Ashok Kharat Sex Scandal Sinnar: स्वयंघोषित महाराज भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्रासह देशाला हादरवून सोडले आहे. धार्मिक विधीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. खरातच्या सेक्स स्कँडलने राज्यात खळबळ माजवली असताना रोज या प्रकरणी नवीन खुलासे समोर येत आहेत. याप्रकरणात मिरगावच्या नागरिकांनी देखील गंभीर आरोप करत काही आश्चर्यकारक खुलासे केले आहेत. 

‘ईशान्येश्वर मंदिर’ 

सिन्नर-शिर्डी रस्त्यावरुन तीन किलोमीटर अंतरावर अंदाजे १,५०० लोकसंख्या असलेले मिरगाव वसलेले आहे. दूरवर पसरलेला शेतीचा भाग आणि एका बाजुला मानवी वसाहत आहे. गावाला लागूनच असलेला ‘ईशान्येश्वर मंदिर’ परिसर नेहमीच चर्चेत राहायचा. “शनिवारी आणि रविवारी वाहनांच्या मोठ्या रांगा लागत. आलिशान गाड्यांमधून लोक भेट देण्यासाठी यायचे”, असे मिरगावचे गावकरी भीमराव शेळके यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले. 

खरातला अटक केल्यानंतर या परिसरात आता शुकशुकाट पाहायला मिळत असून, परिसरातील अनेक खोल्यांना टाळे लावण्यात आले. स्थानिक दबक्या आवाजात खरातच्या कृष्णकुत्यांची चर्चा करत आहेत, असे चित्र घटनास्थळी भेट दिलेल्या एक्सप्रेस टीमला दिसून आले.

२१ एकर जमिनीची खरेदी

गुंगीचे औषध देऊन लैंगिक शोषण केल्याचा आरोप स्वत:ला कॅप्टन म्हणून घेणाऱ्या खरात विरोधात सात महिलांकडून करण्यात आले आहेत. खरात मूळचा मिरगावचा रहिवासी नाही. तो सिन्नर तालुक्यातीलच कहांडळवाडी गावचा रहिवासी आहे. मिरगाव येथे तो जमीन खरेदी करण्याच्या उद्देशाने आला होता, असे स्थानिकांनी सांगितले. स्थानिकांनी खरातच्या कृत्यांबाबत संताप व्यक्त करत त्याला गावात प्रवेश करण्यापासून कायमची बंदी घालण्याची मागणी केली आहे.

खरातने २००८ -०९ मध्ये मिरगावमध्ये २१ एकर जमीन खरेदी केल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. यानंतर प्रशस्त ‘ईशान्येश्वर मंदिर’ उभारले. मंदिर संकुलाची जागा गावाचाच भाग असल्याचे स्थानिक सांगतात. खरातने कालांतराने फार्महाऊस, मंदिर, मेळाव्यांसाठी खुली जागा यासाठी बांधकाम वाढवले. खरातच्या ताब्यात सध्या ४० ते ५० एकर जमीन असल्याचे गावकऱ्यांनी एक्सप्रेसशी बोलताना सांगितले. 

“त्यानं या जागेत मंदिर उभं केलं. गावकऱ्यांचा याच्याशी काही संबंध नाही. व्यवस्थापन असो किंवा एखादा निर्णय घेणे, यात आमचा सहभाग नाही. मोठा कार्यक्रम असेल तेव्हाच आम्ही भेट द्यायचो. काही गावकरी केवळ महाशिवरात्रीलाच मंदिरात जायचे”, असे अशोक शेळके यांनी सांगितले.

नदीत अतिक्रमण

गोदावरीची उपनदी असलेल्या जाम नदीच्या जवळ हे मंदिर संकुल उभारण्यात आले आहे. खरातने फार्महाऊस उभारताना नदीपात्रात बंधारा बाधून नदित नैसर्गिक प्रवाह खंडीत केला, यामुळे पाण्यावर परिणाम झाला, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. “नदीपात्रात बांधकाम करण्यात आले आहे”, असा आरोप गावकरी अनिल जगताप यांनी केला आहे. फार्महाऊस बांधण्यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी घेण्यात आली होती का? याबाबत आता गावकऱ्यांकडून सवाल उपस्थित केले जात आहेत.

राज्य सरकारकडून निधी

२०१७-१८ मध्ये राज्य पर्यटन योजनेअंतर्गत मंदिरासाठी १.०५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. पैकी २५ लाख रुपये प्राप्त देखील झाल्याची माहिती शासन निर्णयातून उघड झाली आहे. सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेली पाण्याची टाकी आणि दरना धरणातून होणाऱ्या पाणी पुरवठ्याबाबत देखील गावकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले. राज्य सरकारकडून मिळालेल्या निधीमुळे या सगळ्याला अधिकृत पाठिंबा असल्याची धारणा गावकऱ्यांची झाली असे स्थानिक सांगतात.

“मंत्री, ज्येष्ठ नेते मोठा पोलिस फौजफाटा घेऊन येथे भेट देण्यासाठी येतात तेव्हा कोण प्रश्न विचारण्याचे धाडस दाखवेल? यामुळे खरात किती शक्तिशाली झाला होता हे दिसून येते”, असे भीमराव शेळके म्हणतात. “जे कोणी इथं यायचे ते बाहेरचे होते. आमच्यासोबत मिसळत नव्हते”, असेही शेळकेंनी पुढे सांगितले. 

उद्योगपती, राजकीय नेते, मंत्री आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या रांगा

‘खरात केवळ शनिवारी- रविवारी येथे यायचा, इतर दिवशी याठिकाणी सातत्याने वाहनांची गर्दी पाहायला मिळत. मोठे उद्योगपती, राजकीय नेते, मंत्री आणि शासकीय अधिकारी येथे भेट देत’, असे गावकरी सांगतात. “मोठे लोक इथं यायचे त्यांना कोण प्रश्न विचारणार? आम्ही फक्त बघत राहायचो. निधी आणि पाणी येतंय तेव्हा तुमच्या लक्षात येथे की खूप मोठी आणि अधिकृत गोष्ट आहे. त्यामुळे प्रश्न विचारण्याचे धाडस नव्हते”, असे शेळकेंनी पुढे सांगितले. 

‘खरातने १५० देशांनी भेट दिली आहे. त्याला अनेक भाषा बोलता येतात, तो जे बोलतो ते सत्य होते, त्याच्याकडे दैवीशक्ती आहे, असे बाहेरच्या लोकांनी केलेले दावेच केवळ आम्ही ऐकले होते’, असे गावकरी सांगतात. 

अजून भीतीचे वातावरण आणि पोलिसांची कारवाई

“लोकांमध्ये एकप्रकारची भीती होती त्यामुळे ते बाहेर वाच्यता करत नव्हते. आत्ताही अनेक लोक भीतीपोटी बोलत नाहीयेत. कदाचित बाहेर आल्यावर मोठे संबंध उघड होऊ शकतात अशी भीती अनेकांच्या मनात आहे”, असे शेकळे म्हणाले. 

खरातला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या नाशिक आणि सिन्नर येथील मालमत्तेत झाडझडती केली. पोलिसांनी त्याच्या घरातून बंदूक, जिंवत काडतूस, आठ लाख रोख रक्कम, दोन लॅपटॉप आणि कोट्यवधींच्या जमीन व्यवहारांची कागदपत्रं जप्त केली आहेत. खरात आणि त्याच्या कुटुंबाशी निगडीत मालमत्ता नाशिक, सिन्नर आणि आहिल्यानगरच्या काही भागात (शिर्डी, राहता) आढळून आली आहे. ४० कोटींची त्याची मालमत्ता असल्याचे आत्तापर्यंतच्या तपासात आढळून आले आहे. 

खरातला गावात प्रवेशबंदीची मागणी

“त्याचा इतिहास आणि कृत्यांची माहिती असती तर कदाचित त्याला इथं कधीच येऊ दिल नसतं. त्याचा आम्हाला काही उपयोग नाही. त्याने केवळ समस्याच निर्माण केल्यात”, असे भीमराव शेळके म्हणाले. तर, “खरातने गावाचं नाव खराब केलं, त्याला परत इथं प्रवेश दिला नाही पाहिजे”, असे अनिल जगताप म्हणाले. ‘खरातला गावात प्रवेशबंदी करण्याबाबत लवकरच ग्रामसभेत ठराव घेतला जाईल’, असेही शेळके म्हणाले. 

दरम्यान, “मंदिर ट्रस्ट धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारीत येते, गाव त्यावर ताबा अथवा नियंत्रण घेऊ शकत नाही. याबाबत धर्मादाय आयुक्तांना निर्णय घ्यावा लागतो,” असे ग्रामसेवक केतन निकम म्हणाले.