At Operation Sindoor press briefing, Ramcharitmanas and Rashmirathi quoted: सोमवार, १२ मे रोजी झालेल्या ऑपरेशन सिंदूरच्या पत्रकार परिषदेत हवाई दलाचे (ऑपरेशन महासंचालक) एअर मार्शल ए. के. भारती यांनी सांगितले की, भारताने या कारवाईत फक्त दहशतवाद्यांना आणि त्यांच्या तळांना लक्ष्य केले होते. यात कोठेही पाकिस्तानच्या लष्कराला लक्ष्य करण्यात आले नव्हते. परंतु, पाकिस्तानच्या सशस्त्र दलांनी यामध्ये हस्तक्षेप करून दहशतवाद्यांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला. या पत्रकार परिषदेत ए. के.भारती यांच्या शेजारी लष्कराचे लेफ्टनंट जनरल राजीव घई आणि नौदलाचे व्हाइस अॅडमिरल ए. एन. प्रमोद उपस्थित होते.
विशेष म्हणजे, या पत्रकार परिषदेला सुरुवात करण्याआधी एका व्हिडिओच्या माध्यमातून काही कविता वाचण्यात आल्या. या ओळी प्रसिद्ध कवी रामधारी सिंह दिनकर यांच्या होत्या. नंतर, पत्रकारांनी या ओळींची निवड का केली हे विचारल्यावर एअर मार्शल भारती यांनी रामचरितमानसातील एक चौपाई सांगून त्यामागील संदेश काय होता हे स्पष्ट केले.
रश्मिरथीमधून घेतलेल्या आणि पत्रकार परिषदेत वाचल्या गेलेल्या ओळी
जब नाश मनुज पर छाता है, पहले विवेक मर जाता है। हित वचन न तूने माना, मैत्री का मूल न पहचाना, तो ले मैं भी अब जाता हूँ, अंतिम संकल्प सुनाता हूँ। याचना नहीं अब रण होगा, जीवन जय या कि मरण होगा।
…अब रण होगा
या ओळी रश्मिरथी या रामधारी सिंह दिनकर यांच्या महाकाव्यातून घेतल्या आहेत. हे काव्य महाभारतातील कर्णाच्या दृष्टिकोनातून लिहिले गेले आहे. या ओळी ‘कृष्ण की चेतावनी’ या प्रकरणात येतात. जेव्हा पांडव आणि कौरवांमध्ये युद्ध अटळ असते, तेव्हा भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाकडे शांतता प्रस्थापित करण्याची विनंती करतात. ते पांडवांच्या वतीने आश्वासन देतात की, जर दुर्योधनाने पाच गावं दिली, तर ते हस्तिनापूरच्या सिंहासनाचा त्याग करतील. अहंकारात बुडालेल्या दुर्योधनाने मात्र ही विनंती धुडकावून लावली. इतक्यावरच तो थांबला नाही तर त्याने श्रीकृष्णाला पकडून बंदिवासात टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु, कृष्णाने त्याच क्षणी विराट रूप धारण केले, आणि दुर्योधनाला इशारा दिली.
शांततेचे प्रयत्न फसले…
या प्रसंगातून हा बोध होतो की, पांडवांनी कितीही वेळा शांततेचा मार्ग निवडला तरी त्यांचे सर्व प्रयत्न फसले. म्हणूनच त्यांनी युद्धाचा मार्ग निवडला. त्यांनी योग्य रणनीति आणि धैर्याने युद्ध करून कौरवांचा पराभव केला. म्हणूनच या ओळी पाकिस्तानविरोधात झालेल्या कारवाईनंतर पत्रकार परिषदेत सादर होणे हा एक सूचक निर्णय होता.
रामचरितमानसचा संदर्भ
पत्रकार परिषदेनंतर एका पत्रकाराने भारती यांना विचारले की, या कविता निवडण्यामागील हेतू काय होता? त्यावर त्यांनी उत्तर दिलं की, “मी फक्त तुम्हाला रामचरितमानसातील काही ओळींची आठवण करू देऊ इच्छितो; ‘बिनय न माने जलधि जड़, भय बिन होइ न प्रीत।बोले राम सकोप तब, भय बिन होइ न प्रीत।’ समजुतदार व्यक्तीसाठी इशाराही पुरेसा असतो.”
या चौपाईचा अर्थ: प्रभू रामाने लंकेत जाण्यासाठी मार्ग करून द्यावा, अशी समुद्राकडे प्रार्थना केली होती. परंतु, तीन दिवस उलटले तरी समुद्राने काहीही प्रतिसाद दिला नाही. शेवटी रामाने रागाने बाण उचलला. त्याबरोबर समुद्र देव प्रकट झाला. त्याने रामाची माफी मागितली आणि मार्ग मोकळा करून दिला. ‘भय बिन होइ न प्रीत’ म्हणजेच, भीती ही प्रेम किंवा सौहार्द टिकवण्यासाठी आवश्यक असते. जर एखादा व्यक्ती शक्तिहीन असेल, तर त्याला आदर मिळत नाही, ना समान वागणूक.
दिनकरांची या विषयावरची टिप्पणी; रामधारी सिंह दिनकर यांनी सुद्धा या प्रसंगावर भाष्य केले आहे.
“सच पूछो तो शर में हीबसती है दीप्ति विनय की।संधि वचन संपूज्य उसी का,जिसमें शक्ति विजय की।”
अर्थ: “खरं सांगायचं झालं, तर बाणातच विनयाची दीप्ती असते. ज्याच्याकडे विजय मिळवण्याची क्षमता असते, त्याचेच लोक ऐकतात.”
त्याचप्रमाणे त्यांची एक प्रसिद्ध ओळ अशीही आहे; “क्षमा शोभती उस भुजंग कोजिसके पास गरल हो। उसको क्या जो दंतीन, विष रहित, विनीत, सरल हो।”
क्षमाशीलता नागाला शोभते
अर्थ: “क्षमाशीलता त्या नागाला शोभते, ज्याच्याकडे विष आहे. ज्याच्याकडे विष नाही, ना दात आणि मग तो क्षमाशील असला, तरी त्याचा कोणीही आदर करत नाही.”
सामर्थ्य असेल तर वाटाघाटींचा आदर
एकुणातच, या कविता आणि चौपायांचा उपयोग करून भारताने पाकिस्तानला एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. शांततेच्या वाटाघाटींचा आदर तेव्हाच होतो, जेव्हा तुमच्याकडे सामर्थ्य असते. विनाश टाळण्यासाठी भारताने संयम ठेवला, परंतु जेव्हा विरोधक सामंजस्य नाकारतात, तेव्हा निर्णायक कारवाई अटळ असते.