Sapna Didi Dawood Ibrahim revenge: मुंबईच्या गुन्हेगारी जगतात दाऊद इब्राहिम, अरुण गवळी आणि छोटा शकील यांचा वरचष्मा असताना, पतीच्या हत्येचा सूड घेण्यासाठी एका सामान्य स्त्रीने ‘सपना दीदी’ होवून थेट दाऊदच्या साम्राज्याला हादरवून सोडले होते. १९८० च्या दशकातील या थरारक कहाणीत सूड, शस्त्र तस्करी, गुप्तचर जाळे आणि छोटा शकील टोळीचा निर्घृण अंत असा अंगावर शहारे आणणारा इतिहास दडला आहे.
दुबईत राहून मुंबईतील गुन्हेगारी साम्राज्याची सूत्रे हलविणाऱ्या दाऊदची प्रचंड दहशत होती. मुंबई पोलिसांना दाऊदकडूनच प्रतिस्पर्धी गुंडाची टीप दिली जात होती. आपल्याला डोईजड झालेल्या हस्तकांना वा प्रतिस्पर्ध्यांना दाऊद पोलिसांमार्फत ठार करीत होता. पठाण टोळीतील मेहम्मूद खान ऊर्फ काल्या हा चकमकीत ठार झाला. दाऊदने टीप दिल्याचे जेव्हा त्याच्या पत्नीला कळले तेव्हा तिने थेट दाऊदला मारण्याची योजना आखली. सपना दीदी या नावाने ती गुन्हेगारी जगतात ओळखली जाऊ लागली. दाऊदचा या कटाचा सुगावा लागला आणि छोटा शकील टोळीने केलेल्या निर्घृण हत्येने गुन्हेगारी जगतही हादरले.
मुंबईतील गुन्हेगारी जगतात दाऊद, अरुण गवळी, अमर नाईक, छोटा शकील, छोटा राजन आदींचा वरचष्मा वाढत चालला होता. दाऊदही जिला मानायचा, ती झैनाब दरवेश गांधी ऊर्फ जेनाबाई हिचे ‘महिला माफिया’ म्हणून एक स्थान होते. गुन्हेगारी जगतात तिला आदर होता. परंतु पुरुषांचे प्राबल्य असलेल्या गुन्हेगारी जगतात ‘महिला माफिया टिकणे कठीण होते. अशातच ‘सपना दीदी’ ही महिला माफिया नवऱ्याच्या हत्येचा सूड घेण्यातून निर्माण झाली होती. तिने थेट दाऊदलाच आव्हान दिले होते. परंतु बलाढ्य दाऊद टोळीपुढे तिचा टिकाव लागणे शक्यच नव्हते आणि तसेच झाले. अंत्यत निर्घृणपणे तिची हत्या करण्यात आली.
मेहम्मूद खान चकमकीत ठार
१९८० च्या दशकातील शेवटचा काळ होता. मुंबईच्या सांताक्रूझ विमानतळाबाहेर जुलै १९८६ मध्ये गुन्हे अन्वेषण विभागाचे तेव्हाचे चकमक फेम पोलीस निरीक्षक इमॅन्युअल अमोलिक यांनी मेहम्मूद काल्या ऊर्फ मेहम्मूद खान याला चकमकीत ठार केले. मेहम्मूदची पत्नी अश्रफ खान हिच्या डोळ्यादेखत ही चकमक झाली. दुबईहून परतलेल्या मेहम्मूदला घ्यायला ती विमानतळावर आली होती. परंतु चकमकीत ठार झालेल्या नवऱ्याचा मृतदेह तिला पाहावा लागला. मेहम्मूद काल्या हा पठाण टोळीचा कट्टर हस्तक होता. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी आदी गुन्हे दाखल होते. पोलिसांनी त्याला शरण येण्यास सांगितले. परंतु त्याने पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो ठार झाला, असे प्रसिद्धी पत्रक पोलिसांनी जारी केले व वृत्तपत्रात ‘कट्टर गुंड चकमकीत ठार’, अशी बातमी झळकली.
या बातमीने मेहम्मूदची पत्नी अस्वस्थ झाली. आपल्यासमोर आपल्या पतीची हत्या केल्याचा तिचा दावा होता. दुबईहून परतलेल्या नवऱ्याला मारण्यात आले, असा तिचा आरोप होता. कारण दुबईहून निघताना मेहम्मूदने तिला आपले दुबईतील ‘डील’ फिसकटल्याचे सांगितले होते. ती त्याला घ्यायला सांताक्रुझ विमानतळावर गेली. परंतु नवऱ्याची भेट झाली नाही. चकमकीत तो ठार झाला. हे तिला पचलेच नाही. ही खोटी चकमक असल्याचाबाबत तिने त्यावेळी न्यायालयात याचिका दाखल केली. या प्रकरणी न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले. परंतु चौकशीत अमोलिक यांना क्लिन चीट मिळाली. हेच अमोलिक गोव्याला चार्ल्स शोभराज याला अटक करण्यासाठी गेलेल्या मधुकर झेंडे यांच्या पथकात होते. जेव्हा चार्ल्स शोभराज हाती लागला, तेव्हा अमोलिक यांनी म्हणे त्याच्यावर बंदूक रोखली होती. परंतु झेंडे यांना चार्ल्स शोभराज जिवंत हवा होता, अशी आठवण सांगितली जाते.
न्यायालयात न्याय मिळेल, असे अश्रफला वाटत होते. परंतु ती निराश झाली नाही. तिने यामागील सुगावा लावण्याचे ठरविले. मुस्लिम समाजात नवऱ्याच्या मृत्यूनंतर पत्नी साधारण तीन महिने घराबाहेर पडत नाही. परंतु मेहम्मूदला बडा कब्रस्थान येथे पुरण्यात आले, त्याच दिवसापासून ती बुरखा घालून घराबाहेर पडली होती. कब्रस्थानात महिलांना प्रवेश नसतो. तरीही ती मेहम्मुदच्या कबरीजवळ आली. तेव्हा तेथे आलेल्या उस्मान नावाच्या इसमाने मेहम्मूदची हत्या दुबईत असलेल्या दाऊदने केल्याचे सांगितले. उस्मान मेहम्मूदला चांगला ओळखत होता. दाऊदनेच पोलिसांना टीप दिली व तो मग चकमकीत मारला गेला. तेव्हाच तिने ठरवले की, नवऱ्याच्या हत्येचा बदला घ्यायचा. दाऊदला मारण्याचे तिने ठरवले. त्या इसमानेच दाऊदचा कट्टर विरोधक व पोलिसांचा खबरी मोहम्मद हुसैन शेख ऊर्फ वस्तरा याच्याकडे जाण्याचा सल्ला दिला.
‘दाऊदला ठार मारायचे आहे’
गुन्हेगारी जगताशी काहीही संबंध नसलेली अश्रफ थेट हुसैन वस्तरा याला भेटली. अश्रफ दिसायला खूपच सुंदर व आकर्षक होती. हुसैन हा तसा स्रीलंपट होता. पैसे देऊन महिलांचा उपभोग घेणे हा त्याचा आवडता छंद होता. सुरुवातीला जेव्हा अश्रफ त्यांच्याकडे आली तेव्हा त्याला तसेच वाटले. परंतु काही क्षणातच त्याच्या भ्रमाचा भोपळा फुटला. ‘आपल्याला दाऊदला ठार मारायचे आहे’, असे सांगताच तोही क्षणभर बुचकळ्यात पडला. पती मेहम्मूदच्या हत्येचा बदला घ्यायचा आहे, असेच सतत ती बडबडत होती. दाऊद हा तसा हुसैनचाही शत्रु होता. तिच्या सौंदर्याने भाळलेल्याने हुसैनने तिला शस्त्र चालविण्याचे, स्वसंरक्षणासाठी मार्शल आर्ट आणि मोटरसायकल चालविण्याचे प्रशिक्षण देण्याचे मान्य केले. तीही सतत हुसैनकडे येऊ लागली. तीन-चार महिन्यांतच ती पारंगत झाली. बुरखा काढून ती आता जीन्स आणि टॉप वापरु लागली. बाईकवर बिनधास्त फिरु लागली. पतीच्या हत्येचा बदला हे काही तिच्या डोक्यातून जात नव्हते.
हुसैन वस्तरा हा दाऊदचा कट्टर विरोधक. पाकिटमारीत माहिर असलेल्या हुसैनने एकदा मोठा डल्ला मारला. मात्र यातील फारच कमी रक्कम त्याने ‘रिंगलीडर’ला (पाकिटमारांचा म्होरक्या) दिली. हे कळताच रिंगडिलरने हुसैनला बेदम मारहाण केली. कोवळ्या हुसैनने पाकिटमारीसाठी वापरण्यात येणारा छोटा वस्तरा रिंगलीडरच्या चेहऱ्यावर मारला. रिंगलीडरला बरेच टाके पडले. वस्तरा ज्या पद्धतीने मारला होता ते पाहता डॉक्टरही म्हणे त्यावेळी म्हणाले की, ही आता कायमची खूण राहील.तेव्हापासून तो हुसैन वस्तरा म्हणून गुन्हेगारी जगतात ओळखू जाऊ लागला. दाऊद टोळीशी नेहमीच त्याने पंगा घेतला. दाऊदच्या अड्ड्यांची माहिती तो पोलिसांना देत असे. त्यातूनच पोलिसांचा खास खबरी बनला. त्यातून त्याने अमाप माया कमावली. त्याचे राहणीमानही उच्च होते. महागड्या बाईक, गाड्या त्यावेळी तो वापरत असे.
… आणि तिने सपना नाव धारण केले
दाऊदला थेट दुबईमध्ये जाऊन मारणे शक्य नाही, असे हुसैन अश्रफला वारंवार बजावत होता. परंतु ती ऐकायला तयार नव्हती. दाऊदला मोठा फटका बसावा, यासाठी तिने दाऊदचे अड्डे, तस्करी तसेच त्याच्या हस्तकांबाबत पोलिसांना ‘खबरी’ म्हणून माहिती द्यायला सुरुवात केली. त्यामुळे दाऊदला फारसा पडत नाही, असे तिच्या लक्षात आले. दाऊदचा कट्टर विरोधक कोण, असेही तिने एकदा हुसैनला विचारले. तेव्हा त्याने ताडकन् अरुण गवळीचे नाव घेतले. अश्रफने थेट दगडी चाळीत जाऊन अरुण गवळीची भेट घेतली व आपला मनसुबा जाहीर केला. परंतु गवळीने अविश्वास दाखविला. मुस्लिम असल्यामुळे दाऊदनेच काहीतरी कट आखला नाही ना, असा गवळीला संशय आला आणि त्याने काहीही मदत करण्यास नकार दिला. मात्र आपण मुस्लिम असल्यामुळेच गवळीने आपल्याला मदत केली नाही, याची तिला खात्री झाली. मुस्लिम नावामुळे आपल्याला गुन्हेगारी जगतात फटका बसू शकतो, हे ओळखून अश्रफने आपले नाव बदलण्याचे ठरविले. दाऊदला मारणे हे आपले स्वप्न (हिंदीत सपना) आहे. ते पुरे करण्यासाठी आजपासून आपण ‘सपना’ नाव धारण करीत आहे, असे तिने हुसैनला सांगितले.
आपण काहीतरी केले पाहिजे, दाऊदला मोठा फटका बसला पाहिजे, असे सतत ती हुसैनला सांगत होती. दाऊदला एके ४७, पिस्तूल, काडतुसे आदी मोठा साठा पाकिस्तानातून काठमांडूमार्गे बिहारमधील सीमेवरून येत असे, अशी माहिती हुसैनकडे होती. हा शस्त्रसाठा ताब्यात घेतला तर दाऊदला मोठा फटका बसेल, असे सपनाला वाटत होते. त्यामुळे हुसैन व सपना हे काठमांडूत जाण्यासाठी बिहारमधील सीमावर्ती भागात गेले. दाऊदच्या शस्त्र तस्करीच्या मार्गाची माहिती मिळताच हुसैन व सपना दोघे काही दिवस पाळतीवर राहिले. दाऊदचा शस्त्रसाठा त्यांनी हस्तगत केला. कोलकता येथे या शस्रसाठ्याची विल्हेवाट लावली तर चांगले पैसे मिळतील, असे हुसैन सांगत होता. परंतु सपना ऐकायला तयार नव्हती. दाऊदचा असा बराचसा शस्रसाठा पकडून तो खोऱ्यात टाकून देण्यात आला. परंतु त्याने दाऊदला फारसा फरक पडत नसल्याचे सपनाला जाणवले. त्यामुळे दोघांनी मुंबईत राहूनच दाऊदला धक्का देण्याचे ठरवले.
दाऊदच्या हस्तकांमध्ये सपना या नावाची दहशत पसरली. दाऊदच्या अनेक अड्ड्यांची माहिती पोलिसांना मिळत होती व छापे पडत होते. त्यामुळे दाऊदचे हस्तक हैराण झाले होते. दाऊदचे गुंड तिच्या पाळतीवर होते. मध्यरात्रीच्या वेळी ती पळतच हुसैनच्या घरी आली. आपल्यामागे दाऊदचे गुंड लागले आहेत. ते आपल्यावर बलात्कार करतील, अशी भीती तिने व्यक्त केली. हुसैनने तात्काळ आपली जर्मन माऊझर पिस्तूल घेतली व तो थेट इमारतीच्या खाली गेला. परंतु तेथे कुणी नव्हते. हुसैनच्या इमारतीत घुसण्याची दाऊदच्या गुंडांची हिंमत नव्हती. हुसैनने तिला धीर दिला. तिला आलिंगन दिले. ती काही बोलत नसल्याने हुसैनने तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भानावर आलेल्या सपनाने हुसैनला ढकलून दिले व तेथून ती तडक बाहेर पडली ती हुसैनला पुन्हा न भेटण्याचा पण करूनच.
मुस्लिम तरुणांनाच दाऊदविरोधात एकत्र केले
सपनाने नंतर काही मुस्लिम तरुणांना दाऊदविरुद्ध एकत्र केले. दाऊद आपल्या कौममधील लोकांच्याच कशा हत्या करीत आहे, असा ब्रेनवॉश केला. अल्पावधीतच ती त्यांची ‘सपना दीदी’ झाली. पोलिसांची अज्ञात खबरी म्हणून ती दाऊदच्या गुडांच्या कारवायांची माहिती पोलिसांना देत होती. त्यातच तिने दाऊदला मारण्याची योजना आखण्यास सुरुवात केली. त्यावेळी शारजा येथील क्रिकेट सामन्यात दाऊद अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या कक्षात दिसतो हे तिने पाहिले होते. याच ठिकाणी दाऊदला ठार मारण्याची योजना तिने आखली होती. सपनाचे हस्तक शारजात जाऊन दाऊद बसतो, त्या जवळची तिकिटे खरेदी करणार होते व ती दाऊदवर जीवघेणा हल्ला करणार होती. तिने तसे आपले हस्तक तयार केले होते. परंतु यापैकी एक हस्तक फुटला व त्याने या योजनेची छोटा शकीलला माहिती दिली. मग छोटा शकीलने सपनाचाच काटा काढण्याचे ठरवले.
नागपाडा येथील हुजरा मोहल्ला येथे सपनाने छोटे घर विकत घेतले होते. हुजरा मोहल्ला हा छोट्या-मोठ्या गुंडांचा अड्डा. कपड्यांची दुकाने आठ वाजता बंद झाली की, या गुंडांचेच राज्य असायचे. जुगार, चोरी-दरोड्याचे कट, पाकिटमारीचे नवे तंत्र आदींची येथेच पहिल्यांदा चर्चा व्हायची. दाऊदचा मुसाफिरखाना या मोहल्ल्यापासून काही अंतरावर होता. कदाचित त्यामुळेच सपनाने या जागेची निवड केली असावी. दाऊदची हत्या करणे हे काही केल्या तिच्या डोक्यातून जात नव्हते. सपना नेहमी साथीदारांच्या घोळक्यात असायची. परंतु १९९४ चा काळ असावा. सपनाला ताप भरला होता. आपल्याला एकटे राहायचे आहे, असे तिने सर्व साथीदारांना सांगितले. ती घरात एकटी असल्याची बातमी सपनाच्याच एका साथीदाराने छोटा शकीलपर्यंत पोहोचविली. काही क्षणात लाल रंगाच्या मारुती गाडीतून चारजण आले ते थेट सपनाच्या घरी गेले. आजारी असलेल्या सपनाला काही कळायच्या आत तिला खेचत इमारतीच्या खाली आणले व सर्वांदेखत तिला लाथा-बुक्क्यांनी बदडले. तिच्यावर तसेच गुप्तांगावर चॅापरने इतके वार केले की, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सपनाचा जागीच मृत्यू झाला. सपना ओरडत होती, मदतीसाठी याचना करीत होती. परंतु ती माणसे दाऊद व छोटा शकीलची असल्यामुळे कुणी पुढे आले नाही. दाऊदशी पंगा घेतला तर काय हाल होऊ शकतात, याची चुणूकच सपनाच्या हत्येने दाखवून दिली गेली. गुन्हेगारी जगतात या अंगावर शहारे आणणाऱ्या हत्येची चर्चा बराच काळ सुरु होती. दाऊदची दहशत आणखीच वाढली.
हुसैनला त्याच्या माणसांमार्फत सपनावरील हल्ल्याची माहिती मिळाली. तो घटनास्थळी व नंतर रुग्णालयात गेला. त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता. तो हळहळला. परंतु काहीही करु शकत नव्हता. सपनाला मदत केल्याची त्यालाही भरपाई करावी लागली. ११ सप्टेंबर १९९८ या दिवशी पठ्ठे बाबुराव मार्गावर आपल्या मैत्रिणीला भेटून बाहेर आलेल्या हुसैनच्या शरीराची दाऊदच्या गुंडांनी चाळण केली. या दोन्ही हत्येप्रकरणात पोलिसांनी छोटा शकील टोळीतील काहीजणांना अटक केली. परंतु नंतर पुराव्याअभावी त्यांची सुटका झाली. दाऊद वा छोटा शकील टोळीविरोधात साक्ष देण्यासाठी कुणी पुढे यायचेच नाही, हेच त्यामागील कारण… पतीच्या हत्येचा बदला घेण्याचे अश्रफ ऊर्फ सपना दीदीचे ‘स्वप्न’ मात्र अधुरेच राहिले…
(पुढील भागात : मटका किंग पतीची हत्या करणारी जया छेडा ! )
(संदर्भ : माफिया क्विन्स ऑफ मुंबई : एस हुसैन झैदी आणि जेन बोर्जेस, गुन्हे अन्वेषण विभागातील काही निवृत्त अधिकारी)
