Understand the paradigm shift driven by Artificial Intelligence in Warfare and the crucial Russia Ukraine War lessons: “ज्याच्याकडे सर्वाधिक सैनिक असतात तो नव्हे; तर ज्याच्याकडे सर्वाधिक वेगाने निर्णय घेणारी यंत्रणा, तोच जिंकण्याची सर्वाधिक शक्यता” हे आधुनिक युद्धाचे नवे सूत्र ठरते आहे. युक्रेनचे आकाशात उडणारे एक छोटेसे ड्रोन अचानक दिशा बदलते, शत्रूचा रणगाडा ओळखते आणि मानवीच्या आदेशाशिवाय क्षणार्धात तो जमीनदोस्त करते. हे कोणत्याही साय-फाय सिनेमातील दृश्य नाही तर कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (AI) बदललेले आजच्या युद्धाचे भीषण वास्तव आहे.

साय-फाय नव्हे प्र त्यक्ष घडलेली घटना

युक्रेनच्या ड्रोनने केलेला हल्ला हा मानवी आदेशाशिवाय झालेला असतो. ड्रोनच्या कॅमेऱ्याला जमिनीवर एक रणगाडा नजरेस पडलेला असतो आणि तो शत्रूचा आहे, हेही लक्षात आलेले असते. कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) त्या रणगाड्याचा आकार, त्यातून येणाऱ्या उष्णतेची प्रतिमा आणि हालचाल यांचा क्षणात अभ्यास करते आणि इलेक्ट्रॉनिक जॅमिंगमुळे GPS बंद पडलेले असतानाही ते ड्रोन पुढच्या काही सेकंदांतच हल्ला करून रणगाडा जमीनदोस्त करते… ही रशिया- युक्रेन युद्धात प्रत्यक्ष घडलेली घटना आहे.

युद्धभूमीवरही डेटा महत्त्वाचा

रशिया-युक्रेन युद्धाने जगाला दाखवून दिले आहे की, भविष्यातील युद्धे केवळ रणगाडे, क्षेपणास्त्रे किंवा लढाऊ विमाने यांच्या बळावर लढली जाणार नाहीत. तर माहितीचे विश्लेषण, अल्गोरिदम, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वायत्त ड्रोन यंत्रणा, उपग्रह आणि डिजिटल नेटवर्क ही युद्धातील निर्णायक शस्त्रे असतील. त्यामुळेच युद्धभूमीवर आता तोफगोळ्यांपेक्षा डेटाचा वेग अधिक महत्त्वाचा ठरतो आहे, असे जगभरातील संरक्षणतज्ज्ञांचे मत आहे.

युद्धातील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक AI ड्रोनचा वापर. (Image-Gemini)

युद्धात AI म्हणजे नेमके काय?

कृत्रिम बुद्धिमत्तेचा युद्धातील वापर म्हणजे फक्त रोबो सैनिक नव्हे. AI अनेक स्तरांवर काम करत असते, ते पुढीलप्रमाणे…

  • लाखो उपग्रह छायाचित्रांचे काही सेकंदांत विश्लेषण
  • शत्रूच्या हालचालींचा अंदाज
  • ड्रोनना स्वायत्त मार्गदर्शन
  • क्षेपणास्त्रांसाठी अचूक लक्ष्य निश्चिती
  • इलेक्ट्रॉनिक जॅमिंगला चकवा देणे
  • हजारो सेन्सरमधून आलेल्या माहितीचे एकत्रित विश्लेषण
  • कमांडिंग अधिकाऱ्याला निर्णय घेण्यासाठी क्षणार्धात पर्याय सुचवणे

पूर्वी ही सर्व कामे करण्यासाठी अनेक अधिकारी असत आणि त्यांना त्यासाठी बराच वेळ लागत असे. आता ही प्रक्रिया अवघ्या काही सेकंदांत पूर्ण होत असते.

रशिया-युक्रेन युद्धाने काय बदलले?

रशिया- युक्रेन युद्धाच्या सुरुवातीला जगाचे लक्ष रणगाडे आणि क्षेपणास्त्रांकडे होते. पण नंतरच्या दोन -तीन वर्षांत या युद्धाचे चित्र बदलले. सध्या हजारो ड्रोन्स एकाच वेळेस उड्डाण करत असतात. हे ड्रोन केवळ हल्ला करत नाहीत, तर शत्रूची माहिती गोळा करतात, तोफखान्यासाठी लक्ष्यनिश्चिती करतात, आणि प्रसंगी जखमी सैनिकांपर्यंत औषधेही पोहोचवतात. युक्रेनने AI च्या मदतीने ड्रोनची लक्ष्य निश्चित करण्याची क्षमता वाढवत नेली आहे. दुसरीकडे रशियाने इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणालींचा वापर करून ड्रोन्स निष्क्रिय करण्याचा प्रयत्न केला. परिणामी दोन्ही बाजूंनी ‘AI विरुद्ध AI’ अशी नवी स्पर्धा सुरू झाली. यामुळेच जगभरात सामरिक तज्ज्ञांच्या लक्षात आलेला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे युद्ध आता शस्त्रांचे कमी आणि सॉफ्टवेअरचे अधिक झाले आहे.

AI फक्त हल्ला नाही; विचारही करतं

युद्धातील प्रत्येक सेकंद आता अधिक महत्त्वाचा आहे. उदाहरणार्थ, उपग्रहाच्या माध्यमातून तासात ५० हजार छायाचित्रे आली. त्यातील कोणत्या छायाचित्रात शत्रूची हालचाल आहे हे माणसाला शोधण्यासाठी काही तास लागतील. पण AI काही सेकंदांत रणगाडे ओळखतं, सैनिकांची हालचाल शोधतं, नवीन बंकर तयार झाला आहे का या शोध घेतं आणि संभाव्य हल्ल्याचा अंदाजही व्यक्त करतं. यामुळे कमांडिंग अधिकाऱ्याला अधिक वेगाने निर्णय घेता येतो.

ड्रोन युद्धाचा नवा अध्याय

एकेकाळी ड्रोन म्हणजे फक्त निरीक्षण करणारे मानवरहीत विमान असे मानले जात होते. आज परिस्थिती पूर्ण बदलली आहे. FPV (First Person View) ड्रोन अवघ्या काही लाखांमध्ये तयार होतात. पण काही कोटी किमतीचे रणगाडे नष्ट करण्याची क्षमता राखतात. युक्रेनने या स्वस्त ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. रशियानेही त्याला उत्तर म्हणून AI-आधारित ड्रोन विकसित करण्यास सुरुवात केली. यामुळे युद्धाचे अर्थशास्त्रच बदलून गेले आहे. महागड्या शस्त्रांच्या विरोधात स्वस्त आणि बुद्धिमान ड्रोन हेच आजच्या लढाईतील वास्तव असल्याचे रशिया- युक्रेन युद्धाने दाखवू दिले आहे.

GPS बंद? तरीही हल्ला सुरूच

रशिया-युक्रेन युद्धातील एक मोठा धडा म्हणजे इलेक्ट्रॉनिक युद्ध. सध्या युद्धक्षेत्रात GPS सिग्नल जॅम केले जातात. पूर्वी अशा प्रसंगी ड्रोन दिशाहीन होत असत. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आता AI च्या मदतीने अनेक ड्रोन कॅमेऱ्यात दिसणाऱ्या भूभागाची तुलना पूर्वीच्या नकाशांशी करतात. तर काही ड्रोन झाडे, रस्ते, नद्या आणि इमारती ओळखून स्वतःचा मार्ग स्वतः शोधतात. यालाच Visual Navigation किंवा Terrain Matching म्हणतात. यामुळे शत्रूने GPS जॅमर्स लावल्यानंतरही ड्रोन त्याच्या निश्चित लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतात.

डेटा महत्त्वाचा

पूर्वी युद्ध जिंकण्यासाठी इंधन, दारूगोळा आणि सैनिक महत्त्वाचे होते. आता त्यात आणखी एका घटकाची भर पडली आहे, तो म्हणजे डेटा. ड्रोन, उपग्रह, रडार, मोबाइल नेटवर्क, सेन्सर्स, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि सोशल मीडियातून प्रचंड प्रमाणात माहिती उपलब्ध होते. या माहितीचा अर्थ लावणारा देश अधिक सक्षम ठरतो. म्हणूनच AI ला अनेक तज्ज्ञ ‘Force Multiplier’ म्हणजेच क्षमता कैक पटीने वाढविणारे तंत्रज्ञान असे म्हणतात.

स्वायत्त शस्त्रे आणि नैतिक प्रश्न

AI चा वाढता वापर जितका प्रभावी आहे तितकाच तो धोकादायकही आहे, असे तज्ज्ञांना वाटते. एखाद्या शस्त्राने स्वतःच लक्ष्य स्वतःच निवडले आणि हल्ला केला तर त्या निर्णयाची जबाबदारी कोणाची? एआय वापरणारा सैन्याधिकारी, सॉफ्टवेअर निर्माण करणारा अभियंता की, स्वतः AI? याच कळीच्या प्रश्नावर गेल्या काही वर्षांत संयुक्त राष्ट्रसंघात Lethal Autonomous Weapons Systems (LAWS) या विषयावर चर्चा सुरू आहे. जगभरातील काही देशांनी अंतिम निर्णय माणसाचाच असला पाहिजे, असे मत व्यक्त केलेले असले तरी काही देश स्वायत्त शस्त्र विकसित करण्याचे काम वेगात करत आहेत. यामुळे भविष्यातील युद्ध अधिक वेगवान, होण्याची शक्यता आहे.

AI वापरणारे प्रमुख देश

सध्या AI-आधारित संरक्षण तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या देशांमध्ये अमेरिका, चीन, रशिया, इस्रायल, युक्रेन आणि ब्रिटन आघाडीवर आहेत. अमेरिका ‘Project Maven’ सारख्या प्रकल्पांमधून उपग्रह आणि ड्रोन प्रतिमांचे AI विश्लेषण करते. चीन स्वायत्त ड्रोन स्वॉर्म आणि बुद्धिमान युद्ध प्रणालींवर मोठी गुंतवणूक करत आहे. इस्रायलने क्षेपणास्त्र संरक्षण, लक्ष्य ओळखण्यासाठी ड्रोन प्रणालींमध्ये AI चा व्यापक वापर सुरू केला आहे. तर दुसरीकडे युक्रेनने युद्धाच्या गरजेतून अत्यंत वेगाने AI-आधारित तंत्रज्ञान आत्मसात केलेले दिसते आहे. (क्रमश:)

संदर्भसूची

  • Center for Strategic and International Studies (CSIS) – How Russia Is Reshaping Command and Control for AI-Enabled Warfare
  • NATO Review – AI, autonomus systems and war
  • Center for a New American Security (CNAS) – AI and research on national security.
  • RAND Corporation – Artificial Intelligence and National Security
  • U.S. Department of Defense – Project Maven
  • United Nations Convention on Certain Conventional Weapons (CCW) – Lethal Autonomous Weapons Systems (LAWS)
  • NATO Allied Command Transformation – AI, data and multidimentional war
  • DRDO- Innovations for Defence Excellence (iDEX) L Structure