कटिबंधातील उत्पादन आहे. आधुनिक काळात संपूर्ण जगात कांद्याचे उत्पादन घेतले जात असले, तरी कांद्याची जन्मभूमी म्हणून इजिप्त, भारत व चीनसारख्या प्राचीन संस्कृतींकडे पाहिले जाते. कांद्यामध्ये पोषक तत्त्वे कमी असली तरी त्याच्या औषधी गुणधर्मांमुळे कांद्याचा वापर रोजच्या आहारात केला जातो. विशेष म्हणजे इतिहासात डोकावून पाहताना भारत व चीन या देशांमध्ये कांद्याचा वापर रोजच्या आहारात जेवढ्या मोठ्या प्रमाणात केला जातो, त्या प्रमाणात जगातील इतर भागात क्वचितच केला जात असेल. किंबहुना जगातील इतर भागाचा आढावा घेतल्यावर असे लक्षात येते की, जेवणापेक्षा औषधोपचारासाठी कांदा अधिक वापरला जात होता.

औषधी वापर प्राचीन काळापासून
गेली हजारो वर्षे कांद्याला उपचारात्मक शक्तींचे श्रेय दिले जाते. सर्दी, कानदुखी, स्वरयंत्राचा दाह, जळजळ याशिवाय एखादा प्राणी चावणे यांसारख्या दुखापतींवर कांदा वापरला गेल्याचे लक्षात येते. कांद्याचे जेवणातील महत्त्व वगळता जगाच्या इतिहासात कांद्याविषयी असणाऱ्या धारणा रोचक आहेत. भारतासोबत प्राचीन संस्कृती असलेला देश म्हणजे चीन. या देशातून सापडलेले कांद्याचे पुरावे भारताप्रमाणेच इसवी सनपूर्व ५००० वर्षे इतके मागे जातात. हे पुरावे कांस्ययुगीन संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारे आहेत.

आणखी वाचा: विश्लेषण : इजिप्तमधील पिरॅमिड्सचा भारताशी काही संबंध आहे का?

कांद्याविषयीच्या जगभरातील विविध धारणा

प्राचीन इजिप्तमध्ये लोक कांद्याच्या गोलाकार बल्बला विश्वाचे प्रतीक मानत होते. विशेष म्हणजे इसवी सनपूर्व तिसऱ्या शतकात होऊन गेलेले जगप्रसिद्ध ग्रीक तत्त्ववेत्ता ॲरिस्टॉटल यांनी आपल्या कॉसमॉस थिअरीत एकाग्र गोलाकाराची (concentric spheres) तुलना कांद्याच्या आकाराशी केली आहे. ॲरिस्टॉटल हा प्लुटोचा शिष्य तर ‘अलेक्झांडर द ग्रेट’ याचा गुरू होता. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील ‘प्लिनी द एल्डर’ने त्याच्या ग्रंथात पॉम्पेईमध्ये केल्या जाणाऱ्या कांदा आणि कोबीच्या वापराबद्दल नमूद केलेले आहे. डोळ्यांच्या आजारांमध्ये सुधारणा करण्यासाठी, शांत झोप लागण्यासाठी, तोंड येणे यांसारख्या उष्णतेच्या विकारांवर उपाय म्हणून, त्याचप्रमाणे दातदुखी आणि कुत्रा चावणे आदींवर कांदा कसा व किती उपयुक्त आहे, त्याबद्दल प्राचीन रोमन दस्तावेजांमध्ये माहिती सापडते. पोम्पेई या पुरातत्त्व स्थळावर कांद्याची बाग ही प्लिनीच्या तपशीलवार कथनातील बागांसारखी आहे.

नामकरणाचे मूळ

कांदा हा अँग्लो-फ्रेंच शब्द ‘युनियन’ आणि जुन्या फ्रेंच ‘ओइग्नॉन’ किंवा ‘ओइंगन’ या शब्दापासून इसवी सनाच्या १२ व्या शतकात रूढ झाला. दोन्ही शब्द मूलतः लॅटिन ‘युनियनम’ मधून आले आहेत, ज्याचा अर्थ एकरूपता किंवा एकता असा आहे. कांदा हा अनेक पापुद्र्यांच्या समूहाने एकरूपता साधतो. म्हणूनच हे नाव रूढ झाले असावे, असे भाषातज्ज्ञांना वाटते.

जगाच्या कुठल्या भागात मूलतः कांदा उपलब्ध होता हे सांगणे आज थोडेसे कठीण आहे. इसवी सनपूर्व काळात व्यापाराच्या निमित्ताने रोमन साम्राज्याचा इजिप्त व आशियाई देशांशी आलेल्या संपर्कामुळे रोमन व्यापाऱ्यांच्या माध्यमातून कांदा युरोपात प्रसिद्ध झाला, असे इतिहासकारांना वाटते. असे असले तरी रेड इंडियन्स या अमेरिकेतील मूल निवासी समूहाच्या वापरात कांदा हा आद्य काळापासून होता याचे दाखले मिळतात. रेड इंडियन्स अत्यंत तिखट असलेल्या जंगली कांद्याचा ( Allium canadense) वापर करत.

आणखी वाचा: विश्लेषण : पुरातन वस्तू कायद्याचे महत्त्व काय?

इजिप्तमधील कांदा
विविध हवामानांत आणि कोणत्याही प्रकारच्या मातीत वाढण्याची क्षमता असल्यामुळेच पुरातत्त्वशास्त्रज्ञ, अन्नविषयक अभ्यासक आणि वनस्पतिशास्त्रज्ञांनी कांद्याला जगातील ‘आद्य पीक’ मानले आहे. इजिप्तमधील विविध ऐतिहासिक स्थळांवर उत्खननामध्ये कांद्याचे पुरावशेष मिळालेले आहेत. तत्कालीन जागतिक व्यापारामध्ये इजिप्तची भूमिका अद्वितीय होती. कालांतराने प्राचीन इजिप्तमध्ये फारोनिक आणि नंतर अलेक्झांड्रियन युगात कांदा आदरणीय ठरला होता. उपलब्ध ऐतिहासिक पुराव्यांनुसार कांद्याला सोन्याएवढेच मोल प्राप्त झाले होते. कांद्याच्या पुरावशेषांनुसार कांद्याचे प्राचीनत्व ५००० वर्षे तर दस्तऐवजीय दाखल्यांनुसार कांद्याचे प्राचीनत्व ३५०० वर्षे असल्याचे दिसून येते. इजिप्शियन दफनविधींमध्ये कांद्याचा वापर केला जात होता. प्राचीन इजिप्शियन लोक कांद्याचा बल्ब पूजत होते, त्याचा गोल आकार आणि एकाग्र वलय हे चिरंतन जीवनाचे प्रतीक आहे. रामेसेस चार याच्या डोळ्याच्या खोबणीत पुरातत्त्व अभ्यासकांना कांद्याचे अवशेष सापडले.


ममिफिकेशनसाठी कांद्याचा वापर

इजिप्तमध्ये ममिफिकेशनसाठी वापरल्या जाणार्‍या पट्ट्या एका मिश्रणात बुडवल्या जात होत्या. त्यात एक महत्त्वाचा घटक कांदा होते. जतन केलेले कांदे मृत पार्थिवाच्या उदर आणि छातीच्या पोकळीत तसेच ममीच्या कान आणि आजूबाजूस ठेवलेले होते, तसेच मृताच्या पायाभोवतीही कांदे ठेवलेले होते.


२१ व्या शतकात कांदा
गेल्या सुमारे पाच हजार वर्षांनंतर आता कांदा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला असून अन्नासाठी त्याचप्रमाणे औषधी म्हणूनही त्याचा वापर होताना दिसतो. मात्र अन्नातील वापरामध्ये हजारो पटींनी वाढ झाली असून जगातील सर्व खंडांमध्ये त्याचा वापर होतो. दीर्घकाळ टिकणारे उत्पादन हेदेखील त्याचा वापर वाढण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. जगभरातील कांद्याची व्याप्ती आणि वापर अशा प्रकारे वाढलेला असला तरी त्याच्या प्रत्यक्ष मूल्यामध्ये फारशी वाढ झालेली नाही आणि म्हणूनच आजही त्याच्या रास्त उत्पादनमूल्यासाठी लढा देण्याची, मोर्चा काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aristotle to the 21st century onions interesting journey svs
First published on: 17-03-2023 at 17:43 IST