ईशान्येकडील सर्वात मोठे राज्य आसाम. येथे येत्या तीन ते चार महिन्यांत विधानसभा निवडणूक होईल. गेली दहा वर्षे राज्यात भाजपची सत्ता आहे. सध्या बहुसंख्य जनमत चाचण्यांमध्ये भाजपला आघाडी दर्शवली जातेय. अर्थात या चाचण्या नेहमीच खऱ्या ठरत नाहीत. भाजप नेते व मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांच्या नेतृत्वाची कसोटी या निवडणुकीत लागेल. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई हे त्यांच्या पक्षाला सत्तेत आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. चहाचे मळे, बराक खोरे, बोडोप्रदेश अशी विविधता असलेल्या या राज्यांत सत्तारूढ भाजप विरुद्ध काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांतच सामना होईल.

मुख्यमंत्री सरमा केंद्रस्थानी

राज्यात भाजपने आसाम गण परिषद, युनायटेड पार्टी पीपल्स लीबरल तसेच बोडोलँड पीपल्स फ्रंट या पक्षांशी आघाडी केली. गेल्या वेळी विधानसभेच्या एकूण १२६ जागांपैकी भाजपला ६५ जागा जिंकता आल्या. मित्र पक्षांसह त्यांचा आकडा ७५च्या घरात गेला. त्या अर्थाने मोठे बहुमत असले तरी, सलग दहा वर्षे सत्तेत असल्याने काही प्रमाणात जनतेची नाराजी आहे. सरकारने मोठ्या प्रमाणात आश्वासने दिली. मात्र अनेक प्रश्न सुटले नाहीत अशी तक्रार आहे. राज्यात पुन्हा भाजपचे सरकार आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आणखी किमान पाच वर्षे राज्याच्या राजकारणात सक्रिय राहणार असल्याचे ५७ वर्षी सरमा यांनी नमूद केले. नंतर पुढे पाहू असे सांगत केंद्रातील राजकारणात जाण्याबाबत थेट भाष्य केले नाही.

आसाममधील निवडणुकीत घुसखोरांचा मुद्दा नेहमीच केंद्रस्थानी असतो. सीमेपलीकडील बांगलादेशमधून बेकायदा स्थलांतर होते. त्यामुळे आसाममध्ये लोकसंख्याशास्त्रीय बदल (डेमॉग्राफी) होण्याची भीती भाजप व मित्र पक्षांचे नेते वारंवार व्यक्त करतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकताच राज्याचा दौरा केला. भाषणात गेल्या दहा वर्षांत घुसखोरी थांबल्याचे नमूद करत, भाजप पुन्हा सत्तेत आल्यावर घुसखोरांना हाकलून लावले जाईल अशी घोषणा केली. तसेच सरमा हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असे स्पष्ट केले. सरमा हे ईशान्येकडील भाजपशासित राज्यांमध्ये केंद्राशी समन्वय साधणारे प्रमुख नेते मानले जातात. प्रचाराची सारी धुरा त्यांच्याकडे एकहाती असेल.

ध्रुवीकरणाचे राजकारण

आसाममध्ये ३५ टक्के मुस्लीम मतदार आहेत. गेल्या म्हणजेच २०११ च्या जनगणनेनुसार राज्यात मुस्लिमांची संख्या ३४.२२ टक्के इतकी होती. मुस्लीमबहुल असे विधानसभेचे २२ ते २९ मतदारसंघ आहेत. राज्यातील ९० मतदारसंघात मूळ आसामींचे तर जवळपास १० मतदारसंघांत बंगाली भाषकांचे प्रभुत्व मानले जाते. उर्वरित आदिवासीबहुल आहेत. मतदारसंघ फेररचनेनंतर (२०२३) भाजपला सोईची होईल अशीच रचना केल्याचा विरोधकांचा आरोप आहे. ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंट (एआययूडीएफ) चे सध्या १५ आमदार आहेत. मुस्लीमबहुल भागातून हे विजयी झाले आहेत.

मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा हे कडव्या हिंदुत्ववादी भूमिकेसाठी ओळखले जातात. मिया या त्यांच्या शब्दावरून वादही झाला होता. आताही भाजपने शंभर जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. मुस्लीमबहुल मतदारसंघात एआययूडीएफ विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष अपेक्षित आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडे २२ जागा आहेत. मात्र गेल्या दोन निवडणुकांत विरोधात बसावे लागल्याने काँग्रेसला राज्यात कार्यकर्ते टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. काही वृत्त वाहिन्यांनी केलेल्या सर्वेक्षणात भाजपला ३४ ते ३६ टक्के तर काँग्रेसला ३२ टक्क्यांच्या आसपास मते यंदा मिळतील असा अंदाज वर्तवलाय. अर्थात अजून मतदानाला तीन ते चार महिन्यांचा कालावधी असला तरी यातून राज्यात चुरस असल्याचा अंदाज बांधता येतो.

विरोधकांत ऐक्याचा अभाव

विरोधकांनी भाजपला आव्हान देण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय. मात्र राज्यात अद्याप काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडीत जागा वाटप झाले नाही. काँग्रेससह आठ पक्षांच्या या आघाडीत रैजोर दल, दि आसाम जातीय परिषद, आंचलीक गण मोर्चा, ऑल पार्टी हिल लीडर्स कॉन्फरन्स तसेच तीन डाव्या पक्षांचा समावेश आहे. काँग्रेसने १२६ पैकी १०० जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय घेतला. मात्र कोणत्या जागा कोणाला द्यायच्या हे निश्चित होत नसल्याने भाजपला आव्हान देणारी आघाडी कशी उभारणार, असा मित्र पक्षांचा मुद्दा आहे.

राज्य काँग्रेस संघटनेत शैथिल्य असून उमेदवारी नाकारल्याने बंडाळीचा धोका काँग्रेसला वाटतोय. एकेका जागेसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पक्षनेतृत्व सावधपणे पावले टाकत आहे. तसेच एआययूडीएफची काँग्रेस युती करणार नसल्याचे स्पष्टीकरण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई यांनी दिले. गेल्या म्हणजेच २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र होते. राज्यात एआययूडीएफ ३० ते ३२ जागा लढेल. याद्वारे आसाममध्ये बहुरंगी सामना होईल. त्याचा लाभ भाजपलाच अधिक मिळण्याची शक्यता आहे. आसाम अस्मिता, मतचोरी, घुसखोरी हेच प्रमुख मुद्दे यावेळी निवडणुकीच्या तोंडावर दिसत आहेत.