Pakistan Asim Munir Warning to India : पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर सोमवारी ‘चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस’ पदावर विराजमान झाले. रावळपिंडी येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमातून त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ किताब देण्यात आला. यादरम्यान संरक्षण दलाची सर्व सूत्रे हाती येताच मुनीर यांनी भारताविरोधात पुन्हा गरळ ओकण्याचे काम केले. आपल्या भाषणातून त्यांनी भारत-पाकिस्तान सीमेसह देशाची सुरक्षा आणि दहशतवादासंबंधीचे अनेक मुद्दे मांडले. नेमके काय म्हणाले असीम मुनीर? त्यांनी भारताला काय इशारा दिला? त्याविषयीचा हा आढावा…

असीम मुनीर यांचा भारताला इशारा

भारताने कोणत्याही भ्रमात राहू नये, त्यांनी आपल्या देशावर कोणताही हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला पाकिस्तानही कठोर प्रत्युत्तर देईन, असे असीम मुनीर म्हणाले. यावेळी त्यांनी अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारलाही तीव्र इशारा दिला आहे. तालिबानने सीमावर्ती भागात शांतता ठेवण्यास नकार दिल्यास त्यांनाही चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे मुनीर यांनी म्हटले आहे. पाकिस्तान हा एक शांतताप्रिय देश असून, त्याच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेला कुणीही नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केल्यास त्याची खैर केली जाणार नाही, असा इशाराही मुनीर यांनी दिला. त्यांचे हे वक्तव्य भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या लष्करी मोहिमेला उद्देशून असल्याचे मानले जात आहे.

असीम मुनीर यांची चिथावणीखोर विधाने

असीम मुनीर यांची चिथावणीखोर विधाने करण्याची पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी भारताविरोधात अनेकदा गरळ ओकलेली आहे. त्यांची चिथावणीची भाषा पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या आधीपासूनच सुरू आहे. एप्रिललमध्ये इस्लामाबादमध्ये केलेल्या एका भाषणातून त्यांनी १९४७ मध्ये भारताच्या फाळणीला कारणीभूत ठरलेल्या वादग्रस्त द्विराष्ट्र सिद्धांताचे समर्थन केले होते. “आपली भूमिका पूर्णपणे स्पष्ट आहे. काश्मीर आपल्या गळ्याची नस होती आणि ती कायमच आमच्या गळ्याची नस आहे हे आम्ही विसरणार नाही. आम्ही आमच्या काश्मिरी बांधवांना त्यांच्या संघर्षाच्या काळात एकटे सोडणार नाही”, असे मुनीर म्हणाले होते.

आणखी वाचा : Vande Mataram PM Modi: ‘वंदे मातरम्’चे तुकडे काँग्रेसने केल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप? इतिहास काय सांगतो?

एप्रिलमध्ये झाला होता दहशतवादी हल्ला

पाकिस्तानी नागरिकांनी त्यांच्या मुलांना आपला देश कसा निर्माण झाला हे सांगण्याचे आवाहन मुनीर यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर काही दिवसांतच दहशतवाद्यांनी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला घडवून आणला होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर ही लष्करी मोहीम राबवीत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. भारताच्या या कारवाईला सुरुवातीला पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला; पण भारतीय लष्कराने तो यशस्वीरीत्या हाणून पाडला होता. ऑपरेशन सिंदूरमुळे भेदरलेल्या पाकिस्तानने भारतीय लष्करप्रमुखांना फोन करून, त्यांच्यासमोर युद्धविरामाची झोळी पसरवली होती. त्यानंतरच दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाला होता.

फेब्रुवारीमध्येही मुनीर यांनी दिला होता इशारा

फेब्रुवारीमध्येही असीम मुनीर यांनी पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुजफ्फराबाद येथून भारताला इशारा दिला होता. काश्मीरसाठी आधीच तीन युद्धे झाली आहेत. गरज पडल्यास आणखी १० युद्धे करावी लागली तरी आम्ही करू, असे ते म्हणाले होते. ऑगस्टमध्ये अमेरिका दौऱ्यावर असताना त्यांनी काश्मीर विषयावर पुन्हा भाष्य केले होते. काश्मीर हा भारत आणि पाकिस्तानचा अंतर्गत मुद्दा नसून, निकाली न निघालेला एक आंतरराष्ट्रीय प्रश्न असल्याचे ते म्हणाले होते. मुनीर यांनी सिंधू जल कराराबाबतही भारतावर टीका केली होती. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने हा करार स्थगित करण्याच्या निर्णय घेतल्यानंतर मुनीर यांनी संताप व्यक्त केला होता. सिंधू या नदीचा प्रवाह भारतीयांची कौटुंबिक मालमत्ता नाही. भारत जर सिंधू नदीवर जर धरण बांधत असेल, तर आम्ही त्याची वाट पाहू आणि धरण बांधल्यास ते उद्ध्वस्त करू, अशी धमकीही त्यांनी दिली होती.

मुनीर यांच्या वक्तव्यांमागची कारणे काय?

असीम मुनीर यांनी सतत भारताविरुद्ध युद्धखोर भाषा वापरण्याचे कारण केवळ भारत–पाकिस्तानमधील दशकांपासूनचे वैर एवढेच नाही. काश्मीर हा आमचाच भाग असल्याचा दावा पाकिस्तानकडून सातत्याने केला जातो. त्यांचा हा दावा भारतानेही वेळोवेळी फेटाळून लावला आहे. पाकिस्तानच्या लष्करप्रमुख पदाची सूत्रे हाती आल्यानंतर मुनीर यांनी हाच मुद्दा पुढे रेटून धरला आहे. काश्मीर हा एक दिवस भारताच्या ताब्यातून मुक्त होऊन पाकिस्तानचा भाग होईल, अशी खोटी आश्वासने ते आपल्या देशातील जनतेला देत आहेत. याच आश्वासनांमुळे पाकिस्तानी जनतेचाही मुनीर यांच्यावरील विश्वास अधिकच बळकट झाल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. मुनीर यांची भारतविरोधी भाषा ही केवळ राजकीय नव्हे, तर पाकिस्तानच्या लष्कराला राष्ट्रीय ओळख आणि इस्लामचे रक्षणकर्ते म्हणून सादर करण्याच्या व्यापक विचारसरणीचा भाग असल्याचे द प्रिंटने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

हेही वाचा : Vasco da Gama cruelty: नंबूदिरी ब्राह्मणांचे कान कापले, ३०० यात्रेकरूंना जिवंत जाळले; वास्को द गामाच्या अत्याचाराची कथा काय सांगते?

भारताने मुनीर यांच्या विधानांकडे कसे पाहावे?

तज्ज्ञांच्या मते, मुनीर यांनी पाकिस्तानमधील नागरी सरकारला कमकुवत करण्याचे काम केले आहे. सध्या पाकिस्तानातील जनता महागाईने त्रस्त असून, देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. त्यातच सिंधू नदीच्या पश्चिमेकडील भागात गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे चीनही चिंतीत झाला असून, त्यांनी पाकिस्तानमधील आपले नवीन प्रकल्प थांबवले आहेत. मुनीर यांच्या कार्यकाळात पाकिस्तानातील अंतर्गत तणाव आणि लष्करी नेतृत्वातील अपयश अधिक स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षात देशात ७८४ दहशतवादी हल्ले झाले असून, त्यात ५७९ लोकांचा मृत्यू झाला आहे. २०१५ नंतरचा हा सर्वांत मोठा आकडा आहे. हेच अपयश झाकण्यासाठी मुनीर भारताविरोधात चिथावणीची भाषा करून, लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारताने अशा धमक्यांकडे फारसे लक्ष देण्याची गरज नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.