AMOC Impact on Indian Monsoon : अटलांटिक महासागरातील जलप्रवाहांच्या एका महाकाय प्रणालीच्या स्थिरतेबाबत शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. एका नवीन संशोधनात, ही प्रणाली तिच्या पूर्वीच्या अंदाजापेक्षा कितीतरी अधिक वेगाने कमकुवत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ‘AMOC’ म्हणजेच अटलांटिक मेरिडिओनल ओव्हरटर्निंग सर्कुलेशन म्हणून ओळखली जाणारी ही प्रणाली जगातील मोठ्या भागातील हवामान नियंत्रित करते. २१०० सालापर्यंत या प्रणालीत सुमारे ५९ टक्के घट होण्याची शक्यता असल्याने त्याचा थेट परिणाम भारतीय उपखंडापर्यंतच्या हवामान पद्धतींवर होऊ शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. हा निष्कर्ष भारतासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे, कारण देशातील कोट्यवधी लोकांचे जीवन आणि उपजीविका थेट मान्सूनवर अवलंबून आहे. या पार्श्वभूमीवर ‘AMOC’ प्रणाली नेमकी आहे तरी काय? तिचा भारतातील मान्सूनवर काय परिणाम होणार, त्याविषयीचा हा आढावा…
AMOC प्रणाली म्हणजे काय?
पृथ्वीवरील महासागरांचा विचार केल्यास ते एका विशाल आणि अदृश्य ‘कन्वेयर बेल्ट’सारखे कार्य करतात. अटलांटिक महासागरात या प्रवाहांच्या जटिल व्यवस्थेला वैज्ञानिक भाषेत ‘अटलांटिक मेरिडिओनल ओव्हरटर्निंग सर्क्युलेशन’ (AMOC) असे म्हणतात. ही प्रणाली उष्ण आणि थंड पाण्याचे वहन करून जगभरात हवामानाचे संतुलन राखण्याचे काम करते. भारतातील कोट्यवधी लोकांचे जीवन आणि उपजीविका मान्सूनवर अवलंबून आहे. मान्सूनमध्ये व्यत्यय आल्यास शेतीसाठी लागणाऱ्या पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. पृथ्वीच्या हवामानाचे संतुलन राखण्यासाठी महासागरांमध्ये एक प्रचंड मोठी आणि संथ प्रणाली रात्रंदिवस कार्यरत असते. उष्ण कटिबंधातील उबदार पाणी उत्तर ध्रुवाकडे नेणारी आणि थंड पाणी पुन्हा दक्षिणेकडे आणणारी ही प्रक्रिया जगभरातील पावसाचे चक्र आणि तापमानावर नियंत्रण ठेवते.
या प्रक्रियेद्वारे उष्ण कटिबंधातील उबदार आणि क्षारयुक्त पाणी पृष्ठभागावरून उत्तरेकडे ग्रीनलँडच्या दिशेने वाहते. आर्क्टिक प्रदेशात पोहोचल्यानंतर हे पाणी थंड होते आणि त्याची घनता वाढते. त्यानंतर हे थंड पाणी तळाखालून दक्षिणेकडे वाहू लागते आणि पुढे जाऊन पुन्हा पृष्ठभागावर येते, जिथे ते उबदार होऊन पुन्हा हे चक्र सुरू करते. ही संथ पण सातत्यपूर्ण प्रक्रिया जगभरात प्रचंड प्रमाणात उष्णतेचे वहन करते. याच्या गतीचा अंदाज द्यायचा झाल्यास, केवळ एक घनमीटर पाण्याला हा पूर्ण प्रवास करण्यासाठी सुमारे १,००० वर्षे लागतात. याच प्रक्रियेमुळे युरोपमध्ये तुलनेने अधिक सौम्य हवामान आढळते; तसेच आफ्रिका, अमेरिका आणि विशेषतः आशियातील पावसाच्या प्रमाणावर या जलप्रवाहांचा मोठा प्रभाव पडतो. जर जागतिक तापमानवाढीमुळे ही यंत्रणा विस्कळीत झाली, तर भारतासह आशियातील मान्सूनचे गणित पूर्णपणे बिघडू शकते, असा इशारा पर्यावरण तज्ज्ञांनी दिला आहे.
प्रवाहांचा वेग का मंदावत आहे?
समुद्रातील ‘कन्वेयर बेल्ट’ म्हणजेच Atlantic Meridional Overturning Circulation अत्यंत नाजूक संतुलनावर आधारित आहे. विशेषतः पाण्याचे तापमान आणि खारटपणा यावर त्याची प्रक्रिया अवलंबून असते. मात्र, मानवनिर्मित हवामान बदलामुळे आर्क्टिक प्रदेशामधील बर्फ झपाट्याने वितळत आहे, त्यामुळे उत्तर अटलांटिक महासागरात मोठ्या प्रमाणावर गोडे पाणी मिसळत आहे. गोडे पाणी हे खाऱ्या पाण्यापेक्षा हलके असते, त्यामुळे ते समुद्राच्या तळाशी सहजपणे उतरत नाही. परिणामी AMOC प्रणालीवर जणू ‘ब्रेक’ लागल्यासारखा परिणाम होत आहे. गेल्या ५० वर्षांत या प्रवाहांचा वेग १५ टक्क्यांनी कमी झाल्याचा अंदाज जुन्या अभ्यासांनी वर्तवला होता. मात्र, नवीन संशोधनानुसार २१०० सालापर्यंत ही प्रणाली ५९ टक्क्यांनी कमकुवत होऊ शकते. या प्रक्रियेचा अचूक कालावधी काय असेल याबाबत शास्त्रज्ञांमध्ये मतभेद आहेत, पण काहींच्या मते हे या शतकातच घडू शकते.
तज्ज्ञांनी काय दिला इशारा?
पृथ्वीचे हवामान नियंत्रित करणारा महासागरातील ‘कन्व्हेयर बेल्ट’ आता एका अशा वळणावर पोहोचला आहे, जिथून त्याचे परत फिरणे अशक्य होऊ शकते. शास्त्रज्ञांनी याला ‘टिपिंग पॉइंट’ असे संबोधले आहे. या प्रक्रियेचे संतुलन बिघडल्यास जागतिक स्तरावर हवामानाचा हाहाःकार उडू शकतो. ज्याप्रमाणे एखादी खुर्ची एका मर्यादेपर्यंत तिरकी केल्यास ती पुन्हा सरळ होऊ शकते, पण त्या मर्यादेच्या पलीकडे झुकल्यास ती कायमची कोसळते; तसेच काहीसे महासागरातील प्रवाहांच्या बाबतीत होऊ शकते. जर हा ‘टिपिंग पॉइंट’ ओलांडला गेला, तर त्याचे परिणाम विनाशकारी असतील. उत्तर अमेरिकेतील समुद्रकिनाऱ्यांवरील पाणी पातळीत प्रचंड वाढ होईल, जगभरातील हवामान चक्र विस्कळीत होऊन अतिवृष्टी किंवा तीव्र दुष्काळासारखी संकटे वारंवार उद्भवतील, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
एल निनोचा धोका वाढणार?
‘AMOC’ ही प्रणाली अटलांटिक महासागरात असली तरी तिचे विघटन झाल्यास त्याचे पडसाद प्रशांत महासागरात उमटतील आणि पर्यायाने भारताच्या मान्सूनमध्ये मोठा हाहाःकार उडेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. ‘एल निनो’ ही पॅसिफिक महासागराशी संबंधित नैसर्गिक हवामान प्रक्रिया आहे. मध्य आणि पूर्व पॅसिफिकमधील समुद्राच्या पाण्याचे तापमान जेव्हा सामान्यपेक्षा जास्त वाढते, तेव्हा वातावरणातील वाऱ्यांचे प्रवाह, ढगांची निर्मिती आणि पावसाचे चक्र बदलते. हा बदल दिसायला लहान असला तरी त्याचा परिणाम संपूर्ण जगाच्या हवामान प्रणालीवर होतो. काही ठिकाणी दुष्काळ, तर काही ठिकाणी अतिवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण होते. अटलांटिकमधील ‘कन्व्हेयर बेल्ट’ मंदावल्यामुळे दक्षिण गोलार्धात उष्णता साचून राहते, तर उत्तर प्रशांत महासागर थंड पडतो. तापमानातील या असंतुलनामुळे ‘एल निनो’च्या घटना अधिक टोकाच्या आणि अनपेक्षित होतील. २०१५-१६ आणि २०२३-२४ मधील शक्तिशाली एल निनोमुळे आधीच जगभरात दुष्काळ आणि दक्षिण आशियात कमी पावसाची नोंद झाली आहे. भविष्यात ही परिस्थिती अधिक भीषण होऊ शकते.
भारताच्या अन्नसुरक्षेला मोठा धोका?
भारतासाठी AMOC चे कोसळणे अन्नसुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकते. संशोधनानुसार, यामुळे अरबी समुद्रातून आर्द्रता वाहून नेणारी पवन यंत्रणा कमकुवत होईल. परिणामी, पावसाळ्याचा कालावधी कमी होऊन कोरड्या हवामानाचे प्रमाण वाढेल. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा मोठा कणा मानला जातो. मात्र, अटलांटिकमधील या बदलांमुळे भारतीय शेतकरी दुहेरी संकटात सापडण्याची शक्यता आहे. एका बाजूला तीव्र दुष्काळ तर दुसऱ्या बाजूला अनियमित आणि विनाशकारी महापूर अशा टोकाच्या हवामानाचा सामना करावा लागू शकतो. पावसाच्या लहरीपणामुळे पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होऊन भविष्यात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. एकंदरीत जागतिक महासागरातील प्रवाहांचे हे एकमेकांशी जोडलेले जाळे विस्कळीत झाल्यास त्याचे सर्वात मोठे नुकसान भारतासारख्या शेतीप्रधान देशाला सोसावे लागू शकते, त्यामुळेच शास्त्रज्ञ या बदलांकडे ‘हवामान आणीबाणी’ म्हणून पाहत आहेत.
