Artemis 2 NASA Moon Mission Toilet Issue: एकदा किशोर कुमार आपल्या मुलासह लाल किल्ला पाहायला गेले. बरोबर असलेल्या गाईडने संपूर्ण वास्तू फिरवल्यानंतर किशोर कुमार यांनी त्या काळात राजघराण्यातील मंडळी शौचास कुठे जात होती हा प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकताच गाईडही अवाक झाला. साहजिकच या प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे नव्हते. पोट साफ होणं ही कोणत्याही माणसाची मूलभूत गरज असते. आता विचार करा पृथ्वीपासून खूप लांब अंतराळात गेलेल्या स्पेसशिप मध्ये शौचालयाची काय व्यवस्था असेल?
थ्री इडियट्स या बॉलिवूड चित्रपटात अंतराळात वापरण्यासाठी तयार केलेल्या पेनाचा उल्लेख आहे. पेन्सिल स्वस्त असूनही अंतराळात तिचा वापर का होत नाही याचेही कारण संगितले आहे. पेन्सिलचे लीड (शिसे) सहज तुटू शकत होते आणि गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे ते अंतराळात तरंगू शकले असते. यामुळे अंतराळवीर आणि अंतराळयानातील संवेदनशील इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांना धोका निर्माण होऊ शकला असता. याव्यतिरिक्त, पेन्सिल ज्वलनशील असते त्यामुळे अंतराळयानात पेन्सिल वापरली जात नाही. तोच नियम शौचालायसाठी आहे. दरम्यान, शौचालय बिघडले तर काय होवू शकतं याची प्रचिती आर्टेमिस II मोहिमेदरम्यान अलीकडेच आली आहे.
आर्टेमिस II (Artemis II) १ एप्रिल २०२६ रोजी चंद्राच्या दिशेने झेपावले. सध्या ते अवकाशात आहे. कालच (६ एप्रिल) या अंतराळवीरांनी चंद्राच्या सर्वात जवळून (सुमारे ६,५०० किमी अंतरावरून) प्रवास केला आणि चंद्राची ‘पलीकडली बाजू’ (Far side) आपल्या डोळ्यांनी पाहिली. या मोहिमेने मानवी इतिहासातील पृथ्वीपासून सर्वाधिक दूर जाण्याचा विक्रम स्थापित केला आहे (सुमारे ४,०७,७७३ किमी). हे यान १० एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी पॅसिफिक महासागरात उतरण्याची (Splashdown) शक्यता आहे.
चंद्राकडे झेपावणार्या कॅप्सूलमध्ये टॉयलेटसाठी एक खास यंत्रणा बसवलेली आहे. त्या यंत्रणेचं नाव Universal Waste Management System (UWMS) आहे. अंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे साधं टॉयलेट चालत नाही. संपूर्ण मोहीमेत अद्याप कोणताच बिघाड झालेला नव्हता. परंतु, टॉयलेट सिस्टममध्ये पुन्हा पुन्हा अडथळे येत आहेत. सुरुवातीला fault light आला, Mission Control च्या मदतीने crew ने ते restore केलं. काही वृत्तांनुसार नंतर venting/ urine handling बद्दलही अडचणी आल्या. आर्टेमिस II मोहीम एकूण चांगली चालली होती; मात्र अंतराळवीरांसाठी बसवलेल्या टॉयलेट यंत्रणेत वारंवार बिघाड होत असल्याने ती NASAसाठी डोकेदुखी ठरली आहे.
युनिव्हर्सल वेस्ट मॅनेजमेंट सिस्टम कसे काम करते?
लॉकहीड मार्टिनने विकसित केलेल्या ‘ओरियन’ (Orion) क्रू कॅप्सूलमध्ये, १० दिवसांच्या या मोहिमेदरम्यान अंतराळवीरांच्या वापरासाठी ‘युनिव्हर्सल वेस्ट मॅनेजमेंट सिस्टम’ (Universal Waste Management System) बसवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हे शौचालय साधारणपणे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) वापरल्या जाणाऱ्या अंतराळ शौचालयासारखेच आहे. परंतु, उड्डाणादरम्यान हे गुंतागुंतीचे उपकरण (Equipment) व्यवस्थित कार्यान्वित करणे ही एक वारंवार उद्भवणारी समस्या ठरली.

या ‘युनिव्हर्सल वेस्ट मॅनेजमेंट सिस्टम’मध्ये (UWMS) लघवीसाठी एक फनेल (नरसाळे) आणि नळी (Hose) बसवण्यात आली आहे, तर शौचासाठी छिद्र असलेली एक आसन व्यवस्था आहे. अंतराळवीर ‘मायक्रोग्रॅविटी’मध्ये (कमी गुरुत्वाकर्षण) असल्याने, हे शौचालय हवेच्या प्रवाहावर (Air Flow) अवलंबून असते. हा हवेचा प्रवाह कचरा खेचून शौचालयात ढकलतो आणि कॅप्सूल स्वच्छ राहील याची खात्री करतो. शौचालय वापरताना स्वतःला स्थिर ठेवण्यासाठी अंतराळवीर तिथे असलेल्या ‘फूटस्ट्रॅप्स’ (पायाचे पट्टे) आणि हँडल्सचा वापर करू शकतात.
आर्टेमिस II च्या प्रवासाच्या पहिल्याच दिवशी, अंतराळवीर अवकाशात पोहोचल्यानंतर लगेचच शौचालयात काहीतरी बिघाड असल्याचे संकेत मिळाले. अखेर, अंतराळवीर ख्रिस्तिना कोच यांनी मिशन कंट्रोलच्या मदतीने शौचालय पुन्हा सुरू केलं. त्यांनी मजेत स्वतःला स्पेस प्लंबर असंही म्हटलं. शेवटी असं लक्षात आले की, ही समस्या शौचालयाच्या पंपाशी संबंधित होती. हा पंप व्यवस्थित सुरू होण्यासाठी (Primed) त्यामध्ये अतिरिक्त पाण्याची गरज होती. आर्टेमिस II चे फ्लाईट डायरेक्टर जड फ्रिलिंग म्हणाले, “एकदा आमच्या लक्षात आले की आम्ही पुरेसे पाणी टाकलेले नाहीये, तेव्हा आम्ही त्यात आणखी पाणी ओतले आणि तो पंप वापरासाठी तयार (Prime) असल्याची खात्री केली. त्यानंतर शौचालय पुन्हा व्यवस्थित सुरू झाले.”
आणखी एकदा शौचालय बिघडले
परंतु हे सगळं एवढ्यावरच संपलं नाही. शौचालयाने पुन्हा एकदा त्रास द्यायला सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) सांडपाणी साठवून त्यावर प्रक्रिया केली जाते आणि ‘क्लोज्ड लूप सिस्टम’द्वारे ते पुन्हा वापरले जाते. मात्र, याच्या उलट आर्टेमिस II मोहिमेत सांडपाणी ठराविक अंतराने थेट अंतराळात सोडून दिले जाते. हे पाणी बाहेर सोडले जात असताना, त्याचे चमकणारे कण ओरियनच्या खिडकीतून बाहेर प्रवाहित होताना दिसलं, जे अंतराळवीरांनी टिपलेल्या व्हिडिओमध्येही स्पष्ट दिसत होते. मात्र, सांडपाणी बाहेर सोडण्याची ही प्रक्रिया अचानक वेळेआधीच थांबली.
शौचालय वापरण्यावर बंदी
नासाला असा संशय आहे की, ज्या नोझलवाटे (Vent Nozzle) हे सांडपाणी अंतराळात सोडले जाते, तिथे कदाचित बर्फ साचल्यामुळे हा अडथळा निर्माण झाला असावा. नासाने या समस्येचे निवारण करत असताना, सुरक्षिततेचा उपाय म्हणून अंतराळवीरांनी लघवीसाठी शौचालयाचा वापर करू नये, असा निर्णय घेतला. मूळ अडचण अशी होती की, त्या कॅप्सूलमध्ये लघवी साठवण्यासाठी मर्यादित जागा उपलब्ध होती.
नासाच्या ‘ओरियन’ उप-कार्यक्रम व्यवस्थापक डेबी कोर्थ यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, “या वाहनातील युरिन टँक (लघवी साठवण्याची टाकी) ही तुमच्या ऑफिसमधील एका छोट्या कचऱ्याच्या डब्याएवढीच असते. त्यामुळे त्यात आणखी काही साठवण्यापूर्वी ती रिकामी करणे आवश्यक असते.” मात्र, अंतराळवीरांना शौचासाठी (Bowel movements) शौचालयाचा वापर करण्याची मुभा होती, कारण हा कचरा पाण्याला अटकाव करणाऱ्या (Water-tight) पिशव्यांमध्ये गोळा केला जातो.
कोलॅप्सिबल कंटिंजन्सी युरिनल्स
लघवीसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून, अंतराळवीर ‘कोलॅप्सिबल कंटिंजन्सी युरिनल्स’चा (Collapsible Contingency Urinals) वापर करू शकत होते. ही लांब नळीसारखी पात्रे असतात, जी द्रवाचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी तयार केलेली असतात. नासाचे प्रशासक जेरेड आयझॅकमन यांनी रविवारी सीएनएनच्या ‘स्टेट ऑफ द युनियन’ कार्यक्रमात सांगितले की, “आज आपण अंतराळात अनेक विलक्षण गोष्टी करू शकतो, पण ही विशिष्ट क्षमता (शौचालयाचे तंत्रज्ञान) अचूकपणे विकसित करण्यावर आपल्याला अजून बरेच काम करण्याची गरज आहे.” अंतराळात शौचालयाला बर्फामुळे अडथळा येण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत.
‘STS-41-D’ या स्पेस शटल मोहीम
अंतराळात शौचालयाचा खोळंबा होण्याची ही पहिलीच वेळ नाही. १९८४ मधल्या ‘STS-41-D’ या स्पेस शटल मोहिमेतही असाच एक गमतीशीर पण तितकाच त्रासदायक प्रसंग घडला होता. शौचालयाचं सांडपाणी बाहेर सोडणाऱ्या नळीपाशी (व्हेंट) बर्फाचा एक मोठा गोळा साचला होता, ज्यामुळे अख्खं शौचालयच ठप्प झालं. त्यामुळे अंतराळवीरांना मोहिमेचा मोठा भाग ‘बॅकअप पिशव्यांचा’ वापर करून काढावा लागला होता. अखेर शटलच्या ‘रोबोटिक हाताने’ तो बर्फाचा गोळा तोडल्यानंतर त्यांनी सुटकेचा श्वास घेतला.
आताच्या ‘आर्टेमिस II’ मोहिमेतही नेमकी हीच अडचण समोर आली. पण यावेळी नासाने एक भलतीच हुशार युक्ती लढवली. त्यांनी कोणत्याही यांत्रिक हाताचा वापर न करता, संपूर्ण ‘ओरियन’ कॅप्सूलची दिशाच फिरवली. शौचालयाचा तो बर्फ जमलेला भाग त्यांनी काही तास थेट कडक उन्हात धरला. सूर्याच्या नैसर्गिक उष्णतेने तो बर्फ वितळावा हा त्यामागचा साधा पण मास्टर प्लॅन होता आणि तो अगदी यशस्वी ठरला!
बर्फ वितळला आहे की नाही हे पाहण्यासाठी अंतराळवीरांनी सांडपाणी बाहेर सोडण्याच्या काही चाचण्या केल्या. सुरुवातीला पाण्याचा प्रवाह थोडा अडखळत होता, पण अखेर शनिवारी रात्री ‘मिशन कंट्रोल’कडून ती आनंदाची बातमी आलीच! जॉन्सन स्पेस सेंटरमधील अधिकाऱ्याने रेडिओवरून जाहीर केलं, “मित्रांनो, एक मोठी खूशखबर आहे! सिस्टिम आता पूर्णपणे ठीक झाली असून, तुम्ही आता बिनधास्तपणे शौचालयाचा वापर करू शकता.”
