Success Story Water Hyacinth: एकेकाळी तलाव, नद्या आणि ओढ्यांचा श्वास घोटणारी वनस्पती… मासेमारी, शेती, पाणीपुरवठा यावर गंडांतर आणणारा हिरवा राक्षस किंवा हिरवा शाप म्हणून ओळखली जाणारी पाणवनस्पती… ब्रिटिशांनी दिलेला शाप… पण आज मात्र हीच वनस्पती उःशाप मिळाल्यासारखी वरदान ठरते आहे. याच पाणवनस्पतीतून गावकऱ्यांच्या हाताला काम, महिलांच्या बँक खात्यात खात्यात उत्पन्न आणि पर्यावरणाला नवसंजीवनी मिळते आहे. पाणमेटेका म्हणजेच वॉटर हायसिंथ. आजवर ब्रिटिशांनी भारतात आणलेला हिरवा शाप म्हणून ओळखली जाणारी ही वनस्पती आसाममध्ये ‘शाप नव्हे तर वरदान’ कशी ठरली हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरावे. ही केवळ पर्यावरणाची नव्हे तर सामाजिक-आर्थिक परिवर्तनाचीही कथा आहे!
सजावटीचे साधन म्हणून भारतात…
पाणमेटेकाचा उगम दक्षिण अमेरिकेतील, अॅमेझॉनच्या खोऱ्यातला. पाण्यावर तरंगणारी हिरवी वनस्पती आणि त्यातून बाहेर माना डोकावणारी जांभळी-निळी फुले. अनेकदा हे चित्र दिसायला अतिशय मोहक दिसते. पाण्यावर तरंगणारी ही वनस्पती १९व्या शतकात युरोपियन वनस्पतीशास्त्रज्ञांची लाडकी होती. ब्रिटिश राजवटीत १८९६ च्या सुमारास, सजावटीच्या उद्देशाने ब्रिटिशांनी ही वनस्पती भारतात आणली.
जगातील सर्वाधिक धोकादायक जलतण
भारतात पोहोचल्यानंतर येथील उष्ण, दमट हवामानात पाणमेटेकाने अक्षरशः धुमाकूळ घातला. काही आठवड्यांत दुप्पट वाढणारी ही वनस्पती तलावांच्या पृष्ठभागावर वेगात पसरू लागली. सूर्यप्रकाश पाण्यात पोहोचेनासा झाला, पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले आणि स्थानिक जलचर, मासे, वनस्पती नष्ट होऊ लागले. डासांचे प्रमाण वाढले, जलवाहतूक ठप्प झाली. जागतिक पातळीवर तिला ‘जगातील सर्वात धोकादायक जलतण’ मानले जाते.
वीड टू वेल्थ
आसामसारख्या नद्या-तलावांनी समृद्ध असलेल्या राज्यात या समस्येचा फटका अधिक तीव्र होता. ब्रह्मपुत्रेच्या पात्रात आणि असंख्य ‘बील’मध्ये (स्थानिक तलाव) पाणमेटेकाने अक्षरशः त्याचे साम्राज्यच निर्माण केले. तलावात सर्वत्र पसरलेली पाणमेटेका म्हणजे काढून टाकून फेकून द्यायची वनस्पती म्हणूनच तिच्याकडे पाहिले जात होते. मात्र गेल्या दोन दशकांत परिस्थिती बदलते आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात फोफावणाऱ्या या वनस्पतीचा काही उपयोग करून घेता येईल का, या प्रश्नाने सारे काही बदलले. आसाममधील ग्रामीण स्वयं-सहायता गट, स्वयंसेवी संस्था आणि आसाम स्टेट रूरल लाइव्हलीहुड्स मिशन (ASRLM) यांनी पुढाकार घेतला. ‘वीड टू वेल्थ’ अर्थात पाणतणापासून संपत्ती ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयोग केला.

महिलांहाती उद्योग
पाणमेटेकाच्या देठांमध्ये मजबूत तंतू असतात. योग्य प्रक्रिया केल्यास त्यातून विणकाम शक्य आहे हेच आसामच्या महिलांनी सिद्ध केले. माजुली हे नदीमध्ये असलेले जगातील सर्वात मोठे बेट. या ठिकाणच्या महिलांनी पाणमेटेकापासून पिशव्या, टेबलमॅट, बास्केट, योगा मॅट्स तयार करण्यास सुरुवात केली. प्रशिक्षण, कर्जसुविधा आणि बाजारपेठ मिळाल्यानंतर अनेक महिलांचे वार्षिक उत्पन्न लाखभर रुपयांपर्यंत पोहोचले. मोरीगाव, तिनसुकिया, धेमाजी, कोकराझार अशा जिल्ह्यांतही हे मॉडेल यशस्वी ठरले. काही गावांत महिलांना दरमहा ८-१० हजार रुपये उत्पन्न मिळू लागले. पूर्वी शाप ठरलेली ही वनस्पती आता वरदान ठरत होती…
हस्तकलेपलीकडे… कागद, योगा मॅट आणि ब्रँडिंग
ही कथा केवळ हस्तकलेपुरती मर्यादित राहिली नाही. तर गुवाहाटीतील ‘कुंभि कागज’ या स्टार्टअपने पाणमेटेकापासून पर्यावरणपूरक हँडमेड कागद तयार करण्यास सुरुवात केली. रसायनमुक्त उत्पादनामुळे हा कागद पर्यावरणस्नेही बाजारात लोकप्रिय ठरतो आहे. दीपर बीलसारख्या जैवविविधतेने समृद्ध तलावांतून काढलेल्या पाणमेटेकापासून तयार झालेल्या योगा मॅट्स आज राष्ट्रीय पातळीवर विकल्या जात आहेत. त्याकडे सस्टेनेबल म्हणजेच शाश्वत विकासाचे आदर्श उदाहरण म्हणून पाहिले जात आहे.
जीआय टॅग आणि अधिकृत मान्यता
या प्रयत्नांना २०२४ मध्ये मोठी मान्यता मिळाली, जेव्हा ‘आसाम पाणीमेटेका क्राफ्ट’ ला भौगोलिक निर्देशांक (GI) टॅग देण्यात आला. यामुळे या उत्पादनांची ओळख संरक्षित झाली, बाजारपेठ विस्तारली आणि स्थानिक कारागिरांना अधिक चांगला दर मिळू लागला.
पर्यावरण आणि अर्थव्यवस्था- दोन्हींसाठी लाभ
आज पाणमेटेकाचे संकलन म्हणजे केवळ रोजगारनिर्मिती नाही, तर पर्यावरणाला संजीवनी देणारा मार्ग म्हणून त्याकडे पाहिले जाते. तलाव स्वच्छ होतात, मासेमारीमध्ये चांगला परिणाम दिसतो, पाण्याची गुणवत्ता सुधारते. एकेकाळी ब्रिटिशांनी आणलेला हा ‘परकीय शाप’ आज आसामच्या गावांसाठी स्वावलंबनाचे साधन ठरतो आहे. ही पाणमेटेकाची कथा सांगते की समस्यांकडे नावीण्यपूर्ण दृष्टिकोनातून पाहिले तर त्यातूनच चांगले उत्तर अर्थात वरदान जन्माला येऊ शकते.
संदर्भ-
- IUCN / Global Invasive Species Database – Eichhornia crassipes, Global classification as one of the world’s worst invasive aquatic plants, Source: IUCN & GISD
- Assam State Rural Livelihoods Mission (ASRLM) – Water Hyacinth Initiatives, Official documentation on ‘Weed to Wealth’ programmes, SHGs, livelihood generation, Source: Government of Assam
- The Hans India – Majuli Women Turn Water Hyacinth into Handicrafts. Income data, women SHGs, Majuli case study
- The Sentinel Assam – Assam Converts Water Hyacinth into Sustainable Livelihoods village-level impact, Morigaon district examples, monthly income figures
- Tinsukia district case study, biodiversity-linked livelihood model, The Better India – Assam Startup Makes Paper from Water Hyacinth
- AuthIndia – Women in Assam Weave Sustainable Yoga Mats, Deepor Beel initiative, eco-products, market linkage.
